Feb 23, 2008

चित्रपटयात्रा!

पुन्हा एकदा आमच्या लाडक्‍या मनस्वीवरचा लेख.

तसं तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जावंसं कायमच वाटत असतं, पण दरवेळी ते शक्‍य होत नाही. काही वेळा नाइलाजानं न्यावं लागतं, तर काही ठिकाणी तिला नेलं नाही, तर चुकचुकायला होतं. गेल्या वर्षी मलेशियाला गेलो होतो, तेव्हा हर्षदा (माझी लग्नाची, अधिकृत बायको) आणि मनस्वी बरोबर असायला हवी होती, असं वाटलं होतं.

तरीही मनस्वीला एकट्यानं मी अनेक ठिकाणी फिरवत असतो. एकदा आम्ही दोघंच कात्रज सर्पोद्यानातही दिवसभर धमाल केली होती.

पिक्‍चरला मनस्वी आणि मी दोघं जाणं आता काही नवीन राहिलेलं नाही. पहिल्या "चक दे इंडिया', "हनुमान रिटर्न्स'पासून अगदी "जिंकी रं जिंकी', "पटलं तर घ्या', "वादळवारं सुटलं गं'पर्यंत तिनं मला साथ केली आहे. थिएटरची रेंजही अफाट आहे. सिटीप्राईडपासून अलका, प्रभात, "विजय'पर्यंत! (मी स्वतः सिनेमाच्या आवडीपायी अगदी "निशात', "भारत', "अल्पना', "सोनमर्ग' वगैरे थिएटरही पचवू शकतो, ही गोष्ट अलाहिदा! तरीही, "अप्सरा'त पायधूळ झाडायचं राहिलंय अजून!) तर, सांगायचा मुद्दा काय, की आजही तिला घेऊन गेलो होतो, "बाबा लगीन' बघायला. अभिराम भडकमकर लेखक-दिग्दर्शक. पण पिक्‍चर बोअर होता. आधी मनस्वी इडली खाऊन गेली होती. पिक्‍चरही बोअर असल्यानं जरा कंटाळली होती.

थिएटरमध्ये चिझलिंग, द्राक्षं वगैरे खुराक झालाच. नंतर इंटरव्हल झाल्यावर मला वाटलं, नेहमीप्रमाणे कंटाळून घरी चला म्हणेल. पण मलाच म्हणते, "बाबा, पुन्हा लागणारेय सिनेमा.' मग इंटरव्हलमध्ये शेंगदाणे घेतले. तिच्या हट्टापायी ""मिरिंडा'ही घेतलं. तेच चुकलं. आधी रसही प्यायला होता, त्यातून वर दाणे खाल्ले होते. "मिरिंडा' बाधलं आणि तिला उलटी झाली. मग आमचा पिक्‍चर बोंबललाच! फारसा बघण्यासारखाही नव्हता, त्यातून निमित्त मिळालं.

तिला स्वच्छ करून घरी जाण्यासाठी बॅग घ्यायला थिएटरच्या अंधारात पुन्हा घुसलो, तर आमची जागाच सापडेना. अंधारात बॅगही दिसेना. शेवटी कशीबशी सापडली आणि निघालो. रिकाम्या खुर्च्यांच्या मधून जाताना तोल जाऊन जरासा कोसळलो. मनस्वीलाही कुठेतरी चेमटलं. मग तिनंही भोकाड पसरलं. बाहेर पार्किंगमध्ये येऊन पाहतो, तर मनस्वीचा गॉगल पिशवीत नव्हता. मग तो शोधायला पुन्हा अंधारात घुसलो. त्या अवस्थेतही तिची विनोदबुद्धी (!) शाबूत होती. (बापावर गेलेय कार्टी!) मला म्हणते, "सारखं इकडून तिकडे-तिकडून इकडे. इकडून तिकडे-तिकडून इकडे!'

मी हसू दाबलं.

