Oct 27, 2011

आली माझ्या घरी ही दिवाळी

आंबा जसा फळांचा राजा, गुलाब जसा फुलांचा, तशी दिवाळी म्हणजे सणांचा राजा किंवा राणी वाटते मला. लहानपणापासूनच सगळ्यात जास्त आरर्षण दिवाळीचं असायचं. इतर सण सुरू झाले म्हणेपर्यंत संपून जायचे. पण दिवाळी छान चार दिवसांचा सण. त्याची तयारी आठ दिवसांची काय...महिनाभराचीच.
सहामाही परीक्षांच्या आधीच दिवाळीचे वेध लागायचे. परीक्षा कधी एकदा होतेय, असं होऊन जायचं. मग शेवटचा पेपर संपला, की आम्ही त्या दिवशी हमखास एखादा पिक्चर टाकायचो. नाहीतर चिंचीणीखाली, नाहीतर शाळेच्या मैदानात एखादी मॅच ठरलेली. अगदीच काही नसलं तर घरी येऊन मस्त लोळायचं. मग दिवाळीच्या कपड्यांची खरेदी आणि मुख्य म्हणजे फटाके. त्या वेळी 50-60 रुपयांचे फटाकेही दिवाळीभर पुरायचे.
``आम्ही लहानपणी फक्त एक ते दोन रुपयांचे फटाके घ्यायचो....माहितेय?`` असं पालुपद वडील आम्हाला ऐकवायचे. आता मी ते माझ्या मुलीला ऐकवतो. कारण त्या वेळच्या 50-60 रुपयांच्या फटाक्यांची किंमत आता 500 ते 600 रुपये झाली आहे. कालाय तस्मै नमः...असो.
दिवाळीचा किल्ला हाही एक चांगला टाइमपास असायचा. मी कधी फार समरसून किल्ला केला नाही, पण त्यात भुयारं, विहिरी, पाय-या वगैरे करायला मजा यायची. दरवेळी किल्ल्याची जागाही बदलायची. मग कुठे कुठे किल्ले बघायला जाण्याचा कार्यक्रम असायचा. इतर मुलांचे किल्ले बघून आपण फारच पाट्या टाकल्या आहेत, हेही लक्षात यायचं. त्या वेळी दिवसभर मातीत आणि चिखलात रंगून जाण्यात भूषण वाटायचं. मुख्य म्हणजे किल्ल्लासाठी कच्चे साहित्य म्हणजे माती आणि दगड यांची काही कमतरता नव्हती. मावळे इकडून तिकडून जमवले जायचे. आता मुलीसाठी किल्ला करताना मावळे तर विकत आणावे लागतातच, पण मातीही नर्सरीशिवाय दुसरीकडून मिळत नाही.
``यंदा दिवाळीत दिल्लीला जायचं की केरळला?`` असा प्रश्न आम्हाला त्या वेळी पडायचा नाही. कारण पर्यटन म्हणजे केवळ लग्नामुंजीकरता पुणे, मुंबई, बेळगाव किंवा कोल्हापूरला कुठल्यातरी नातेवाइकाच्या घरी मुक्काम ठोकणं, एवढंच आम्हाला माहिती होतं. त्यावेळी लग्नाची धामधूम आटपून आईवडील किंवा एखादा दादा उदार झालाच, तर एखादी बाग किंवा शनिवारवाडा दाखवून आणत असे. तेच आमचं पर्यटन.
फटाके चार दिवस पुरवून वापरण्यात मजा असायची. आधी फटाके आणल्यावर ते उन्हात वाळवण्याचा एक कार्यक्रम असायचा. चांगले तापले, की ते चांगले वाजतात, असा एक (गैर)समज वडीलधा-यांनी करून दिला होता. अॅटमबाॅब सगळ्यात दणदणीत आवाजामुळे आवडते असले, तरी सगळ्यात लाडके फटाके म्हणजे बंदुकीच्या केपा, सापगोळ्या आणि लवंगी बार. लवंगी तर दोन-चार रुपयांना मिळायची, त्यामुळे ती उडवण्यात जास्त समाधान असायचं. बंदुकीच्या केपा आम्ही बंदुकीतून कमी आणि हातोडा किंवा दगडानंच जास्त वाजवल्या. केपा किंवा टिकल्या एकावर एक गठ्ठा करून ठेवायच्या आणि दाणकन त्यावर दगड किंवा हातोडी घालून मोठ्या bomb सारखा मोठा आवाज काढण्यात जी मजा यायची, ती लक्ष्मीबारमध्येही नव्हती.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाक्यांच्या आवाजानेच जाग यायची. इतर वेळी झोपल्यानंतर ढोल वाजवूनही न उठणारा मी, नरक चतुर्दशीला मात्र पहाटे साडेचारलाच कुणीही हाक न मारता टुणकन उठून बसायचो. क्वचित एखाद्या वर्षी पाच वाजता जाग आली, तर फार अपराध्यासारखं वाटायचं. अख्ख्या परिसरात पहिला अॅटमबाॅब आपणच वाजवला पाहिजे, असा एक अलिखित नियम होता. पहिल्या दिवशी फराळ करण्यासाठी देवळात जाऊन येईपर्यंत धीर नसायचा. अशा वेळी देवाला नैवेद्य दाखवण्याच्या पद्धतीचा फार राग यायचा. फराळ झाला, की अकरा-साडेअकरानंतर काय करायचं, हा मोठा प्रश्न असायचा. घरातली मोठी माणसं लवकरच पथारी पसरून झोपून जायची. आम्ही पोरं मात्र बेवारस व्हायचो. खेळायला सवंगडी असले तर ठीक, नाहीतर वेळ जाता जायचा नाही.
फटाके वाजवण्याची मला फार क्रेझ नव्हती. रोज नियम म्हणून फटाके वाजवले जायचे. फार चित्रविचित्र फटाके, बाण वगैरेही कधी लावले नाहीत. लहानपणी एकदा अनावश्यक कुतूहल म्हणून भुईचक्र ज्यावर फिरतात, ती सगळी गोल चक्रं एकदा बसून काढून टाकल्याचं आठवतंय. ती चक्रं चुकून चिटकलेली असावीत, असं वाटलं होतं त्यावेळी. त्यानंतर असा काही मार खाल्ला होता, की विचारू नका.
फटाक्यांची काळी बाजू त्या वेळी कधी लक्षात आली नाही. आता मोठं झाल्यावर ती आली असली, तरी फटाक्यांशिवाय काही दिवाळी जात नाही. दोन वर्षांपूर्वी मनस्वीला घेऊन फटाका वाजवताना एकदा अनपेक्षितपणे भुईनळ्याचा स्फोट होऊन हात भरपूर भाजला होता. डोळ्यापुढे अंधारी आली होती. डोळ्यांना काही झालं नाही ना, असंही क्षणभर वाटून गेलं. फटाक्यांच्या बाबतीतला तो सगळ्यात मोठा अपघात.
गेल्या आठवड्यात मनस्वी घरी आली आणि एकदम बोट उगारून मला धमकी दिल्याच्या सुरात म्हणाली, ``बाबा, मला यंदा जास्त फटाके आणलेस, तर याद रख!`` (टीव्हीवरचे हिंदी कार्यक्रम बघून बिघडलेय कार्टी!)
मी घाबरत घाबरत `का` विचारल्यावर म्हणाली, ``फटाक्यांनी प्रदूषण होतं.`` शाळेतून बहुधा पट्टी पढवली होती. तिचा हा प्रदूषणमुक्तीचा ताप दिवाळी सुरू होईपर्यंतच टिकला. आता सोसायटीतल्या पोरांना ती जमवून आणते, तेव्हा आजच्यापुरते फटाके बास झाले, म्हणून रोज तिच्यामागे कंठशोष करावा लागतोय, हे सांगणे न लगे!

Aug 24, 2011

दर्शनमात्रे मनःकामना (अर्ध) पुरती!

(FILM REVIEW - MORAYAA)
 
