Dec 26, 2010

`कांदे'पालट!

कांद्यानं शंभरी गाठल्याचे संभाव्य परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसून आलेच. पण इतर न दिसलेले आणि फारसे प्रकाशात न आलेले परिणामही देण्याचा हा प्रयत्न.
...
मुलगी "पाहण्याच्या' कार्यक्रमात शिष्टाचारसंमत आणि समाजमान्यताप्राप्त "कांदे-पोहे' जाऊन त्याजागी "बटाटा-पोहे' आले. त्यामुळे "अहो, शकूला कांदे-पोहे आणायला सांगा,' असं म्हणून "आमची शकू फर्मास कांदे-पोहे करते हो!' अशी भलामण करण्याची संधी वधुपित्यांच्या हातून निघून गेलेय. त्याऐवजी शकूला बटाटे-पोहे आणण्याची हाक दिली जातेय. "मुलगी नाकानं कांदे सोलणारी आहे हो!' असं म्हणण्याचीही वरमाईंची पंचाईत झालीय!
...
- परवाचीच गोष्ट. दिनकरकाका गोखले सदाशिव पेठेतून मंडईपर्यंत तंगडतोड करीत मंडईत कांद्याला चार रुपये कमी भाव असेल, या आशेने गेले. दोन-चार दुकानं फिरले, पण मनासारखा कांदा मिळेना. भावही कोणी ओरडून सांगत नव्हते. मंडईच्या कांदा बाजारात शुकशुकाट होता. एका ठिकाणी मनाचा हिय्या करून गोखलेकाकांनी भाव विचारला, तेव्हा सत्तर रुपये किलोचा भाव ऐकून तिथेच चक्कर येऊन पडले म्हणे. कांद्याच्या बाजारात असूनही त्यांना शुद्धीवर आणायला कुणी कांदाही फोडला नाही म्हणतात!
...
लपाछपी, डोंगर की पाणी, रंग रंग कोणता, विषामृत, असे खेळ सध्याच्या क्रिकेटच्या आक्रमणात भरडून गेलेच आहेत, पण अध्येमध्ये खेळला जाणारा "कांदेफोडी'चा खेळही मुलांच्या क्रीडाविषयक आयुष्यातून बाद झाला. परवा गल्लीत कुणी पोरं "कांदेफोड' खेळत होती, तर अण्णा दांडेकरांनी त्यांना बडवून काढलं. "ही कसली तुमची श्रीमंती थेरं' म्हणून ते त्यांच्या अंगावर खेकसले. पोरांना मार खाण्याचं कारणच न कळल्यामुळं ती नुसतीच धुमसत राहिली.
...
छापून तयार असलेल्या पुढच्या वर्षीच्या सर्व दिनदर्शिका "कालनिर्णय', "भाग्यलक्ष्मी'वाल्यांनी माघारी घेऊन त्यात महत्त्वाची दुरुस्ती केली म्हणे. कांद्याचे भाव उत्तरोत्तर वाढतच राहण्याची शक्‍यता असल्यानं "कांदेनवमी'च्या तिथीचा उल्लेख कॅलेंडरांतून काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे. जो सण साजराच होणार नाही, त्याचा उल्लेख तरी कशाला हवा कॅलेंडरात?
...
कांद्याची भजी, कांद्याचं थालीपीठ, कांदा-बटाटा रस्सा, कांदा-लिंबू "मारके' मिसळ, कांद्याची पीठ पेरून भाजी, कांदा उत्तप्पा, वगैरे पदार्थ अजिबात कांदा न वापरता कसे करता येतील, यावरच्या पुस्तकांना आणि "पॉकेट्‌स बुक'ना प्रचंड मागणी आल्याचं समजतं. काही पुस्तकांच्या तर तीस-चाळीस आवृत्त्या (प्रत्येक आवृत्ती पन्नास पुस्तकांची या हिशेबाने) निघाल्याचंही विश्‍वसनीय सूत्रांकडून कळलं आहे.
...
कांदा-लसूण खाणे वर्ज्य असलेल्या "चातुर्मासा'ची व्याप्ती वाढवून ती बारा महिन्यांपर्यंत करावी, या मागणीसाठीही मोठी आंदोलनं उभी राहत आहेत.
...
महाग झालेल्या कांद्याला पर्याय म्हणून अळवाचे कांदे, पालकाचे कांदे रोजच्या जेवणात वापरायला लोकांनी सुरवात केली आहे.
...
कांद्याचे भाव आणखी वाढू नयेत म्हणून चिडका कांदा, अकलेचा कांदा, असे शब्दप्रयोगही दैनंदिन व्यवहारातून काढून टाकण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे.
...
प्रत्यक्ष कांद्याऐवजी कांद्याचा इसेन्स बाजारात आलाय आणि तो प्रचंड खपतोय. हल्ली डाळीच्या पिठात हा इसेन्स घालून कांदा भजी केली जातात म्हणे! कांदा "एक्‍स्कूझिव्ह' झाल्यामुळं कांद्याच्या परफ्यूमला अचानक मागणी वाढलेय. "ऍक्‍स', "झटॅक'पेक्षा हा परफ्यूम जास्त "पॉवरफुल' असल्याची जाहिरात केली जातेय.
...
...आणि सरतेशेवटी...सर्वांत महत्त्वाचं.
"कांद्यानं केला वांदा' हे नाव चित्रपटाला मिळण्यासाठी पंचवीस जणांनी एकाच वेळी अर्ज केलाय आणि आपल्यालाच हे नाव पहिल्यांदा कसं सुचलं, असा दावा करण्यावरून मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांमध्ये भांडणं लागली आहेत!
 

Dec 15, 2010

अताशा असे हे...

ए खादा मोठा दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोर कुलदैवताला जाऊन साकडं घालतात, तसं मी आज करणार आहे. मला कुठे दरोडा घालायला नसला, तरी चार-दोन खडे बोल सुनावायचे आहेत. कदाचित तो माझा अवास्तव संताप असेल किंवा आततायीपणादेखील. पण मला जाणवलंय, ते मांडायचं नक्की आहे. त्यामुळं आधी जरा दोन चांगल्या गोष्टी लिहिणं आवश्‍यक आहे.
माझ्या ब्लॉगला आता 70 फॉलोअर्स मिळालेत. निदान त्यापैकी निम्म्यांना तरी मी काय लिहितो, याविषयी उत्सुकता असल्यानंच ते माझे अनुयायी झाले असावेत, असा दावा करायला हरकत नाही. काहींना ओझरता दृष्टिक्षेप टाकायचा असेल, आणि सोय म्हणून ते फॉलोअर झाले असतील. काही जण केवळ ब्लॉगने पुरविलेल्या सोयीचा एक भाग म्हणून औपचारिकता पूर्ण करण्यासाठी झाले असतील, तर काही चुकून!...या सगळ्यांनाच माझे मनापासून धन्यवाद. ब्लॉगवर मी जे काही (बाही) लिहितो, ते एवढे दिवस सहन करणाऱ्या 35 व्हिजिटर्सनाही माझा सलाम! माझ्या लिखाणात त्यांना वाचण्यासारखं किंवा निदान माझ्या ब्लॉगला भेट देण्यासारखं काहितरी वाटलं, ही भावनाच मला आनंद देते.
माझ्या विविधांगी (भरकटलेल्या?) लेखनावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांनाही धन्यवाद. ते दर वेळी नेमाने पोस्ट वाचून त्यांचेही अनुभव शेअर करतात, मतेही मांडतात.
मला थोडीशी तक्रार करायचेय ती ही, की एखाद्या चांगल्या लेखावर भरभरून प्रतिक्रिया देणारे माझे हे चाहते, वाचक, हितचिंतक, गुणग्राहक, स्तुतिपाठक वगैरे वगैरे मी अनेक दिवसांत ब्लॉग अपडेट केलाच नाही, तर काहीच कसे म्हणत नाहीत? हल्ली मी काही ना काही कारणांनी बिझी आहे. ब्लॉग अपडेट करायला, नवे अनुभव लिहायला वेळ नाही. मला नेहमी उत्सुकता असते, की ब्लॉगला भेट देणारे, नेहमी वाचणारे मला विचारतील, बाबा रे, काही लिहिलं का नाहीस बऱ्याच दिवसांत? कुठेतरी ई-मेलवर, फेकबुकात तसा उल्लेख करतील. पण तसं काहीच घडत नाही.
ब्लॉग लोक वाचतात, तो त्यांना आवडतोही. त्यांच्या प्रतिक्रियांतून ते जाणवतं. मग लोकांना नवी पोस्ट टाकली नाही तर काही मिस केल्याचं का वाटत नाही? की तसं वाटूनही ते उल्लेख करायचं विसरतात? की अन्य बरंच काही चांगलं वाचायला उपलब्ध असल्यानं माझ्या ब्लॉगची उणीव वगैरे जाणवत नाही?
हा विषय फक्त ब्लॉगपुरताच मर्यादित नाही. मैत्रीबाबतही हीच परिस्थिती मला हल्ली त्रास देते. कितीतरी मित्रांशी महिनोन्‌ महिने भेट होत नाही. कधीतरी कामानिमित्त बोलणं होतं, पण पुन्हा आपण आपापल्या कामांत गुंतून जातो. कुणा मित्रानं "अरे बरेच दिवसांत भेटला नाहीस, खूप उणीव जाणवतेय तुझी. भेट की एकदा!' असं म्हटल्याचंही फारसं घडत नाही.
मी ही तक्रार करताना मी स्वतःदेखील हल्ली काही दिवस खूप बिझी आहे आणि मित्रांना स्वतःहून भेटण्याचा, कुणाचं नवीन काही वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला नाही, हेही खरंच. त्यामुळं या तक्रारीचा बराचसा दोष माझ्याकडेही जातोच. म्हणून तर सुरुवातीला म्हटलं, की तक्रारीपेक्षाही केवळ भावना मांडण्याचा हा प्रयत्न होता.
असो. तुम्हाला काय वाटतं यावर? अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया द्या. चुकीचं वाटलं तर कान उपटा. होऊन जाऊ द्या!
 

Dec 6, 2010

सौंदर्याचा "अर्थ'

""छ्या! यंदाच्या "मिस अर्थ'मध्ये काहीच अर्थ नाही! कुठल्याही ब्यूटी कॉंटेस्टमध्ये पहिल्या आलेल्या मुली कशा एसटीत बसून पोटात ढवळल्यावर उलटी दाबल्यासारखे हात तोंडावर ठेवतात....तसे हिनं का नाही ठेवले?'' चि. कुरकुरे सक्काळी सक्काळी टीव्ही बघताना चेष्टेच्या मूडमध्ये होता.
""ईईईई...काय काहितरी घाणेरडं बोलतोस रे?'' कु. किरकिरेनं त्याच्या डोक्‍यात एक टप्पल मारली.
""घाणेरडं काय? दर वेळी तसेच नाही का फोटो येत? पण ही निकोल का कोण, तिनं चक्क संपूर्ण चेहरा दाखवणारे फोटो दिलेत, म्हणून जरा शंका आली, एवढंच!''
""बरं. कळली हा तुमची अक्कल! आता गप्प बसा.'' कु. त्याला पुन्हा दटावली.
""आणि ज्या प्रश्‍नाच्या उत्तरावर ती जिंकली, तो वाचलात का तुम्ही बाबा?''
""नाही चिरंजीव! आपणच सांगा!'' आता बाबांनीही परिसंवादात उडी घेतली होती.
""तिला विचारलं, दिवसातली सगळ्यात आवडती वेळ कोणती, तर म्हणते सूर्योदयाची!''
""बरोबर आहे, सकाळी सकाळी पोट साफ झालं, की दिवस कसा छान जातो!'' श्री. कुरकुरेंनी आरोग्य, आहार, संतुलनाची टेप लावली.
""शी बाबा! तुम्ही पण काय बोलता?'' कु. पुन्हा कुरकुरली, तशा चि. कुरकुरेंना उकळ्या फुटल्या.
""आज आईसाहेबांच्या काही एक्‍स्पर्ट कमेंट्‌स नाहीत का?'' चि. नं आता आईला वादात ओढलं.
""अरे ती निकोल का कोण ती...तिला म्हणं आमच्या घरातला पसारा एकदा आवरून बघ. सगळं सौंदर्य काळवंडेल तिचं!'' चिरंजीवांचं निमंत्रण स्वीकारून सौ. कुरकुरेही आता मैदानात उतरल्या.
""जाऊ दे, जाऊ दे. भांडण नको. ती तिकडे जिंकणार, मग गावभर फिरणार, मुलाखती देणार, समाजसेवेच्या गप्पा मारणार...आपल्याला कशाला चिंता?'' श्री. कुरकुरेंनी कधी नव्हे ते शांतीपथावरून मार्गक्रमण सुरू केले.
""बाबा, आणखी एक जोक वाचला का? ती बंगलोरमधल्या सायकल रिक्षा वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्न करणारेय. प्रदूषण टाळण्यासाठी!''
""भले शाब्बास! या नटव्यांच्या डोक्‍यातलं समाजकार्याचं प्रदूषण कमी केलं पाहिजे आधी!'' सौ. कुरकुरे पुन्हा फिस्कारल्या आणि भाजी करपल्याचा वास आल्यानं पुन्हा स्वयंपाकघराकडे पळाल्या.
 

Dec 2, 2010

कुरकुरीत!

