Mar 28, 2009

पातेलीभर खिरीची गोष्ट!

गेल्या आठवड्यात एके दिवशी कधी नव्हे तो संध्याकाळी घरी होतो. काम करूनही कंटाळा आला होता. थोडंसं (कथित) पाककौशल्य दाखविण्याची खुमखुमी आली. शिवाय, मुलीच्या आवडीचा पदार्थ करून तिची मर्जी संपादन करण्याची संधीही होतीच. म्हणून मुदपाकखान्याकडे वळलो.
काय करावं, काही ठरलं नव्हतं. नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! त्यामुळं वेगळा बेत आखला. कधीकाळी आजी रव्याची खीर करायची. तेव्हा मीही शिकलो होतो. बऱ्याच वर्षांत तिच्याकडे (म्हणजे, खिरीकडे) ढुंकून पाहिलं नव्हतं. म्हटलं, करून बघूया आज! मस्त बेत होईल!
(बचकाभर) रवा घेतला आणि खरपूस भाजून काढण्याच्या उद्योगाला लागलो. पण तो भाजता भाजत नव्हता. काही वेळाने मलाच कंटाळा आल्यावर, तो पुरेसा भाजला आहे, असा (गैर)समज करून घेऊन त्यात पाणी ओतलं. मग पुन्हा (त्याला आणि मला! ) कंटाळा येईपर्यंत शिजू दिलं. रवा थोडासा जास्त झाला होता. कारण भरपूर पाणी पीत होता. जवळपास तीनदा पाणी घालूनही खिरीसदृश काही तयार होण्याचं नाव नव्हतं. शेवटी कंटाळून साखर घातली. तीही किती घालायची, काही अंदाज नव्हता. अनेक वर्षांचं पाककौशल्य पणाला लावून अंदाजे कितीतरी घातली. आता खीर तयार झाली, अशी पक्की खात्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं....
अरे, खीर तर दुधाची करतात!
म्हणजे रवा शिजण्यापुरतं पाणी घालून नंतर त्यात दूध मिसळायचं असतं.
बोंबला! आता आली का पंचाईत? मी आधीच पाणी एवढं घालून ठेवलं होतं, की पातेलंभर खीर तयार झाली होती. मग ते पातेलं बदलून मोठं पातेलं घेतलं आणि त्यात खीर ओतून वर दूध घातलं.
एवढ्या अथक प्रयत्नांनंतर जे काही "द्रावण' तयार झालं होतं, ते मुलीनं(च) घरी आल्यावर (बहुधा, प्रचंड भूक व वडिलांवरील अपार विश्वासापोटी) थोडंसं चाखलं. दुसऱ्या दिवसापासून काही तिनं त्या अगम्य पदार्थाचं नावही काढलं नाही. चार दिवस फ्रीज नावाच्या "व्हेंटिलेटर'मध्ये ठेवल्यानंतर ती बिचारी खीर बेटी अल्ला को प्यारी हो गई!

या अनुभवातून एवढंच शिकायला मिळालं, की...
1. जवळपास पंधरा-एक वर्षं आपल्याला स्वयंपाक येतो, असं ऊर बडवून आपण सांगत आहोत, त्याला काही अर्थ नाही. जुन्या चुकांतून आपण काहीच शिकलेलो नाही.
2. अनेक वर्षं लक्षात ठेवून, किंवा तारतम्य बाळगून काही नव्या पदार्थाचा प्रयोग करावा, हे आपलं वय राहिलं नाही.
3. सहधर्मचारिणीनं केलेल्या (कशाही) स्वयंपाकाला कुठल्याही प्रकारे नावे ठेवण्याचा आपल्याला अधिकार राहिलेला नाही!


मूळ प्रेरणा : कथा कढईभर शिऱ्याची!