Apr 7, 2009

घोळ सहा हजारांचा!

तसा नेहमीचाच रविवार. सकाळी उशिरा उठल्यानंतर चहा कुणी करायचा यावरून भांड्याला भांडं (चहाच्या नव्हे!) लागलेलं. नंतर नाश्‍त्याला काट मारून थेट पावभाजीच्या जेवणाचाच बेत. पाव किती आणायचे, कुणी आणायचे, मीच का आणायचे, यावरून पुन्हा एक `लडिवाळ' संवाद! शेवटी घरचा कर्ता (आणि आठवडाभर नाकर्ता) पुरुष म्हणून जबाबदारी अस्मादिकांवरच! वर "फुकटचं गिळायला मिळतंय, हे नशीब समजा!' हा कृपाप्रसाद!!

झक्‌ मारत पाव आणायला नि बाकी कचरापट्टी जमवायला बाजारात रवानगी. मग `जातोच आहेस, तर माझ्या बॅंकेतून पैसेही काढ' ही एक प्रेमाची गळ. मुंडी हलवून संमती देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही! मग सवलत म्हणून "स्कूटी' वापरण्याची परवानगी घेऊन स्वारी बाजारात रवाना!

आधी पाव (नीट लक्षात ठेव. पुन्हा गोंधळ करशील!), बटर (घरी बटर आणलेले असताना नको तो शहाणपणा कुणी सांगितला होता?), मुलीच्या हट्टापायी कॅडबरी (कालच तिला घेऊन दिली होती. बिघडव तिला!) अशी खरेदी करत करत बॅंकेपाशी पोचलो. `आयडीबीआय'चं खातं असलं, तरी तिथपर्यंत जाण्याचा हेलपाटा नको, म्हणून आणि एक एप्रिलपासून कुठलंही कार्ड विनाशुल्क कुठेही वापरण्याची बातमी वाचून हुरळल्यानं एसबीआय मध्ये कार्ड वापरायचं ठरवलं. घात इथेच झाला!

स्टेट बॅंकेच्या एटीएमवर अमांउंट टाकली. तीन हजार रुपये. पण खाडखाडखुडखुडखटर्रखुम होऊन एक पावती माथी मारली गेली. "सॉरी, अनेबल टु प्रोसेस!'. मला वाटलं, माझंच काहीतरी चुकलं असेल. पुन्हा शेजारच्या एटीएम मशीनवर प्रयत्न केला. "बाबा, मला द्या ना बटणं दाबायला!' पोरीची मध्ये लुडबूड सुरू होतीच. (कार्टीला एक एटीएम मशीन खेळायला घेऊन द्यायला हवं! पैसे काढून घेतल्यावर कितीला मिळतं?) शेवटी दोन्हीकडे निराशा पदरी आल्यावर एसबीआयला शिव्या देत तिथून बाहेर पडलो. "सॉरी अनेबल'च्या दोन्ही पावत्या जपून ठेवण्याची दुर्बुद्धी कशी कुणास ठाऊक, पण सुचली.

तिथून झक मारत आयडीबाआयमध्ये वारी. तिथे गेल्यावर आधी तिच्याऐवजी माझ्याच कार्डचा पिन नंबर दिला. त्यातून ते कार्ड पुन्हा आत घेतलं जाईना. नंतर तीन हजार रुपयांची विड्रॉवल अमाउंट टाकली, तर काय! "बॅलन्स नॉट ऍव्हलेबल'ची पाटी. बरं, आमचं शास्त्री रस्त्यावरचं आयडीबीआयचं केंद्र एवढं आंतरराष्ट्रीय आहे, की तिथे कधी पावतीचा कागद संपलेला असतो, कधी पैसे उशिरा येतात. कधी मशीन बंद असतं. कधी पैसे भरण्याचं काम चालू असतं. या वेळी पावतीचे कागद संपले होते. त्यामुळं मिनी स्टेटमेंट घेऊन काय प्रकार आहे, ते तपासायचीही सोय नव्हती. "बयेनं साड्या-ड्रेसवर (किंवा गेला बाजार माहेरच्यांवर!) पैसे उधळले असणार!' अशी एक पुसटशी शंका मनाला चाटून गेली. पण तिची खातरजमा करून घेण्याची हिंमत नव्हती.
मुकाट घरी आलो. फार वाकड्यात शिरलो नाही. "दुपारी बघू' सांगून वेळ मारून नेली. दुपारी दुसऱ्या एटीएममधून मिनी स्टेटमेंट मिळवलं. या वेळचा धक्का मोठा होता! प्रत्येकी तीन हजार रुपयांची दोन डेबिट याच तारखेवर अकाउंटवर पडली होती. म्हणजे, न मिळालेले पैसे बॅंकेनं मात्र अकाउंटमधून वजा केले होते.

शेवटी आज बॅंकेत जाऊन रीतसर तक्रार केली. अर्ज भरून दिला. पावत्या दिल्या. आता तीन आठवड्यांनी पैसे परत मिळणारेत, म्हणे! लिहिण्याचा उद्देश एवढाच, की एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्या. शक्‍यतो पावत्या जपून ठेवा. दुसऱ्या बॅंकेच्या एटीएमवरून व्यवहार करणे टाळा. आणि मुख्य म्हणजे, पत्नीच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी घेऊ नका!