""बाबा, बघितलंत का, संजूबाबानं मान्यताला काय भेट दिलेय ती...? रोल्स रॉइस!'' चि. कुरकुरेंनी कधी नव्हे तो पेपर हातात घेतला होता आणि त्यावरून परममूज्यांना चाळवण्याची त्याला हुक्की आली होती.
""हो का? बरं!'' फार उत्सुकता दाखवणं श्री. कुरकुरेंना परवडण्यासारखं नव्हतं.
""अगं बाई, कुठला राईस? बरं झालं आठवलं. तांदूळ पार संपलेत! आणायला झालेत...अहो...''
""अगं आई, राईस नाही. रोल्स रॉइस! अडीच-तीन कोटींची गाडी आहे ती! त्यानं मान्यताला भेट दिली, तिच्या वाढदिवसानिमित्त!'' चि. कुरकुरे चिरकला.
""तिची मान्यता आहे ना एवढ्या खर्चाला? मग आपल्याला काय करायचंय? आम्हाला वाढदिवसाला रोल्स रॉइस काय, साधा जिरा राइस खायला घालत नाही कुणी हॉटेलात!'' सौ. कुरकुरे धुसफुसत म्हणाल्या.
""का? गेल्या आठवड्यातच गेलो होतो ना हॉटेलात? तेव्हा जिरा राइस कशाला, सगळ्यांनी चांगली बिर्याणी चापली होतीत की! एवढ्यात विसरलात?''
""हो! धाकट्या वन्संबाईं आल्या होत्या अमेरिकेहून! तेव्हा आमचं भाग्य उजळलं होतं! उगाच नाही काही! कुणाच्या कोंबड्यानं का होईना, उजाडलं म्हणजे झालं, असं आहे तुमचं!''
""बाबा, कोंबडी पण काय मस्त लागत होती ना त्या दिवशी? एकदम सॉल्लिड!''
""गधड्या, तोंड आवर की जरा! तुझ्या जिभेला काही हाड?'' सौ. कुरकुरे त्याच्या अंगावर वस्सकन ओरडल्या.
""का? हाडं चघळताना नाही जीभ अडखळत तुमची! मग आता तो बोलला तर काय होतंय? ऐकू देत शेजाऱ्यांना काय ऐकायचंय ते!'' श्री. कुरकुरेंनी मघाच्या टोमण्यांचं उट्टं काढलं.
""जाऊ दे. तो विषयच नको. बघू तरी कशी दिसत्येय मान्यता? बाळंतपणानंतर बघितलंच नाही बाई तिला! बाळंतपण चांगलंच मानवलंय नाही? आणि तिची बाळं कशी दिसत नाहीत काखोटीला? आणि हे काय? ओली बाळंतीण ना ही? तशीच फिरत्येय कानाला स्कार्फ वगैरे न बांधता? काय बाई या आया तरी!''
""आई किती चिंता तुला? तिची मुलं सांभाळायला नोकरांची फौज असेल. बाबा, कसलं भारी वाटलं असेल ना मान्यताला? तुम्ही पण अशीच एखादी भेट द्या ना आईला!'' चि. कुरकुरेनं पुन्हा खोडी काढली.
""गाढवा, एकतर अशी एखादी गाडी घ्यायची, तर तुझ्या बापालाच विकावं लागेल. आणि त्या मान्यताला जुळी मुलं झाल्येत म्हणून आनंद साजरा करतायंत ते! आपल्याकडे असं काही निमित्त आहे का आता...?''

Nov 28, 2010

सत्त्वपरीक्षा!

परीक्षणासाठी काल "अग्निपरीक्षा' पाहायचा होता. अलका आठल्येचा सिनेमा असला, तरी आपल्याला कुठलाच सिनेमा वर्ज्य नसल्यानं कंटाळा येण्याचा प्रश्‍नच नव्हता. शुक्रवारी त्याच्या प्रेस शो ला जायला जमलं नव्हतं आणि नंतर दिवसभरातही माझ्या वेळेशी त्याची वेळ जमत नव्हती. शनिवारी काहीही करून सिनेमा पाहणं भागच होतं.
"लक्ष्मीनारायण'ला दुपारी साडेबाराचा खेळ होता. एका कामात अडकल्यानं थिएटरवर पोचायला उशीर झाला. तरीही, जेवूनखाऊन गेलो नव्हतो. खरं तर मला चित्रपटाची सुरुवात वगैरे चुकलेली अजिबात आवडत नाही. सिनेमा सुरू व्हायच्या आधी पंधरा मिनिटं आपण थिएटरच्या आवारात उपस्थित पाहिजे आणि अगदी सुरुवातीच्या "फिल्म्स डिव्हिजन की भेंट'पासून काहीही चुकता कामा नये, असा माझा लहानपणापासूनचा खाक्‍या. पण हल्ली जास्तच बिझी झाल्यामुळं अनेकदा हा दंडक मोडतो. असो. हल्ली कधीतरी सुरुवातीचा सिनेमा चुकला आणि ओळखीचं थिएटर असेल, तर पुढच्या शो च्या वेळी चुकलेला भाग पुन्हा बसून पाहायचा, असेही उद्योग करावे लागतात. अर्थात, वेळ जमणारी असेल, तर! मराठी सिनेमाचे मुळातच दोन-तीन खेळ असतात. तेही कुठल्या कुठल्या लांबच्या थिएटरात! हे गणित कसं जमायचं?
"लक्ष्मीनारायण'च्या दारात पोचलो, तेव्हा एक वाजून पाच मिनिटं झाली होती. थिएटरचं गेट बंद झालं होतं. वॉचमनला विचारलं, तर म्हणाला, "तिकीटविक्री बंद झालेय आता.' मी त्याला समजावून पाहिलं. मी चित्रपट पाहणं कसं महत्त्वाचं आहे आणि उद्याच्या पेपरात परीक्षण आलं नाही, तर कसं आकाश कोसळेल, हेही पटवून पाहिलं. तो बधला नाही. त्यानं कुण्या उपलब्ध वरिष्ठाला बोलावलं. त्याच्यापुढेही मी हीच टेप वाजवल्यानंतरही त्याला पाझर फुटला नाही. मी गेल्या पावली परत आलो.
आज सिनेमा पाहून परीक्षण लिहिणं आवश्‍यकच होतं. एकदा हा आठवडा चुकला, की पुढच्या आठवड्यात पुन्हा सिनेमा पाहण्याची, त्याचं परीक्षण छापून येण्याची आणि मुळात तो थिएटरात टिकण्याची काय गॅरेंटी? तर ते असो. "लक्ष्मीनारायण'ची संधी हुकल्याने नंतर "मंगला'मध्ये सव्वाचा खेळ असल्याचं कळलं. मी जेवणखाण सोडून आलो होतो. त्यामुळे मग जेवण करूनच जायचं ठरवलं. सुदैवानं थेटरवर पोचल्यावर दीडचाच शो असल्याचं कळलं. दहा मिनिटांचाच चित्रपट हुकला होता. त्यानं फारसं काही बिघडलं नाही.
मध्यंतरी आमच्या हक्काच्या "प्रभात'मध्येही एकदा ऍडव्हान्स बुकिंगच्या वेळेनंतर तिकीट काढायला गेलो होतो. नियमांचा निष्ठावान पाईक असलेल्या तिथल्या कर्मचाऱ्यानं वेळ संपून गेलेली असल्यामुळं मला तिकीट देण्यास नकार दिला. खरं तर त्यांचा धंदा वाढवायलाच मी मदत करत होतो. पण त्याला ते मंजूर नसावं.
मी "मल्टिप्लेक्‍स' संस्कृतीच्या बाजूनं नाही, पण तिथे पैसे मोजून का होईना, प्रेक्षकांना मिळणाऱ्या सोयी निश्‍चितच चांगल्या असतात. उरलीसुरली गिऱ्हाइकं टिकवण्यासाठी "एक पडदा'वाल्यांनी त्यांच्या काही सवयी बदलायला नकोत?

Nov 20, 2010

एलओएलझेड!

मला पहिल्यांदा कळायचंच नाही. "एलओएल' आणि "एलओएलझेड' म्हणजे काय ते! मला वाटायचं, सॉफिस्टिकेटेड भाषेत शिवी देण्यासाठी "वायझेड' म्हणतात, तशीच काहितरी शिवी असावी. पण फेकबुकाच्या वाऱ्या वाढल्यानंतर हे काहितरी वेगळं प्रकरण आहे, हे लक्षात यायला लागलं.
कुणीतरी समुद्रावर कुठेतरी उंडारतानाचा फोटो टाकते.
त्यावर डझनभर प्रतिक्रिया येतात.
"काय घरदार सोडलंय वाटत...एलओएलझेड!'
....
कुणीतरी हापिसातल्या कर्मचाऱ्यांच्या पार्टीतला कुणाच्या तरी गळ्यात पडलेला असतानाचा फोटो टाकते.
त्यावरही "हं...पार्टी-शार्टी...मजाय!' असली काहितरी भंपक कॉमेंट.
- पुढे - एलओएलझेड!
....
जत्रेतली शिंगं डोक्‍यावर लावलेला फोटो काढतं, वर फेसबुकात टाकतं.
त्यावरही डझनभर एलओएलझेड!
...
तरी फारच साधीसुधी, सोज्वळ, प्रातिनिधिक उदाहरणं घेतली.
या वरच्या प्रसंगांत "लाफिंग आऊट लाऊड' अर्थात तोंड फाटेस्तोवर हसण्यासारखं काय आहे?
ओळख, सुसंवाद, मैत्री, उत्तम मैत्री, एकमेकांच्या भावना न सांगता ओळखण्याएवढ्या पातळीवर गेलेली ही माणसं. निदान, तसा दावा करणारी. मग एखाद्याच्या फोटोवर हलकाफुलका विनोद करणारी, त्याचा पाय खेचणारी, त्याची कुरापत काढणारी कॉमेंट टाकली, तर "एलओएलझेड' कशाला म्हणावं लागतं? आपण त्याची चेष्टा करतोय, गंमत करतोय, हे पटवून देण्यासाठी? की त्याबद्दल आगाऊ माफी मागण्यासाठी?
विनोद आपल्या आयुष्यातून एवढा हद्दपार झालाय? आपण ज्याला "मैत्री' म्हणतो, ती एवढी पोकळ, बाळबोध, बालिश, बाष्कळ आहे? दुसऱ्यानं केलेली चेष्टा, गंमत, टर खुल्या मनानं, तेवढ्याच जिंदादिलीनं न स्वीकारण्याएवढी?
की "एलओएलझेड' म्हणण्याचा पण एक ट्रेंड आहे? सगळे म्हणतात, म्हणून आपणही म्हणूया! की स्वतःच्याच विनोदशैलीच्या क्षमतेबद्दल असलेली ही शंका आहे?
काय नक्की आहे काय?
...
ही झाली एक तऱ्हा.
दुसरी तऱ्हा म्हणजे फेसबुकावर काहितरी आचरट, अर्धवट, अपूर्ण आणि तथाकथितरीत्या उत्कंठा चाळवणारा स्क्रॅप टाकण्याची.
उदाहरणार्थ - "फीलिंग लाइक वीपिंग...'
"अलोन टुडे...'
"व्हाय धिस हॅपन्स टू मी ऑल द टाइम...'
"समथिंग इंटरेस्टिंग इन माय लाइफ...'
किंवा तत्सम काहितरी.
म्हणजे सरळसोट "आज 18 वेळा बादली धरून बसावं लागलं,', "अमक्‍या ढमक्‍याशी लग्न ठरलंय,' "तमक्‍यानं आज मला जाम पिडलं. जोड्यानं मारावासा वाटतोय साल्याला', असं म्हणायचं नाही. गोल - गोल फिरत बसायचं.
मग कुणीतरी विचारणार - "काय झालं गं?'
अशा दीडेक डझन कॉमेंट आल्यावर मग ही - "काही नाही गं...सहजच. गंमत करत होते,' असं काहितरी उत्तर देऊन वेळ मारून नेणार.
काय साधतं यानं?
लोकांचा वेळ फुकट घालवल्याचं समाधान? की लोकांना निष्कारण त्रास देण्याचा विघ्नसंतोषीपणा?
तुम्ही म्हणाल - "ज्याला वाचायचंय त्यानं वाचावं. इतरांनी सोडून द्यावं.'

मग प्रश्‍नच मिटला!
असो.
एलओएलझेड!
--------
 

Oct 28, 2010

चिऊचं घर शेणाचं...

एक होता काऊ
एक होती चिऊ

काऊचं घर होतं मेणाचं
चिऊचं घर होतं शेणाचं

एकदा काय झालं,
जोराचा वारा आला
चिऊचं घर उडून गेलं

चिऊ आली काऊकडे
तिला वाटलं, तो आपलं ऐकून घेईल
त्याचं घर एवढं मोठं, त्यात जागा देईल

काऊदादा काऊदादा दार उघड
""नको, माझं घर लहान आहे''

काऊदादा काऊदादा दार उघड"
"नको, माझं घर खराब होईल''

काऊदादा काऊदादा दार उघड
""नको, माझे कपडे खराब होतील''

काऊदादा काऊदादा दार उघड
""नको, मला जायला उशीर होईल''

""असं काय रे करतोस? माझं घर वाहून गेलंय.
सगळे छळतील. टोचतील, त्रास देतील.
तू मला घरी घे; दाणे दे, पाणी दे.
जरा वेळाने बरी होईन. भुर्रकन उडून जाईन.''

