Apr 28, 2008

का बघायची मराठी नाटकं?

कालच "सही रे सही'ची तिकिटं काढून दिली सासू-सासऱ्यांना. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! "बाल्कनी' बंदच ठेवली होती. गेली पाच-सहा वर्षं हे नाटक गाजतंय. दोन हजारांच्या आसपास प्रयोग झालेत. मी पहिला प्रयोग तीस रुपयांत खाली बसून पाहिला होता. फार वर्षं नाही झाली त्याला. त्यानंतर दुसऱ्यांना 50 रुपयांत बाल्कनीतून हे नाटक पाहिलं होतं. एवढी तिकिटं का असावीत या नाटकांना?

नाटक म्हणजे काही सर्वंकष मनोरंजन नाही. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही. मग यांनी शंभर-दीडशे रुपयांना का लुटावं प्रेक्षकांना? म्हणजे, घरातल्या चौघांनी जायचं, तर सहाशे रुपये नुसता तिकिटाचा खर्च. आता तुम्ही म्हणाल, मल्टिप्लेक्‍सला चित्रपट बघायलाही एवढा खर्च येतोच की! पण माफ करा, मी शक्‍यतो स्वतःच्या पैशांनी मल्टिप्लेक्‍सला चित्रपट बघत नाही. मला अगदी लक्ष्मीनारायण, प्रभात, विजय, अलका, नीलायम, गेला बाजार "सोनमर्ग', "निशात', "भारत'ही चालतं. गेलोच, तर सिटीप्राइड कोथरूडला पहाटे दहा वाजताचा 50 ते जास्तीत जास्त 60 रुपयांतला चित्रपट मी पाहू शकतो. त्याहून जास्त नाही. त्यातदेखील चित्रपट अगदी भुक्कड असला, तरी त्यातली गाणी म्हणा, एखाद्या कलाकाराचा अभिनय, नुसती कथा, नुसतं उत्तम चित्रीकरण, निसर्गदृश्‍यं, (आणि एखाद्या हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्‍यं) यांवर पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळं एखादा चित्रपट वाईट आहे, असं कुणी सांगितलं, की मी त्यावर पहिली धाड घालतो. नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार?

नाटकांची गोची काय, की नामवंत कलाकार नसले, की प्रेक्षक येत नाहीत आणि नामवंत कलाकार घेतले, की त्यांचं बजेट वाढतं, त्यातून नाटकाचे तिकीटदर वाढतात. आता, नाटकाच्या एका दौऱ्याचा सगळं मानधन वगैरे धरूनचा खर्च जास्तीत जास्त तीस हजार असेल. प्रेक्षागृहाची सरासरी 500 क्षमता गृहीत धरली, तरी शंभर रुपयांच्या हिशेबानं 50 हजार रुपये गोळा होतात. मी हे चांगल्या संस्थांच्या, चांगले कलाकार असल्याच्या नाटकांच्या स्थितीबद्दल बोलतोय. अप्रसिद्ध कलाकार असलेल्या नाटकांचा खर्चही तुलनेनं कमी असतो, त्यामुळं त्यांचा गल्लाही.

नाटकाच्या हिशेबाचे ठोकताळे मला माहित नाहीत. मात्र, एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून एका नाटकाला शंभर-दीडशे रुपये मोजायला मला परवडत नाही. चित्रपटाच्या तुलनेत तर नाहीच नाही! अशा अवस्थेत नाटक जगायचं कसं? मुळात नाटकाची आवड असलेले प्रेक्षक कमी. जे येतात, त्यांच्याही आवडीनिवडी निराळ्या. मग एवढं करून नाटक जगायचं कसं?
--------------