काही नाही, एकही प्रतिक्रिया आली नाही `दिवाळी पहाट' या पोस्टवर, म्हणून हेडिंग बदलून पाहतोय, झालं!
आधी वाचलेल्यांनी (आणि पहिल्यांदाच वाचणार्यांनीदेखील) पुन्हा वाचण्याची गरज नाही. अगदीच वेळ जात नसेल तर ठीक आहे...!
असो.
------
आपल्या समाजात काही साथीचे रोग आहेत. डेंग्यू, मलेरियापेक्षाही भयंकर वेगाने फैलावणारे. गणपतीतली डिजिटल "भिंताडगिरी', नवरात्रातला दांडिया-मॅनिया आणि आता दिवाळीतला पहाटींची धुडगूस.
या रोगांचे व्हायरस कसे येतात, कसे पसरतात आणि धोकादायक असल्याचे माहित असूनही अनेक लोक त्याला कसे फशी पडतात, का...ही कळत नाही. गेले एक-दोन दिवस पेपरातल्या मनोरंजनाच्या जाहिरातींवर तुम्ही नजर टाकली असेल, तर हा दिवाळी पहाट कार्यक्रमांचा उच्छाद सहज लक्षात येईल.
कुणीतरी अलाणा फलाणा गायक, गायिका, पावरीवाला किंवा तबलाकुट्या. त्याच्या कलेला हा सुगीचा काळ. एरव्ही त्याला कुणी विचारत नसेल, किंवा रंगमंचावरच्या भरताड भरतीतला तो कुणीतरी एकही असू शकेल. पण दिवाळीत त्याला कोण डिमांड!
बरं, हे कार्यक्रम पण भल्या पहाटे साडेपाच, सहाला वगैरे असतात. आता घरी पणत्या, दिवे लावायचे सोडून, कोण उपटसुंभ पहाटे पहाटे पाचशे-हजारांची तिकिटं काढून थेटरांमध्ये दिवे लावायला जातात कोण जाणे! आमच्यासारख्या फुकट पासवाल्यांचं तरी एकवेळ समजू शकतो. पण तिकीट काढून काय जायचं असल्या पावऱ्या नि तबले ऐकायला?पावसाळा आला की पावसाळलेली गाणी, हिवाळ्यात गारठलेली गाणी, दिवाळीत मांगल्यरसाने बदबदलेली गाणी...काय चाललंय काय? गोडाचं किती अजीर्ण सहन करायचं?
पुढच्या वर्षाच्या दिवाळीसाठी एक प्रस्ताव आहे. पाहा, पटलं तर. नाहीतरी काय, घरंदारं सोडून बाहेर थेटरातच दिवे लावायचेत ना, मग मल्लिका शेरावतच्या हॉट सीन्सवर (प्रात्यक्षिकासह) रसभरीत चर्चा का नको? सनोबर कबीर, दीपल शॉ यांच्यासारख्यांचा दिलखेचक नृत्यथयथयाट का नको? गेला बाजार, एकमेकांना यथेच्छ बुकलणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूएफवाल्यांचा रक्तपाती आविष्कार का नको?
बघा, विचार करा. सुचवा आणि आनंद घ्या!
-------