""तुझं पटतंय गं चिऊताई, पण माझा इलाज नाही.
माझ्या मुलांना दाणे, पाणी घालायचंय.
त्यासाठी ऑफिसला जायचंय, काम करायचंय.
त्यापेक्षा तू असं कर. तूच दुसरं घर शोध!''

काऊनं मग तिला उचललं
पण चिऊ बसली होती हटून.
काऊच्या गाडीवर पाय रेटून!

ती जागेवरून हलेना
आपला हेका सोडेना

काऊनं जास्तच जोर केला
बिचारीचे पाय सोडवायला

चिऊ शेवटी दमली
भुर्रकन उडून गेली...
एका मैत्रीची कहाणी
अर्ध्यावरच संपली
---
(घरातून निघताना चिमणीचं एक पिल्लू माझ्या बाईकच्या हॅंडलवर बसलं होतं. उठता उठेना. त्याला उचलून बाजूला ठेवायला गेलो, तर घट्ट रोवलेले पाय सोडेना. त्याला कुणापासून तरी संरक्षण हवं असावं. मला काहीच करायचं सुचलं नाही. मी त्याला उचलून खाली ठेवायला गेलो, तर हात लावल्यावर भुर्रकन उडून गेलं. त्यावरून ही (कथित) कविता सुचली...)

Oct 20, 2010

देव देव्हाऱ्यात नाही!

शनिवारी ऑफिसातून कधी नव्हे ते लवकर घरी आलो होतो. मनस्वीला देवी दाखवायला नेण्याचं कबूल केलं होतं. रात्री नऊला घरातून बाहेर पडलो. ती थोडीशी झोपाळली होती, पण देवी बघायला जाण्याचं सोडवत नव्हतं.
सर्वांत आधी बंगाली दुर्गा पाहण्यासाठी कॉंग्रेस भवन गाठलं. तुफान गर्दी होती, पण देवी पाहता आली. माझ्यासमोर डझनभर तरुण-तरुणी, प्रौढ-प्रौढा हातातले मोबाईल सरसावून देवीची छबी आणि शूटिंग टिपण्यात गुंतले होते. फ्रेम ऍडजस्ट करून देवीचा चेहरा बरोबर मध्यभागी कसा येईल, याचे प्रयत्न सुरू होते. मला हसावं की रडावं कळेना. गणपतीतही हेच दृृश्‍य सगळीकडे पाहायला मिळतं. लोक उठसूट कसलेही फोटो मोबाईलमध्ये घेऊन काय साध्य करतात? बरं, देवीची भक्ती, श्रद्धा समजू शकतो. पण यांच्या वॉलपेपरवर, स्क्रीनसेव्हरवर किंवा इतर वेळी कायम पाहण्यात हा फोटो येणार नसतो. फोटो डाऊनलोड करून ते डेस्कटॉप, लॅपटॉपवर टाकणार नसतात. गेला बाजार तो फोटो फेसबुक किंवा ऑर्कुटचं कोंदण पटकावू शकतो. पण तेवढ्यासाठी एवढा आटापिटा कशाला?
बंगाली दुर्गेचं उदाहरण एकवेळ समजू शकतो. ती एरव्ही पुण्यात कुठे पाहायला मिळणार नाही. पण गणपतींच्या मूर्तींचं काय? दगडूशेठ गणपतीचा देखावा आणि रथ दरवर्षी इथूनतिथून सारखाच असतो. त्याला नावं वेगवेगळी असतात, एवढंच. बरं, आपण मोबाईलवर काढतो त्यापेक्षा अत्युच्च गुणवत्तेचा फोटो कुठूनही उपलब्ध होऊ शकतो. मग उपडीतापडी पडून, लोकांना धक्काबुक्की करून, मोबाईलचा आणि आपला जीव धोक्‍यात घालून फोटो काढण्यासाठी धडपडायलाच हवं का?
काही लोक याला श्रद्धा असं नाव देतील.
कबूल.
श्रद्धा कुठेतरी असायलाच हवी. काहींची ती देवावर असते. याच श्रद्धेचा प्रत्यय त्यानंतर सारसबागेसमोरच्या महालक्ष्मी मंदिराजवळ गेलो, तेव्हा आला. रात्रीच्या साडेदहा वाजता भाविकांचा मोठा जथ्था महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भक्तिभावानं रांगेत उभा होता. साधारण तास-दीड तास तरी त्यांना तसंच ताटकळावं लागेल, असं चित्र होतं. तरीही लोक एकेका पायावर नाचत, हातात तबकं, फुलं, पोरं सांभाळत त्या रांगेत तिष्ठत होते.
मंदिराच्या समोर रस्त्यावर उभं राहूनही देवीचं दर्शन झालं. "आत येऊन माझी खणानारळानं ओटी भरली नाहीस, तर तुझा नरकासुर करून टाकीन,' असं काही देवी माझ्या कानात पुटपुटल्याचं मला तरी ऐकू आलं नाही.
तिरुपतीच्या रांगेत म्हणे तासन्‌ तास उभं राहावं लागतं. सिद्धिविनायकाच्या मंदिरात बच्चन कुटुंबीय अनवाणी चालत गेल्याचे फोटो छापून येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तिष्ठणाऱ्या भाविकांना "थंडगार' करण्याची सोय केल्याचं कौतुक होतं, एकवीरेला 50 लाखांचा मुखवटा चढवल्याच्या हेडलाइन होतात....
देवांच्या चरणी लीन होण्यासाठी एवढे उतावीळ झालेले हे भाविक इतर वेळी कितपत पुण्याचं (पुण्याचं म्हणजे उच्चारानुसार "पुण्ण्याचं'. "पुणे शहराचं नव्हे!) काम करतात हो? एकदा देवाच्या पाया पडलं की बाहेर आपण चोऱ्यामाऱ्या, लांड्यालबाड्या, पापं करायला मोकळे का? बाहेर दडपून पैसे खाणारे देवळात जाऊन स्वतःच्या तोंडावर थपडा कशाला मारून घेतात? बाहेर पुन्हा लोकांना थपडा मारता याव्यात म्हणून?
झ्या मनात ते वाईट विचार असतात, ते देवळात गेल्यावरही येऊ शकतात. म्हणून तिथे गेल्यावर भाविकतेचं, सात्विकतेचं नाटक मी करत नाही. आपण अजिबात वाईट काम करत नाही, असा माझा बिल्कुल दावा नाही. किंवा देवळात गेल्यानं आपली सर्व पापं धुवून निघाली, असंही मला कधी वाटत नाही. माझ्या चुका, उणिवा, कमतरता आणि अकार्यक्षमतेचं खापर मी कधी देवावर फोडत नाही.
एवढ्या निर्गुण-निराकार देवाला एखाद्यानं नमस्कार केला नाही, गंध-फूल वाहिलं नाही, दक्षिणेची लाच दिली नाही, तर एवढं कोपायचं कारण काय? तो राग-लोभ-मोह-माया यांच्या पलीकडं गेलाय ना? मग त्याची पूजा केली की तो चांगला माणूस आणि नाही केली तर वाईट, हा कुठला न्याय? हा भक्तिरूपी अत्याचार आता "ई-मेल'मधूनही फोफावलाय. कुठल्या तरी देवाचा फोटो पुढे 15 जणांना पाठवला नाही, तर म्हणे तुमच्यावर कोप होईल. होऊ द्या काय व्हायचाय तो कोप. तुमचा देव जर चराचरांत भरून राहिलाय, तर एवढा प्रसिद्धिलोलुप कसा हो?
असो. सध्या एवढंच. उर्वरित भाग पुढच्या वेळी.
कुठल्या देवाला झोडपण्याचा उद्देश नाही. नाहीतर देवाचे स्वयंघोषित "पीआरओ' अंगावर यायचे!

Oct 17, 2010

"अन्नोन'दशा!