"मोरया' हा गणेशोत्सवातल्या अपप्रवृत्तींवरचा नव्हे, तर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या दोन शेजारच्या चाळींमधल्या तरुणांच्या दोन गटांतली खुन्नस आणि त्याला लागणारं वाईट वळण दाखवणारा चित्रपट आहे. सध्याच्या गणेशोत्सवाचं बरं-वाईट रूप व्यापक स्वरूपात बघायला मिळेल, अशी अपेक्षा ठेवली नाही, तर हा चित्रपट बऱ्यापैकी रंजक झाला आहे.
मुंबईतील दोन चाळींमधील गणेशोत्सव मंडळांचे प्रमुख असलेले समीर (चिन्मय मांडलेकर) आणि मनोज (संतोष जुवेकर) एकमेकांचे कट्टर वैरी. आपापल्या चाळीचा गणेशोत्सव जास्त दिमाखात व्हावा, यासाठी ते काहीही करण्यास तयार होता. दोन राजकीय नेते आणि एका मुस्लिम संघटनेचा नेता या दोघांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतात. त्यातून दंगली पेटतात आणि परिस्थिती विकोपाला जाते. शेवटी या दोघांनाही आपला कोणी, कसा गैरवापर केला, हे लक्षात येऊन एकत्र येण्याची उपरती होते.
लेखक सचिन दरेकर यांनी पहिल्यापासून प्रेक्षक या कथेत आणि संघर्षात गुंतेल, याची उत्तम काळजी घेतली आहे. पटकथेपेक्षाही दमदार संवादांमुळे चित्रपट जबरदस्त पकड घेतो. मात्र, कथा केवळ दोन गटांमधील वैरापुरतीच मर्यादित राहते. त्यांच्या कुरघोड्या आणि खुन्नस याच्या पलीकडे जाण्याचा चित्रपट प्रयत्न करत नाही. खानावळ चालविणाऱ्या काकांच्या (दिलीप प्रभावळकर) माध्यमातून गणेशोत्सवाला आलेल्या वाईट स्वरूपाबद्दल काही टिप्पणी आहे, पण ती तेवढ्यापुरतीच.
दहीहंडीच्या दृश्‍यापासूनच कॅमेऱ्याची चित्रपटावरील जबरदस्त पकड जाणवते. संवाद आणि छायांकन या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत, त्याचबरोबर चिन्मय आणि संतोष जुवेकर यांच्यासह त्यांच्या सर्वच "पंटर्स'चा उत्तम अभिनय. दोघांची खुन्नस छान चित्रित झालेय. खासगी दूरचित्रवाणीचे पत्रकार दोन छोट्या मंडळांच्या प्रमुखांच्या दावणीला बांधल्यासारखे त्यांच्यासोबत वाहवत कसे जातात, देव जाणे! कुठल्या चाळीतल्या दहीहंडीत तरुण-तरुणी एकमेकांच्या कंबरेत हात घालून नाचतात, याचाही शोध घ्यायला हवा.
गणेश यादव, दिलीप प्रभावळकर, जनार्दन परब, यांच्या भूमिका लक्षात राहण्याजोग्या. लबाड आणि तेवढाच "पोचलेला' पोलिस अधिकारी गणेश यादवच करू जाणे. अशी उत्तम व्यक्तिरेखा लिहिल्याबद्दलही दरेकर यांना शंभर टक्के गुण! परी तेलंग आणि स्पृहा जोशी ठीकठाक.
अवधूत गुप्तेंनी दणकेबाज गाणी केली आहेत. दहीहंडीच्या गाण्याचे चित्रीकरणही झकास. ऊर्मिला कानेटकर-क्रांती रेडकरच्या आयटम लावणीची कल्पना त्यांच्यातल्या संगीतकाराला सुचली, निर्मात्याला, की दिग्दर्शकाला, हे कळायला मार्ग नाही. "घालीन लोटांगण' मध्ये "प्रेमे आलिंगन' मात्र खटकतं. एवढी ढोबळ चूक टाळायला हवी होती.
सर्वांनी घेतलेल्या मेहनतीसाठी मात्र "मोरया'चं एकदा दर्शन घ्यायला हवं.

Aug 17, 2011

27 टक्के आरक्षण, 73 टक्के मसाला!

(Film Review : AARAKSHAN)

"झा साहेब, तुम्ही सामाजिक विषयांवरचे एवढे सिनेमे बनवता. आरक्षणाच्या वादावर एखादा सिनेमा काढा की! कसला भारी होईल! पब्लिकचं लक्ष एकदम वेधून घेतलं जाईल!'' कॉर्पोरेट क्षेत्रातली कंपनी प्रकाश झा यांच्या मागे लागली होती.

""अरेच्चा! एवढे दिवस हा विषय माझ्या नजरेतून कसा सुटला?'' झा यांना प्रश्‍न पडला.

झा यांनी मग आपली टीम गोळा केली आणि "आरक्षण'ची बुंदी पाडायला घेतली.

""सर, आरक्षण हा खूपच संवेदनशील विषय आहे. आपल्याला त्याचा सखोल अभ्यास करायला लागेल. समाजाच्या सर्व स्तरांतल्या लोकांना भेटावं लागेल. याबाबतच्या वेगवेगळ्या भूमिका समजून घ्याव्या लागतील. आरक्षणाच्या विषयावर काहितरी भाष्य करावं लागेल...'' कुणीतरी शंका काढली.

""काही गरज नाहीये त्याची. आपल्या "आरक्षण' या नावाचा सिनेमा बनवायचाय. आरक्षणाच्या विषयावरचा नाही.'' झांनी खुलासा केला.

""सर, कळलं नाही!''

""अरे, आरक्षणाचा विषय त्याच्यात असला पाहिजे, पण त्याचं प्रमाण 27 टक्केच ठेवायचं. म्हणजे, आरक्षणाची कोंबडी आणि उरलेला सगळा मसाला. आलं लक्षात?''

""आलं सर. म्हणजे आरक्षणावरून विषय सुरू करायचा आणि मग टिपिकल मालमसाला सिनेमा करायचा.''

""पण आरक्षणावरचे दोन-तीन कडक सीन झाले पाहिजेत. प्रोमोमध्ये तेच दाखवायचे. म्हणजे लोकांना एकदम भारी वाटेल. सोमवारपर्यंत मल्टिप्लेक्‍स भरली, की झालं आपलं काम!''

""हे बेस्ट आहे. पण सर, त्याच्यावरून वाद होऊ शकतील.''

""होऊ देत की! आपल्याला तेच हवंय. वाद झाले, की चित्रपटाचं बुकिंग जास्त वाढतं. लोक आधी आक्षेप घेतील...आपण सुद्धा ताणून धरू. नंतर त्यांना फिल्म दाखवू. त्यात आरक्षणाबद्दल काहीच वादाचा मुद्दा नाहीये, हे कळल्यावर आपोआप वातावरण शांत होईल. तोपर्यंत आपलं बुकिंग फुल झालेलं असेल. काय?''

...

निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा आणि त्यांच्या टीममध्ये "आरक्षण' बनवताना अशाच प्रकारचा संवाद झाला असावा की काय, अशी पहिलेछूट शंका हा चित्रपट बघितल्यावर येते. प्रभाकर आनंद (अमिताभ बच्चन) या आदर्शवादी शिक्षकाच्या संघर्षाची ही कहाणी आहे. "एसटीएम'मध्ये ते आदर्शवाद आणि समानतेचे धडे विद्यार्थ्यांना देत असताना ओबीसी आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं जातं. त्यावरून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील जातिवाद उघड होतो. आरक्षणाविषयी सकारात्मक भूमिका प्रभाकर आनंद व्यक्त करतात आणि त्यांचे हितशत्रू त्यांना पदावरून दूर करून मिथिलेशसिंग (मनोज वाजपेयी) या भ्रष्ट प्राध्यापकाला प्राचार्य करतात. मिथिलेश खासगी क्‍लासही चालवत असतो. आरक्षणाचा विषय इथेच संपतो आणि मग मिथिलेशचे खासगी क्‍लास विरुद्ध प्रभाकर आनंद यांच्या मोफत शिकवण्या, असा संघर्ष सुरू होतो. त्याचे दोन माजी विद्यार्थीही (सैफ खान, प्रतीक बब्बर) त्याला मदत करतात.

आरक्षणाचा आणि चित्रपटाच्या मूळ कथेचा काहीच संबंध नसल्याचं मध्यंतरानंतर उघड होतं आणि त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा केवळ प्रसिद्धीच्या सोयीसाठी घेतला असावा की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. आरक्षणाचं समर्थन केल्याबद्दल प्रभाकर आनंदवर कारवाई होते, त्याऐवजी ती कुठल्याही अन्य कारणामुळे झाली असती, तरी काही फरक पडला नसता. आरक्षणाबद्दल मागासवर्गीयांना डिवचल्यावर त्यांनी व्यक्त केलेल्या सात्विक संतापाचे काही प्रसंग प्रभावी झाले आहेत.

नुसता संघर्षपट म्हणून विचार केला, तरी चित्रपट सामान्यच आहे. प्रकाश झा यांच्या वकुबाला तर अजिबात साजेसा नाही. घर गमावलेल्या प्राचार्याला तारांकित हॉटेलात राहायला कसं परवडतं, गरीब समाजातील विद्यार्थी गर्लफ्रेंडला घेऊन मोठ्या हॉटेलांत कसा जातो, काही कळत नाही.

अमिताभ बच्चन यांनी या वयातही तडफदार कामगिरी केली आहे. सैफ खान, मनोज वाजपेयी वाखाणण्याजोगे. दीपिका पदुकोन पाठ केल्यासारखं बोलते. प्रतीक बब्बरचं तर बहुधा तालमीच्या वेळीच चुकून शूटिंग केलं असावं.

चर्चेतला विषय घेऊन, त्यातल्या बऱ्या-वाईट गोष्टींचे चटके न सोसता नुसता शेक घ्यायचा आणि वादाची भट्टी पेटवून त्यात स्वतःची पोळी मात्र भाजून घ्यायची, हे वागणं प्रकाश झा, बरं नव्हं!

Aug 9, 2011

रमलेल्या बाबाची कहाणी!

