Apr 10, 2018

का रे अबोला?

रेवा दोन दिवसांपासून थोडी गप्प गप्प आहे, या भावनेनं मधुरा अस्वस्थ झाली होती. वयात येत असलेल्या आपल्या लेकीशी बोलावं, तिचं म्हणणं समजून घ्यावं, असं तिला मनापासून वाटत होतं, पण तिला वेळच मिळत नव्हता.

खरंतर लेकीशी लहानपणापासून तिचा उत्तम संवाद होता. अधूनमधून काही ना काही निमित्तानं ती रेवाशी बोलत असे. आता मुलगी जशी मोठी होऊ लागली, तशी तिच्या कल्पना, तिचं वागणंबोलणं, तिची मानसिक, शारीरिक स्थिती याबद्दलही मधुरा खूप जागरूक होती. रेवाला कुठल्याही बाबतीत आपल्याशी बोलायला ऑकवर्ड वाटू नये, उत्तम संवाद राहावा, सगळं मोकळेपणानं बोलता यावं, असं तिला वाटत होतं. रेवा आत्ता कुठे अकरा वर्षांची होत होती, पण आता मुली लवकर मोठ्या होतात, आपल्याला जे सोळाव्या वर्षात कळत नव्हतं ते त्यांना या वयातही कळतं, हे मधुराला पक्कं माहीत होतं. म्हणूनच ती अस्वस्थ झाली होती.
रेवा दोन दिवस नीट बोलत नाही, वागत नाही, आपण काही सांगायला गेलो, तर तेवढ्यापुरतं उत्तर देते, हे तिच्या लक्षात आलं होतं. नक्की काय झालं असेल पोरीला? कुणी काही बोललं असेल का? कुणी तिच्याशी चुकीचं वागलं असेल का? शाळेत कुणी ओरडलं असेल का? कुणाचं काही चुकीचं वागणं बघितल्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला असेल का? काही वाचून, बघून चुकीचं मत तयार झालं असेल का? विचार करून करून मधुराचं डोकं फुटून जायची वेळ आली होती. तिनं शंभरवेळा ठरवलं, पण तिची आणि रेवाची बोलण्यासाठीची निवांत वेळ जुळूनच येत नव्हती.
अखेर एक दिवस ती संधी मिळाली. घरातले सगळे कुठे ना कुठे गेले होते आणि संध्याकाळच्या वेळी दोघीच घरी होत्या.
``माझ्यासाठी छान कॉफी करतेस का गं बच्चू?`` मधुरानं प्रेमानं विचारलं.
रेवानं फार प्रतिक्रिया न देता नुसती मान हलवली आणि ती कॉफी करायला स्वयंपाकघराकडे वळली. बच्चू ही लाडाची हाक मारल्यावर रेवाची कळी खुलते, असा मधुराचा अनुभव होता, पण आज ही मात्रासुद्धा फारशी लागू पडली नव्हती. काहीतरी गडबड होती, नक्कीच.
आपण तर गेल्याच आठवड्यात तिच्याशी बोललो होतो! तेव्हा ती नॉर्मल वाटत होती. मग चार पाच दिवसांत असं काय घडलं असेल?
रेवा कुठे कुठे गेली होती ह्या आठवड्यात?
मधुरानं मेंदूतल्या सगळ्या आठवणी फास्ट रिवाइंड केल्या, तरी तिला काही पत्ता लागेना. ती जास्तच अस्वस्थ झाली. नाही म्हणायला एकदा तिनं रेवाला भाजी आणायला पाठवलं होतं, तेव्हा पाच रुपयाऐवजी दहा रुपयांना कोथिंबिरीची जुडी घेऊन आली, त्यावरून आजी तिला थोडं बोलली होती. त्याच्यावरून काही बिनसलं असेल का? की सोसायटीत नव्यानंच राहायला आलेल्या घरी ती एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली, तिथे काही घडलं असेल?
``कॉफी!`` रेवाच्या शब्दांनी मधुरा भानावर आली.
``तुला नाही केलीस?`` मधुराला आश्चर्य वाटलं.
उत्तरादाखल रेवानं फक्त `च्यक्` केलं.
मधुरानं आग्रहानं आपल्यातली थोडी कॉफी दुसऱ्या कपात ओतून तिला दिली.
तिच्याशी संवाद साधण्याची हीच संधी होती. अभी नहीं, तो कभी नहीं!
``रेवा, काय झालंय सोन्या?`` तिनं आईच्या मायेनं विचारलं.
``काही नाही.`` रेवानं नजरेला नजर न देता उत्तर दिलं, तेव्हाच काहीतरी झालंय, हे मधुरातल्या आईनं हेरलं.
``मला सांगणार नाहीस? आपण बोलतो की नाही मोकळेपणानं? आपण मैत्रिणी आहोत ना एकमेकींच्या? मग? सांग बघू...!``