सकाळी बाइकवरून कुठेतरी निघालो होतो आणि राजाराम पुलाजवळील सिग्नलच्या अलीकडेच मोबाईल वाजला. "सायलेंट' करायला विसरलो होतो आणि व्हायब्रेटर सुरू असल्यानं माझं हृदय खिळखिळं होण्याआधी फोन उचलणं आवश्‍यक होतं.
कुठला तरी "अननोन' नंबर होता.
""सर तुम्ही अभिजित पेंढारकरच बोलताय ना?''
""हो, बोला.''
""सर, मी जळगावहून बोलतेय, तुमचा "प्रीमियर'मधला लेख वाचला.''
व्हायब्रेटरवर असलेल्या मोबाईलमुळे दडपलेली माझी छाती आता फुगली होती. सत्काराच्या वेळी हार घालण्यासाठी मान वाकवून ठेवतात, तशी मी लेखनाबद्दलची प्रशंसा ऐकण्यासाठी माझे कान मी मोबाईलच्या अधिकाधिक जवळ आणले. कानात प्राण, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, शक्ती कपूर...सगळे आणले!
""सर, तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण एक विचारू का?''
आता तर मी तिच्या शब्दांच्या अमृतचांदण्यात चिंब व्हायला आतुर झालो होतो. माझ्या लेखनाची वारेमाप स्तुती होणार, "तुम्हाला कसं काय सुचतं हे सगळं,' असा कौतुकवर्षाव होणार, अशी खात्री होती. त्याच धुंदीत मी असताना तिनं पुढचं वाक्‍य टाकलं -
"सर, सलमान खानचा नंबर आहे का तुमच्याकडे?''
धुंदी खाडकन उतरली होती. कानाखाली एक सणसणीत चपराक बसली होती.
""सलमान खानचा नंबर? तुम्हाला कशाला हवाय? तुम्ही फॅन आहात का त्याच्या?'' मी आवाजात शक्‍य तितकं मार्दव आणून विचारलं.
""हो सर...खूप! मला प्लीज द्या ना त्याचा नंबर. कुठून मिळणार नाही का?''
""अहो ताई, माझ्याकडे नाही त्याचा नंबर. मी पुण्यात असतो. तुम्हाला मुंबईतून मिळवावा लागेल नंबर.''
"सलमान खानच्या कारकिर्दीवर लेख लिहिण्यासाठी त्याला "मॉडेल' म्हणून समोर बसवून त्याची लांबी-रुंदी मोजायची नसते! तसा मी बराक ओबामांनाही लेखातून चार खडे बोल सुनावू शकतो. याचा अर्थ ते अफगाणिस्तान, इस्राईलविषयीची धोरणं आखण्यासाठी ते दर वेळी फोन करून माझा सल्ला घेतात असं नाही!' असंच मला तिला सुनावायचं होतं, पण मनाला आवर घातला. शेवटी युवती-दाक्षिण्य म्हणून काही असतंच ना!
बिचारीचा भ्रमनिरास झाला होता. लेख वाचल्या वाचल्या "युरेका' म्हणून तिनं मला फोन केला असावा. तिच्या लाडक्‍या सलमानचा नाही, निदान त्याच्यावर लेख लिहिणाऱ्याचा नंबर "प्रीमियर'मध्ये छापला होता. सलमान त्याच्याकडे नक्कीच रोज विटी-दांडू खेळायला येत असणार, असा तिचा ठाम समज होता. केवढ्या अपेक्षेनं तिनं मला फोन केला होता! पण तिच्या सगळ्या स्वप्नांचा आणि उत्साहाचा मी चक्काचूर केला.
"अननोन' नंबरची दहशत असते ती अशी. एखाद्या वेळी काही वेगळी संधी असेल म्हणून "अननोन' नंबरचा फोन उचलायला जावं, तर कुण्यातरी प्रतिभावंत वाचकाचा फोन असतो. कुठला तरी लेख कुठल्या तरी पुरवणीसाठी त्यांनी म्हणे टपालानं, कुण्या माणसाच्या हस्ते किंवा पेटीत टाकून पाठविलेला असतो. आपला एवढा एकमेवाद्वितीय अनुभव का छापला नाही, अशी त्यांची विचारणा असते.
कधी कधी तर आपण सकाळी सकाळी प्रेमानं "अननोन' नंबरचा फोन घ्यावा तर असे संवाद होतात...
""हॅलो...'' (आवाजात शक्‍य तितका गोडवा आणून) - मी.
""हलव...कोन बोल्तंय?''
""आपण कोन बोल्ताय?''
""हा...कोन? विलास का?''
""आपण कोण बोलताय? आपण फोन केलाय ना? मग आपणच आधी सांगितलं पाहिजे ना, कोण बोल्ताय ते?''
""हा...मी अण्णा बोल्तोय. विलास आहे का?''
...
कधी कधी तर "रॉंग नंबर' आहे, असं सांगूनही लोकांना पटत नाही. "काय चेष्टा करताय का राव,' म्हणून ते पुन्हा तिथेच फोन करतात. वर त्यांच्या कुणा विलास, संजय, दादू, म्हादू, गणपतला फोन देण्याचा धमकीवजा आदेशही देतात. आता त्यांच्या आग्रहासाठी आणि आपण त्यांचा फोन उचलल्याचं प्रायश्‍चित्त म्हणून त्यांचा विलास, संजय, दादू, म्हादू किंवा गणपत कुठून पैदा करायचा, असा प्रश्‍न मला पडतो.
प्राचीन काळी लॅंडलाइनवर फोन करण्याची पद्धत होती, तेव्हा तर माझ्या नंबरवर कायम दुसऱ्याच कुणाच्या नावासाठी फोन यायचा. बहुधा "बीएसएनएल'नं कुणाचा तरी बंद केलेला नंबर मला दिला होता. त्या भल्या माणसाचे जुने स्नेही मला फोन करून पिडायचे. दहा-बारा वेळा सांगून झालं, तरी त्यांची संपर्कयात्रा काही थांबेना. शेवटी कंटाळून त्यांनी त्यांच्या स्नेह्याचा मोबाईल नंबर मिळविला की काय, कुणास ठाऊक! पण माझे फोन बंद झाले.
हल्ली नाइट ड्युटीच्या वेळी तरी मी दुपारी मोबाईल सायलेंटवरच टाकून घोरत पडतो. कुठल्या नोन-अननोन नंबर्सना नंगानाच घालायचाय, तो घालू द्या! चार वाजता उठेपर्यंत मी त्याकडे ढुंकून बघत नाही. एखाद वेळी उतावीळ झालेल्या कुणाकुणाचे ढीगभर मिस्ड कॉल्स मिळतात. मी मेलो बिलो की काय, अशी शंका त्याला येते. मग मी झोपलो होतो, असं त्याला शांतपणे सांगतो. त्याचा चेहरा मग (मोबाईलवरूनही) पाहण्यासारखा होतो.
र्ल मॅनर्स ही तर भल्याभल्यांना न झेपणारी गोष्ट आहे. माझा मोबाईल अनेकदा "सायलेंट' असतो. म्हणजे मीटिंगसाठी जाण्यापूर्वी काही मिनिटं आधी आणि नंतर, दुपारी झोपलो असताना, रात्री झोपण्यापूर्वी आणि अगदी फोनच्या रिंगची कटकट नको असेल तेव्हाही! मीटिंग ऐन रंगात आलेली असताना अनेक जणांचे मोबाईलवरचे "कोंबडे' आरवतात. काहीतरी गंभीर विषय चाललेला असताना त्यांची "मुन्नी बदनाम' होते किंवा तबला, ढोलताशे वाजू लागतात. मग फोन बंद करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी त्यांची तारांबळ उडते. बरं, मीटिंगमध्ये असताना चुकून फोन आला, तर लोक कट करून गप्प बसत नाहीत.
"हॅलो, मीटिंगमध्ये आहे.' हे सांगून बहुधा त्यांना फुशारकी मिरवायची असते.
बरं, हळू आवाजात खुसपुसल्यामुळं पलीकडच्याला काही ऐकू येत नाही. तेवढी त्याची पोहोचही नसते. तो पुन्हा काहितरी विचारतो.
हा पुन्हा - "हॅलो, मीटिंगमध्ये आहे. नंतर करतो,' असं सांगतो.
आल्यावर कट न करण्याएवढा आणि फोन "कट' केल्याचा अर्थ न कळण्याएवढा कोण उपटसुंभ पलीकडे असतो, कुणास ठाऊक! यांना तरी "आन्सर' करावाच लागेल, असा कुठल्या राष्ट्राध्यक्षांचा दर वेळी फोन येत असतो, हेही कळत नाही.
थेटरात असताना तर यांना आणखी स्फुरण चढतं. थेटरातल्या गर्दीतही फोन घेऊ नये, सायलेंट ठेवावा, वगैरे गोष्टी यांच्या गावीही नसतात. तिथला संवाद साधारणतः असा ः
""हां...बोल.'' ...जणू काही हा लोडाला टेकून घरात निवांत पडलाय!
"पिच्चर बघतोय...पिच्चर'
यावर पलीकडच्यानं "बरं, ठीक आहे, नंतर करतो,' असं म्हणणं अपेक्षित असतं. प्रत्यक्षात पलीकडचा विचारतो, "कुठला पिच्चर?'
मग हा त्याला "पिच्चर'चं नाव सांगतो. बरं, ते सहज समजण्यासारखं असेल, तर ठीक. नाहीतर त्याला त्यातल्या कलाकारांचीही नावं घेऊन समजावून द्यावं लागतं. (किती त्रास!) पलीकडच्याचं समाधान होत नाही, तोपर्यंत शेजारच्या प्रेक्षकांची सुटका कठीणच.
बरं, फोन "कट' करण्याचा, न उचलण्याचा अर्थही अनेकांना कळत नाही, हे खरंच आहे. एकदा फोन उचलला नाही, तर लोक तो उचलेपर्यंत पुनःपुन्हा करत राहतात.
मला तर अनेक जण एसएमएस-शत्रूच वाटतात.
मध्यंतरी माझ्या फोनवरचे सगळे नंबर उडाले. त्यामुळे सणासुदीला ढिगाने येणारे एसएमएस कुणाचे आहेत, हेही कळत नाही. काही "अननोन' लोक एखादा जोक-बिक पाठवतात, त्यांचेही नाव कळत नाही. "हू इज इट,' असा रिप्लाय पाठवला, तर या बाबांना झेपतच नाही! पुन्हा काहीच उत्तर नाही.
मला रिप्लाय करण्याचीही जाम खुमखुमी असते. त्या माणसाला पुन्हा एसएमएस करण्यासाठी उचकवण्याचा प्रयत्न त्यातून असतो. अनेक ठोंब्यांना तेही कळत नाही. विरामचिन्हांचा आणि त्यांचाही 36चा आकडा असावा, असं वाटतं. कारण दूरदर्शनवरच्या बातम्या सांगितल्यासारखे सपक, सरळसोट एसएमएस करून ते मोकळे होतात.
असो.
विषय जरासा लांबलाच नाही? आपल्या प्रतिक्रिया एसएमएस करून नक्की कळवा हं! "अननोन' नंबर असला, तरी मी नक्की रिप्लाय देईन. (*कंडिशन्स अप्लाय)
...
* दसरा, दिवाळीला एक किंवा दोन रुपये एसएमएस नसलेल्या दिवशी!

Oct 6, 2010

"विकत' घेतला श्‍याम!



निमिष गेल्या आठवड्यात अखेर कायदेशीररीत्या आमचा झाला.
तसा गेल्या डिसेंबरमध्ये आणल्यापासूनच तो आमचा झाला होता, पण त्यावर कायदेशीर मान्यता बाकी होती. त्याला पहिल्यांदा आमच्या घरापर्यंत येण्यात जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या नंतरच्या प्रवासात आल्या नाहीत, हे खरं आहे. तरीही वाटलं तेवढा हा प्रवास सोपा नव्हता.
त्याच्या काही वैद्यकीय तपासण्या आणि शारीरिक वाढ, या प्रकरणात आमचे काही दिवस व महिने मानसिक तणावाचे गेले. अशा प्रकारच्या मुलांना पोटात पुरेसे पोषण मिळाले नसल्याने त्यांच्यात असणाऱ्या कमतरता नंतरच्या काळात भरून काढण्यासाठीचे आव्हान होतेच. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने त्याचा खुराक आणि उपचार सुरू होते. शारीरिक व्यायामही सुरू होता आणि तोच सर्वांत अवघड प्रकार होता. हर्षदानं त्यासाठी दोन महिने अक्षरशः जिवाचं रान केलं. दिवसातून तीन-चार वेळाहा व्यायाम घेण्याचं आव्हान खडतर होतं. ते तिनं लीलया पेललं. मी तिला जमेल तशी मदत केली, पण तरीही तिचं पारडं जड होतं.
मनस्वीची आणि निमिषची लगेचच गट्टी झाली होती. आमच्याही आधी तिनं त्याच्याशी जुळवून घेतलं. सुरुवातीच्या काळात अगदी त्याला मांडीवर घेऊन वाटी-चमच्यानं दूध पाजण्यातही ती मागे नव्हती. अजूनही कधी मस्ती कधी रडारड असा दंगा सुरू असतो. ती आमच्या जवळ आली ती हा तिला ढकलतो, केस ओढतो, ओरबाडतो. मग ती त्याला दणकावते. कधी स्वतःहून उचलून घरभर फिरवते. कधी पाडते, कधी मलम लावते. कधी समजावते. कधी खायला देते, कधी हिसकावून घेते.
निमिषचा कायदेशीर ताबा आमच्याकडे देण्याची प्रक्रिया मात्र सुलभरीत्या झाली. आता त्याचा नावे एक आर.डी. आणि दोन धनादेशही द्यावे लागले. एक पॉलिसीही करायचेय. हा "श्‍यामरंगी' त्या दृष्टीने विकतच घ्यावा लागला म्हणायचा! आता माझ्या आधीच्या दोन आरडी बंद कराव्या लागणार आहेत. बघू, कसं काय जमतंय ते!
अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेली ही प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुफळ संपूर्ण झाली. आताशा निमिष चार-पाच पावलंही टाकायला लागलाय. त्याला सोबत घेऊन आता नव्या आयुष्याची पावलं टाकायची आहेत...
 

Oct 5, 2010

दमते `तंत्र' देवता

दीडशे कोटींचा "रोबो' पाहताना डोळ्याचं पारणं फिटतंच, पण डोळेही फिरतात. एका शास्त्रज्ञानं यंत्रमानवाच्या स्वरूपात साकारलेली स्वतःचीच प्रतिकृती आणि तिच्या करामती पाहताना अक्षरशः स्तंभित व्हायला होतं. चमकदार कथा, रंजक पटकथा यामुळे "रोबो' प्रेक्षणीय झाला आहे. तरीही चित्रपटाचं बलस्थान असलेलं "तंत्र' शेवटच्या काही प्रसंगांत एवढं अंगावर येतं, की प्रेक्षकाचीच काय, त्या तंत्रज्ञानाचीही दमछाक व्हावी!
चित्रपटाची कथा तीन-तीन रजनीकांतांशी संबंधित आहे. डॉ. वसीकरण हा साधारण (तीस ते पन्नास या कुठल्याही वयोगटातला) रजनीकांत एका अद्‌भुत यंत्रमानवाच्या संशोधनासाठी दहा वर्षे मेहनत घेतो. शंभर कला, जगातील सर्व भाषा, शंभर हत्तींचं बळ असलेला, त्याच्याच चेहऱ्याचा एक रोबो तयार होतो. हाच दुसरा रजनीकांत. पहिल्या रजनीकांतची प्रेयसी असते "सना'. ती दुसऱ्या रजनीकांतला घरी "खेळायला' घेऊन जाते आणि तो तिला फिल्मी स्टाईलनं वाचवतो. दुसऱ्या रजनीकांतला लष्कराच्या ताब्यात देऊन सीमेवर शत्रूशी लढायला पाठवायचं पहिल्या रजनीकांतच्या मनात असतं, पण त्याचेच वरिष्ठ शास्त्रज्ञ (डॅनी) हे असूयेतून त्यात दोष काढतात. मग दुसऱ्या रजनीकांतच्या शरीरात पहिला रजनीकांत मानवी भावनाही फिट करतो. त्यातून दुसरा रजनीकांत पहिल्याच्याच प्रेयसीच्या प्रेमात पडतो आणि घोळ होतो. मग डॅनी दुसऱ्या रजनीकांतला आपल्या ताब्यात घेऊन, त्याचे "प्रोग्रॅम' बदलून तिसराच रजनीकांत जन्माला घालतो आणि विनाशकारी खेळ सुरू होतो...
दिग्दर्शक शंकरनं "रोबो'ला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून आणि खऱ्याखुऱ्या रजनीकांतला दुय्यम भूमिका देऊन खेळलेला जुगार यशस्वी झाला आहे. रोबोच्या रूपात रजनीकांतच असल्यानं त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून दसपट प्रमाणात पूर्ण होतात. जमिनीला समांतर अवस्थेत रेल्वेच्या डब्यांवरून धावत जाणं, हेलिकॉप्टरची फेकाफेक, डोकं काढून हातात घेणं, असे चमत्कार पाहताना थक्क व्हायला होतं. "रोबो'बरोबरच चित्रपटातही भावना पेरायला दिग्दर्शक विसरलेला नाही. त्यामुळे शेवटी "रोबो'ची आत्महत्या पाहताना डोळ्यांत पाणी येतं.
दीडशे कोटी ज्या कारणासाठी घातलेत, ते तंत्रज्ञान, गाण्यांचं परदेशातील विलोभनीय चित्रीकरण, यातून प्रेक्षकांचेही पैसे वसूल होतात. शेवटच्या प्रसंगातील शेकडो रोबोंचे "सर्कस'छाप विविध खेळ मात्र अंगावर येतात. तेवढा भाग सोडला, तर चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.
पहिल्या रजनीकांतकडून अभिनयाची अपेक्षा त्याचे चाहतेही करत नाही. त्याच्याकडून ज्या करामतींची अपेक्षा असले, त्या दुसरा रजनीकांत आणि तिसरा रजनीकांत इथे पूर्ण करतात. ऐश्‍वर्या तिला मिळालेल्या मानधनाइतपत सुंदर दिसलेय.
खऱ्या रजनीकांतनं आता अभिनयाचा नाही, निदान वयाचा विचार करण्याची वेळ आलेय. म्हणजे आणखी दहा वर्षांनी तरी तो आपल्याला पडद्यावर गेला बाजार चाळिशीच्या भूमिकांत दिसू शकेल.

Sep 24, 2010

स्मृतिभ्रंश!

