नवे रस्ते शोधणं आणि त्यासाठी तंगडतोड करणं, ही खाज पहिल्यापासूनचीच. पुण्यात वास्तव्याला आल्यानंतरही पहिल्यांदा आसपासचे सगळे गल्लीबोळ पालथे घालण्याचं कर्म अगदी श्रद्धेनं पार पाडलं होतं. बोळ शोधताना वेगळ्याच `गल्ल्या` सापडल्या, तेव्हा तंतरली होती, ते वेगळंच. असो.
तर मुद्दा असा, की आता मुंबईत (अधून मधून का होईना,) राहायला लागल्यानंतर आसपासचे रस्ते शोधून काढणं हे आद्यकर्तव्य मानलं. त्यातून `सुजलायंस सगळीकडून. जरा शरीराला कष्ट देऊन चालायला जात जा,` हा धमकीवजा आदेश धर्मपत्नीकडून मिळाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणंही क्रमप्राप्त होतं. ही हौस किती महागात पडू शकते, याचा मात्र अंदाज आला नव्हता. काल तोही आला.
गोरेगाव पश्चिम भागात आत्याकडे गेलो होतो. आमचा दिंडोशी भाग म्हणजे पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून सुमारे तेवढंच अंतर. म्हणजे आत्याचं घर ते दिंडोशी अंतर सरळ रेषेत मोजलं, तर सुमारे पाच ते सहा किलोमीटर असावं. दिंडोशीपासून गोरेगाव स्टेशनपर्यंत (सुमारे अडीच कि.मी.) चालत जाण्याची हौस अनेकदा भागवली होती. काल आत्याकडून निघताना गोरेगाव स्टेशनवरून भाज्या घ्यायच्या होत्या. संसारसंसर्ग. दुसरं काय? आत्याला विचारलं, तर ती गोरेगावपेक्षा मालाडला चांगल्या मिळतील, असं म्हणाली. मी मालाड स्टेशनपर्यंत चालत जायचं ठरवलं. अंतर साधारण दीड किलोमीटर. भाज्या मनासारख्या मिळाल्या. गोरेगावहून दिंडोशी जेवढं अंतर आहे, तेवढंच मालाडहून असेल, असा आपला माझा एक स्वैर अंदाज. समोर दिसणारा रस्ता दिंडोशीच्या आधी लागणा-या पूर्व द्रुतगती मार्गालाच मिळणार, हा फाजील आत्मविश्वास. रस्त्याचं ज्ञान अगाध असतानाही चालण्याची खाज भागवण्याची ही नामी संधी होती. म्हणून चालत निघालो. पाठीला laptop, हातात भाजीची जड पिशवी होती. समोर दिसेल तो रस्ता आपलाच मानून चालत राहिलो. एकतर मुंबईचा उकाडा, पाठीला बॅग, हातात पिशवी आणि रस्ता संपता संपेना अशा अवस्थेत अंगानं घामाच्या धारा लागल्या. मिल्खासिंगनं ग्राउंडला राउंड मारून बनियन पिळपिळून मग भरला होता. मी हातातला नॅपकिन पिळत होतो. शर्टही संपूर्ण भिजून निथळत होता. (तो काढून पिळणं शक्य नव्हतं. असो.) साधारण साडेसहा वाजता मी घरातून निघालो होतो. पाऊण ते तासाभरात माझ्या घरी पोचेन, असा अंदाज होता. हायवे पर्यंत पोचायलाच दोन तास लागले. तिथूनही Oberoy mall चा चौक दृष्टिपथात नव्हता. आपण नक्की कुठे आलो आहोत, तेच कळेना झालं होतं. उजव्या बाजूनं चालत राहिलं, तर दिंडोशीला जाता येईल हे नक्की, पण किती चालायला लागेल, याचा अंदाज येत नव्हता. तरीही चालत राहिलो. रिक्षा करायचा घातक विचार एक क्षण मनाला शिवून गेला, पण भाज्यांचे पैसे वाचवण्यासाठी एवढी तंगडतोड केली आणि आता रिक्षावाल्याच्या नरड्यात तीसेक रुपये कोंबायचं जिवावर आलं होतं. बसनं जावं तरी हायवे ओलांडून जावं लागणार होतं आणि त्यासाठी कुठेच सोय दिसत नव्हती. ``इथून ओबेरायचा चौक किती लांब आहे हो साहेब...?`` असं गि-हाईक टिपायला टपलेल्या एका हवालदाराला विचारलं. ``हे इथेच. एक चौक.`` असं त्यानं उत्तर दिलं. मला तर नजरेच्या टप्प्यात कुठेच ओबेरायची इमारत दिसत नव्हती. तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून चालत राहिलो. आणखी थोडं चालल्यावर ओबेरायचा चौक नाही, पण एक पादचारी पूल दिसला आणि जीवात जीव आला.
पूल ओलांडून पलीकडे गेलो, तर एक बस stop लागला. कुरार गाव. दिंडोशी अजून खूप लांब आहे, निदान या अवस्थेत चालत जाण्यासारखं नक्की नाही, हेही लक्षात आलं. मग बसनं जाण्याचा शहाणपणा करायचं ठरवलं. पहिली गर्दीची बस सोडून दिली आणि पुन्हा मूर्खपणा केला की काय, असं वाटू लागलं. आणखी दहा मिनिटं बसच आली नाही. शेवटी मला हवी ती बस आली. फार गर्दीही नव्हती. एखादा आदिमानव बघितल्यासारखं लोक वळून वळून माझ्या अवताराकडे बघत होते. घामानं निथळणारा चेहरा, ओलाचिंब शर्ट, विस्कटलेले केस. माझा जवळपास `टारझन` झाला होता. फक्त अंगात वल्कलं नव्हती, एवढंच. उघडं व्हायची इच्छा होती, पण सार्वजनिक ठिकाणचे संस्कार आड येत होते.
दिंडोशी दहा मिनिटांत आलं, पण तेवढी आणखी पायपीट केली असती, तर माझी `दिंडी` काढायची वेळ आली असती, हेही लक्षात आलं. माझी ही रामकहाणी रूम पार्टनर्सना ऐकवली. त्यांनी ती शांतपणे ऐकून घेतली. बिच्चारे. काही बोलले नाहीत.
पुण्यात असतो, तर एवढ्या द्राविडी प्राणायामानंतरही...
``हे काय? कोबी कशाला आणलास परत?``
``अरे श्रावणघेवडा आणलाय मी कालच. तुला आणू नको म्हटलं होतं.``
``शी. किती सुकलेली आहे ही कोथिंबीर!``
``अरे देवा. ही मेथी बघून नाही का घेतलीस? सगळी किडकी आहे!``
...यापैकी काही ना काही सुवचन कानी पडलंच असतं.!!
असो. असतात एकेक भोग.