ड्यूक्‍स नोज म्हणजे आम्हा ट्रेकर्सची पंढरीची वारी असते. गेली दहा-बारा वर्षं तरी ही वारी कधी चुकवलेली नाही. पुण्यात आल्यानंतर ट्रेकिंग सुरू केल्यावर पहिले काही ट्रेक केले, त्यातला एक ड्यूक्‍स नोज होता. तेव्हा "झेप'बरोबर केला होता. नंतर एकदा युवाशक्ती आणि नंतर नियमितपणे "गिरीदर्शन'बरोबर जाऊ लागलो. यंदा "वॉंडरर्स'बरोबर जाण्याचा योग पहिल्यांदाच आला होता....म्हणजे जुळवून आणला होता!
ड्यूक्‍स नोज म्हणजे वेड आहे वेड! जाताना-येताना प्रवासाचा फारसा त्रास नाही, फार लांबही नाही...जाताना एक छान धबधबा. त्यात दोन तास धिंगाणा, वाटेत तीन-चार खुमखुमी जिरवणारे रॉक पॅच. अगदी नव्यानेच आलेल्यालाही पार करता येण्याजोगे. आणि ड्यूक्‍स नोजच्या नाकावर पोचल्यानंतर स्वर्गीय सुखाचा आनंद...!!
मनस्वीला ट्रेकला घेऊन जाण्याचा बेत ती दोन वर्षांपासून आखत होतो. एकदा ती आजारी पडली म्हणून राहिलं, कधी अन्य काही कारणांनी राहिलं. यंदा मात्र तिला घेऊन जाण्याची भीष्मप्रतिज्ञाच केली होती. तरीही "गिरीदर्शन'सोबत जाण्याचा योग चुकला. म्हणून मग अजित रानडे या जुन्या (म्हणजे आधीपासूनच्या. "जुन्या झालेल्या' नव्हे!) मित्राच्या "वॉंडरर्स' ग्रुपबरोबर जाण्यासाठी गळ टाकून ठेवला होता. योगायोगानं त्याचा ट्रेक 7 ऑगस्टला होता आणि मलाही त्या वेळी जमणार होतं.
मनस्वीची मानसिक आणि शारिरिक तयारी करण्याच्या आधी मला स्वतः तयारी करणं आवश्‍यक होतं. कारण या 84 किलोच्या देहाला जिने चढण्या-उतरण्याखेरीज फारशी तोशीस गेल्या काही दिवसांत पडलेली नव्हती. म्हणून किमान आठवडाभर आधी तरी रोज पर्वतीला जाण्याचा संकल्प केला. त्यानुसार आदल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी - सोमवारी निमिषला कडेवर घेऊन पर्वती साजरी केली. तरीही ड्यूक्‍स नोज झेपेल की नाही, हा अंदाज येत नव्हता. अर्थात, तरीही खुमखुमी काही कमी होणार नव्हती!
रोज जाण्याचा संकल्प असला, तरी पर्वती पुन्हा काही शक्‍य झाली नाही. मग एकदम रविवारी सकाळी ड्यूक्‍स नोजला जाऊन धडकण्याचा निर्धार करून टाकला. मनस्वी कितपत साथ देईल, चालण्याबाबत किती नाटकं करेल, काहीच अंदाज येत नव्हता. कारण आत्तापर्यंत तिला कधी सिंहगडावरही घेऊन गेलो नव्हतो. त्यामुळे मनात जरा धाकधूक होती. सालाबादप्रमाणे शुक्रवार आणि शनिवारी रात्री माझी झोप झाली नव्हतीच. शनिवारी रात्री दोनला झोपून रविवारी सकाळी पाचला उठलो. मनस्वी लवकर तयार झाली. ट्रेकला जाण्यासाठी तिचं आधी बरंच बौद्धिक घेतलं होतं, तरीही ती आयत्या वेळी दगा देईल, अशी धाकधूक मनात होती. तसं झालंही!
पाय दुखत असल्याचं टुमणं तिनं सुरू केलं. मग हर्षदाही गळाठली. माझ्याही पोटात गोळा आला. म्हटलं तिकडे गेल्यावर या पोरीनं अचानक भोकाड पसरलं, तर काय करायचं? वाटेतून अर्ध्यावर एकट्यानं परतावं लागलं असतं. त्यात अवघड काही नव्हतं, पण सगळा मूड गेला असता. पण काय झालं कुणास ठाऊक, मनस्वी पुन्हा तयार झाली. "तू स्वतःच्या मर्जीनं येते आहेस. माझ्यासाठी नव्हे,' असं मी तिला बजावूनही टाकलं.
सिंहगड एक्‍स्प्रेस पकडून खंडाळ्याचा रस्ता धरला. मनस्वी अगदी उत्साही आणि मजेत होती. गाडीत गर्दी असली, तरी अनेक मांड्या उबवून ती खुशीत होती. तिच्यासाठी हर्षदानं आवडत्या खाऊचा भरपूर खुराक दिला होता. खंडाळ्यात उतरल्यापासून मनस्वीने त्याच्यावर जो ताव मारायला सुरुवात केली, तो शेवटपर्यंत सुरू होता. त्यामुळेच तिला कुरकुरीला फारसा वाव मिळत नव्हता.
एवढ्या अनोळखी ग्रुपमध्ये ती कंटाळेल, सारखी मला चिकटेल, किरकिरेल, अशी भीती मनात होती. पण मुलं ऐनवेळी आईबापाला उताणी पाडण्यात एक्‍सपर्ट असतात, हेच खरं! मनस्वीनं खंडाळ्यापासून जे कुणाकुणाचा हात धरला, ते मला एकदम धबधब्याच्या जवळच भेटली. मी आवरून जाईपर्यंत ती धबधब्याच्या पाण्यात डुंबायलाही लागली होती. नेहमीप्रमाणे आम्ही धबधब्यात भरपूर धुमाकूळ घातला. मजा आली. मनस्वी धबधब्याचं पाणी मात्र थेट अंगावर घ्यायला तयार नव्हती. मग मनसोक्त उधळल्यानंतर तिचे कपडे बदलले आणि ड्यूक्‍स नोजच्या सुळक्‍याकडे रवाना झालो. वाटेतल्या कुठल्याही अवघड वाटांवर, चिंचोळ्या रस्त्यांवर, चढणीवरसुद्धा तिनं हूं की चूं केलं नाही. एकदा फक्त दमले म्हणून मला कडेवर घ्यायला लावलं. तेव्हा पुढे त्रास देते की काय, या विचारानं पोटात गोळा आला होता, पण ती पुन्हा उधळली. नंतरचा ट्रेकही तिनं व्यवस्थित केला. डोंगराच्या माथ्यावर गेल्याचं तिला आकर्षण होतं. तिथे फ्रेंडशिप डे निमित्त फुगेही तिला सोडायला मिळाले, त्यामुळे स्वारी खूष!
येताना खाली उतरल्यानंतर आमचा जरा वेळ करणुकीचा कार्यक्रम आणि टाइमपास चालला होता. मनस्वीने तिथे स्वतःहूनच नाट्यछटा सादर केली आणि भरपूर हशा व कौतुक मिळवलं. मी लिहिलेली ही नाट्यछटा तिला सादर करताना मी स्वतः पहिल्यांदाच पाहत होतो. तिनं दिवाकर नाट्यछटा स्पर्धेत नाट्यछटा सादर केली, तेव्हाही मी तिच्यासोबत नव्हतो. आज या निमित्तानं योग आला.
परतीच्या वाटेवर माझे पाय दुखत होते, पण ही बया उड्या मारत चालत होती. शेवटी मलाच तिची दया आली आणि अधून मधून तिला उचलून घेतलं. कुणीकुणी खांद्यावरही बसवलं. एकूण तिचा ट्रेक मजेत, आनंदात पार पडला. चक्क दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला उठून बया शाळेतही वेळेवर पोहोचली!
परतताना मला म्हणाली, ""बाबा, पुढचा ट्रेक कधी आहे?''
...एका उत्साही बापाचा ऊर भरून यायला अजून काय लागतं?
...

Jun 22, 2011

"रजनी'नाथ हा

सिंगापूरमध्ये हल्ली सकाळच्या वेळी लोकांना भूकंपाचे हादरे बसल्याचा अनुभव येतो. हा भूकंप वेगळाच आहे. जमीन हादरून दुभंगण्याच्या ऐवजी जमीन खाली गेल्याचा अनुभव येतो. थोड्या वेळाने जमीन पुन्हा पूर्वीच्या जागी येते.
...सिंगापूरच्या रुग्णालयात रजनीकांत रोज सकाळी "जोर' काढत असतो.