प्रत्येक शब्दागणिक मधुरा रेवाच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव टिपत होती. तिची चुळबूळ वाढल्याचं मधुराला जाणवत होतं. आता भावनांचा कडेलोट होऊ न देता तिच्याकडून काय झालंय ते काढून घेणं, हे शिवधनुष्य तिला पेलायचं होतं, पण त्यात ती तरबेज होती.
``घरी कुणी ओरडलं का?``
रेवानं नकारार्थी मान हलवली.
``बाबा काही चिडून बोलले का?``
तरीही नकार कायम राहिला.
``आजी-आजोबांशी काही भांडण?``
``अं हं...!``
``शाळेतल्या बाई काही....``
नकार कायम राहिला.
``खाली खेळताना कुणी....``
``वॉचमनकाकांमुळे काही.... ``
``तू क्लासला जातेस, तिथलं कुणी... ``
सगळ्यांना नकारार्थी उत्तरं येत राहिली आणि मधुराचा धीर खचत चालला. तिची कल्पनाशक्तीही आता संपत चालली होती.
``त्या दिवशी वाढदिवसाला त्या नव्या शेजाऱ्यांकडे गेली होतीस, तिथे काही...`` तिनं प्रश्न विचारला आणि रेवाच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. मधुराचं काळीज हललं. म्हणजे आपला तर्क खरा होता तर!
आता आपलं कोकरू आपल्या कुशीत येऊन धाय मोकलून रडत काय काय सांगणार, या कल्पनेनंच तिच्या पोटात गलबललं.
``काय झालं बाळा तिथे?`` मधुरानं रेवाचा अंदाज घेत, स्वतःवर प्रचंड कंट्रोल ठेवत विचारलं. तिचं उत्तर ऐकण्यासाठी तिचे प्राण कानांत गोळा झाले होते.
``काहीच नाही!`` रेवानं उत्स्फूर्तपणे उत्तर दिलं, ``आम्ही पावभाजी खाल्ली, आईस्क्रीम खाल्लं आणि घरी आलो!``
मधुराचा बार फुसका ठरला होता. थोडक्यात, तिथे काहीच झालं नव्हतं. आता मात्र मधुराची सहनशक्ती संपत चालली.
``अगं, मग अशी का वागतेयंस दोन दिवस? गप्प गप्प का असतेस तू? काय झालंय तुला? कुणावर रागावलेयंस?`` मधुराला राग येत होता, पण आई म्हणून जबाबदारीनं वागणं महत्त्वाचं होतं.
दोन क्षण शांततेत गेले. मायलेकी एकमेकींच्या नजरेला नजर देत बघत राहिल्या.
``आई, खरं सांगू?``
``हो. खरंच सांग!`` मधुरा कळवळून म्हणाली.
``तू रागावणार नाहीस ना?``
``नाही बेटा. काहीही झालं असलं, तरी सांग. मला आज उत्तर हवंय. कुणामुळे तू अशी उदास असतेस?``
रेवाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती म्हणाली, ``तुझ्यामुळे!``
काही क्षण मधुराचा तिच्या कानांवर विश्वासच बसेना. पूर्वीच्या कादंबऱ्यांत नायिकांना नायकाने नकार दिल्यानंतर त्यांच्या कानात कुणीतरी तप्त लाव्हा वगैरे ओतल्यासारखा फील यायचा ना, तसं काहीतरी तिला झालं.
`अगं पण का? मी काय केलंय?`` मधुराच्या बोलण्यात उत्सुकता, उद्विग्नता, कुतुहल, राग, आर्तता वगैरे सगळंच दाटून आलं होतं.
``अगं, काय होणारेय मला दर चार दिवसांनी? इथे तुझ्या समोरच असते ना? `काय झालं बेटा,` असं सारखं काय विचारायचं? बोअर होतं मला! म्हणूनच मूड गेला होता माझा.`` शक्यतो आईला न दुखावता, आवाजात नम्रता ठेवून रेवा म्हणाली आणि तिच्यासमोरून उठली.
``मी खेळायला जातेय खाली. तासाभरात येते!`` असं म्हणून सॅंडल घालून खाली पळालीसुद्धा!

मधुराच्या डोक्यावरचं मोठ्ठं ओझं एकदम उतरल्यासारखं झालं. तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. साडेसात वाजायला आले होते. 
...आणि त्याच वेळी तिला जाणवलं, आणखी एक मोठी समस्या आपल्यासमोर आपल्यासमोर आ वासून उभी आहे – `आज रात्रीला भाजी काय करायची?`