निमिष गेल्या आठवड्यात अखेर कायदेशीररीत्या आमचा झाला.
तसा गेल्या डिसेंबरमध्ये आणल्यापासूनच तो आमचा झाला होता, पण त्यावर कायदेशीर मान्यता बाकी होती. त्याला पहिल्यांदा आमच्या घरापर्यंत येण्यात जेवढ्या अडचणी आल्या, तेवढ्या नंतरच्या प्रवासात आल्या नाहीत, हे खरं आहे. तरीही वाटलं तेवढा हा प्रवास सोपा नव्हता.
त्याच्या काही वैद्यकीय तपासण्या आणि शारीरिक वाढ, या प्रकरणात आमचे काही दिवस व महिने मानसिक तणावाचे गेले. अशा प्रकारच्या मुलांना पोटात पुरेसे पोषण मिळाले नसल्याने त्यांच्यात असणाऱ्या कमतरता नंतरच्या काळात भरून काढण्यासाठीचे आव्हान होतेच. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा खुराक आणि उपचार सुरू होते. शारीरिक व्यायामही सुरू होता आणि तोच सर्वांत अवघड प्रकार होता. हर्षदानं त्यासाठी दोन महिने अक्षरशः जिवाचं रान केलं. दिवसातून तीन-चार वेळाहा व्यायाम घेण्याचं आव्हान खडतर होतं. ते तिनं लीलया पेललं. मी तिला जमेल तशी मदत केली, पण तरीही तिचं पारडं जड होतं.
मनस्वीची आणि निमिषची लगेचच गट्टी झाली होती. आमच्याही आधी तिनं त्याच्याशी जुळवून घेतलं. सुरुवातीच्या काळात अगदी त्याला मांडीवर घेऊन वाटी-चमच्यानं दूध पाजण्यातही ती मागे नव्हती. अजूनही कधी मस्ती कधी रडारड असा दंगा सुरू असतो. ती आमच्या जवळ आली ती हा तिला ढकलतो, केस ओढतो, ओरबाडतो. मग ती त्याला दणकावते. कधी स्वतःहून उचलून घरभर फिरवते. कधी पाडते, कधी मलम लावते. कधी समजावते. कधी खायला देते, कधी हिसकावून घेते.
निमिषचा कायदेशीर ताबा आमच्याकडे देण्याची प्रक्रिया मात्र सुलभरीत्या झाली. आता त्याचा नावे एक आर.डी. आणि दोन धनादेशही द्यावे लागले. एक पॉलिसीही करायचेय. हा "श्यामरंगी' त्या दृष्टीने विकतच घ्यावा लागला म्हणायचा! आता माझ्या आधीच्या दोन आरडी बंद कराव्या लागणार आहेत. बघू, कसं काय जमतंय ते!
अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेली ही प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुफळ संपूर्ण झाली. आताशा निमिष चार-पाच पावलंही टाकायला लागलाय. त्याला सोबत घेऊन आता नव्या आयुष्याची पावलं टाकायची आहेत...