रुग्णालयाच्या कपाटांमध्ये वरच्या खणांत औषधांच्या बाटल्या, कापूस, इतर वैद्यकीय साहित्य, कपडे वगैरे ठेवण्यावर व्यवस्थापनानं सध्या बंदी आणलेय.
...रजनीकांत रोज प्राणायाम करत असतो!
...
हॉस्पिटलच्या डीनच्या केबिनमध्ये रजनीकांत रोज बसून डॉक्‍टरांवरील उपचारांचं नियोजन करतो. रुग्णांचं एक पथक रोज येऊन "आज डॉक्‍टरांवर काय उपचार करायचे,' याची विचारणा करतं. समोर असलेल्या वैद्यकीय पुस्तकावर रजनीकांत फुंकर मारतो. त्यातलं जे पान उलगडलं जाईल, ते पान वाचून त्यानुसार रुग्णांचं पथक डॉक्‍टरांवर उपचार करतं. रजनीकांत जे आद्याक्षर सांगेल, त्यापासून सुरू होणारी औषधं डॉक्‍टरांना दिली जातात. रिकव्हरीचं प्रमाणही खूपच वाढलं आहे.
अशाच एका सकाळी रजनीकांत जमीन खाली ढकलत असताना त्याचा सेक्रेटरी धावत आला.
""कलैग्नार...कलैग्नार...'' तो किंचाळला.
""ते केव्हाच मातीत गेले!'' रजनीकांत अस्सल मराठीत फिस्कारला.
""त्यांचा फोन आहे...''
""फोन कशाला करायचा? मी इथून डायरेक्‍ट बोललो तरी ऐकू गेलं असतं ना त्यांना...बरं, आता आलाच आहे फोन, तर बोलतो. दे!''
सेक्रेटरीनं फोन रजनीकांतच्या दिशेनं फेकला. रजनीकांतनं चपळाईनं डोकं हलवून तो कानाच्या पाळीच्या वर अडकवून टाकला....सुतारकाम करणारे मिस्त्री पेन्सिल अडकवतात, तसा! खिशातून एक सिगारेट काढली. ती हवेत फेकली. समोरच्या टेबलावर असलेल्या लायटरच्या दिशेने एक पेपरवेट फेकला. लायटरही हवेत उडाला आणि आकाशात जाऊन पेटला. त्यावर सिगारेट शिलगावली गेली. खाली येऊन रजनीकांतच्या ओठांच्या कोपऱ्यात विराजमान झाली. लायटर खाली येऊन जागच्या जागी गेला.
""बोला, करुणाजी!''
""काही नाही...सहज तुमच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला.''
""मला काय झालंय? जरा विश्रांती हवी होती आणि इथल्या डॉक्‍टरांची प्रकृतीही खूप बिघडली होती. त्यांना योग्य ट्रीटमेंटची गरज होती. म्हणून त्यांनीच मला बोलावून घेतलंय.''
""तसं वाटलंच होतं मला...पण हे मीडियावाले...''
""मीडियावाल्यांचं काय घेऊन बसलात हो? आता तुमच्यासारख्या सज्जन, सत्शील खानदानावरही ते शिंतोडे उडवतात. पैसे खाल्ल्याचे आरोप करतात.''
""हे बाकी खरं बोललात. सच्चाईचा जमानाच राहिला नाही हो! पूर्वी हां-जी हां-जी करणारेसुद्धा सत्ता गेल्यावर हल्ली मला "टू-जी' "टू-जी' म्हणून चिडवतात!''
""तुम्ही मीडियावाल्यांकडे लक्ष देऊ नका. बोला, कशासाठी फोन केलात.''
""सहज. तुम्हाला आराम करण्याचा सल्ला द्यायचा होता. सध्या तुम्हालाही विश्रांतीची गरज आहे आणि मलाही सक्तीची विश्रांती मिळालेय.''
""खरंय कलैग्नार. किती केलंत तुम्ही राज्यासाठी, देशासाठी! ए. राजा, दयानिधी मारन, कनिमोळी...किती किती सच्चे राष्ट्रभक्त आणि सच्चे कार्यकर्ते निर्माण केलेत!''
""त्याचं मोल आहे कुणाला? आमच्याच पक्षातून फुटून स्वतःचं दुकान लावणाऱ्यांकडे आता सत्ता गेलेय ना!''
""मोल नसलं, तर नसू द्यात. तुमच्या "मॉल'ला एखाद्या दुकानानं काही फरक नाही पडत!''
""पण काळजी वाटते हो. माझे डोळे आता पैलतीराकडे लागलेले. राज्यातून सत्ता गेली. केंद्रात सोनियांशी कट्टी घेतलेली. एक मुलगी, एक मानलेला मुलगा तुरुंगात. नातवावरही कुणी "दया' दाखवत नाही. कसं निभावायचं यातून?''
""काळजी करू नका. मी आहे तुमच्या पाठीशी.''
""तुम्ही असं काल जयललितांनाही सांगितलंत!''
""हो...पण तुमच्याबद्दल मला जास्त आपुलकी आहे.''
""ती का?''
""आपल्यात अनेक गोष्टी कॉमन आहेत...आपण दोघेही गॉगल वापरतो. आपण दोघेही "चमत्कार' घडवू शकतो.''
""हो...पण मी तुमच्यासारखा गॉगल हवेत फेकून डोळ्यावर झेलू शकत नाही..आणि आता चमत्कार करायची ताकदही राहिली नाही!''
""होईल हो...सगळं सुरळित होईल.''
""कसलं काय सुरळित होतंय? सोनियाजींना एवढी पत्रं लिहिली...सगळ्यांची "सुरळी' करून कचऱ्यात फेकून दिली त्यांनी! आता तुम्हीच काहितरी चमत्कार घडवा. फार आशा आहेत तुमच्याकडून...''
""काय चमत्कार घडवायचाय? तुमचं गेलेलं राज्य परत मिळवून देऊ? की केंद्रातलं तुमचं वजन वाढवू?''
""मला राज्य नको...की सत्ता नको...फक्त एकच करा. तेवढं माझ्या मुलीला तुरुंगातून सोडवा हो!''
""सोडवलं असतं, पण एक अडचण आहे. तिहार तुरुंगाची भिंत लाथ मारून पाडावी लागेल. किंवा गळ्यातल्या चेनच्या लोहचुंबकानं तुरुंगाचं मुख्य दार खेचून घ्यावं लागेल. त्यासाठी भारतात येणं आवश्‍यक आहे. आणि इथल्या डॉक्‍टरांवरची ट्रीटमेंट सोडून मी सध्या तरी तिथे येऊ शकत नाही. डॉक्‍टर बरे होईपर्यंत थोडं थांबा!''
करुणानिधींनी कपाळावर हात मारून घेतला आणि पुन्हा विलापात बुडून गेले...
 

Jun 15, 2011

विहीर

परसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या मागच्या अंगणाला लागूनच विहीर होती. आजही आहे. माझ्या बालपणी पंप, नळ वगैरे आधुनिक सेवांचा आम्हाला गंधही नव्हता. रोज विहिरीवरून पाणी भरायला लागायचं. अंगणातल्या माडांना आणि फुलझाडांना विहिरीचंच पाणी काढून घालावं लागायचं. आजोबा या कामात एकदम पुढे असायचे. आम्हाला कळायला आणि झेपायला लागल्यापासून आम्हीही मग त्यांना मदत करायचो.
मला आठवतंय, तेव्हापासून विहिरीचं पाणी काढायला दोन रहाट होते. त्याआधी त्यांच्या मध्ये एक तिसरा रहाटही होता, अशी आख्यायिका ऐकायला मिळायची. सध्या जिवंत असलेल्या दोन रहाटांपैकी उजवीकडचा जरा डेंजर होता. लोखंडीच असावा, पण जरा पातळसर आणि हलका होता. त्यावर पाणी भरायला जास्त सोपं जातं, असं आजोबा म्हणायचे. आम्हाला मात्र लहानपणी त्याची भीती वाटायची. तो जास्तच हलका होता, त्यामुळे कळशी बांधून खाली सोडताना एकदम गपकन पाण्यात पडायची. रहाट आणि विहिरीचा कठडा यांच्यातील अंतरही थोडं जास्त होतं. त्यामुळे सवय नसेल, तर कळशी खेचून वर काठावर घेणं आणि पुन्हा खाली सोडणं अवघड जायचं.
त्या मानानं दुसरा रहाट अगदीच मध्यमवर्गीय होता. सोपा, साधा आणि सरळ. जरासा जाडसर आणि गुळगुळीत होता. आम्हा मुलांना तो बरा वाटायचा. रहाटाचं टोक डोळ्याला लागण्याचा धोकाही तिथे नव्हता. आम्ही बरेचदा तोच वापरायचो.
आजोबा प्रत्येक माडाला चार, अशा साधारणपणे पंचवीस ते तीस कळशा आणि घागरी दिवसातून दोनदा उपसायचे. आम्ही मदतीला असलो, की त्यांचं काम हलकं व्हायचं. पण त्यांनी स्वतःहून आम्हाला कधी मदतीला बोलावलं नाही. आम्ही नसलो किंवा खेळात दंग असलो तर तरी त्यांचा पाणी घालण्याचा शिरस्ता काही मोडायचा नाही. पुढच्या अंगणासमोर नंतर आमच्या आवाराच्या मालकांनी कपडे धुवायला पाथरी घालून दिल्या. तिथेही आजोबा त्यांचे कपडे, चादरी, अंथरुणं धुण्याचा आनंद घ्यायचे. त्यासाठीचे पाणीसुद्धा ते विहिरीवरूनच आणायचे.
आमच्या संपूर्ण आवारात ही विहीर सामायिक होती. आवाराचे मालक वेगळे असले, तरी आमचं घर तेवढं स्वतःच्या मालकीचं होतं. पण आम्हाला ही विहीर वापरण्याची मुभा होती, आहे. तेव्हा नगरपालिकेचे नळ फोफावले नव्हते. आसपासच्या घरांतली, अगदी लांबलांबची माणसं या विहिरीवर पाणी भरायला यायची. बायका आमच्या घरासमोरच्या पाथरीवर कपडे धुवायच्या. सकाळच्या वेळेतली ही लगबग बघताना वेळ छान जायचा. आवारातल्या एका घरातले वयस्कर भाऊ, धुणी भांडी करणा-या कमल-शेवंती आणि इतर काही लोक यांचा विहिरीवर दिवसभर राबता असायचा. कुणा एकाची दोरी रहाटाला लावलेली असायची. दिवसभर सगळ्यांच्या ती उपयोगाला यायची. एखादी प्लॅस्टिकची कळशीदेखील असायची. ती सोयीची असेल, तर लोक तिचाच वापर करायचे. नाहीतर स्वतःची कळशी लावली जायची.
पाणी काढण्याची प्रत्येकाची निरनिराळी त-हा होती. काही जण कळशी सोडताना ती रहाटाला लावून मग गडगड करून एकदम विहिरीत सोडायचे. भाऊ त्यात अगदी पटाईत. पन्नाशीच्या घरातले असले, तरी त्यांचा पाणी काढण्याचा उत्साह आणि क्षमता दाडगी होती. ते रहाट एवढ्या वेगाने सोडायचे, की तो डोळ्याला लागेल की काय, अशी भीती वाटायची. काढतानाही अगदी ढंगात ती कळशी वर घ्यायचे.
मलाही पाणी काढायला खूप आवडायचं. पण पाणी काढताना त्यात खेळच जास्त व्हायचा. कळशी बुडवताना होणारा आवाज ऐकून मजा यायची. ती पूर्ण भरली, की विहिरीच्या अगदी तळापर्यंत किंवा दोरी संपेपर्यंत सोडायची. मग पाण्याच्या आत असेपर्यंत ती हलकी वाटायची. पाण्याच्या वर आल्यावर मात्र जड व्हायची. मोठ्या रहाटावर पाणी काढायला मला लहानपणी कठीण जायचं. आमचा मुक्काम कायम दुस-या रहाटावर.
कधीकधी पाणी काढताना कळशीचा फास सुटून ती विहिरीच्या तळाशी जायची. मग तळाशी सूर मारून काढणारे एक-दोघे जण होते. आमची विहीर जेमतेम सात-आठ पुरुष खोल. त्यामुळे वरून विहिरीचा तळ सहज दिसायचा. कळशी कुठे पडलेय, ते दिसू शकायचं. आम्ही अगदी लहान असतानाच पाण्यात सूर मारून कळशी काढणारे होते. कधीकधी घळ सोडून कळशी वर काढली जायची. घळ म्हणजे लोखंडी आकडे असायचे. त्याला दोर लावून खाली सोडले जायचे. एखादा आकडा कळशीच्या काठात अडकायचा आणि कळशी वर निघायची.
आवारात राहणारे एक कुटुंब त्यांचा गणपतीही विहिरीत सोडायचे. पण नंतर ही पद्धत बंद झाली. आमच्या विहिरीत पोहण्याचे किंवा विहिरीच्या काठाला लागूनच कपडे धुण्याचे प्रकार नव्हते.
विहिरीत पाण्याचे दोन-तीन मोठे झरे होते. एक तर पाण्याच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळच होता. आमचे आवार म्हणजे पूर्वीचे शेतच असल्याने विहिरीला पाणी भरपूर. पावसाळ्यात तर हाताने पाणी काढता यायचं. विहीर कोरडी झालेली मी एखाद वेळीच बघितली असेल. एकदा गाळ साफ करण्यासाठी पाणी उपसलं होतं, तेव्हाच.
हळूहळू काळ बदलला आणि घरोघरी मुन्सिपाल्टीचे नळ आले. विहिरीच्या पाण्याची गरज कमी होऊ लागली. आम्हीसुद्धा पंप घेतला. दारात नळाचं पाणी येऊ लागल्यावर विहिरीवरची वर्दळ कमी झाली. आता तर विहिरीवर जाळी घातलेय आणि एखादंच कुणीतरी कधीतरी पाणी उपसतं. पाण्यावर हिरवळीचे थरही बघायला मिळतात. आता विहीर बरीचशी एकाकीच असते...बालपणीच्या अनेक आठवणींसारखी...

