Nov 21, 2009

एकच "तारा' समोर आणिक...

meteor

"सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्‍वात उलथापालथ होण्याचा प्रश्‍नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले. त्यांच्या आविर्भावावरून काहितरी प्रस्ताव असावा आणि त्यासाठी माझी मदत हवी असावी, असा दाट संशय आला. खोदून विचारल्यावर त्यांनी उल्कावर्षाव पाहायला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. रात्री दोन ते पाच या वेळेत उल्कावर्षाव दिसणार होता. त्यासाठी पुण्याहून आम्हाला राजगुरूनगरजवळच्या कडूस गावी जायचं होतं. अंतर 40 किलोमीटरचंच होतं, पण रात्रभर जागरणाचं दिव्य पार पाडायचं होतं. त्यातून दुसऱ्या दिवशीच्या कामांत आणि ड्युटीत कुणी सवलत देणार नव्हतं. त्यामुळंच मला विचारायला ते जरा का-कू करत असावेत. असो. मी फारसे आढेवेढे न घेता होकार भरला आणि आम्ही उत्साहाने काम आटोपून निघालो.
घरी जाऊन कार घेऊन आलो. माझ्यासह चार सहकारी होतो. जाताना टाइमपासला सीडी प्लेअर घेतला होता, पण गप्पा, गॉसिप आणि विनोदांची मैफल रंगली आणि गाणी लावायची वेळच आली नाही! ग्लास नव्हते, (त्यांचा उपयोगही नव्हता!) पण सोबत "चकणा' भरपूर होता. त्यामुळं चरत चरतच इप्तित स्थळी पोचलो. फारशी वाहतूक नव्हती. राजगुरूनगरच्या अलीकडच्या फाट्यावरून दहा किलोमीटर आत असलेल्या या गावातील शाळेच्या मैदानावर आम्ही पोचलो, तेव्हा पावणेतीन वाजले होते. "गाडीचे दिवे बंद करून आत या, जपून पावले टाका,' अशा सूचना आम्हाला तिथे आधीच उपस्थित असलेला आमचा सहकारी आणि हौशी आकाशनिरीक्षक मयुरेश प्रभुणे याच्याकडून मिळाल्या होत्या. अंधारात चाचपडतच गाडीतून उतरलो. बरेच लोक त्या मोकळ्या मैदानात पथारी टाकून निवांत पहुडले होते. पायाखाली किडा-मुंगी चिरडू नये म्हणून काळजी घेतात, तशी कुणाच्या अंगाखांद्यावर पाय पडू नये म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागत होती.
कसेबसे धडपडत शाळेचा कट्टा गाठला नि विसावलो. गप्पा-विनोदांना ऊत आलाच होता. आमचा सहकारी मयुरेश कुठल्या तरी गच्चीवर जाऊन उल्कांचे फोटो घेण्यासाठी धडपडत होता. त्याचं दर्शन होणं दुरापास्त होतं. मैदानात पहुडलेली माणसं नि "उल्का' या नामविशेषावरून यथेच्छ कोट्याही करून झाल्या. थोड्याच वेळात उल्का पडताना दिसायला लागल्या. अगदी "वर्षाव' नसला, तरी नेत्रसुखद दृश्‍य होतं ते. निदान आपण गेल्याबद्दल पश्‍चात्ताप तरी झाला नाही, एवढा दिलासा देणारं! काही छोट्या, काही मोठ्या उल्का पडताना पाहायला मिळाल्या. पहाटे अपेक्षित असलेलं मोठ्या प्रमाणातलं उल्कावर्षावाचं नाट्य मात्र हुलकावणी देऊन गेलं. "आत्तापर्यंत दोन ढगांतून उल्का पडल्या आहेत. आता तिसऱ्या ढगातून आणखी मोठा वर्षाव पाहायला मिळेल,' असं आश्‍वासन मयुरेश देत होता, पण आम्हाला त्यानं फारसा फरक पडत नव्हता. वातावरण एन्जॉय करण्याचा उद्देश सफल झाला होता.
दहा वर्षांपूर्वी असाच एकदा उल्कावर्षाव झाला होता, त्या वेळी तो बघायला दुचाकीवरून बोंबलत पौडच्या पुढे गेलो होतो. फारसा अनुभव त्या वेळीही घेता आला नव्हता, असं आता अंधुकसं आठवतंय.
असो. पण या वेळचा अनुभव धमाल होता. उल्कांचा नसला, तरी आनंदाचा, उत्साहाचा आणि विनोदांचा भरपूर वर्षाव झाला! "एकच तारा' समोर दिसला असला, तरी "पायतळी अंगार' मात्र नव्हता!!