बातमी खूप वाईट आहे.
गांभीर्यानं दखल घेण्याजोगी आहे. चिंता करायला लावणारी आहे. खचवून टाकणारी आहे.
माझ्या मोबाईलमधल्या "सॉफ्टवेअर'चं काल दि. 23 रोजी निधन झालं. अनंत चतुर्दशीनंतरच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज त्याचं "विसर्जन' करायला मला भाग पडलं. सॉफ्टवेअर बदलून घेणं किंवा त्यासाठी आलेला अडीचशे रुपये खर्च, हे दुःखाचं कारण नसून, माझ्या खात्यातील सर्व संपर्कही सॉफ्टवेअरसोबत गंगेला मिळाले, हे आहे!
काल रात्री काम करताना वरिष्ठांचे धपाधप पाच-सहा एसएमएस आले. बहुधा त्याचा ताण सहन न झाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, मोबाईलनं अचानक मान टाकली. सुरूच होईना. थोडासा "डिस्प्ले' येऊन गायब होत होता. मला वाटलं, झाला असेल "स्विच ऑफ'! पण मोबाईल नव्हे, त्यातलं "सॉफ्टवेअर' स्विच ऑफ झालंय, याची मज पामरास काय कल्पना?
सकाळी सगळे प्रयोग करून पाहिले. बायकोच्या मोबाईलमधलं सिमकार्ड काढून इकडे घाल, इकडची बॅटरी तिकडे लाव, मेमरी कार्ड तपासून बघ...सगळे निष्फळ होते. मोबाईल जो रुसून बसला, तो उजेडात यायला काही तयार नव्हता.
""सगळे नंबर सेव्ह करून ठेवायला काय होतं तुला? फोन मेमरी कशाला वापरतेस? सिम मेमरी वापरत जा ना! एवढंही कळत नाही का...'' वगैरे वगैरे स्तुतिसुमनं मी हर्षदावर वारंवार उधळली होती. त्यामुळं माझ्याकडील सर्व नंबर सिमकार्डमध्ये सेव्ह असणार, याची खात्रीच होती. माझं सिमकार्ड काढून दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकलं, तेव्हा त्यात ढिम्म एकसुद्धा नंबर दिसत नव्हता.
माझा पोपट झाला होता. मोबाईल बंद पडला होताच, वर सिम कार्ड कोरं होतं. सकाळी सगळा जामानिमा घेऊन मोबाईलच्या दुकानात जाणं नशीबी आलं.
"साहेब, काही होणार नाही. सॉफ्टवेअर बदलायला लागेल. मेमरी लॉस होईल...' तिथल्या कर्मचाऱ्यानं निष्ठूरपणे सांगून टाकलं.
""अरे लेका, आमची मेमरी लॉस झालेय म्हणून या मोबाईलच्या मेमरीवर अवलंबून राहतो ना! आता तीही लॉस झाली, तर "गझनी' होईल की नाही आमचा?'' असं म्हणायचं अगदी तोंडावर आलं होतं. पण मी ते माझ्या "मेमरी'तच ठेवलं. "डिस्प्ले' होऊ दिलं नाही.
मग खात्री करण्यासाठी आणखी दोन-चार दुकानं पालथी घातली. काहीही फायदा होणार नव्हता, हे लक्षात आलं होतं, तरी वेडी आशा काही सुटत नव्हती. "सध्याच्या स्थितीत फोन नंबर्स तरी सेव्ह होणार नाहीत का,' अशी अजीजी मी प्रत्येक ठिकाणी करत होतो आणि मी जणू काही त्यांची इस्टेट लिहून मागत असल्यासारखी प्रतिक्रिया ते देत होते.
शेवटी मनावर दगड ठेवून "सॉफ्टवेअर' बदलून घ्यायचं ठरवलं. दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून आधीच्या सॉफ्टवेअरला श्रद्धांजली वाहिली. काहीही झालं तरी त्यानं मला दोन वर्षं साथ दिली होती! संध्याकाळी मोबाईल कोरा होऊन माझ्या हातात आला, तेव्हा माझं मन मात्र आता सगळे नंबर पुन्हा जमविण्याच्या कल्पनेनंच भरून आलं होतं!
...
ता. क. : "तुमचा मोबाईल नंबर पाठवा,' असा एसएमएस माझ्या सर्व परिचितांना पाठवण्याचा विचार आहे. कशी वाटते कल्पना?

Aug 30, 2010

लगी रहो मुन्नीबाई!

काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं.

तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती...

`

दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती...

देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात. अरबाज खाननं केवढ्या उदात्त हेतूनं त्याच्या `दबंग`मध्ये हे गाणं टाकलं!स्त्रीला कवडीमोल समजणा-या, तिच्या भावनांना, विचारांना काडीचीही किंमत देणा-या आपल्या समाजाच्या तोंडात मारणारं हे गाणं. `मुन्नी बदनाम हुई..डार्लिंग तेरे लिये...` किती अर्थवाही शब्द. किती अप्रतिम चाल...आपल्यासाठी अतिप्रिय असलेल्या आपल्या प्रियकराला उद्देशून, समाजाची पर्वा करता, सर्व बंधनं झुगारून आपल्या प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करणारी ही रूपगर्विता...सगळ्या जगाला ओरडून सांगतेय, `मुन्नी बदनाम हुई...डार्लिंग तेरे लिये...` कुणी ऐकेल, तिला विरोध करेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. आपल्या पवित्र, उदात्त प्रेमासाठी कोणत्याही त्यागाची तिची तयारी आहे. भले समाजानं नावं ठेवली तरी चालतील! तिचं प्रेम अढळ आहे. तिची निष्ठा अविचल आहे. तिचा निर्धार दबंग...साॅरी..अभंग आहे.

भारतीय संस्कृतीचं मोल आणि सार किती सार्थपणे मांडलंय मोजक्या शब्दांतून...किती समर्पक उपमा! किती नेमक्या भावना! काय उत्स्फूर्त नृत्य!!

गाण्यातल्या नेमक्या भावना, विचार आपल्या अंगप्रत्यंगातून समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेली तशीच समर्थ अभिनेत्री, नृत्यांगनाही हवी. अरबाज खाननं हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सहधर्मचारिणीलाच साकडं घातलं. तिनंही पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून ही कामगिरी लीलया पार पाडलेय. प्रेक्षकांच्या हृदयांचा आणि स्वतःच्या हाडांचा चक्काचूर होईल, याची पर्वाही करता तिनं गाण्यातल्या भावना, विचार नेमकेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी किती विद्युल्लतेच्या वेगानं कंबर लचकवलेय पाहा...

प्रत्यक्ष जीवनात नणंद-भावजयीचं पवित्र नातं कसं असावं, याचं किती यथार्थ दर्शन सलमान-मलायकाच्या नृत्यातून घडतं...वहिनी असावी तर अशी असं प्रत्येकाला वाटलं नाही, तर ज्याचं नाव ते.

चित्रपट संगीताची ओळख बदलून टाकणा-या, गीतलेखन-नृत्यशैलीला नवी दिशा दाखवणा-या, भारतीय संस्कृतीची महती नेमक्या शब्दांत पटवून देणा-या या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करणं, त्यासाठी निर्मात्यांना कोर्टात खेचणं, याला करंटेपणा म्हणावं नाहीतर काय..

...

दुःखालाही सुखाची सोनेरी किनार असते म्हणतात. `मुन्नी बदनाम हुई`वर बंदी येण्याच्या नैराश्यजनक, विदारक बातमीच्या सोबत एक आशेचा किरण आहेच....त्यातल्या हिंदुस्थान एवढ्याच शब्दाला याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. त्यामुळे देशाचा अवमान होत असल्याचा त्याचा दावा आहे. चला...म्हणजे तेवढा शब्द काढला, तर गाणं या भीषण संकटातून सहीसलामत सुटण्याची चिन्हं आहेत. देव पावला!
 

Aug 23, 2010

राखी अमावस्या!

राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्‍वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो...
शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम्‌ पापम्‌' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच! "मैत्रीण' असणं वगैरे गोष्टी वर्ज्यच होत्या, साधं वर्गातल्या मुलीशी बोलणंही दुरापास्त होतं. शाळेच्या व्हरांड्यात मुलं-मुली घोळक्‍यानं गप्पा मारताहेत, एकत्र नाटकं-सिनेमे बघताहेत, टाळ्या देऊन खिदळताहेत, अशी दृश्‍यं पाहिली, की आपण शाळेत भोगलेल्या "नरकयातना' नको नको म्हणताना आठवतात.
आम्ही सातवीच्या वर्गात होतो. आमचा वर्ग जाम दंगा करायचा, त्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला एका बेंचवर एक मुलगा-एक मुलगी असं बसवण्यात आलं होतं. केवढा घोर अपमान, अन्याय वाटला होता आम्हाला तेव्हा! तेव्हा आम्ही एकमेकांशी घेतलेली खुन्नस, बेंचवर आखून घेतलेली हद्द वगैरे गोष्टी ब्लॉगवर लिहिल्या आहेतच.
वर्गात मुला-मुलींच्या जोड्या लावायची फॅशन होती. कुणी मुलगा एखाद्या मुलीच्या जागेवर बसला, की त्याला तिच्या नावानं चिडवलं जायचं. किंवा साधारणपणे मुलग्यांमधला हुशार क्रमांक एक आणि मुलींमधली हुशार क्र. 1, अशा क्रमानेही जोड्या लागायच्या. एकमेकांच्या नावांमधली सामायिक अक्षरं शोधून त्यानुसार जोड्या लावल्या जायच्या. शेजारी पाजारी किंवा एकाच भागात राहणाऱ्या मुलामुलींच्या जोड्या लावायला तर सोप्पंच होतं. एकाच भागात राहत असलो, तरी शाळेत एकत्र वगैरे जाण्याची सोयच नव्हती. साधं एखाद्या मुलीच्या मागून गेलो, तरी हा मुलगा आपल्या मागे लागलाय की काय, असा संशय या मुलींना यायचा. "दहशतवाद' त्या काळीही फोफावलेला होताच!
अशा चिडवाचिडवीला वैतागून मग त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा सोपा मार्ग म्हणजे राखीपौर्णिमेचा "पवित्र' सण होता. आपल्याला ज्या नावाने चिडवलं जातं, त्या मुलाला राखी बांधली, की भानगडच मिटून जायची. मग कोण कशाला धाडस करतंय चिडवायचं? असे आगंतुक "भाऊराया' बनायला काही लोक अगदी उतावीळ असायचे, तर काहींच्या हृदयाची अगदी शंभर शकलं व्हायची.
वर्गातून गायब होऊन किंवा आवडत्या मुलीला टाळून या दहशतवादातून सुटण्याचा मार्ग होता. पण शाळेत होणाऱ्या सामूहिक रक्षाबंधनाचं काय? संघाच्या माध्यमातून शाळेत येणाऱ्या गोंड्याच्या राख्या प्रत्येकाच्या हातावर दिसल्याच पाहिजेत, असा शाळेचा दंडक होता. जणू सगळ्या मुलींचा संभाव्य तेजोभंग टाळण्याचा घाऊक मक्ताच शाळेने घेऊन टाकला होता! जेवढी मुलं, तेवढ्या राख्या वर्गात मागवल्या जायच्या आणि मग प्रत्येकाला समोर बोलावून एकेका मुलीनं त्याच्या प्रेमभावनांच्या सामूहिक कत्तलीचा साग्रसंगीत सोहळा पार पडायचा! तरीही शक्‍यतो आपली आवडती मुलगी आपल्याला राखी बांधायला येऊ नये, म्हणून मुलं जागांची अदलाबदल, बेंचखाली दडून राहणं, वगैरे वगैरे उपद्‌व्याप करायचे. कश्‍शाकश्‍शाचा म्हणून निभाव लागायचा नाही.
अर्थात, राखी बांधून घेण्यातही एक गंमत होतीच म्हणा! आपल्याला मुलगी राखी बांधतेय, म्हणजे इतरांपेक्षा जास्त भाव देतेय, असाही एक सर्वमान्य समज होता. हातावर राख्यांची संख्या जेवढी जास्त, तेवढा तो मुलगा मुलींचा लाडका, असंही एक गृहीतक होतं. त्यातून मुलीच्या नाजूक हातातून राखी बांधून घेताना होणारा अलगद स्पर्शही त्या वयात मनाला मोहरून टाकायचा, ही गोष्ट अलाहिदा! शिंगं फुटली, तशी राख्यांची जागा "फ्रेंडशिप बॅंड'नी घेतली. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली त्यांचेही पेव फुटायच्या आतच आम्ही कॉलेजातून बाहेर पडलो होतो!
मनगटांतील राख्यांची आणि अपवादात्मक परिस्थितीत फ्रेंडशिप बॅंडची सद्दी संपली आणि लग्नाच्या वेळी हातात बांधलेला हळकुंडाचा दोरा हातात बांधला. दुसऱ्या दिवशी तो उतरवला असला, तरी आयुष्यभराची बेडी हातात पडली ती पडलीच!

Aug 12, 2010

ये रे माझ्या "माग'ल्या!

युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्‍वभूमी' जरा वेगळी होती.
बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्‍वभागाचा! हो हो...!
`दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी...
कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं. शिवाय, त्यासाठी दहा कोटी रुपये कुठली कंपनी मोजायला तयार होणार, ते विमा म्हणून नक्की कशाची हमी देणार, याविषयीचं कुतूहल जास्त होतं.

