Aug 17, 2011

27 टक्के आरक्षण, 73 टक्के मसाला!

(Film Review : AARAKSHAN)

"झा साहेब, तुम्ही सामाजिक विषयांवरचे एवढे सिनेमे बनवता. आरक्षणाच्या वादावर एखादा सिनेमा काढा की! कसला भारी होईल! पब्लिकचं लक्ष एकदम वेधून घेतलं जाईल!'' कॉर्पोरेट क्षेत्रातली कंपनी प्रकाश झा यांच्या मागे लागली होती.

""अरेच्चा! एवढे दिवस हा विषय माझ्या नजरेतून कसा सुटला?'' झा यांना प्रश्‍न पडला.

झा यांनी मग आपली टीम गोळा केली आणि "आरक्षण'ची बुंदी पाडायला घेतली.

""सर, आरक्षण हा खूपच संवेदनशील विषय आहे. आपल्याला त्याचा सखोल अभ्यास करायला लागेल. समाजाच्या सर्व स्तरांतल्या लोकांना भेटावं लागेल. याबाबतच्या वेगवेगळ्या भूमिका समजून घ्याव्या लागतील. आरक्षणाच्या विषयावर काहितरी भाष्य करावं लागेल...'' कुणीतरी शंका काढली.

""काही गरज नाहीये त्याची. आपल्या "आरक्षण' या नावाचा सिनेमा बनवायचाय. आरक्षणाच्या विषयावरचा नाही.'' झांनी खुलासा केला.

""सर, कळलं नाही!''

""अरे, आरक्षणाचा विषय त्याच्यात असला पाहिजे, पण त्याचं प्रमाण 27 टक्केच ठेवायचं. म्हणजे, आरक्षणाची कोंबडी आणि उरलेला सगळा मसाला. आलं लक्षात?''

""आलं सर. म्हणजे आरक्षणावरून विषय सुरू करायचा आणि मग टिपिकल मालमसाला सिनेमा करायचा.''

""पण आरक्षणावरचे दोन-तीन कडक सीन झाले पाहिजेत. प्रोमोमध्ये तेच दाखवायचे. म्हणजे लोकांना एकदम भारी वाटेल. सोमवारपर्यंत मल्टिप्लेक्‍स भरली, की झालं आपलं काम!''

""हे बेस्ट आहे. पण सर, त्याच्यावरून वाद होऊ शकतील.''

""होऊ देत की! आपल्याला तेच हवंय. वाद झाले, की चित्रपटाचं बुकिंग जास्त वाढतं. लोक आधी आक्षेप घेतील...आपण सुद्धा ताणून धरू. नंतर त्यांना फिल्म दाखवू. त्यात आरक्षणाबद्दल काहीच वादाचा मुद्दा नाहीये, हे कळल्यावर आपोआप वातावरण शांत होईल. तोपर्यंत आपलं बुकिंग फुल झालेलं असेल. काय?''

...

निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा आणि त्यांच्या टीममध्ये "आरक्षण' बनवताना अशाच प्रकारचा संवाद झाला असावा की काय, अशी पहिलेछूट शंका हा चित्रपट बघितल्यावर येते. प्रभाकर आनंद (अमिताभ बच्चन) या आदर्शवादी शिक्षकाच्या संघर्षाची ही कहाणी आहे. "एसटीएम'मध्ये ते आदर्शवाद आणि समानतेचे धडे विद्यार्थ्यांना देत असताना ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं जातं. त्यावरून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील जातिवाद उघड होतो. आरक्षणाविषयी सकारात्मक भूमिका प्रभाकर आनंद व्यक्त करतात आणि त्यांचे हितशत्रू त्यांना पदावरून दूर करून मिथिलेशसिंग (मनोज वाजपेयी) या भ्रष्ट प्राध्यापकाला प्राचार्य करतात. मिथिलेश खासगी क्‍लासही चालवत असतो. आरक्षणाचा विषय इथेच संपतो आणि मग मिथिलेशचे खासगी क्‍लास विरुद्ध प्रभाकर आनंद यांच्या मोफत शिकवण्या, असा संघर्ष सुरू होतो. त्याचे दोन माजी विद्यार्थीही (सैफ खान, प्रतीक बब्बर) त्याला मदत करतात.

आरक्षणाचा आणि चित्रपटाच्या मूळ कथेचा काहीच संबंध नसल्याचं मध्यंतरानंतर उघड होतं आणि त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा केवळ प्रसिद्धीच्या सोयीसाठी घेतला असावा की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. आरक्षणाचं समर्थन केल्याबद्दल प्रभाकर आनंदवर कारवाई होते, त्याऐवजी ती कुठल्याही अन्य कारणामुळे झाली असती, तरी काही फरक पडला नसता. आरक्षणाबद्दल मागासवर्गीयांना डिवचल्यावर त्यांनी व्यक्त केलेल्या सात्विक संतापाचे काही प्रसंग प्रभावी झाले आहेत.

नुसता संघर्षपट म्हणून विचार केला, तरी चित्रपट सामान्यच आहे. प्रकाश झा यांच्या वकुबाला तर अजिबात साजेसा नाही. घर गमावलेल्या प्राचार्याला तारांकित हॉटेलात राहायला कसं परवडतं, गरीब समाजातील विद्यार्थी गर्लफ्रेंडला घेऊन मोठ्या हॉटेलांत कसा जातो, काही कळत नाही.

अमिताभ बच्चन यांनी या वयातही तडफदार कामगिरी केली आहे. सैफ खान, मनोज वाजपेयी वाखाणण्याजोगे. दीपिका पदुकोन पाठ केल्यासारखं बोलते. प्रतीक बब्बरचं तर बहुधा तालमीच्या वेळीच चुकून शूटिंग केलं असावं.

चर्चेतला विषय घेऊन, त्यातल्या बऱ्या-वाईट गोष्टींचे चटके न सोसता नुसता शेक घ्यायचा आणि वादाची भट्टी पेटवून त्यात स्वतःची पोळी मात्र भाजून घ्यायची, हे वागणं प्रकाश झा, बरं नव्हं!