आम्ही प्रयत्न करून, किंवा शेजारच्यांनी मदत करूनही गॉगल सापडला नाही.
"बाबा, मोबाईलनं पकाश पाडा ना!' असा अनाहूत सल्लाही मनुताईंनी दिला.
शेवटी गॉगलचा नाद सोडून आम्ही बाहेर आलो. जाताना डोअरकीपरजवळ निरोप ठेवावा आणि त्यांना गॉगल सापडल्यास पुन्हा येऊन घेऊन जावा, असा विचार होता. म्हणून त्यांना सांगायला गेलो, तर तेच आमच्याबरोबर पुन्हा शोधायला आले.पुन्हा एकदा शोधमोहिमेचा सोपस्कार पार पडला.मग आम्ही "जाऊ दे तो गॉगल' म्हणून बाहेर आलो.

गाडीपाशी आलो आणि पिशवी ठेवायला डिकी उघडली तर काय! गॉगल डिकीत होता...!!
जाताना मीच तो तिथे ठेवला होता...आठवणीनं!

असो.

एवढ्या गदारोळातही मनस्वीला कपडे बदलून पुन्हा पिक्‍चर बघायला यायचं होतं. पिक्‍चर कितीही सुमार असला, तरी शेवटपर्यंत बघायचाच, हा तिचा पण होता. (पुन्हा एकदा) बापावर गेलेय कार्टी!
वर मला म्हणते, "बाबा, अहो, त्या काकांना सांगूया ना, गॉगल सापडला म्हणून!'
मी कपाळावर हात मारला.

तेवढ्यात ते डोअरकीपर काका समोर आलेच.
"कुठे सापडला गॉगल?' त्यांनी विचारलं.
प्रामाणिक व्हायचं मी जाणुनबुजून टाळलं. येताना वाटेत सापडल्याचं सांगितलं.
नशीब, आमची निरागस लेक काही बरळली नाही तिथे!

अशी आमची चित्रपटयात्रा घडली. मग घरी येऊन गुमान झोपलो.

पुढच्या वेळी मनस्वीला एकटीला सिनेमाला घेऊन जायचं नाही, असा निश्‍चय केलाय.

बहुधा, तो मोडेपर्यंत तरी टिकायला हरकत नाही...!

-------------

Feb 21, 2008

केमिकल "लोच्या'