बातमीतून तरी ते काही स्पष्ट झालं नाही. माझ्या मनात मात्र अनेक कल्पना, शंकाकुशंकांनी थैमान घातलं. त्यातल्याच या काही...
1. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्‍वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का?
2. बूडही न हलवता तासन्‌ तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का?
3. पार्श्‍वभागाचं दर्शन घडविणाऱ्या जीन्स घातल्या, तर विम्याच्या हप्त्यात काही सवलत मिळते का?
4. "हिप्स डोन्ट लाय' असं कुणीतरी शकीरा नामक गुरूमाता म्हणून गेलेय, असं ऐकतो. "हिप्स'बाबतची "पॉलिसी' पण डोन्ट लाय, याची हमी कोण देणार?
5. ** फाटणे, ** मारणे, ** उदास होणे, अशा दुर्घटना/आपत्तींसाठी पण विमा योजना लागू होणार का?
---

Aug 11, 2010

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे.
- मी सर्वपित्री अमावस्येला करतो.
...
चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे.
- मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो.
...
संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात.
- मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो.
...
बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे. गेल्या महिन्यापासून तसा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडला. अलिकडच्या काळात सोन्याला सोन्याचा भाव आल्यापासून तर आपण त्यात गुंतवणूक करायलाच हवी, असं प्रकर्षानं वाटू लागलंय. त्यातून लॅपटॉपच्या "सरप्राइज गिफ्ट'साठी बायकोनं घरात जमवून ठेवलेलं सोनं उधळल्याचं रहस्योद्‌घाटन मला झाल्यानंतर तर हा किडा डोक्‍यात फारच वळवळायला लागला. गेल्या महिन्यापासून शिलकीतले पैसे सोन्यात घालायचा संकल्प केला आणि दोन महिने पारही पाडलाय. सोनं खरेदी करायचं ठरवणं, त्यासाठी वेळेत हातात पैसे असणं, हा "मणिकांचन योग'च! सुदैवानं तो जुळून आलाय.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की याच सोन्यानं आज एका संभाव्य भुर्दंडातून मला वाचवलं.
सकाळी सकाळी बहिणीचा फोन आला. बॅंकेत लॉकरच्या किल्ल्यांवर एम्बॉसिंग करून मिळणार आहे आणि त्याची मुदत आज आणि आणखी एक दिवस, अशी दोनच दिवस आहे, असं तिनं सांगितलं. या मुदतीत करून न घेतल्यास ग्राहकांना स्वतःच्या पैशांनी ते करून घ्यावं लागणार आहे, असंही समजलं. तसं पत्र तिला बॅंकेकडून आल्याचं तिनं सांगितलं. मला असं काहीच पत्र आल्याचं आठवत नव्हतं. मी तिच्या सूचनेचं पालन करायचं ठरवलं आणि सकाळी सकाळी बॅंकेत जाऊन धडकलो. विचार केला, लॉकरची किल्ली घेऊन जात आहोत, तर लॉकर उघडून घरातलं काहीबाही ठेवूनही यावं. भविष्यकालीन योजनेसाठी घेतलेलं सोनंही त्यात होतंच.
घरातून लॉकरची किल्ली चटकन शोधून बॅंकेत पोचलो, तर हीऽऽऽऽ गर्दी होती. आधी लॉकर उघडून ते काम पूर्ण करावं, मग एम्बॉसिंगसाठी किल्ली द्यावी, असं ठरवलं. लॉकर उघडायला गेलो, तर किल्लीच लागेना. सोबत आलेल्या बाईंनी त्यांच्याकडची किल्ली लावली, तरी कुलूप ढिम्म. मग त्यांनी आलटून पालटून सगळ्या किल्ल्या लावून बघितल्या. दुसरा जुडगाही आणला. तरीही काहीही फरक नव्हता. मी चुकीची किल्ली आणली असेल, असं त्यांनी भीत भीत सुचवून पाहिलं, पण मी त्यांना धुडकावून लावलं. आमच्या घरात अशी दुसरी किल्लीच नाहीये, असं छातीठोकपणे सांगितलं. मग त्या थकल्यावर त्यांनी एका शिपायाला ते काम दिलं. त्याचेही प्रयत्न निष्फळ ठरले.
त्यांच्यावर उपकार केल्याच्या थाटात, "तरीही मी किल्ली चुकलेय का ते पाहतो,' असं मोठ्या मनानं मी त्यांना सांगितलं.
बाहेर पडल्या पडल्या हर्षदाला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला.
""तू चुकीची किल्ली नेली असशील!'' तिनं पहिलेछूट सांगून टाकलं.
स्वतःबद्दलही नसेल, एवढा विश्‍वास बायकांना नवऱ्याच्या गबाळेपणाबद्दल कसा असतो, कुणास ठाऊक!
तरीही मी मनाचा हिय्या करून तिला प्रत्युत्तर देण्याचं धाडस केलं. तूच कुठली तरी किल्ली आणून ठेवली असशील, मी चुकणं शक्‍यच नाही वगैरे तिला सांगून पाहिलं.
घरी येऊन तपासलं, तर तिचंच म्हणणं बरोबर होतं.
चुकीची किल्ली नेली होती. आता मान खाली घालून पुन्हा बॅंकेत जाणं आलं. तरीही बॅंकेतल्या बाई माझ्याशी सौजन्यानं वागल्या.
"तुम्हाला एवढीही अक्कल नाही का हो,'च्या ऐवजी फक्त "बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना,' एवढंच म्हणाल्या.
बाई देखण्या होत्या. त्यामुळे त्यांना "सॉरी' म्हणतानाही जिवावर आलं. त्यांनी त्याची दखलही घेतली नाही, हे सांगणे न लगे.
...
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, बॅंकेचं लॉकरसंदर्भातलं जे पत्र आलं नाही म्हणून मी त्या (देखण्या) बाईंशी भांडलोही होतो, ते आमच्या घरीच असल्याचं मला बायकोनं नंतर सांगितलं.
"मला आधी का सांगितलं नाहीस,' असा जाब विचारल्यावर, ते मीच फोडलं होतं, अशी मौलिक माहिती तिनं दिली.
"किल्लीच्या एम्बॉसिंगबद्दल मला का सांगितलं नाहीस,' असं विचारल्यावर "तू ते वाचलंही होतंस,' अशी आणखी मौलिक माहिती तिनं दिली.
"माझ्या दिव्य स्मरणशक्तीबद्दल कल्पना असूनदेखील, तूच ते लक्षात ठेवून मला का ठोठावलं नाहीस,' असा युक्तिवाद मी त्यानंतर केला.
कपाळावर हात मारून घेण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता!
---

Aug 9, 2010

काचांची `लांबी' आणि गृहकृत्यदक्षतेची `रुंदी'

"घरच्या छपराचे कोने (दोन बाजूंच्या कौलांना जोडणारी वेगळ्या प्रकारची कौले) बसवायला माणूस मिळत नव्हता. घरी यायला नाटकं करत होता. शेवटी मी त्याला झिडकारून छपरावर चढून कोने बसवले...''
रायकर मास्तर आम्हाला सांगत होते.
""कुणी अडून बसला, तर त्याच्यावर अजिबात अवलंबून राहायचे नाही, हे धोरण अंगी आणायला हवे. जगात कुणाचं काही अडणार नाही!''...त्यांची भूमिका ठाम होती.
आज मी घराच्या खिडक्‍यांना लांबी बसवली, तेव्हा त्यांची आठवण झाली.
...
"घरात इतर काही करत नाहीस. निदान तेवढं तरी काम कर!''
...अगदी अशाच नाही, पण अशा भावना असलेल्या भाषेत सहधर्मचारिणीनं आमचा उद्धार केला होता. त्यामुळं आपल्यालाही घराची काळजी आहे, घरासाठी आपलंही काही योगदान आहे, हे सिद्ध करणं आवश्‍यक होतं.
घराच्या खिडक्‍यांच्या काचांची लांबी पडली होती. पण आमच्या मासिक आर्थिक नियोजनाची "रुंदी' कमी झाल्यानं लांबी लावण्याचं काम बाहेरच्या कुणाला देणं शक्‍य होत नव्हतं. एका कामगाराला बोलावलं, त्यानं सगळ्या काचांचे एक हजार रुपये सांगितले होते. त्याच वेळी त्याच्या पुढ्यात त्या सगळ्या काचा फोडून त्यावर त्याला नाचायला लावावं, असं मला वाटलं होतं. पण घरच्या "हेमा'नं रोखलं.
बाहेरच्या कुणालाही काम द्यायचं नाही, असं ठरवलं खरं, पण याचाच अर्थ ते काम मी करण्याला पर्याय नाही, असा झाला होता. त्यासाठी बाहेरून लांबी आणणं आणि वेळात वेळ काढून ती लावणं गरजेचं होतं. बरेच दिवस ते काही जमत नव्हतं. एक काच तर अगदी पडायला आली, तेव्हा चिकटपट्ट्या लावून तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ती आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती.
अखेर आज मुहूर्त लागला. समोर बॅंकेत काही कामानिमित्त गेलो होतो, तेव्हा मनाचा हिय्या करून हार्डवेअरच्या दुकानात गेलो आणि अखेर लांबी खरेदी केली. घरी आणून लावूनही टाकली. ती तयार अवस्थेतलीच होती. त्यात काहीच मिक्‍स वगैरे करायचं नव्हतं. अवघ्या वीस रुपयांत दोन काचांचं काम उरकलं!
एवढे दिवस लांबी कुठे मिळेल, ती कशी वापरायची, हाच गहन प्रश्‍न होता. त्यामुळे टाळाटाळ चालवली होती. एखाद्या दुकानात जाऊन चौकशी करण्याची तसदीही घेतली नव्हती. आज अचानक मनात आलं आणि लांबी मिळूनही गेली!
काही गोष्टींना थेट भिडल्याखेरीज त्या हाताशी येत नाहीत, हेच खरं!!
...
ता. क. : या ब्लॉगपोस्टला फारशी "खोली' नाही, हे जरी खरं असलं, तरी "लांबी'च्या या मोहिमेबद्दल मला छाती "रुंद' करून सांगायचंच होतं! असो.

Aug 3, 2010

फ्रेंडशिप band (`बंद')!

""बाबा, आपल्याकडे फ्रेंडशिप बॅंड आहेत?''
शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेली आमची साडेपाच वर्षांची चिमुरडी मला विचारत होती.
"नाहीत,' असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला.
""मला उद्या पाच -सहा फ्रेंडशिप बॅंड हवेत!'' तिनं फर्मान सोडलं.
""कशाला गं?'' मी साळसूदपणाचा आव आणला.
""आमच्या वर्गातली मुलं आज एकमेकांना बांधत होती. माझ्याकडे एकही नव्हता. मला उद्या हवा म्हणजे हवा!'' तिनं ठणकावलं.
आपला गरीब बिच्चाऱ्या पित्याच्या भूमिकेत शिरून गप्प बसलो. संध्याकाळी आईनं तिला फ्रेंडशिप बॅंड आणून दिले. आज वर्गातल्या तिच्या आवडत्या मुलांना ती बांधूनही आली.
आमची शाळा आठवली.
फ्रेंडशिप म्हणजे काय, ते आम्हाला सातवी-आठवीत कळू लागलं. तेदेखील मुला-मुलांच्या फ्रेंडशिपबद्दलच. मुला-मुलींची फ्रेंडशिप वगैरे नाव काढायचीच सोय नव्हती. एक गाल शिक्षकांनी आणि दुसरा घरच्यांनी लाल केला असता, अशी परिस्थिती होती.
शाळेत मुला-मुलींच्या गप्पा, मैत्रीवर अघोषित बंदी होती. शाळेनं तशी घातली नव्हती, पण प्रथाही नव्हती. मुला-मुलींना चिडवणं वगैरे चालायचं. एखाद्या मुलीला एखाद्या मुलाच्या नावानं जास्तच चिडवलं जाऊ लागलं, की ती राखीपौर्णिमेला थेट त्याला राखीच बांधायची. मुला-मुलींमध्ये एकच नातं होतं - भावा बहिणींचं! कसं अगदी पवित्र नातं!
आम्ही वर्ग डोक्‍यावर घ्यायचो म्हणून सातवीत आम्हाला भयंकर "शिक्षा' झाली होती. मुलींच्या शेजारी एकाच बाकावर बसण्याची!
एखाद्या मुलीच्या शेजारी बसण्यासारखा अपमान आणि अवहेलना नव्हती!
आम्ही मग बेंचवर "हद्द' आखून घ्यायचो. माझ्या हद्दीत तू फिरकायचं नाही...हात ठेवायचा नाही...पेन इकडे येता कामा नये, एवढ्या पातळीवर ही खुन्नस चालायची.
झ्या शेजारी राहणारी मुलगी माझ्या पुढच्याच बाकावर बसायची, पण मी वर्गात तिच्याशी जेमतेम एक-दोनदा बोललो असेन. तेदेखील पेन खाली पडलंय, खोडरबर आहे का वगैरे प्रश्‍नांसाठी.
फ्रेंडशिप वगैरे करण्याचं वारं कॉलेजात गेल्यावरच डोक्‍यात शिरलं. स्लॅमबुक देखील वर्षाच्या अखेरीस हाती पडलं.
फ्रेंडशिप करायची क्रेझ असते त्या वयात ती केली नाही, पण पुण्यात आल्यावर मात्र मनसोक्त अनुभवली. प्रत्यक्ष फ्रेंडशिपच्या जागी इथे व्हर्च्युअल, अर्थात नेट फ्रेंडशिप अनुभवायला मिळाली.
त्या माध्यमातून मात्र अनेक चांगले मित्र मिळाले. कुणी माझ्या गावाचे निघाले, कुणाशी विचार जुळले, कुणाशी भावनिक तारा जमल्या, कुणी "ग्राफिटी'चे चाहते निघाले. अनेकांशी दृढ मैत्री झाली. ती केवळ व्हर्च्युअल न राहता प्रत्यक्षही भेटणं झालं.
असं असलं, तरी फ्रेंडशिप बॅंड वगैरे मैत्रीच्या देखाव्यात कधी अडकावंसं वाटलं नाही. तशा दिखाऊ मैत्रीपेक्षा खूप घट्ट मैत्री असली, तरी ती जगाला ओरडून सांगावीशी वाटली नाही. कधीकधी स्पष्ट बोलण्यानं, अलिप्त वागण्यानं काही मित्र दुखावले, काही दूर गेले, काहींनी अचानक रामराम ठोकला. पण जे उरले, त्यांच्याशी छान संवाद राहिला. त्यांच्या आयुष्यात वेगवेगळी स्थित्यंतरं आली...दरवेळी मला साथीला जाता आलंच असं नाही, पण त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी, मदतीची भावना कायम राहिली.
आजही आहे...जे दूर गेले, त्यांनाही या निमित्तानं परत येण्यासाठी ही हाक आणि जे आहेत, त्यांच्याशी मैत्री अधिक घट्ट व्हावी, ही सदिच्छा!
मनस्वीच्या फ्रेंडशिप बॅंडच्या निमित्तानं बऱ्याच आठवणींवरचा पडदा निघाला.
लिहायचं होतं जरा हलकंफुलकं, पण जरा भावनांचे कढ जास्तच झाले.
असो. माणसानं दर वेळी मन हलकं करण्यासाठी विनोदाचा आधार घेतलाच पाहिजे का?
----
तळटीप ः आजही फेसबुक, ऑर्कुटवर ओळखपाळख, स्वतःची माहिती देण्याचंही सौजन्य न दाखविता थेट "फ्रेंडशिप रिक्वेस्ट' पाठवणारे उपटसुंभ भेटतात. मी त्यांची माहितीही न बघता रिक्वेस्ट फेटाळून लावतो!
 

