अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं.
मुंबईच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला. लेविस जीन्स (आणि वर टी-शर्ट) घालून. दोन वर्षांपूर्वी याच फॅशन महोत्सवात कुणा मॉडेलचं (अनवधानानं) वस्त्रहरण झाल्यानं कोण गदारोळ उठला होता! अक्षयला दोन वर्षांत काही चर्चा झाली नसल्याचं वैषम्य वाटलं असावं. त्यानं स्वतःच आपलं वस्त्रहरण करून घेतलं, तेही चारचौघात! आणि स्वतःच्या अधिकृत धर्मपत्नीच्याच हातून!
"दम भर जो उधर मूँह फेरे ओ चंदा...मैं तुमसे प्यार कर लूँगी' म्हणणारी लाजाळू नायिका काळाच्या पडद्याआड गेली. आता जमाना आहे "जरा जरा टच मी किस मी होल्ड मी' वगैरे म्हणून नायकाला थेट आव्हान देणाऱ्या मदमस्त फटाकड्यांचा! "टल्ली हो गई' म्हणून भर मैफलीत धिंगाणा घालणाऱ्या बिनधास्त युवतींचा. बॉलिवूडच्या एका हॉट जोडीनं या बदलत्या जमान्याचं प्रात्यक्षिक 30 मार्चच्या संध्याकाळी दाखवून सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.
झालं असं, की मुंबईच्या फॅशन वीक मध्ये लेविस जीन्सची जाहिरात करण्यासाठी रॅम्पवर आलेल्या अक्षयकुमारला समोर धर्मपत्नी ट्विंकल बसलेली पाहून एक "खट्याळ' प्रकार सुचला. तो रॅम्पवरून खाली उतरला आणि थेट तिच्यासमोर उभा राहिला. शर्ट वर करून त्यानं तिला (आपल्या!) पॅंटचं बटण काढायला सांगितलं. कशी का होइना, भारतीय नारीच ती! बावरली हो बिच्चारी! पती झाला म्हणून काय झालं, त्याच्या पॅंटचं बटण काढायचं? चारचौघांदेखत?
ती लाजली. हा हुरळला. मग यानंच लाडंलाडं तिचा हात आपल्या पॅंटजवळ घेतला आणि तिला बटण काढायला लावलं. शेजारीपाजारी बसलेल्यांनी अगदी कौतुकभरल्या नजरेनं हा "सोहळा' पाहिला. मग तो तसाच रॅम्पवर चढला आणि पडद्याआड गेला.
कित्ती छान नै? परंपरेच्या, लाजाळूपणाच्या, तथाकथित संस्कृतिबंधनांच्या जाळ्यात अडकून पडलेल्या भारतीय नारीला या सगळ्यातून मुक्त करणाऱ्या अक्षयच्या या धाडसी कृतीबद्दल "पद्मश्री' नव्हे, "भारतरत्न' मिळायला हवं, असं नाही वाटत तुम्हाला?