संपतराव नुकतेच उठून मागल्या दारी मशेरी लावत बसले होते, तोच रंग्या तिरमिरत, धडपडत संपतरावांच्या नावानं बोंबलत तिथं आला.
""काय रे, सकाळीच तडमडलास? काय आभाळ कोसळलं की काय?''
रंग्याला धावून धाप लागली होती. कुत्र्यासारखा जीभ बाहेर काढून धापा टाकत होता. बोलताही येत नव्हतं. पाटाचं घोटभर पाणी प्याला आणि पुन्हा जीभ बाहेर काढली.
""अरे, जीव जाईस्तो धावायला सांगितलं कुणी तुला? काय झालंय काय एवढं?''
'"पाटील, अवो, आभाळच कोसळलंय. पण माज्या नव्हं, तुमच्या डोक्‍यावर!'
"काय सकाळी सकाळी ढोसलीस काय तू? डोस्कं ठिकाणावर आहे का तुझं?''
""माझं हाये. पण आता तुमचं ऱ्हाईल का बघा, हे वाचल्यावर!'' रंग्यानं हातातला ताजा पेपर संपतरावांसमोर नाचवला."
"अरे, आलंय काय एवढं त्यात?'' धोतराच्या सोग्याला तोंड पुसत संपतराव त्याच्याकडे वळले. ""ऐकलं का ओ, चहा टाका...!''"
"चहाचं राहू द्या संपतराव! सध्या हे बघा. पहिल्या पानावर छापलेय त्या बयेनं. तुमची अब्रूच काढलेय जनू!''
आता संपतरावांची झोप पुरती उडाली. रंग्याच्या हातातनं त्यांनी पेपर हिसकावूनच घेतला. पहिल्या पानावरचा मजकूर बघून भर थंडीत त्यांना घाम फुटला.
"काल रात्री ह्यांच्या हातून चूक घडली. पण मला मूल नकोय. आता काय करू?' असा काहीतरी मजकूर होता. सोबत एका बाईचा फोटो होता. खाली इंग्रजीमध्ये काहीबाही लिहिलं होतं. संपतरावांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. (लक्ष देऊन कळणार कुणाला होतं?)
"अरं रंग्या, काय झालं हे?''
त्यांचा चेहरा एकदमच पडला. अस्वस्थपणानं ते येरझाऱ्या घालायला लागले.
""नाय तर काय वो? तुमच्या मर्जीतली होती ना ती बाई? तालुक्‍यातल्या मित्राच्या ओळखीनंच गेला होतात ना तिच्या कार्यक्रमाला? मग असं कसं होऊन बसलं? आणि तुमाला काही पत्त्याच नाही लागला?''
""गप रे जरा! हळू बोल. आत वहिनी आहेत....पण असं काही झालेलं मला तरी आठवत नाही. आणि त्या बाईनं तरी डायरेक्‍ट पेपरात कशाला छापायचं हे प्रकरण? तेही लगेच एका दिवसात?''"
"संपतराव, या बाया ना, अजिबात भरोसा ठेवण्यासारख्या नसतात. तुमी उगाच भुललात. नको म्हणत असताना जास्त घेतलीत आणि आता गफलत करून बसलात.''"
"जळलं तुझं तोंड! जरा चांगलं बोल की. तसलं काही केलेलं मला आठवत नाहीये. मी एकतर जास्त धुंदीत होतो. तरीपण असं काही झालं असेल, असं मला वाटत नाही. पण आता काय करायचं?''
"तुमी काळजी करू नका. एवढी वर्सं मीठ खाल्लंय तुमचं. त्याला जागीन मी. करतो काहीतरी उपाय.''"
"बघ बाबा. आता तूच मला वाचव यातनं. पेपरमधला त्या बाईचा फोटो बघितल्यापासून मला तर काही सुचतच नाहीये. वाट्टेल ते कर, पण यातनं आपण बाहेर पडलं पाह्यजे. पुढच्या महिन्यात निवडणूक आहे. काही झेंगट नकोय आपल्याला!''
"बरं ठीकाय. चहा घेऊन लागतोच कामाला...'' इति रंग्या."
"चुलीत घाल तो चहा! जा आधी!'' संपतराव डाफरले तसा रंग्यानं नाइलाजानं काढता पाय घेतला.
संपतरावांनी मग चहाऐवजी तो पेपरच चुलीत घातला. त्या मजकुराचं कात्रण तेवढं सदऱ्याच्या आतल्या बाजूच्या खिशात घालून ठेवलं