May 4, 2011

मायेची सावली

लहानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्याचं एक विशेष आकर्षण असायचं. आंब्या-फणसाचा यथेच्छ आस्वाद, नदीतली आंघोळ, मनसोक्त भटकंती आणि आजीचं प्रेम!
आमच्या लहानपणी सुटीत कुलू-मनाली, नैनिताल-दार्जिलिंग, गीर-कान्हा, गेला बाजार महाबळेश्‍वर, असं कुठे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. किंबहुना, तसा विचारही कधी मनात यायचा नाही. पर्यटन म्हणजे लग्ना-मुंजीच्या निमित्तानं मुंबई-पुणे किंवा कोल्हापूरला केलेला दौरा. येता-जाता कुणाची गाडी असेल किंवा अगदीच सोयीचं असेल, तर एखाद्या ठिकाणाचं दर्शन. किंवा आईवडिलांबरोबर भावासाठी नवससायास करण्यासाठी केलेली गाणगापूर, त्र्यंबकेश्‍वर किंवा नृसिंहवाडी वगैरे ठिकाणांची वारी. बास! आमच्या लहानपणीचं पर्यटन हे एवढंच.
आजोळी जायला मात्र बंदी नव्हती. सुटी लागली, की कधी एकदा आजोळी जातो असं होऊन जायचं. माझं आजोळ म्हणजे शिपोशी. रत्नागिरीपासून अगदी 48 किलोमीटर म्हणजे दीड तासाचा एश्‍टीचा प्रवास. संध्याकाळची चारची गाडी पावणेपाचला सुटायची आणि साडेसहापर्यंत वाकड्या फणसावर पोचायची. शिपोशी गावाच्या स्टॉपला "वाकडा फणस' असं नाव आहे. तिथे पूर्वी एक वाकडं झालेलं फणसाचं झाड होतं म्हणे. त्यावरून त्या स्टॉपला नाव पडलं, वाकडा फणस. शिपोशी गावाचे तीन-चार स्टॉप आहेत, त्यामुळं नेमका स्टॉप करण्यासाठी हेच नाव प्रचलित झालं. या वाकड्या फणसावरून चालत घरी जायला वीसेक मिनिटांचं अंतर. छोट्याशा टेकाडावरून वाट काढत जायला मजा यायची. संध्याकाळी गुरं घराकडे परतीच्या मार्गाला लागलेली असायची, माणसं शेतातून घरी निघालेली असायची. आजोळाच्या ओढीनं झपाझप पावलं पडायची.
नदीच्या पायऱ्या उतरू लागलो, की समोरच्या मामाच्या घरची मंडळी नेमकं कोण आलंय, याचा अंदाज घेऊ लागायची. तेव्हा शिपोशीत काय, रत्नागिरीत पण आमच्या घरी फोन नव्हता. आजोळी जायचं म्हणजे जायच्या आदल्या दिवशी फोन, निघाल्यावर फोन, बसमध्ये बसल्यावर फोन, उतरायच्या आधी फोन, असे काही प्रकार नव्हते. मी आजोळाच्या अंगणात जाऊन उभा राहिलो, की हा मुक्कामाला आलाय, हे त्यांना समजायचं. घरी गेल्यावर आजी गूळ आणि पाण्याचा तांब्या देऊन स्वागत करायची. रात्रीची जेवणं लवकर म्हणजे आठच्या दरम्यानच व्हायची. आजीनं चुलीवर एका मोठ्या तपेल्यात मस्त भात शिजवलेला असायचा. त्याच्या वासानंच कधी एकदा जेवतोय असं झालेलं असायचं. केळीच्या पानावर मावेल एवढा भात आणि घरचा कढीपत्ता घातलेली आमटी, जोडीला सुकांबाचं लोणचं, असा बेत असायचा. पोळी वगैरे पक्वान्नाचा बेत क्वचितच असायचा. त्यामुळं पहिला भात झाल्यावर पुन्हा भात ओरपायचा!
सकाळी आम्ही निवातं आठ साडेआठपर्यंत उठायचो. आजी सकाळी पाच वाजताच उठून कामाला लागलेली असायची. आंब्याचे दिवस असले, की तिची धावपळ काही विचारूच नका! सकाळी उठून रस आटवा, साटं घाला, फणस तयार असेल तर त्याचा रस काढून सांदणं करा, कधी घावने-पातोळे करा, असे तिचे उद्योग सुरू असायचे. आम्ही तोंड वगैरे धुवून चहा घेऊन तरतरीत होईपर्यंत ती गरमागरम नाश्‍ता खाण्यासाठी हाक मारायची. नाश्‍त्यालाही तिनं मोठ्या पातेल्यात गरम मऊ भात केलेला असायचा. कधी रात्रीच्या उरलेल्या भाताला फोडणी घातलेली असायची. नाहीतर कधी फणसावरच भागवलं जायचं. फणसाची उस्तवारी मात्र मामाकडे असायची.
दुपारी साडेबारापर्यंत आजीची सांदणं, आमटीभात, वगैरे स्वयंपाक तयार असायचाच, पण मधल्या काळात ती रस काढून ठेवायची, रस आटवून त्याची साटं घालायची, आधीची साटं परतून कडकडीत उन्हात वाळत घालायची. कधीकधी पापड-फेण्यांचा घाट असेल, तर तेही मधल्या काळात फटाफट उरकायची. आजीला कधी फार दमलेलं आम्ही बघितलं नाही. बघावं तेव्हा पाठीत वाकून तिची स्वयंपाकघरात काहितरी खुडबूड सुरू असायची. मध्येच "हाया..' म्हणून दोन मिनिटं पाठ सरळ करून विश्रांती घ्यायची, की पुन्हा कामाला जुंपून घ्यायला तयार!
दुपारी मात्र थोडा वेळ आजी आराम करायची. शिपोशीच्या जुन्या घरात स्वयंपाकघर आणि माजघराच्या मध्ये तिची खाट होती. त्यावर ती आराम करायची. दुपारी झोपणं ही तेव्हा आम्हाला शिक्षा वाटायची. मग आम्ही गोठ्यात नाहीतर आंब्याखाली जाऊन पत्ते खेळत बसायचो. कधी आंबे गोळा करण्याची स्पर्धा लावायतो, तर कधी नुसत्याच भेंड्या रंगायच्या. चारला पुन्हा चहासाठी आजीची हाक यायची. संध्याकाळी मात्र आजीकडे काही खायला मिळत नसे. मग त्या वेळेत आम्ही डोंगरावरच्या भागात (वाड्याकडे) करवंदं ओरपायला उधळायचो. नाहीतर हिरेजी नावाच्या भागात जांभळं शोधायला पळायचो. नाहीतर नदीच्या पलीकडे काळ्या वाळूत खेळत बसायचो.
रात्री अंधार झाल्यावर आजोळीच्या शिरस्त्याप्रमाणे शुभंकरोती वगैरे म्हणावी लागायची. मग थोडा वेळ टाइमपास झाला, की आठ वाजता पुन्हा जेवणं तयारी असायची!
कार्तिक महिन्यातल्या उत्सवाचा काळ असला, की जेवणं लवकर करून देवळात कार्यक्रमांसाठी जावं लागत असे. आजी तिची तब्येत सांभाळून रात्रीची कीर्तनं आणि भोवत्या पाहायला येत असे. अलिकडे मात्र तिला फार जागरण झेपत नव्हतं. मग ती घरीच थांबे. कीर्तन ऐकताना आम्ही कीर्तनकार बुवांच्या पुढ्यात बसून पेंगत असू आणि ती देवळाच्या मागच्या बाजूला पेंगत बसे. कधीकधी तिथेच डुलकीही काढत असे. पहाटे तीन-चारला कधीतरी आम्ही घरी यायचो, तेव्हा तीदेखील आमच्यासोबत येई. कधीकधी एकटी किंवा मामाबरोबर पुढे निघून येई. जागरणामुळं आम्ही दुपारी बारा-एकला उठत असू, पण तिची मात्र सकाळी पाचला उठून लढाई सुरू झालेली असे!
शिपोशीला दोन खोल्या भरून आंबे काढून ठेवलेले असत. "मनसोक्त खा रे पोरांनो,' अशा सूचना ती दिवसातून किमान चार वेळा देत असे. मध्येच स्वतः खोलीत गेली, तर दोन चांगले अस्सल पायरी किंवा हापूसचे आंबे आणून हातात देत असे. ठेचलेल्या, पडलेल्या आंब्यांचे काप काढून ती ताटं आमच्यासमोर आणून ठेवत असे. आंब्याचे तर एवढे पदार्थ तिला येत, की त्यांच्या रेसिपी ती कशी लक्षात ठेवते आणि एवढं करते तरी कधी, असा प्रश्‍न पडावा. मुरांबा, गुळांबा, साखरांबा, कोयाडं, तक्कू, रायतं, उकडांबा, मोरावळा, आंब्याचं साट, फणसाचं साट, सांदणं, दशम्या, सुकवलेले गरे, सुकवलेल्या आंब्याच्या फोडी, सुकांबाचं लोणचं. मोहरीचं लोणचं, कैरीचं पन्हं...सत्राशे साठ प्रकार. शिवाय एवढं करून आणि तिथे खायला घालून तिचं समाधान होत नसे. आम्ही शिपोशीहून निघताना सोबत कायकाय प्रकार बांधून देई. घरात जास्त चर्चा नको, म्हणून हळूच डब्यातून दोन-चार साटं काढून आमच्या पिशवीत भरून ठेवी. वर कुणाला सांगू नको, असा हलका दम असे.
आजीनं आम्हाला श्‍लोक, परवचा वगैरे कधी शिकवल्याचं आठवत नाही. ती शाळेतही गेली नव्हती बहुधा. आजोबा खूप लवकर गेले. त्यामुळं आम्ही त्यांना बघितलेलंही नाही. आजी मात्र कधी उदास, निराश दिसली नाही. आजीनं आम्हाला रात्री कधी गोष्टीही सांगितल्या नाहीत. तो तिचा प्रांत नव्हता. पण स्वयंपाक आणि घराचं व्यवस्थापन, यात तिचा हात कुणी धरू शकत नव्हतं. मामाकडे गुरं असताना अध्येमध्ये दूध काढण्याचं आणि वैरण टाकण्याचं कामही ती करायची.
गेल्या वर्षी गणपतीत गाडी घेऊन रत्नागिरीहून पुण्याला येताना शिपोशीला काही वेळ गेलो होतो. त्या वेळी हातात डिजिटल कॅमेरा होता म्हणून आजीचं शूटिंग केलं, फोटो काढला. तिला ते लगेच पाहायला दिल्यावर तिला फार अप्रूप वाटलं होतं. दोन महिन्यांपूर्वी सहज फोन केला, तेव्हा तिच्याशी बोलणंही झालं होतं. त्यानंतर काही दिवसांतच ती आजारी पडली. गेल्या महिन्यात तातडीनं तिला भेटून आलो. जागेवर होती, पण चांगली शुद्धीत होती. घावने पातोळे करून घालणारेस ना, अशी तिची चेष्टाही आम्ही केली. पण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, हे स्पष्ट दिसत होतं. या आजारातून ती वर येणं अवघड होतं. तिला अशा प्रकारे झोपून राहिलेलं आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. कंबर दुखत असताना पाठीला पट्टा लावून, ढोपरं दुखली की ढोपराला चिंध्या बांधून आणि डोक्‍यावर पट्ट्या ठेवून ती कामं करत राहायची. निवांत बसणं तिच्या रक्तातच नव्हतं. शेवटच्या आजारपणातही नैसर्गिक विधीसाठी ती जोर करून उठायची. स्वतः जाऊन यायची. "तुम्ही सगळी आलात, नि मी इथे अंथरूणावर पडलेय,' अशी खंत तिनं बोलून दाखवली, तेव्हा हसावं की रडावं कळत नव्हतं.
आजीचं वय झालं होतं. आणखी कष्ट उपसण्याची ताकद तिच्यात उरली नव्हती. तिचा आयुष्यातला शेर संपला होता. जन्माला आलेला माणूस कधीतरी जाणार, हेही स्पष्टच होतं. तरीही आम्हाला ती हवी होती. आजोळी गेल्यावर गोडधोड खाऊ घालण्यासाठी, भरपूर माया करण्यासाठी, "आजी' नावाचं रसायन काय असतं, हे आमच्या मुलांना, नातवंडांना दाखवण्यासाठी! आता कुठे बघायला मिळणार त्यांना आणि आम्हालाही अशी "आजी'? संग्रहालयात तरी मिळेल?

