Sep 19, 2007

लेट्‌स एन्जॉय गणपती!


आज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. "शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूडच्या जंगलातला तो भयानक रस्ता. रात्री जाग आली, तर बाहेर किर्रर्र अंधार. पण एक बरं होतं, दणकून झोप लागली गाडीभर. स्वारगेट आल्यावरच कळलं. आजपासून पुन्हा कामाचा रामरगाडा सुरू.चार दिवस मजेत गेले.


कोकणात गेलो, की मन नेहमीच प्रसन्न होतं. कोकणातल्या गावांत, भटकंतीत जी मजा आहे, ती महाराष्ट्राच्या अन्य कुठल्याही भागात नाही. कोकणातल्या गावासारखं शांत, निवांत, निसर्गानं नटलेलं, प्रेमळ गाव एकतरी शोधून दाखवा अन्यत्र. बकाल स्टॅंड, उकिरडे, डुकरं, घाण, कचऱ्यांनी भरलेल्या गल्ल्या, बजबजपुरी तुम्हाला कुठेच दिसणार नाही. कोकणातही ही "परंपरा' आणू पाहणारे काही सन्माननीय अपवाद आहेत म्हणा, पण अगदीच तुरळक.घरीच गणपती असल्यानं वातावरण प्रसन्न होतंच. त्यातून लाडक्‍या लेकाला रोज काहितरी नवं, गोडधोड खाऊ घालण्यात माऊली चार दिवस व्यग्र होती. त्यामुळं लेकही धन्य आणि माऊलीही. जमलं, तर नैवेद्याचा वास मिळालेला गणपतीबाप्पाही.



लहानपणी आरत्यांची धमाल असायची. शेजारीपाजारी रात्री अकरापर्यंत सामूहिक आरत्या चालायच्या. इतर वेगळी गावावरून ओवाळून टाकलेल्या सर्वांना गणपतीच्या काळात मग फारच मानाचं स्थान मिळायचं. आरत्यांसाठी त्यांना निमंत्रणं जायची. उत्तमोत्तम प्रसादांची आमिषं दाखवली जायची. मग त्या बोलीवर तास-तासभर आरत्या चालायच्या. स्पष्ट उच्चार, चोख पाठांतर आणि खणखणीत आवाज (बामणाला दुसरं जमतंय काय?) यामुळं अस्मादिकांनाही गणपतीच्या काळात मागणी फार. पण हळूहळू चित्र बदललं. गणपतीची, आरत्यांची, प्रसादाची "क्रेझ' कमी झाली. आरत्यांची गर्दी हळुहळू विरळ व्हायला लागली, घरं रिकामी व्हायला लागली. माणसं एकटी पडायला लागली. सात दिवसांचे गणपती दीड दिवसांवर आले. एकमेकांकडे गणपती पाहायला जाणं, हा उत्साहाचा, भेटीगाठीच्या निमित्ताचा भाग न बनता औपचारिकता व्हायला लागली. टीव्हीच्या आक्रमणामुळं आरत्याही आटोपत्या घेतल्या जाऊ लागल्या, मोठ्या शहरांतल्या सार्वजनिक भव्यदिव्य देखाव्यांपुढं घरच्याच माणसांनी राबून केलेल्या पण सुबक, आकर्षक देखाव्यांची किंमत वाटेनाशी झाली.


हल्ली दरवर्षी गणपतीतल्या मुक्कामात हेच जाणवतं. मित्रांच्या भेटीगाठी होतात, लांब गेलेले गणपतीच्या निमित्तानं एकत्र येतात, एवढंच काय ते सुख.असो. आता पुण्यातल्या धुमाकुळाचा सामना करायचाय.


पुण्यातले देखावे मला आवडतात, पण दरवर्षी तोच गणपती रंगवून वापरणं, (हो, "वापरणं'च!) दिवसा देखावे बंद ठेवणं, गणेशभक्तीचा बडेजाव करणं, त्या जोरावर रस्ते अडवणं, उकरणं आणि देखावे पाहायला आलेल्या "पर्यटकां'ना "गणेशभक्त' वगैरे म्हणणं, याचा आपल्याला प्रचंड तिटकारा आहे.


...आणि हो! सोन्या-चांदीत-हिरेमाणकांत लपेटलेला (खरं तर घुसमटलेला) तुमचा तो दगडूशेठ हलवाई गणपती तर मला अजिबात "देव'बिव वाटत नाही. "देव' कसा हवा, सगुण, निराकार, शांत, प्रसन्न, निर्मळ, नैसर्गिक...एवढा "कृत्रिम' आणि "श्रीमंत' देव कसा असतो बुवा?


तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण कोकणातल्या साध्याच दोन-चार ढोलताशांच्या गजरात जी मजा आहे, ती मानाच्या मंडळांपुढच्या अफाट ढोलपथकाच्या शिस्तबद्ध वादनात नाही.


पण रात्र-रात्र चालणारी गणेश विसर्जन मिरवणूक आपल्याला प्रचंड "एन्टरटेन्मेंट' असते.


सो, लेट्‌स एन्जॉय गणपती!


-----