....
रंग्या जो तोंड घेऊन गेला, तो एकदम दुपारीच परतला.संपतरावांच्या तोपर्यंत जिवात जीव नव्हता. कसेबसे दोन घास त्यांनी पोटाखाली ढकलले होते. पण अन्न गोड लागलं नव्हतंच.काल संध्याकाळी मित्राच्या आग्रहास्तव ते तालुक्‍याला गेले होते. तिथं मित्रानं त्याच्या ओळखीतून एका सिनेमानटीची नाचगाण्याची मैफल ठेवली होती. तिथं संपतरावांना जरा जास्तच झाली होती. बस्स...! एवढंच आठवत होतं त्यांना. आणखी काहीच आठवत नव्हतं. पेपरातून आपली बदनामी करणाऱ्या या बाईला शोधावं कुठे, हाही प्रश्‍नच होता. कुणाला सांगायचीही चोरी झाली होती.
संपतरावांनी बसल्याबसल्या तालुक्‍यातल्या आपल्या मित्राला फोन लावला. पण तो "आऊट ऑफ रेंज' होता. संपतरावांची अस्वस्थता आणखी वाढली.रंग्या आल्यावर त्यांनी दाणकन त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. रंग्या जरा कळवळलाच.
"संपतराव, तुमच्यासाठीच मी पण पोटात अन्नाचा कण नसताना वणवण करतोय आणि तुमी माझ्याच जिवावर काय उठलाय?''रंग्या पाठ चोळत म्हणाला. तसे संपतराव जरासे वरमले.
"अहो, या बाईला "तू मराठी', "शी टीवी' का कुठल्यातरी टीवीवर कारेक्रमात बघितल्याचं म्हनत होत्या गण्या शिंपी. लखू लोहाराला पन काय माहित नवतं यातलं. फूलवाल्या तुळसाला पन विचारून बगितलं. पन तिनं बी बघितलेली नाई ही बाई कुठं.""
अरे देवा! म्हणजे या बाईचा पत्ता काढण्याच्या नादात रंग्यानं अख्ख्या गावभर बोभाटा केला की काय?संपतरावांच्या कपाळावरच्या आठ्या आणखी वाढल्या.
रंग्याला काहीच न बोलता त्यांनी आल्या पावली पिटाळून दिलं. या वेळी तरी चहा मिळेल, ही त्याची आशाही फोल ठरली
....
शेवटी एकदाचा बऱ्याच प्रयत्नांनी तालुक्‍याच्या मित्राचा फोन लागला. पण तो कुठल्या तरी राजकीय मीटिंगमध्ये होता. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बहुधा पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक होती. बराच गोंधळ चालला होता. कान फुटायची वेळ आल्यावर संपतरावांनी रागानंच फोन आपटला
....
दिवसभर संपतराव घराबाहेर पडले नाहीत, की घरातही कुणाशी काही बोलले नाहीत. बायकोचं तर त्यांनी सकाळपासून तोंडही बघितलं नव्हतं. तिच्यासमोर जायची भीतीच वाटत होती त्यांना. काल आपल्या हातून असं विपरीत कसं घडलं आणि आपल्याला एवढीही शुद्ध कशी राहिली नाही, याची ठसठस त्यांना लागली होती.
संध्याकाळ झाली, तरी संपतराव आपल्या खोलीत अंधारात बसून होते. आता आपलं, आपल्या राजकीय कारकीर्दीचं कसं होणार, याची चिंता त्यांना खात होती. संध्याकाळच्या राजकीय गटाच्या बैठकीलाही ते गेले नाहीत. संपतरावांची बायको सावित्री संध्याकाळी त्यांना बोलवायला खोलीत आली.
"चला, जरा देवळात जाऊन येऊ. गणपतीला निवेद दाखवायचाय.''"
"अगं निवेद कसला दाखवतेस? इथं आयुष्याचं मातेरं व्हायची वेळ आलेय माझ्या!'' संपतराव डाफरले.
"अवो, असं काय बोलायचं ते तिन्हीसांजेला? लक्ष्मी घरात यायची येळ ही. जरा शुभ बोला की!''