Jul 30, 2010

`काका' मला वाचवा!

"सार्वजनिक काका' अशा नावाचा एक पुरस्कार पुण्यात दिला जातो. सार्वजनिक कार्यात अग्रेसर असलेल्या लोकांसाठी हा पुरस्कार असावा. आमच्याशी संबंधित दोन काकांनी मात्र त्यांच्या "सार्वजनिक' वागण्याने अलीकडच्या काळात उच्छाद मांडला.

गेल्या वर्षीपर्यंत मला वेळ असल्यानं मनस्वीला सकाळी शाळेत आणि दुपारी बाल भवनला सोडण्याची जबाबदारी मीच खांद्यावर (आणि कडेवर) घेतली होती. या वर्षी मात्र निमिषचं आमच्या घरात आगमन झाल्यापासून आणि मनुच्या शाळेची वेळ बदलल्यापासून तिच्या शाळेच्या वेळांच्या बंधनात अडकायला नको वाटू लागलं. मनुची शाळा यंदा सकाळी 7.20 ची झाली. त्यामुळं सहाला उठणं, तिला आवरून वेळेत तयार करणं आणि काकांच्या व्हॅनसाठी सातच्या आधी सोडणं, असा दिनक्रम झाला. महिनाभरच झाला शाळा सुरू होऊन आणि सगळं व्यवस्थित सुरू होतं. एके दिवशी मात्र मनस्वी दुपारी घरी आली, ती हिरमुसल्या चेहऱ्यानं. तिला शाळेत उशीर झाल्यामुळं शिक्षा झाली होती. मैदानात उभं राहायला आणि उठाबशा काढायला लावलं होतं.

सकाळी ती वेळेत खाली उतरली, पण काका आले, तेव्हा त्यांच्या गाडीचं चाक पंक्‍चर होतं. त्यांनी तशाच अवस्थेत मुलांना गोळा करून वाटेत दुसऱ्या गाडीत मुलं सोडली आणि त्यांच्या मार्फत ती शाळेत पोचली, तेव्हा थोडासा उशीर झाला होता. अशा कारणासाठी पाच-दहा मिनिटं उशीर झाल्यानंतरही मुलांना शिक्षा झाल्याचं कळल्यावर माझं डोकंच फिरलं.

दुसऱ्याच दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांना तीव्र नाराजी व्यक्त करणारं पत्र दिलं. त्यांनी त्याची दखल घेतली, पण फारसा फरक पडला नव्हता त्यांना. वर उठाबशा म्हणजे मुलांसाठी व्यायामच असतो, असंही ऐकावं लागलं.

या काकांनी दुसऱ्या काकांकडे मुलं सोपविताना शाळेपर्यंत व्यवस्थित निरोप पोचविण्याची व्यवस्था तातडीने करायला हवी होती. ती त्यांनी न केल्यामुळे या मुलांना नाहक शिक्षा झाली.

दुसऱ्या काकांची वेगळीच तऱ्हा.
मनस्वी बाल भवनला अधून मधून दांड्या मारतेच. कधी पाऊस, कधी कुठलं काम, कधी कार्यक्रम यामुळे ती जाऊ शकत नाही. दर वेळी ती एक-दोन दिवस गेली नाही, की तिसऱ्या दिवशी तिच्या काकांना फोन करून ती येणार असल्याचं कळवायला लागायचं. त्यातून हल्ली साडेचारच्या बाल भवनसाठी तिची रिक्षा खूप लवकर, म्हणजे पावणेचारलाच येते, म्हणून आम्ही जाताना तिला स्वतःच सोडायचं ठरवलं होतं. तरीही काकांना पैसे दोन वेळचेच देत होतो.

मध्यंतरी एक-दोनदा काकांना फोनवरून न कळवल्यामुळं ते मनस्वीला घेऊनच आले नाहीत. मग उगाच धावतपळत तिला आणायला पुन्हा जावं लागलं. दरवेळी त्यांचं कारण ठरलेलं असायचं - ती कुठेतरी खेळत होती, बाईंनी मला सांगितलंच नाही, काका काही बोललेच नाहीत..वगैरे वगैरे.
आज पुन्हा ते तिला तिथेच ठेवून निघून गेले, तेव्हा या संतापानं टोकच गाठलं. मनस्वी ताईंबरोबर घरी आली. मी फोनवरून त्यांना झापलं. पण तरीही ते ढिम्म होते. आजही त्यांची कारणं तयार होती. मी रिक्षा बंद करून टाकली, तरी त्यांना फारसा काही फरक पडलेला नव्हता.

आता मनस्वीला दुसरी व्हॅन शोधायचेच. पण स्वतः करीत असलेल्या कामावर विश्‍वास असलेले काका कुठे मिळतील?
 

Jul 29, 2010

व्यसनेशु सख्यम!

आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो.

अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही. काही सिनेमे तर अर्धवट बघितले, पण इंटरव्हलनंतर बघायचे राहिले, ते राहिलेच. अनेक जुने, अर्धजुने सिनेमेही मी पाहिलेले नाहीत. पूर्वी घरून परवानगी नव्हती, कुठले सिनेमे बघायची त्याची अक्कल नव्हती, रत्नागिरीत फार काही बघण्याची संधी नव्हती...बरीच कारणं. बॅकलॉग बराच राहिलाय, एवढंच खरं.

हाच बॅकलॉग भरून काढण्याचे आता प्रयत्न चाललेत. त्यामुळे आज वेळ होता म्हणून थोड्या सीडी खरेदी कराव्यात, असा विचार करून दुकानात शिरलो होतो. दहा-पंधरा मिनिटांत खरेदी उरकून निघायचं होतं, पण सीडींचा खजिना पाहून रमायलाच झालं. मोझर बेअरच्या अलिकडे आलेल्या स्वस्तातल्या सीडी हे माझं पहिलं लक्ष्य होतं. पण डीव्हीडी पाहिल्या आणि त्यांच्या प्रेमात पडलो.

नव्या, जुन्या सिनेमांच्या अनेक डीव्हीडी खुणावत होत्या. माझे अलिकडच्या काळात चुकलेले अनेक सिनेमे एकत्रित उपलब्ध होते. त्यातही सर्वांत चांगल्या पॅकेजसाठी बरीच शोधाशोध केली. कमिने, वेन्सडे, देव डी, अशा एकूण सहा चित्रपटांची डीव्हीडी अवघ्या 55 रुपयांना पाहून मी थक्क झालो. अलिकडे पायरसी बोकाळल्यापासून 50 रुपयांत पाच, सहा चित्रपट की गोष्ट काही नवी नव्हती. पण ती बनावट सीडींच्या बाबतीत होती. अधिकृत, चांगल्या दर्जाच्या आणि कंपनीच्या सीडीसुद्धा एवढ्या स्वस्तात उपलब्ध असल्याची मला कल्पनाच नव्हती.
अवघ्य 55 रुपयांत सहा सिनेमे खरेदी करताना मला रत्नागिरीचे सिनेमा पाहण्यासाठीचे संघर्षाचे दिवस आठवले. तेव्हा थिएटरला तिकीट दहा रुपयांच्या आतच होते, पण तरीही घरून सिनेमा पाहायला जायला परवानगी मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागायचा. "टीव्हीवर येईल तेव्हा बघ सिनेमा!' हे उत्तर ठरलेलं असायचं. मग काहीतरी कारण सांगून, बाबापुता करून परवानगी मिळवायला लागायची. नववीत असताना आईनं "थरथराट' बघायला परवानगी दिली नाही, तेव्हा तेवढा "थयथयाट' केला होता मी! दहावीच्या अख्ख्या वर्षात मी एकच चित्रपट पाहिला होता. मोठं झाल्यावर मी यंव करीन नि त्यंव करीन अशी स्वप्नं पाहायचं वय होतं ते. मी त्यावेळी मोठं झाल्यावर आपण तिन्ही थिएटरला लागलेले सगळेच्या सगळे सिनेमे दर आठवड्याला पाहायचे, असली स्वप्नं रंगवायचो. आमच्या महत्त्वाकांक्षेची झेप तेवढीच!

अनेकदा उन्हाळ्यात सार्वजनिक पूजेच्या निमित्तानं मळ्यात, मैदानात सिनेमे प्रोजेक्‍टरवर दाखवले जायचे. शेजारपाजारचा कुणीतरी जोडीदार शोधून मी ते पाहायला जायचो. टिपिकल मिथून, अमिताभ, नाहीतर जीतेंद्रचे सिनेमे असायचे. पण तरीही कुठेतरी शेणार, चिखलात, काट्यात, गडग्यावर बसून डोळे तारवटून ते सिनेमे पाहायचो. रस्त्यात बसलेलो असताना बस आली म्हणून चंबूगबाळं आवरून मध्येच उठावं लागायचं. पडद्याच्या समोरच्या बाजूला जागा मिळाली नाही, तर मागच्या बाजूनं उजव्या हातानं फायटिंग करणारा अमिताभ पाहावा लागायचा. मध्येच कुठून तरी सापबिप निघाला, तर पळापळ व्हायची. धुरळा, मातीनं कपडे खराब व्हायचं. पण "की न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने' या निर्धारानं आम्ही टिकून राहायचो.
"राम तेरी गंगा मैली' पाहायला असाच कुठेतरी रस्ता तुडवत गेलो होतो. तिथे व्हिडिओवर सिनेमा होता आणि आम्ही सुमारे वीस-पंचवीस फुटांवर होतो. मंदाकिनीचं नखसुद्धा दिसणं शक्‍य नव्हतं! मग हिरमुसून परत फिरलो होतो.
मजा होती त्या दिवसांत!

आज 55 रुपयांत 6 सिनेमे, म्हणजे नऊ रुपयांना एक सिनेमा कायमस्वरूपी विकत घेताना हे सगळं आठवलं आणि फार वाईट वाटलं. आपण जिवापाड प्रेम केलेलं हे व्यसन एवढं स्वस्त आणि सहज होईल, अशी कधीच कल्पना केली नव्हती.
आपल्या आवडीच्या, अतीव प्रेमाच्या गोष्टीसाठी थोडेफार कष्ट करायला लागले पाहिजेत. सुखसोयी आयत्या मिळाल्या, तर त्यातली गंमत कमी होते, हेच खरं!
 

Jun 29, 2010

पावसा पावसा कधी होशील रे पाऊस?

मानसा मानसा कधी होशील रे मानूस

अशी कुणाची तरी कविता आहे. कुणाची तरी अशासाठी, की मला कवितेतलं की ठो कळत नाही. कळलं, तरी लक्षात राहत नाही. मग कशाला डोक्याला ताप घ्या? कुणाची तरी असं म्हटलं, की सगळे प्रश्न मिटतात.

तर ते असो.

सांगण्याचा उद्देश हा, की सध्या पावसा पावसा कधी होशील रे पाऊस, असं म्हणायची वेळ आलेय.

