पालकांचा अतिउत्साह कधीकधी कसा नडतो आणि काही वेळा तेच कसे तोंडघशी पडतात, याची ही कहाणी. स्वतःच्या बाबतीतलीच.
आपल्या पोराला सर्व क्षेत्रांत पारंगत करण्याचा हट्ट कधीच नव्हता. पण निदान तिनं सुटीचा आनंद घ्यावा, चारदोन गोष्टी शिकाव्यात, अशी बारीकशी इच्छा. शेजारचीच एक मुलगी गोपाळ हायस्कूलच्या जलतरण तलावात प्रशिक्षक आहे असं कळल्यावर आमच्या साडेतीन वर्षांच्या मनस्वीलाही तिथे घालायचं ठरवलं. पण यंदा आमची शेजारीण काही तिथं शिकवणार नाही असं कळलं आणि पहिली माशी शिंकली. साडेतीनशे रुपये भरून प्रवेश घेतला खरा, पण कल्पना काहीच नव्हती. मुळात तिथे काय शिकवतात, कसं शिकवतात, याचीही माहिती व्यवस्थितपणे कुणीही दिली नाही. ना आमच्या शेजारणीनं, ना त्या कार्यालयातल्या मठ्ठ बायकांनी.
पहिल्या दिवशीच आमच्या उत्साहाचा फुगा फुटला. मनस्वीला एरव्ही पाणी भयंकर आवडतं. गेल्या वर्षी सांगलीला कृष्णेत आणि आजोळी शिपोशीलाही नदीत तिला मनसोक्त डुंबवलं होतं. पण इथे प्रकार वेगळा होता. मुलांसाठी छोटा बेबी टॅंक होता आणि त्यात त्यांच्या कंबरभरच पाणी होतं. टॅंकमध्ये गार पाण्याचा शॉवर घेऊन जायचं असल्यानं तिथेच पहिल्यांदा मनस्वीनं कुरकुर केली. कसंबसं तिला समजवावं लागलं. नंतर पाण्यात उतरल्यावर काही वेळ शांत राहिली. पण तिच्याहून लहान एकच मुलगी आणि बाकीची पाच - सहा वर्षांची मुलं होती. सगळ्यांना बारला धरून हातपाय मारायला सांगण्यात आलं. काही वेळानं मात्र मनस्वीचं अवसान गळालं. तिनं टाहो फोडला. माझंही बापाचं हृदय कळवळलं. मला वाटलं, तिच्या हाताला ताण वगैरे येतोय की काय! पण ती फक्त पाण्याची आणि शिस्तीची भीती होती.
पहिल्या दिवशीच असा अपशकुन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिला नेण्याचा माझाच उत्साह गळाठला होता. तिनंही कुरकुर ते निषेध इथपर्यंतची सर्व शस्त्रं परजायला सुरुवात केली होती. मग अधेमधे बावापुता करून तिला न्यावं लागलं. त्यातून ती सव्वादहा ते पावणे अकरा अशी इनमीन अर्ध्या तासाची बॅच. एकतर आम्हाला पोचायला पाच मिनिटं उशीर. पाण्यात उतरेपर्यंत निघायची वेळ यायची. पण मला संपूर्ण वेळ तिथे थांबायलाच लागायचं.मुळात तिथे महिनाभरात मुलांना नियमित पोहायला शिकवतच नाहीत, हा साक्षात्कार मला झाला. म्हणजे तिथं नुसतं उलटं तरंगायला- फ्लोटिंग करायला शिकवणार होते. आता तीन वर्षांची पोरगी पाण्यावर उलटी तरंगायला काय शिकणार, कप्पाळ! तिचा बाप अठ्ठाविसाव्या वर्षी पोहायला शिकला, तरी त्यानंही असले अघोरी प्रयोग केलेले नाहीत. तर पोरीनं का करावेत? त्यामुळं पाण्यात मनसोक्त डुंबण्याव्यतिरिक्त या क्लासचा काही उपयोग नाही, हेही लवकरच लक्षात आलं. पण तोही आनंद परिस्थितीनं मिळू दिला नाही.मध्ये काही दिवस सर्दीच्या निमित्तानं पोहण्याला दांडी झाली.
क्लास संपायला दहा-बारा दिवस बाकी असतानाच तिथल्या प्रशिक्षक मुलांनी काही मोठ्या (पाच वर्षांच्या) मुलांवर सक्ती करून फ्लोटिंग शिकवायला सुरुवात केली. फ्लोटिंग म्हणजे डोक्याखाली हात बांधून पाण्यावर उलटं तरंगायचं. मुलांनाच काय, त्यांच्या बापांनाही ते पटकन जमण्यातलं नाही. त्यातून तोल गेला, तर नाकातोंडात पाणी जाण्याची भीती असतेच. पाणी अगदी कंबरभर असलं तरी! मग ती मुलं धिंगाणा घालायची. आणि ती ऐकत नाहीत म्हणून प्रशिक्षक त्यांना शिक्षा म्हणून पाण्यात बुडवायचे. ते पाहिलं आणि मनस्वीनं असा धसका घेतला की मीही म्हटलं, आता बस्स!
आता तर ती आंघोळीच्या वेळी डोक्यावरून पाणी घ्यायलाही घाबरते. श्वास गुदमरण्याची भीती तिच्या मनात आहे. ती जायला आणखी काही दिवस लागतील.
अशा रीतीनं आमचा पोहण्याचा पहिला उपक्रम अठरा-वीस दिवसांत विफल-अपूर्ण झाला!
--------