"तू जा गं! माझं डोकं ठिकाणावर नाहीये. मला त्रास देऊ नको.''
"आज काय झालं? काल तर एवढं शान्यासारखं वागत होतात. डोकं दुखतंय म्हणून संध्याकाळी लवकर झोपलात आनि जेवलात पन नाही. तुमी चांगले वागायला लागलात, म्हणून गणपतीची पूजा करायची होती मला!''
"काय?'' संपतराव तीन ताड उडालेच!
"म्हणजे, मी काल इथेच होतो? कुठे गेलो नव्हतो? माझं डोकं दुखत होतं म्हणून लवकर झोपलो?''"
"अहो हो. खोटं सांगतेय का मी?''"
"बरं येतो मी. तू हो पुढे.'' संपतरावांनी सावित्रीला कसंबसं कटवलं....
म्हणजे आपण काल तालुक्‍याहून लवकर घरी आलो? घरीच होतो संध्याकाळपासून? त्या बाईचं काय मग? तिनं पेपरात अशी बोंब का ठोकली? ते प्रकरण अंगाशी तर येणार नाही ना?विचार करून करून संपतरावांचं डोकं फुटायची वेळ आली. तालुक्‍याच्या मित्राला फोन करावासा वाटला, पण तो विचार बदलला. तेवढ्यात फोन खणखणला. त्या मित्राचाच होता.
"संपतराव, काय म्हणत होता तुम्ही दुपारी? कशाला फोन केलता मला?''""अरे, माणूस मेल्यावरच चौकशीला जाशील तू त्याच्या. माझा जीव इथे टांगणीला लागला होता. त्या बाईचं काय झालं? तिनं पेपरात काय छापलंय, वाचलंस का तू?''"
"कोण बाई?''"
"अरे भुसनळ्या, ती नटी-बिटी कोण आहे ती! तुझ्याबरोबर आपण गेलो होतो ना ती!''"
"काय चेष्टा करताय संपतराव! अहो, तुमच्यासाठी तिचा कार्यक्रम ठरवला अन्‌ तुमची पाचावर धारण बसली. कुणीतरी बघेल म्हणून तुमी दारातूनच पाय लावून पळालात राव. आन्‌ आमचीच चेष्टा करताय होय?''"
"काय सांगतोस? म्हणजे मी आलोच नव्हतो मैफलीला? मग मला आठवतंय ते काय? ती नटीबिटी?''"
"हां...संपतराव, तुमच्या पण डोक्‍यात "केमिकल लोच्या' झालेला दिसतोय, त्या मुन्नाभाईसारखा. त्याला जिकडेतिकडे गांधीजी दिसत, तुम्हाला ती बाई दिसतेय. माणसानं एखाद्या गोष्टीची भीती घेतली ना, की मेलाच तो!''
आता संपतरावांच्या डोक्‍यात ट्यूब पेटली. म्हणजे बाईच्या मैफलीला जायचं त्यांनी कबूल केलं होतं, पण तिकडे गेलेच नव्हते. तालुक्‍याला जाऊन तसेच परत आले होते ते. वर डोकं भणभणत होतं म्हणून झोपीही गेले होते. त्या बाईकडची मैफल, त्यानंतर आपला तोल गेल्याचं अंधूक अंधुक आठवणं, सगळे मनाचेच खेळ होते त्यांच्या.
"अरे, मग त्या पेपरातल्या फोटोचं आणि त्या बाईनं ठोकलेल्या बोंबेचं काय?'' त्यांनी मनातली शंका मित्राला विचारली.
"कशाबद्दल बोलताय तुम्ही संपतराव? पहिल्या पानावर आलंय त्याच्याबद्दल? अहो, पाळणा लांबवण्याच्या गोळ्या वगैरे ऐकलंय का तुम्ही कधी? त्याची जाहिरात आहे ती! हे जाहिरातवाले आपला माल खपवण्यासाठी काहीही आगाऊ जाहिराती करतात हल्ली! तुम्हाला काय वाटलं त्यात?''"
"काही नाही...सहज विचारलं...'' आपली फजिती संपतरावांनी मित्राला कळू दिली नाही. उगाच होत्याचं नव्हतं करून सांगणाऱ्या रंग्यालाही जिथं असेल तिथं जाऊन बडवावं, असं मनात आलं त्यांच्या.
काही न बोलताच त्यांनी फोन ठेवून दिला.बायकोला हाक मारली.
"अहो, ऐकलं का, आम्ही पण येतोय देवळात. एक नारळ पण घ्या बरोबर. देवाला वाहू जोडीनं!''
-----