यंदा भरपूर पाऊस होणार...मान्सून आला...102 टक्के सरासरी गाठणार..जूनची सरासरी ओलांडली...खंडीभर बातम्या लिहून, वाचून आणि संपादित करून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भरपूर करमणूक झाली. या बातम्या वाचतानाच मनात शंकेची पाल चुकचुकत होती. चोर-दरोडेखोर जसे पेपरमधल्या बंदोबस्ताच्या बातम्या वाचून सावध होतात ना, तसाच पाऊस झाला तर? पण स्वयंघोषित हवामानतज्ज्ञ सांगत होते, `गेल्या वर्षी दुष्काळ होता. म्हणजे यंदा पाऊस नक्की पडणार. अगदी सरासरी ओलांडणार...' मग आमची तोंडं गप्प झाली.

पण व्हायचं तेच झालं. गेले पंधरा दिवस पाऊस वाकुल्या दाखवतोय. पुण्यात, पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडून पाणी वगैरे भरल्याच्या बातम्या एखाद-दोन वेळाच वाचायला मिळाल्या. त्यादेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात. त्यातला निम्मा पाऊस तर मान्सूनचा नव्हताच...

ट्रेकला सुरुवात करायची म्हणून गेल्या रविवारी भातराशी ट्रेकला जाऊन आलो. पवनानगरच्या अगदी पावसाच्या पट्टयात. वाटलं, पावसात चिंब भिजता येईल. पण कसलं काय नि कसलं काय...औषधालाही पाऊस नव्हता. एकदा धुक्याचं दर्शन झालं, तेवढंच.

काल खडकवासल्याला गेलो होतो. तिथेही पाऊस भेटला नाहीच. साधे ढगसुद्धा सिंहगडाच्या टोकावरून खाली उतरायला तयार नव्हते.

गेल्या वर्षी पावसानं असंच कुथवलं होतं. जूनची पुण्यातली सरासरी ओलांडून गेली आणि मग पावसासारखा पाऊस काही पडलाच नाही. जुलै, आॅगस्टमध्ये थोडी भरपाई केली त्यानं, पण तेवढीच. गेल्या वर्षी पाच जुलैला ताम्हिणीत गेलो होतो. नेहमीपेक्षा जरा लवकरच. पुण्यात पावसाची फारशी लक्षणं नसल्यानं या ट्रिपविषयी जरा धाकधूकच मनात होती. पण जातानाच एका छोट्या धबधब्यानं उत्साह वाढवला. नंतर तर रस्त्यावर आम्ही धुक्यात हरवून गेलो आणि ताम्हिणीत फार नाही, पण आनंद घेण्याएवढे धबधबे मिळाले.

यंदा एवढ्यात ताम्हिणीत जायचा विचार नाहीये, पण पावसाची प्रतीक्षा मात्र आहे. ताम्हिणीसह माळशेजही करायचा बेत आहे. बघूया. आधी पाऊस तर पडू दे.!
 
(फोटो गेल्या वर्षीचे आहेत. क्रुपया गैरसमज नसावा.)

Jun 23, 2010

डोळे तुपाशी; डोके उपाशी!



दसऱ्याचा रावण दहनाचा भव्य कार्यक्रम पाहायला जावं आणि बुजगावण्याला जाळताना पाहायला लागावं, तसं काहीसं "रावण' पाहणाऱ्या प्रेक्षकांचं होतं. प्रचंड बजेट, अफाट मेहनत, बक्कळ पैसे घेणारे बडे कलाकार आणि भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळी दिशा देणारे दिग्दर्शक मणिरत्नम अशी भरभक्कम रसद रणांगणावर मान टाकते आणि "रावण'चं "दहन' कसलं, शेकोटीच पाहावी लागते!
महाभारतावरचा "राजनीती' झाला; आता मणिरत्नम यांनी "रावण'मध्ये रामायणाला वेठीस धरलं आहे. इथे दुष्ट प्रवृत्तीचा "रावण' (वीरा ः अभिषेक बच्चन) आहे, त्याला मारणारा "राम' (देव ः विक्रम) आहे आणि रावणानं अपहरण केलेली त्याची पत्नी "सीता' (रागिणी ः ऐश्‍वर्या राय) आहे. सीतेचं अपहरण, रामाला हनुमानाची (गोविंदा) मदत, सीतेची अग्निपरीक्षा (पॉलिग्राफ टेस्ट!) असं सगळं आहे. मणिरत्नम यांचा रावण मात्र जरा जास्तच सहानुभूती वाटावा असा आणि अन्यायामुळे व्यवस्थेशी संघर्ष करणारा आहे. हा रावण जसा सीतेच्या प्रेमात पडतो, तसेच तिलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते, एवढाच कथानकातला "ट्विस्ट'!
मणिरत्नम यांनी आतापर्यंत नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत आणि प्रत्येक चित्रपटातून ते सामाजिक भाष्य करू पाहतात. "रावण' मात्र सामाजिक सोडाच, कुठलंच भाष्य करत नाही. वीरानं केलेल्या रागिणीच्या अपहरणापासून चित्रपटाला सुरवात होते. रागिणी त्याच्या लंकेतल्या यातना भोगत असताना त्याच्यावर झालेला अन्याय आणि त्याची सर्वांना मदत करण्याची वृत्ती जवळून अनुभवते. तिच्या मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते. रागिणीला सोडविण्यासाठी आणि वीराला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक देव जंगजंग पछाडतो. रागिणीला मिळवून तो हा संघर्षही संपवतो.
रावणाची व्यक्तिरेखा सादर करताना मणिरत्नम यांनी अभिषेक बच्चनची प्रतिमा लक्षात ठेवून त्याला खूपच सहानुभूती मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. चित्रपटाची मोठी फसगत तिथेच झालीय. सुरवातीच्या निर्घृण हिंसाचाराच्या दृश्‍यात तो नरसंहारक म्हणून शोभत नाही आणि नंतरच्या सहानुभूतीपूर्ण प्रतिमेमुळे आधीचं क्रौर्य अविश्‍वसनीयच वाटू लागतं. रागिणीला तिच्याविषयी प्रेम वाटावं म्हणून केलेली ही व्यवस्था कथानक भरकटून टाकते. चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात.
कथा-पटकथा फसली असली, तरी चित्रपट शेवटपर्यंत पाहत राहावासा वाटतो तो संतोष सिवन-मणिकंदन यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रणामुळे. रौद्रभीषण धबधब्याचं दृश्‍य असो वा जंगलातील शोधमोहीम... प्रत्येक फ्रेमच्या कानाकोपऱ्यातून कॅमेरा फिरवून त्यांनी झाडं-फुलंच नव्हेत, तर दगड-धोंडेही जिवंत करून टाकले आहेत. शेवटचा अधांतरी पुलावरच्या मारामारीचा प्रसंग म्हणजे तंत्रज्ञानाची, छायाचित्रणाची अत्युच्च पातळी आहे. रहमानचं संगीत वेगळं असलं, तरी चित्रपटातली गाणी अनावश्‍यक पद्धतीनं येतात.
न शोभणारी व्यक्तिरेखा आणि आचरट हावभाव यामुळे अभिषेक बच्चनची कामगिरी फसली आहे. ऐश्‍वर्या राय-बच्चनने अभिनयाचा आणखी एक उत्तम नमुना सादर केला आहे. रविकिशन लक्षात राहण्यासारखा. गोविंदाला वाया घालवलं आहे. विक्रमही ठीकठाक.
छायाचित्रण, सादरीकरणासाठी पाहायलाच हवा, असा हा "रावण' मणिरत्नमचा चित्रपट म्हणून अपेक्षापूर्ती करत नाही, एवढं खरं.

Jun 22, 2010

`भात-राशी'च्या राशीला!

भातराशी हे काही ट्रेकला जाण्यासाठी आकर्षण वाटावं असं नाव नाही, हे कबूल. पण दरवेळी आपल्याला आवडीच्या आणि नेहमीच्या ठिकाणीच जावं, असं काही नाही ना...कधी कधी नवे प्रयोगही करून बघावेत, या उद्देशानं गेल्या रविवारी ट्रेकला जायचं निश्चित केलं.

आमचा मित्र अजित रानडे याच्या wanderers क्लबने ट्रेक आयोजित केला होता. रविवार होता आणि मीही बऱ्याच दिवसांत कुठे ट्रेक केला नव्हता. सगळं जुळून आलं होतं....

सकाळी सहाच्या आधीच शिवाजीनगर स्थानकावर पोचलो. साडेसहाच्या लोकलनं निघायचं होतं. जाताना अजिबात गर्दी मिळाली नाही. त्यामुळे प्रवास छान झाला. पाऊस पडण्याविषयी जरा शंकाच होती. वाटेतही कुठे पावसाची लक्षणं दिसत नव्हती. नाही म्हणायला डोंगरांच्या टोकांवर ढगांचे पुंजके जमलेले काही ठिकाणी दिसत होते, पण मनाचे मोर थुईथुई नाचावेत, असं वातावरण नव्हतं.

तासाभरात कामशेतला पोचलो. तिथून जीपने महागाव या ठिकाणी जायचं होतं. तिथल्या घटेश्वर मंदिरात पहिला थांबा होता. काही मंडळी मागे राहिली होती. त्यांची व्यवस्था करून आम्ही जीपने घटेश्वर मंदिरात पोचलो. तिथे चहाचा आस्वाद घेतला. पुण्यातून आणलेली इडलीही हादडली. अजितनं तिथे कसले कसले व्यायाम पण घेतले. त्याचे नेतृत्वगुण हल्ली फारच फुलून आलेत, हेही लक्षात आलं. इंग्रजीतूनही तो सफाईदार (की बेमालूम) मार्गदर्शन करत होता.

पोटपूजा झाल्यानंतर आम्ही साडेनऊच्या सुमारास भातराशी टेकडीकडे मोर्चा वळविला. जाताना पावसाचं टिपूस नव्हतं. अधूनमधून तर ऊन येत होतं आणि घामाघूम व्हायला होत होतं. दोन चार छोट्या टेकड्या आणि डोंगररांगा पार करून आम्ही एका विस्तीर्ण पठारावर पोचलो. दुपारचे बारा वाजले होते. तरी तिथे हवा आल्हाददायक होती. हवा स्वच्छ असल्यानं लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना असे किल्ले आणि चक्क ड्यूक्स नोजचं टोकही दिसत होतं. महिनाभरानं तिथे जायचंच आहे, पण त्याआधीच तिथलं दर्शन घडलं.

पठारावर मस्त आराम केला. गार वा-याच्या झुळका सुखावत होत्या. कुणाच्या तरी पाय लचकला होता. सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मग भातराशीची टेकडी चढायला सुरुवात केली. अगदी छोटंसंच टेकाड होतं ते. वर चढायला सुरुवात करतानाच पावसाचे हलके शिंतोडे उडाले. वर पोचेपर्यंत पाऊस नक्की येणार, असं वाटत होतं, पण पुन्हा त्याच्या लहरीपणाबद्दल मनात संशयाचं धुकं दाटत होतं.

वर चढायला सोपंच होतं. काही नवख्या माणसांना आधार द्यावा लागला. वर पोचलो, तर अधिक आल्हाददायक आणि गार हवा होती. खालून दरीतून कुणीतरी फुंकर मारावी, तसे धुक्याचे ढग वर आले. काही काळ तेही मनाला सुखावून गेले. पुन्हा एकदा पावसानं शिंतोडे उडवून वाकुल्या दाखवल्या. पण प्रत्यक्षात तो वरुणराजा मात्र मेहेरबान होत नव्हता.

तिथे टेकाडावरच डबे खाल्ले. गावातून दोन वाटाडे आमच्यासोबत आले होते. एक मोठा बाप्या आणि दोन लहानगे. त्यांनाही आमचे डबे खायला दिले. सगळ्यांचे डबे चाखून आणि संपवून झाल्यानंतर उतरायला सुरुवात केली.

उतरणीची वाट जरा आणखी अवघड होती. दोन-तीन डोंगररांगा तर भन्नाट होत्या. तिथून तोल सावरत घसरताना मजा आली. तसेच आम्ही उतरून बेडसे लेण्यांपाशी आलो. लेणी बघायला जाताना खालून वर जाण्याऐवजी वरून खाली येण्याचा हा अनुभव अनोखा होता.

लेणी ठीकठाक होती. निदान कार्ल्याच्या लेण्यांपेक्षा स्वच्छ, नेटकी वाटली. तिथून उतरायला ढीगभर पाय-या होत्या. खाली पुन्हा गावापर्यंत चालत जातानाचा रस्ता मात्र थोडासा कंटाळवाणा झाला. मुख्य रस्त्यावर आमच्यासाठी जीप वाट बघत उभ्या होत्या. तिथून कामशेतला आलो आणि साडेपाचची लोकल निघून गेल्यानं एक तास तिथेच वाट पाहत उभं राहावं लागलं. त्या काळात छान गप्पा आणि टाइमपास झाला. येताना लोकलमध्ये दंगा करायचा विचार होता, पण प्रचंड गर्दी होती आणि आम्ही सगळे विखरले गेल्यानं गप्प बसून राहावं लागलं. हा त्रास सहन करण्यापलीकडचा होता.

चला, पावसाळ्याची सुरुवात तर छान झाली..!!

 

(watch the photos here)