Mar 3, 2018

आयडेंटिटी क्रायसिस



``नितीन, तुझा फोन वाजतोय कधीपासून. घेत का नाहीयेस?`` प्रिया किचनमधूनच ओरडली.
``अगं, मी बाथरूममध्ये आहे. इथून कसा घेऊ फोन?``
``बरं, मी बघते,`` असं म्हणून प्रिया हात पुसून नितीनचा फोन बघण्यासाठी बाहेर आली. नितीनची अंघोळ उरकतच आली होती, तेवढ्यात प्रियाच्या किंचाळण्यामुळे त्याच्या हातातून तांब्या पायावर पडला आणि तोही किंचाळला.
``अगं, झालं काय एवढ्यानं किंचाळायला?``
``काय काय नावानं फोन नंबर सेव्ह करतोस रे?`` प्रिया आता त्याच्याशी भांडण करण्याच्या पवित्र्यात बाथरूमच्या बाहेर उभी राहिली होती.
``काय झालं? `` टॉवेल गुंडाळून बाहेर येत नितीन म्हणाला.
``अवदसा`, अशा नावानं कुणाचा नंबर कसा काय सेव्ह करू शकतोस तू?``
प्रियाच्या या वाक्यावर नितीनच्या हातून टॉवेल निसटणारच होता, पण त्यानं वेळीच टॉवेलला (आणि स्वतःला!) सावरलं.
प्रिया ढिम्म होती.
तिच्या चेहऱ्यावरची एकही वक्ररेषा हलली नव्हती.
``एकेकाळी माझ्या हातून असा टॉवेल निसटला, की कसली कातिल नजरेनं बघायचीस तू माझ्याकडे! आता खुनशी नजरेनं बघतेस. `` नितीन कुरकुरला.
``विषय वेगळा चाललाय इथे. अवदसा कोण आहे? ``
``अगं, ती ही....आपली... ``
``आपली? ``
``आपली म्हणजे, ती मार्केटिंगवाली गं. मार्केटिंग एजन्सीमधून फोन येतो नेहमी त्या नंबरवरून. म्हणून मी तशा नावानं सेव्ह करून ठेवलाय तो. ``
``असंय होय? ``
``म्हणजे? तू संशय घेतेयंस माझ्यावर? ``
``नाही रे राजा. माझा भोळा सांब तू. माझ्याशिवाय दुसरी कुणीही तुझ्या मनात नाहीये, माहितेय मला. तुझ्यावर कसा संशय घेईन मी?`` प्रिया `श्यामची आई टोन`मध्ये बोलली आणि नितीनचा चेहरा खुलला. एवढ्यात एकदम ती `सत्या`ची शेफाली छाया बनत म्हणाली, ``असं वाटण्याएवढा तू भोळा नाहीयेस आणि तुला तसा फील देण्याएवढी मी निर्बुद्ध!``
नितीनचा खळ्ळकन स्वप्नभंग झाला. निघायचंय मला लवकर, असं म्हणून त्यानं तिथून कल्टी मारली.
....
दोन दिवसांनी पुन्हा असाच प्रकार घडला. यावेळी रणसंग्रामाचं ठिकाण बाथरूमबाहेरच्या पॅसेजऐवजी गॅलरी होती. रविवारच्या सुटीच्या निमित्तानं नितीन बागकामाचा पसारा मांडून बसला होता आणि तेवढ्यात त्याचा फोन वाजला. नेमकी त्याला रिंगटोन ऐकू गेली नाही आणि प्रियानं फोन बघितला. यावेळी नाव डिस्प्ले होत होतं - `भवानी.` पुन्हा तोच सुमधुर संवाद घडला. तिनं त्याला फोन वाजतोय सांगणं, त्यानं फोन घेता येत नसल्याचं कारण सांगणं, तिनं त्या विचित्र नावाबद्दल चौकशी करणं आणि त्यानं दचकणं, लपवाछपवी करणं, काहीतरी थातुरमातुर सांगून वेळ मारून नेणं.
``पण आज तर रविवार आहे, मार्केटिंगचा कॉल येणं शक्यच नाही!`` प्रियानं मुद्द्याला हात घातला.
``अगं, तुला माहिती नाहीयेत हे लोक. हे रविवारची सुटी कशी घालवावी, याचंही मार्केटिंग करू शकतील!`` नितीनच्या खुलाशावर प्रिया काही वेळ गप्प झाली, पण तिचं पूर्ण समाधान झालं नव्हतं.

