जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Sep 1, 2009
प्रवास तपपूर्तीचा
धुक्यात बुडालेला आंबा घाट. कोकणचे प्रवेशद्वार.
---
एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पाठवावा का हा फोटो?
---
निसर्गानं मन प्रसन्न केलं.
----
गणपतीपुळ्याला जाण्याचा भन्नाट रस्ता.
---
समुद्राची गाज ऐकत थांबण्याला पर्याय नाही!!
---
उंटावरच्या शहाण्या!
---
समुद्रात धमाल केली
---
किल्ला केला, वाहून गेला!
---
आरतीला मनस्वी पुढे होतीच...
---
अंगणात साफसफाईलाही पुढे!
---
गणपतीबाप्पाला निरोप
---
थिबा पॉइंटची नवी बाग
---
पलीकडे दिसतोय, तो भाट्याचा पूल! (भाट्याच्या खाडीत बुडणारा दालदी आठवतोय ना?)
---
कुरध्यात गेलो, ते नदी पार करून.
---
कुरध्यातलं निसर्गरम्य घर!
---
आडिवर्याचं मंदिर
---
कशेळीचा कनकादित्य : सूर्य मंदिर
---
..आणि परतीच्या प्रवासातला घाटातला धबधबा!
--------
बरोब्बर बारा वर्षं. एक तप झालं मी रत्नागिरीहून स्कूटर घेऊन एकटाच पुण्याला आलो होतो, त्याला. गणपतीतच. असाच भन्नाट पाऊस होता. यंदाही तशीच सफर घडली. फरक फक्त दोन होते. एक रत्नागिरी-पुणे मार्गाचा आणि दुसरा गाडीचा. सन 1997 साली मी बजाज सुपर एफई घेऊन आलो होतो आणि यंदा "मारुती अल्टो'!
गाडी घेतली, तेव्हाच रत्नागिरीच्या गणपतीला यंदा गाडीनंच जायचं, असं ठरवून टाकलं होतं. त्यामुळं दरवर्षी 21 दिवस आधी रिझर्व्हेशनसाठी तडफडावं लागतं, बराच वेळ खोळंबूनही पाहिजे ती सीट मिळत नाही, ती गोष्ट वेगळीच. यंदा तो त्रास वाचणार होता. गणपतीच्या पहिल्या दिवशी यंदा जायला जमणार नव्हतं. यंदा एकूण सात दिवस बाप्पा घरी मुक्काम करणार होते. त्यामुळे पुण्यातील कामं आटोपून तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकडे प्रयाण केलं. नाही म्हणता म्हणता पुण्यातून बाहेर पडायला सकाळचे साडेआठ वाजले. स्वाइन फ्लूच्या धोक्यामुळं कुठे हॉटेलाबिटेलात थांबणार नव्हतोच. पोटपूजेचं साहित्य सोबत घेतलं होतं. खंबाटकी घाटात थांबून आधी पोटपूजा केली. सकाळी गार वाऱ्यांच्या झुळकांत पोटभर नाश्ता करायला मजा आली. नंतर साताऱ्याच्या रस्त्याला लागलो. आम्हाला कोकरूडमागे (कोल्हापूरला वळसा घालून) रत्नागिरीकडे जायचं होतं. जाताना अपेक्षेप्रमाणेच, कोकरूड फाटा शोधताना दमछाक झाली. तो एकदा सापडल्यानंतर पुढे काही अडचण नव्हती.
कोकरूड गावाजवळ एकदा थोडी गडबड झाली, एके ठिकाणी चुकीच्या रस्त्याने थोडा पुढेही गेलो, पण लवकरच चूक लक्षात आली. नंतर मात्र कुठे चुकलो नाही. आंबा घाटात पोचलो आणि पहिल्यांदा पावसानं कृपा केली. गोमुखाच्या ठिकाणी पोचलो, तर तुफान पाऊस आणि धुक्यात बुडून गेलो. बाहेर उतरून फार वेळ थांबण्याचीही सोय नव्हती. उरलेला घाट जपूनच उतरावा लागला. पुढेही कोकणात उतरताना दोन-तीन ठिकाणी पाऊस लागला. वाटेत रमतगमत, फोटो काढत, थांबत गेलो. त्यामुळे रत्नागिरीत पोचायला पावणेचार वाजले. पण त्याची खंत नव्हती.
रत्नागिरीत पाच दिवस मुक्काम होता.
दुसऱ्या दिवशी आरे-वारे मार्गे गणपतीपुळ्याला गेलो. पण यंदा कोतवड्यातून न जाता काजरभाटीचा नवा रस्ता निवडला होता. या मार्गावरून रत्नागिरी-गणपतीपुळे अवघं 28 किलोमीटर अंतर आहे. समुद्रात काही वेळ खेळलो, किल्ले वगैरे केले. "कोकण दर्शन' प्रदर्शन पाहायचं या वेळीही राहून गेलं.