Apr 24, 2011

राडा ...? छे, छे.. संशयकल्लोळ!

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या काही कलाकारांना पुण्यात धुंद अवस्थेत "मोकळ्या' वातावरणात फिरताना पोलिसांनी पकडलं. त्यांच्याबद्दल पेपरात भरपूर बदनामीकारक बातम्या छापून आल्या. खरंतर चांगल्या घरातल्या, सालस, सज्जन अशा या कलाकारांनी काहीच केलं नव्हतं. त्यांच्या जराशा मोकळेपणाच्या वागण्यानं त्यांच्यावर निष्कारण बालंट आलं होतं, हे त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पालकांनीही केलेल्या खुलाशांवरून स्पष्ट झालं. प्रत्यक्षात या "ऐतिहासिक' घटनेचे साक्षीदार होण्याचं भाग्य अनेकांच्या नशिबी नव्हतं, पण या कलाकारांचं पाऊल वाकडं पडल्याच्या अफवा कशावरून उठल्या असाव्यात आणि प्रत्यक्षात काय घडलं असावं, याविषयीचे काही अंदाज...

'ग्लोबल वॉर्मिंग'वरचा एक मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या ज्वलंत समस्येकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे कलाकार रस्त्यावर उतरले होते. तेदेखील त्या चित्रपटाशी थेट संबंध नसताना, केवळ सामाजिक प्रश्‍नाबद्दलची कळकळ म्हणून! आता "ग्लोबल वॉर्मिंग'चा म्हणजे थोडक्‍यात "जागतिक उकाड्या'चा प्रश्‍न मांडण्यासाठी "रिऍलिस्टिक लुक' द्यावा, म्हणून या घटनेतील काही तारकांनी त्या रात्री तसेच कपडे घातले होते, (किंवा घातले नव्हते!) एवढंच.

सौरभ गांगुलीनं भर स्टेडियममध्ये शर्ट काढून फिरवला, तरी त्याच्या कारकिर्दीत त्याला भारताला वर्ल्ड कप जिंकून देता आला नाही. ते स्वप्न धोनीच्या शिलेदारांनी पूर्ण केलं, तर "सार्वजनिक वस्त्रत्याग' करण्याचं व्रत बॉलिवूडच्या एका मॉडेल-कम-अभिनेत्रीनं (म्हणजे जी अभिनेत्री "कमी' आणि मॉडेल जास्त असते ती!) जाहीर केलं होतं. (त्यामुळंच भारतीय खेळाडू जास्त हिरिरीनं खेळले, असंही म्हणतात!) काही नतद्रष्ट संस्कृतिरक्षकांनी तिला ते प्रत्यक्षात आणू दिलं नाही. आपल्या वचनपूर्तीचं ठिकाण तिने पॅरिसला हलविण्याचं जाहीर केलं, त्यामुळे निदान लाइव्ह कव्हरेज पाहता येईल, या आशेनं अनेक जण टीव्हीला डोळे लावून बसले होते. तो सोहळाही रहित झाला. तिची हुकलेली संधी अल्प प्रमाणात का होईना, आपण पूर्ण करावी, अशी या मराठी तारकांची इच्छा होती. पण हाय रे कर्मा! तिथेही (रसिकांचं) कमनशीब आडवं आलं!

या घटनेतील काही कलाकारांनी "राडा' अशा काहीतरी नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटाच्या नावावरून त्यांना जे अपेक्षित होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावर साकारता न आल्याची त्यांना खंत होती. ती त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर चित्रपटाचं नाव सार्थ करून भरून काढली!

"तुला धड मराठी बोलता येत नाही!', "कसले कपडे घालतात आजकालच्या मराठी नट्या', "पार लाज सोडली हो हल्लीच्या पोरींनी,' असे जाहीर टोमणे एका आघाडीच्या मराठी अभिनेत्रीला ऐकावे लागत होते. त्याचा अभिनव निषेध करण्यासाठी तिला याहून अभिनव आंदोलन सुचलं नाही.