तिच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळायला लागला होता. कोण करत असेल नितीनला फोन? तो फोन घेत का नसेल? असं काय घडलं असेल, फोन न घेण्यासारखं? गेल्यावेळी `अवदसा` म्हणून फोन आला होता, तो हाच नंबर नाही ना, हे तपासावं असं तिला वाटत होतं, पण नितीनच्या समोर त्याचा फोन तपासणं हे तिच्या `नवऱ्यावर अजिबात संशय न घेणारी बायको` या इमेजला धक्का लावून घेण्यासारखं होतं. तरीही तिचं मन काही तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. याबद्दल कुणाचा तरी सल्ला घ्यावा, कुणापाशी तरी मन मोकळं करावं, असं तिला वाटत होतं. या परिस्थितीत तिला आईशिवाय दुसरं कुणी जवळचं वाटलं नाही.
``ठीक आहे, मी बोलेन जावईबापूंशी!`` आईनं दिलासा दिला, तेव्हा प्रियाला मनावरचं मणाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं.
``आणि काळजी करू नकोस, जावईबापू चांगले आहेत आमचे. ये सिर्फ तुम्हारा वहम है.`` हिंदी सिनेमे बघत असल्याचा आईवर वाईट परिणाम झालाय, हे प्रियाच्या लक्षात आलं.

प्रियाच्या आईनं तिचा शब्द पाळला. तिनं नितीनला फोन करून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही ना काही कारणानं तिचा संवादच होऊ शकला नाही. शेवटी प्रियानंच आईला सांगितलं, की सध्या तू लक्ष घालू नकोस. प्रकरण अगदीच हाताबाहेर गेलं, तर मी तुला कळवेन. आईलाही बरं वाटलं. तसंही नितीनचं आपल्या आईशी फारसं पटत नाही, याची प्रियाला कल्पना होतीच.

काही दिवस असेच भाकड गेले. मधल्या काळात काहीच घडलं नाही. प्रियाला तो नंबर तपासून बघण्याची उत्सुकता होती, पण ती योग्य संधीच्या शोधात होती. आणि एक दिवस तिला ती सुवर्णसंधी मिळालीच. `अवदसा` या नावानं सेव्ह केलेला नंबर तिनं शोधला, पण आता कॉंटॅक्ट लिस्टमध्ये हा नंबर नव्हता. तिला आश्चर्याचा धक्का बसला, संशय आणखी बळावला. आपण फोन तपासणार, याचा नितीनला आधीच संशय आला होता की काय? त्यानं नंबर डिलीट का केला असेल? निदान `भवानी`चा नंबर तरी शोधावा, असा विचार तिच्या मनात चमकून गेला आणि त्या नावानं तिनं सर्च दिला, पण हाय रे कर्मा! `भवानी`सुद्धा कॉंटॅक्ट लिस्टमधून अंतर्धान पावली होती. आता मात्र प्रिया भयंकर अस्वस्थ झाली. फोन नंबर तोंडपाठ असण्याची कला आपल्याला वश व्हायला हवी होती, असं तिला राहून राहून वाटलं. `तुझा नवराही मेन विल बी मेन कॅटेगरीतला आहे गं सिंड्रोम`ने तिचा पूर्ण ताबा घेतला आणि आता नवऱ्यावर डोळ्यात तेल घालून पहारा करण्याचा निश्चय तिनं करून टाकला.

अर्थात, प्रियाच्या दुर्दैवाचे दशावतार एवढ्यात संपणारे नव्हते. आपल्याला निवांत वेळ असेल आणि टीव्हीवर सिनेमा बघण्याचा मूड असेल, तेव्हा फक्त `सूर्यवंशम,` `मैं हूं सबसे बडा खलनायक नंबर वन` आणि `मुंबई की फूलनदेवी` एवढेच ऑप्शन्स असतात ना, तसंच काहीसं प्रियाच्या बाबतीत झालं. ती त्या विचित्र नावाच्या नंबरवरून फोन येण्याची चातकिणीसारखी वाट बघत होती आणि तिचं नशीब कुठेतरी पेंड खात होतं.
नितीनच्या आयुष्यात आपल्या पलीकडे कुणीतरी आहे आणि तीच त्याला फोन करून त्रास देतेय, तिचे फोन नितीन टाळतोय, अशी प्रियाची खात्री झाली होती. फक्त ती कोण, एवढं समजणं बाकी होतं. तिनं त्याचे सगळे चॅट्ससुद्धा त्याच्या नकळत तपासले होते, पण साजिद खानच्या सिनेमातून जसं काहीच हाताला लागत नाही, तसंच तिच्या हाती काही लागलं नव्हतं.

अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर तिचा भाग्योदय घडवणारा तो दिवस उजाडला.
त्या दिवशी पुन्हा नितीनच्या अनुपस्थितीत त्याचा फोन वाजला आणि `च्यायला, डोक्याला ताप!` असा नंबर डिस्प्ले होऊ लागला. ही तीच बया असणार, हे प्रियाच्या लक्षात आलं. प्रियानं झडप घालून फोन उचलला, पण तोपर्यंत तो कट झाला होता. ती चरफडली. तिनं पुन्हा त्याच नंबरवरून फोन लावायचा प्रयत्न केला, पण तो लागला नाही. ती अस्वस्थ झाली. तिनं नंबर तपासला. तो ओळखीचा वाटत होता, पण नक्की कुणाचा आहे, कळत नव्हतं. आज नितीन फोन घरीच विसरून बागेत फिरायला गेला होता आणि तेवढ्या वेळात या नंबरचा छडा लावण्याचं अग्निदिव्य प्रियाला पार पाडायचं होतं. तिनं आपल्या सगळ्या मैत्रिणींची नावं आठवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे नंबर शोधले, पण त्यांपैकी कुणाचाच तो नंबर नव्हता. तिनं नितीनच्या माहीत असलेल्या मैत्रिणींची नावं आठवली, त्यांचे नंबरही शोधले, पण व्यर्थ! शेवटी तिनं नितीनच्या ऑफिस कर्मचारी, सोसायटीतील शेजारी, क्लबचे मेंबर्स, अगदी मुलाच्या शाळेतल्या ताईंचे नंबर्ससुद्धा आठवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच क्लू मिळत नव्हता.
अचानक तिला काहीतरी सुचलं. आपल्या मोबाईलवरून त्या नंबरवर फोन केला तर?
``शी! हे आधी का सुचलं नाही?`` प्रिया स्वतःवरच चरफडली.
तिनं नितीनच्या फोनवरचा तो नंबर पुन्हा बघितला आणि आपल्या फोनवरून तो नंबर डायल केला. रिंग वाजू लागली आणि तिच्या जीवात जीव आला. तेवढ्यात दार उघडून नितीन आत आला. प्रिया जाम घाबरली आणि कानाला लावलेला फोन तिनं तसाच कट केला.
``चल लवकर, आपल्याला काळे काकांकडे जाऊन यावं लागणारेय. ते अचानक आजारी पडलेत!`` नितीननं तिला सांगितलं आणि ती पटकन आवरून त्याच्याबरोबर बाहेर पडली. आत्ताच डायल केलेला नंबर आपल्याकडे सेव्ह आहे की नाही, हे बघण्यासाठीही तिला वेळ मिळाला नाही.

काळे काकांच्या घरीच तासभर गेला. सगळी हालहवाल विचारून, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था करून दोघं परत आले, तेव्हा प्रियानं मोबाईल बघितला आणि आईचे चार मिस कॉल्स बघून ती चमकलीच.
तिनं घाईघाईनं आईला फोन केला. आईनं फोन उचलेपर्यंत प्रियाच्या जिवाची घालमेल सुरू होती. आईला काही त्रास तर झाला नसेल ना, बाबांची तब्येत ठीक असेल ना, शंभर शंका तिच्या मनात येत होत्या. शेवटी एकदाचा आईने फोन उचलला.
``आई, काय गं, कशासाठी फोन केला होतास? चार मिस कॉल्स होते तुझे. सगळं ठीक आहे ना?`` प्रियानं एका दमात विचारून टाकलं.
``आमच्याकडे सगळंच ठीक आहे गं. पण तू कशासाठी फोन केला होतास?``
``मी? कधी?``
``एक तासापूर्वी! म्हणून तर मी तुला पुन्हा फोन करत होते!``

-    अभिजित पेंढारकर