May 4, 2009

आपला तो संस्कार, त्यांचा तो उर्मटपणा!

आमची मुलगी सध्या हिंदी शिकतेय. म्हणजे, तसं ती गेली दोन वर्षं शिकतेय! (शिकवायला बापच ..सॉरी...पिताश्री असल्यावर कसं व्हायचं पोरीचं?) पिताश्रींनी तिला इंग्रजी-हिंदी शिकवायचं व्रत घेतल्याला काही वर्षं लोटली. (आधी स्वतः शिका म्हणावं!) आता ती "पाच मिनिट थांबो' अशा दर्जाचं हिंदी बोलतेय. जमलं नाही, तर तोंडाला येईल ते ठोकून देते. (पिताश्रींची परीक्षेतली सवय!) काही महिन्यांपूर्वी असंच तिला कळू नये म्हणून मी आणि बायको एक विषय इंग्रजीतून बोलत होतो. ("तसलं' काहीही बोलत नव्हतो! चहाटळ कुठले! "तसलं' मराठीतून बोलायची बोंब. इंग्रजीतून काय बोलताय?) थोडा वेळ पाहिलं पाहिलं आणि पोरगी वैतागली. "ए..."मराठी'तून बोलू नका!' तिनं फर्मान सोडलं. आम्ही ज्या भाषेतून बोलतोय, ते "मराठी' असल्याचा तिचा समज झाला होता.
असो. सांगायचा विषय वेगळाच होता. सध्या लेकीचा आणि तिच्या पालकांचा (विशेषतः पिताश्रींचा) संघर्ष चालला आहे, तो उलट आणि उर्मट बोलण्यावरून! तिच्या बालसुलभ आणि निरागसता का काय म्हणतात त्या गुणांनी मीच अंतर्मुख होऊन एकूणच उर्मटपणाबद्दल विचारांच्या गर्तेत सापडलो आहे.

उदा क्र. 1.
घरात मी आणि मुलगी. मला संगणकावर काम करायचं आहे आणि तिलाही तेच "खेळणं' हवंय. काही केल्या मला काम करू देत नाहीये. झोप सांगितलं, तरी झोपायला जात नाहीये, पसारा पाडून ठेवला आहे. शेवटी कशावर तरी वैतागून मी तिला "आधी ऊठ आणि पसारा आवर' असा काहीतरी दम देतो. ती ज्या कामात गुंतली आहे, त्यात अजिबात फरक पडू न देता ती माझ्याकडे चक्क दुर्लक्ष करते. (आईवर गेलेय कार्टी!) पुन्हा मी आवाज चढवून तेच वाक्‍य उच्चारतो. आता माझा रुद्रावतार पाहून तरी ही कामाकडे वळेल, अशी अपेक्षा. पण ती थंडपणे ऐकवते - "बाबा, असं ओरडायचं नाही. सरळ सांगायचं - "तुझ्या हातातलं काम झालं, की आवर पसारा. हेच आवडत नाही मला तुमचं!'
मी गार!!
कधीतरी हेच आम्ही तिला ऐकवलेलं असतं. एखाद्या कामात असताना गोष्ट सांगण्यासाठी किंवा खेळण्यासाठी ती हट्टाला पेटल्यावर आम्ही तिला हेच वाक्‍य सुनावलेलं असतं. ते बरोब्बर लक्षात ठेवून त्याची सव्याज परतफेड ती आम्हाला अशा प्रसंगी करते.

उदा क्र. 2.
भातुकली घरभर केल्यानंतर किंवा खेळणी गावभर टाकल्यानंतर ती आवरण्याचं नाव नाहीये. मग तिला आधी समजावून, नंतर दटावून आणि शेवटी दम देऊन पाहिलं जातं. त्यावर ती "तुम्हीच आवरा तो पसारा' असं सरळ सांगून मोकळी होते. मग "तुला देवबाप्पाने हात दिलेत की नाही? मग आपला पसारा आपणच आवरायचा!' असंही कधीकधी तोंडून निघून जातं. आपल्याला हेच पुन्हा ऐकायला लागणार आहे, याची त्या वेळी सुतराम कल्पना नसते.
एखाद्या वेळी, एखादी गोष्ट तिला आणून द्यायला सांगितली, की मग "तुम्हाला देवबाप्पाने हात दिले नाहीयेत का?' हे ऐकावं लागतं. आंबे खाताना एखादी जरी साल तिच्या ताटात टाकली, तरी "तुमची साल आहे ना, तुम्हीच टाका मग डब्यात!' असंही सहन करून घ्यावं लागतं. कारण आधी कधीतरी तिला शिस्त लागावी म्हणून तिला हेच वाक्‍य आम्ही ऐकवलेलं असतं.

उदा क्र. 3.
"असं वागायला वेडी आहेस का?' हे वाक्‍य तर घरोघरच्या पिलावळीसमोरचं "टेंप्लेट' असावं. शहाण्यासारखं वागणं म्हणजे काय, हे समजावताना आपण त्याचा सर्रास उपयोग करतो. हेच वाक्‍य पाहुण्यांसमोर आपल्याबाबत वापरून मुलं आपली "शोभा' करतात.
---
"आपण मुलांना शिकवणं म्हणजे संस्कार. त्यांनी आपल्याला शिकवणं म्हणजे उर्मटपणा' अशी ग्राफिटी काही महिन्यांपूर्वी लिहिली होती. सध्या त्याचाच अनुभव घेतोय!