पोलिस आयुक्तपदी महिला अधिकारी असतानाही पुण्यात महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे, याकडे पोलिसांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचा हा उपक्रम होता. त्याअंतर्गत नियोजनानुसार फरसाण-शेव पार्टी करून ते फिरायला बाहेर पडले होते. त्यांच्या बोलण्यावरून कुणीतरी "शेव पार्टी'च्या ऐवजी "रेव्ह पार्टी' असं ऐकलं आणि निष्कारण पोलिसांना फोन केला. दरम्यान, या कलाकारांना कुणीतरी टारगट तरुण छेडत होते, म्हणून त्यांनीही पोलिसांना कळवलं. पोलिसांची "एन्ट्री' आणि पुढे मिळालेली "प्रसिद्धी' हा मात्र त्यांच्या नियोजनाचा भाग नव्हता.

सर्वसामान्य लोक रात्री-अपरात्री "धुंद' झाल्यावर जसे वागतात, त्याहून आपण काही वेगळं केलं नव्हतं, तरीही कलाकार असल्याने आपल्याविरुद्ध मोठी आवई उठली, अशी भावना या कलाकारांच्या मनात आहे. कलाकार म्हणून (निदान अशा प्रसंगी) वेगळी वागणूक देण्यास बंदी घालावी, यासाठी ते आता जनहित याचिका दाखल करणार असल्याचे समजते!

Apr 6, 2011

अनुयायांची पंच्याहत्तरी!...

"मोठेपणी तू कोण होणार बाळा,' असं प्रत्येक (अवलक्षणी) कार्ट्याला त्याला दहावीत पास होणार की नाही, हे माहीत नसण्याच्या वयात विचारलं जात असतं. मग त्यानं अलिकडच्या काळात बघितलेल्या सिनेमामधल्या प्रमुख नायकानं जे पात्र रंगवलं असेल, तेच आदर्श मानून तो ठोकून देतो - डॉक्‍टर होणार, वकील होणार, क्रिकेटपटू होणार! मला अगदी लहानपणी सिनेमानट होण्याची आणि जरा नंतरच्या काळात राजकीय पुढारी होण्याची स्वप्नं पडायची. पण नट होण्यासाठी किमान अभिनयाची पातळी आणि पुढारी होण्यासाठी किमान अनुयायांची संख्या असावी लागते, हे माझ्या गावी नव्हतं. त्या वेळीही मला कुत्रं विचारत नव्हतं आणि आताही परिस्थिती फारशी बदललेली आहे, असं मला वाटत नाही. तर सांगायचं काय, त्या वेळच्या या दोन्हीही महत्त्वाकांक्षा काळाबरोबर पुसट होत गेल्या. सिनेमातला नाही, गेला बाजार हौशी रंगभूमीवरचा एखादा नवशा-गवशा नट होण्याची धुगधुगी अजूनही मनात आहे, पण आपल्याला कुणी अनुयायी मिळतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अर्थात, "ब्लॉग' नावाचं हुकमी हत्यार त्या वेळी मला सापडायचं होतं!
ऑफिसातल्या एक-दोन सहकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन ब्लॉग सुरू केला, तेव्हा त्यावर काय लिहायचं, हा प्रश्‍न मलाही भेडसावत होता. ब्लॉगवर लिहिण्यासारखं बरंच काही असतं आणि ते पेपरमध्ये किंवा अन्यत्र लिहिता येत नाही, ही कल्पना मला त्या वेळी यायची होती. बरं, तसं बघायला गेलं, तर ही खासगी डायरी असली, तरी सगळ्यांना वाचायला देण्याजोगीच होती. म्हटलं तर मुक्त चिंतन, म्हटलं तर शेअरिंग, म्हटलं तर दुसऱ्यांचे विचार, भावना जाणून घेण्याचं व्यासपीठ, असं सबकुछ या ब्लॉगमध्ये होतं. मला त्याचा उलगडा खूप उशिरा झाला.
नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचं कारण असं, की मला ब्लॉगवर आता काय लिहायचं, असा प्रश्‍न पडण्याचं बंद होऊन युगं लोटली. "अरे, इथे लिहिण्यासारखं बरंच आहे की!' हे लगेचच कळलं आणि नंतर तर ब्लॉग लिहायला विषय आहे, पण वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. ब्लॉगवर प्रतिक्रियाही भरपूर येत गेल्या आणि त्यातून नवं लिखाण करण्याचा हुरूप वाढला. विशेषतः मनस्वीच्या जडणघडणीच्या टप्प्यातल्या गमतीजमती लिहिताना मजा आली. निमिषला घरी आणण्याची प्रक्रिया, त्याविषयीचे आमचे विचार (डोंबल!) हे लिहितानाही आनंद वाटला. त्यावर प्रतिक्रियाही उत्साहवर्धक होत्या.
ब्लॉगवर नवी पोस्ट कधी टाकणार, अशी विचारणा वाचकांकडून होऊ लागली आणि आपलं लिखाण लोकांना आवडतंय, याची खात्री झाली. एकेक "फॉलोअर' मिळत गेले आणि त्यातूनही लिहिण्याची ऊर्मी वाढली. गेल्याच महिन्यात या फॉलोअर्सची संख्या 74 झाली. त्यानंतर पंच्याहत्तरीचा टप्पा गाठायला बराच काळ जावा लागला. अखेर गेल्या आठवड्यात तोही टप्पा पार झाला. आता माझे स्वतःचे नाहीत, निदान माझ्या ब्लॉगचे 75 अनुयायी आहेत, असं मी अभिमानानं सांगू शकतो!
 

Mar 25, 2011

गेले यायचे राहुनी...

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या काळात तीन-एक आठवडे सिनेमा थिएटर ओस पडली होती. प्रेक्षक टीव्हीसमोरच ठिय्या देऊन बसतील आणि थिएटरकडे फिरकणारही नाहीत, असा कयास बांधून निर्मात्यांनी मोठे चित्रपट लावायचे टाळले; पण जरा डोकं चालवलं असतं, तर चालू घडामोडींवरचे वेगवेगळे आणि आकर्षक चित्रपट आले असते आणि सहज "ब्लॉकबस्टर' ठरले असते. एक झलक...
...
फस गये रे ओबामा!
प्रमुख भूमिका ः बराक ओबामा, मुअम्मर गडाफी, होस्नी मुबारक, सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन आणि पाहुणे कलाकार म्हणून याच जातकुळीतले अनंत हुकूमशहा.

अमेरिकेने गल्लोगल्ली, गावोगावी, शहरोशहरी आणि देशोदेशी पोसलेल्या हुकूमशहांच्या इतिहासापासून कथा सुरू होते. मग हेच हुकूमशहा भस्मासूर बनून अमेरिकेवर कसे उलटतात, मग अमेरिकेचे हितशत्रू अमेरिकेला कसे उलटे करतात आणि आपणच त्यांना हुसकावल्याचा उलटा कांगावा करण्याची वेळ अमेरिकेवर कशी येते, अशा घटनांमधून ही कथा रंगत जाते. इजिप्तच्या ताज्या संदर्भामुळे ही कथा अधिक जिवंत आणि वास्तववादी ठरू शकेल. लीबियाचे हुकूमशहा गडाफी आधी घाबरल्याचं नाटक करून नंतर अमेरिकेलाच तोंडघशी पाडतात आणि ओबामांना इतर देशांना भरीला घालून हल्ले सुरू करण्याची वेळ येते, या टप्प्यावर शेवट होतो.
...
(फिर) तेरे बिन लादेन...
प्रमुख भूमिका ः ओसामा, ओबामा, जॉर्ज बुश.
चित्रपटाची पार्श्‍वभूमी "फस गये रे...'सारखीच. फक्त अफगाणिस्तानची पार्श्‍वभूमी हा "यूएसपी' ठरू शकेल. जॉर्ज बुश यांच्या बालपणापासून चित्रपट सुरू होतो. लहानगा जॉर्ज "लंडन लंडन'ऐवजी "लादेन लादेन', "रंग रंग कोणता'ऐवजी "लादेन लादेन कोणता', "खांब खांब खांबोळी'च्या ऐवजी "इराक-अफगाणिस्तान लांबोळी', असे खेळ खेळत असतो. लहानपणीच्या जॉर्जच्या भूमिकेत तेवढ्याच बालिशपणासह स्वतः जॉर्ज बुश बेमालूम अभिनय करतात. बुश आणि अमेरिका शेवटपर्यंत लादेनचा शोध घेत राहतात; पण तो त्यांच्या हाती लागत नाही. शेवटी "तेरे बिन लादेन'मध्ये लादेनची भूमिका करणारा कलाकारच त्यांच्या हाती लागतो, असा उत्कंठावर्धक क्‍लायमॅक्‍स. बुश यांची सद्दी संपल्यानंतर ओबामा पुन्हा लादेनच्या शोधावर निघतात, असं "कॅची' दृश्‍य दाखविल्यानं चित्रपटाच्या "सिक्वल'ची ("एक बार फिर' तेरे बिन लादेन) उत्कंठाही टिकून राहते.
...
सिंग इज किंग! (पार्ट 2)
प्रमुख भूमिका ः मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, लालकृष्ण अडवानी, सुषमा स्वराज.
एका दाट जंगलात बोधिवृक्षाखाली मनमोहनसिंग तपश्‍चर्या करीत बसले आहेत. समष्टीपासून दूर जाऊन मनःशांतीचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अचानक सोनिया गांधींचा फोन येतो. मनमोहनसिंगांना पंतप्रधान केल्याचं सांगितलं जातं. मनमोहनसिंग भगवे कपडे बदलून पांढरे कॉंग्रेसवादी कपडे परिधान करून विमानातून थेट राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर अवतीर्ण होतात. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर उभी केल्यासारखी त्यांची खुर्ची सतत डळमळीत राहते. अचानक तिची "डावी' बाजू कलते. मग "उजवी'कडून खुर्ची उलटविण्याचा जोरदार प्रयत्न होतो. तरीही ती स्थिर राहते. कुणीकुणी कुजके, मोडके टेकू आणून खुर्चीला लावतं. त्यामुळं खुर्ची डळमळीत राहते. त्यावर बसलेले मनमोहनसिंग मात्र निश्‍चल, निस्तब्ध, स्थितप्रज्ञ दिसतात. पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेऊन पुन्हा जागेवर येते, तरीही खुर्चीला काही होत नाही. मध्येच अवकाशातून अणुकरार, राष्ट्रकुल, "आदर्श', "विकिलिक्‍स' अशा वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचे वार होत राहतात. तरीही ते जागचे हलत नाहीत...
या चित्रपटाचा "यूएसपी' असा, की पाच वर्षांच्या काळात घडणारी कथा संथ, उत्कंठाहीन असली आणि नायक अगदीच "भारत भूषण' असला, तरी प्रेक्षक पुन्हा पाच वर्षांचा काळ बघण्यासाठी तिकीट काढून कौल देतात!
...
गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा

