"तू ललित का लिहीत नाहीस?'
बारावीत आमच्या एका (साहित्यिक) वर्गमित्रानं मला हा प्रश्न केला होता. ललित अशा नावाचा लेखनाचा काही प्रकार असतो, हे तेव्हा मला प्रथम कळलं होतं. तो स्वतः चांगलं ललित लिहितो, असा त्याचा दावा होता. अर्थात, कॉलेजच्या "सहकार' मासिकातही त्याचं लेखन छापून आणेपर्यंत त्याची मजल होती, त्यावरून तो निश्चितच मोठा साहित्यिक असावा.
तर सांगण्याचा उद्देश काय, की लिखाण म्हणजे एकतर कथा, कादंबरी, नाटक किंवा कविता, एवढंच मला माहीत होतं. गेला बाजार प्रवासवर्णन. पण रत्नागिरीहून एकतर पुणे किंवा मुंबई एवढाच प्रवास मला माहीत नसल्यामुळे आणि तो प्रवासही बरेचदा रातराणीनं होत असल्यामुळे त्याविषयी लिहिण्यासारखं फार काही नव्हतं. रात्री सात किंवा आठ वाजता बसून पहाटे (जाग आलीच तर) पुणे-मुंबईतला दिव्यांचा झगमगाट पाहत शहरात प्रवेश करायचा, एवढाच काय तो प्रवासातला अनुभव. प्रवासापेक्षाही आकर्षण असायचं ते पुणे, मुंबई बघण्याचं. तेसुद्धा कुणी वडीलधारे किंवा वडीलबंधू फळले तर. नाहीतर आमची मुंबई-पुणे वारी म्हणजे लग्न किंवा मुंजीच्या धबडग्यात वाहून जायची. त्यामुळे या महानगरांतलं राहतं घर ते मंगल कार्यालय यांच्या दरम्यान होईल तेवढंच मुंबई-पुणे दर्शन. बाकी प्रवास केला, तो त्र्यंबकेश्वर, पंचवटी, शेगाव असा धार्मिक स्थळांचा. हा प्रवास दिवसा केला असला, तरी बरेचदा गाडी लागण्याच्या (स्वतःला आणि सहप्रवाशांना असलेल्या) भीतीने त्या प्रवासाविषयीही सुखकर असं काही नाही. त्यातून लाल डब्याचा, सुटीच्या "पीक' सीझनमधला तो प्रवास. बसण्याच्या जागेवरून भांडणं, आखडत्या पायांनी सहन केलेला त्रास आणि कंडक्टरच्या खंडीभर शिव्या, याशिवाय फार काही हृदयाच्या कुपीत जपून ठेवण्यासारख्या आठवणी असण्याचं कारण नाही.
दुसरा दिवसाचा प्रवास असायचा तो शिपोशी या आमच्या आजोळचा. पण तो जेमतेम दीड तासाचा. त्या प्रवासात मी एकटा असेन, तर बहुतेकदा शेजाऱ्याला "वाकडा फणस' आला की सांगा, असा निरोप देऊन ठेवायला लागायचा. कारण त्या दीड तासातही माझी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असायची.
सांगायचा मुद्दा काय, की प्रवासवर्णनाच्या वाटेला कधी गेलो नाही. "ललित' म्हणून दुसरं काय लिहायचं, असा प्रश्न होताच. आयुष्यात काय, साधी वाटेतही कुणी "ललिता' आडवी आली नाही, त्यामुळे त्या ललिताविषयी लिहिण्याचा प्रश्नही निकालात निघाला. "सहकार'मध्ये लिहिण्याचा पहिला प्रसंग आला, (गुदरला!) तेव्हासुद्धा मी माझ्या अभ्यास शाखेशी निष्ठावंत राहून एक विज्ञानकथा लिहिली होती. नुकत्याच वाचलेल्या "बर्म्युडा ट्रॅंगल'मधल्या एका प्रसंगाशी ती कथा अगदी मिळतीजुळती होती, हा निव्वळ योगायोग!
आता मात्र व्यावसायिक लेखक झाल्यानंतर (म्हणजे लेखन हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर) उगाचच ललित लेखनाचा किडा वळवळायला लागला आहे. साध्याच प्रसंगावर छानसं लिहायला जमलं पाहिजे, असं वाटायला लागलंय. जमेल ना मला?
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Jul 14, 2012
ललिताचं लळित
Subscribe to:
Posts (Atom)