तिसऱ्या दिवशी राजापूरजवळ आडिवरे येथे आमच्या कुलदैवताला जायचं ठरलं. पावस-पूर्णगडमार्गे जाणारा हा रस्ता भन्नाटच आहे. आडिवऱ्याला मी पहिल्यांदाच जात होतो. पूर्णगडच्या पुढचा, गावखडीपासूनचा रस्ता तर समुद्रकिनाऱ्याला लागून असललेल्या सुरूबनाशेजारून जाणारा होता. मस्त गार वारा होता आणि आम्ही त्या भन्नाट रस्त्यावरून एकटेच निघालो होतो...
आडिवऱ्याचं पारंपरिकता जपणारं रवळनाथ आणि महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती मंदिर मन प्रसन्न करणारं होतं. देवाधर्माशी मला काही देणंघेणं नसलं, तरी देवळं पाहायला मात्र फार आवडतं. विशेषतः खेडेगावांत असणारी शांत, निवांत देवळं. त्यातूनही शंकराची देवस्थानं म्हणजेपर्वणीच! पण ते असो.
आडिवऱ्यात दर्शन उरकून कशेळीचं सूर्यमंदिर पाहायला निघालो. भारतातल्या काही निवडक सूर्यमंदिरांपैकी ते एक आहे. सुमारे नऊशे वर्षांपूर्वी कशेळी समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्रात एक जहाज अडकलं आणि त्यातली मूर्ती तिथल्या एका किनाऱ्यावरच्या गुहेत त्यांनी सोडून दिली, अशी आख्यायिका सांगितली जाते. गुजरातमध्ये मूर्तिभंजनापासून टाळण्यासाठी ही मूर्ती महाराष्ट्राकडे हलविण्यात आली होती. आडिवऱ्यात आणि कशेळी सूर्यमंदिरातही मी वेगळ्या प्रकारची पाणी काढण्याची व्यवस्था पाहिली. त्याला काय म्हणतात, कोण जाणे!
येताना वाटेवरच्या कुरधे गावात आमच्या एका परिचितांकडे जायचं होतं. त्यांच्या घराचा रस्ताही शेत आणि नदीतून जाणारा, एकदम कोकणाची सर्व वैशिष्ट्यं असलेला होता. मजा आली.
रत्नागिरीत काही गणपती पाहिले. मुख्य म्हणजे तिकडे स्वाइन फ्लूचं सावट नव्हतं. त्यामुळे कुठेही भटकण्यात काही बंधनं नव्हती. एके संध्याकाळी सहज थिबा पॉइंटला गेलो होतो, तर तिथल्या पूर्वीच्या नैसर्गिक सुंदर ठिकाणी भली मोठी बाग उभारलेली! आम्ही कॉलेजात होतो, त्या काळात संध्याकाळी भटकायची ही ठिकाणं! ते दगड, दरी...सगळं आता कृत्रिम सौंदर्यानं वेढलं होतं. तरीही, बागेची रचना आवडली. विशेष म्हणजे तिथला धोका आणि स्वैरपणा कमी करण्यात या बागेचा मोठा हातभार लागेल.
पुण्याला येतानाच्या प्रवासासाठी थोडा लवकर, म्हणजे साडेसातला निघालो. रात्री फार झोप झाली नव्हती, त्यामुळे थोडा थकवा होता. तरीही प्रवास उत्तम झाला. पण जाताना जास्त मजा आली होती. कारण सुरुवातीचा पुणे-कऱ्हाड महामार्गावरचा कंटाळवाणा प्रवास संपल्यानंतर पुढे आंबा घाट, कोकणात उतरण्याचा मार्ग, हा प्रवास प्रसन्नकारक आणि उत्साहवर्धक होता. येताना नेमकी उलट परिस्थिती होती. वाटेत कोकरूडच्या पुढे आम्हाला एक लांडोर चालत जाताना दिसली. नंतर वेगळ्या प्रकारचे तीन लांबलचक पक्षी उडत जाताना दिसले. ते पुढे गेल्यावर कळलं, ते मोर होते! वाटेत शेतात काही मोरांचा केकारव पण ऐकू आला, पण दिसले मात्र नाहीत!
मनस्वीनं जाताना तिच्या समस्त गाण्यांचं पारायण करून एवढा पिट्ट्या पाडला होता, की आम्ही पार वैतागून गेलो होतो. येताना खास तिच्यासाठी 50 गोष्टींची एमपी3 घेतली होती. पण दहा-बारा गोष्टी ऐकूनच तिने साडेदहाच्या सुमाराला जी ताणून दिली, ती एकदम पुण्यात आल्यावर तीन वाजताच उठली!
बारा वर्षांपूर्वी रत्नागिरीहून पुण्यात राहायला आलो, तेव्हा गणपतीनंतर स्कूटर घेऊन आलो होतो. तो प्रवास मात्र चिपळूण-कोयनामार्गे केला होता. एकट्यानं दुचाकीवरून एवढा मोठा प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती. वाटेत तब्बल 11 जणांना विनामोबदला लिफ्ट दिली होती! या वेळच्या चार चाकीमधून केलेल्या प्रवासाच्या वेळीही त्याची आठवण झाली. विशेष म्हणजे, त्या प्रवासात एका ठिकाणी कुत्रं अंगावर आलं होतं. या वेळीही आलं, पण माझ्या गाडीला दोन चाकांची पडलेली भर त्याला लक्षात आली नसावी!
Subscribe to:
Posts (Atom)