प्रमुख भूमिका ः विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, इत्यादी.
फिरत्या रंगमंचावर हा चित्रपट घडतो. प्रत्येक हिरो येऊन आपली भूमिका चांगल्या प्रकारे वठवण्याचा प्रयत्न करतो. मध्येच विंगेकडे बघत राहतो. प्रॉंप्टरच्या इशाऱ्याचा वेध घेत राहतो. "नेक्‍स्ट' असं करून ओरडल्याचा एका बाईचा आवाज पडद्यामागून ऐकू येतो. की लगेच स्क्रीनवर असलेला हिरो आपलं चंबूगबाळ आवरून प्रेक्षकांचा रामराम घेतो. गंमत म्हणजे, पडद्यावर असेपर्यंत अगदी "लार्जर दॅन लाइफ' असणारा हा हिरो त्याची भूमिका संपल्यानंतर अगदीच केविलवाणा दिसू लागतो. रंगमंचाच्या कोपऱ्यावर, आडोशाला उभे असलेले काही सहायक अभिनेते मध्येच विंगेत जाऊन ऑर्डर सोडणाऱ्या त्या बाईंना काहीबाही सांगताना दिसतात. हिरोच्या कपाळावर चिंतांचं जाळं पसरतं. तो विंगेकडे बघूनच "नेक्‍स्ट'ची आज्ञा कानी पडण्याची वाट बघत चंबूगबाळं आवरायला घेतो. पुढे काही घडणार, अशी उत्सुकता असतानाच "दी एन्ड'ची पाटी झळकते...

Mar 13, 2011

फुकट ते पौष्टिक?

"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...'
लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा.
"क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं. पण काहीही घ्यायचं नाही, असं आधीच ठरवलं होतं. अर्थात त्यांच्याच ऑफिसात त्यांच्या गळ घालण्याला बळी न पडता त्यांच्याकडून गिफ्ट व्हावचर घेऊन बाहेर पडण्यासाठी जरा जास्तच निगरगट्टपणा हवा होता. तेवढा आजच्या पुरता अंगी आणला होता.
प्रेझेंटेशन म्हणजे त्यांच्या योजनेचं आणि कंपनीचं दुकान लावण्याचा कार्यक्रम होता. पर्यटन किती वेळा करता, कधी करता, किती खर्च करता, कसं करायला आवडेल, परवडलं तर फाइव्ह स्टार हॉटेल आवडेल का वगैरे प्रश्‍न विचारून झाले. वरवरची अशी माहिती घेण्यात काहीतरी गौडबंगाल आहे, हे लक्षात येत होतंच. पण आमचा अंतिम निर्णय आधीच तयार असल्यानं फारशी चलबिचल होत नव्हती.
माहिती देणाऱ्या माणसानं चार-पाच कोऱ्या कागदांची चवड सोबत घेतली होती. त्यावर गिरबटावून तो आम्हाला कायकाय समजावून देत होता. अर्थातच तुम्हाला काय आवडतं आणि त्याचा स्टॅंडर्ड एवढ्याच पैशात वाढवून मिळाला, तर आवडेल का, हे विचारण्यावर भर होता. आमची बहुतांश उत्तरं सकारार्थीच होती. शेवटी दीडेक तासांनी त्यांनी मुद्द्याला हात घातला. "क्‍लब महिंद्रा'च्या मेंबरशिपची ती ऑफर होती.
या ऑफरमध्ये दोन प्रकार होते. एक स्पेशल ऑफर आणि दुसरी साधी ऑफर. साध्या ऑफरमध्ये ज्या दिवशी मेंबरशिप घेऊ, त्याच दिवशी दर वर्षी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी फिरायला जायची अट होती. ते ठिकाण देखील ते तीन दिवस आधी सांगणार. त्यात आपण प्रवास वगैरे सगळी व्यवस्था करायची. म्हणजे ही ऑफर फक्त दिखाऊच होती. कुणी घेऊ नये अशीच.
स्पेशल ऑफर आकर्षक होती. त्यात फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याची सोय दिवसाला हजार रुपये या दरानं करून देण्याचं प्रलोभन होतं. तिकीटांची व्यवस्था, आणायला-जायला टॅक्‍सी सेवा, तिथल्या आणखी सुखसोयी, अशी काय काय व्यवस्था होती. त्यासाठी सगळ्यात स्वस्ताची ऑफर अशी होती - दर महिन्याला 4085 रुपये चार वर्षं भरायचे. ही रक्कम साधारण दोन लाखांपर्यंत जाते. त्यांनी दाखविलेल्या एकूण भरायच्या रकमेत मात्र एक लाख 60 हजार दाखविले होते. शिवाय त्याच्या दहा टक्के म्हणजे 16 हजारांची रक्कम आजच्या आज, ताबडतोब भरायची होती. व्हिसा, मास्टर कार्ड चालणार होतं.! अर्थातच, याची कल्पना आम्हाला आधी देण्यात आली नव्हती. बहुधा मी पंधरा-वीस हजार रुपये शिशात घेऊन फिरणारा मालदार माणूस असावा, अशीच त्यांची अपेक्षा असावी. असो.
त्याशिवाय दर वेळी भारतात किंवा परदेशात पर्यटनाला जाताना "फक्त' 9 हजार भरायचे होते. म्हणजे या नऊ हजारांत सात दिवसांची हॉटेलची राहण्याची सोय होणार होती. साधारणपणे दिवसाला साडेनऊशे रुपयांत फाइव्ह स्टार हॉटेल! म्हणजे, असा त्यांचा दावा होता. त्याआधी भरलेल्या दोन लाखांचा हिशेब ते जमेत धरत नव्हते.
सगळ्यात महत्त्वाची मेख म्हणजे ही स्पेशल ऑफर त्या-त्या दिवसापुरतीच लागू होती! घरी जाऊन विचार करू, मग सांगू वगैरे काही नाही! आज, आत्ता, ताबडतोब!!
म्हणजे 16 हजार त्यांच्या ताब्यात द्यायचे, चार वर्षे दर महिन्याला 4 हजार रुपये भरायचे. शिवाय दर वेळी फिरायला जाऊ, तेव्हा 9 हजार भरायचे. राहण्याची व्यवस्था, इतर सवलती हे सगळं झकास होतं. मला खटकल्या त्या दोन गोष्टी. एक तर आजच्या आज 16 हजारांचं डाऊन पेमेंट करायची सक्ती आणि चार वर्षांसाठीचा ईएमआय. दोन लाख रुपये भरून 25 वर्षांसाठी ही योजना वापरता येणार होती. पण आपले पैसे अडकणार होते, एवढी रक्कम दर महिन्याला परवडणार नव्हती, हे तर होतंच. शिवाय आपण पुढे-मागे खपलो, तर काय? 25 वर्षं पर्यटन करू, असं कुणी बघितलंय? भले आपलं कार्ड ट्रान्सफर करण्याची किंवा विकण्याची सवलत असली, तरी त्यासाठीचं गिऱ्हाईक कोण शोधून देणार? शिवाय आपण आधीच पैसे भरून टाकलेले असताना त्याच्या घशात फुकटात हे कार्ड कशाला घालायचं?
असे बरेचसे प्रश्‍न मला पडले. शिवाय ताबडतोब निर्णय घेण्याच्या सक्तीबाबतही मनात शंकेची पाल चुकचुकली. वेळ आणि पैशांनुसार जमेल तेव्हा जमेल तिथे फिरायला जायची आपली पद्धत. यांच्यासाठी फाइव्ह स्टारमध्येच जाऊन राहा आणि त्यासाठी आधी पैसे भरा, हे उद्योग कुणी सांगितलेत? मला ताबडतोब 16 हजार वगैरे भरणं परवडणारं नव्हतं आणि दर महिन्याचा ईएमआयही. त्यातून त्यांची ही घाई म्हणजे लपवाछपवीचाच उद्योग वाटला. आम्ही त्यांना सप्रेम नकार देऊन आणि अर्थातच, फुकटातलं व्हावचर घेऊन बाहेर पडलो.
येऊन-जाऊन साडेतीन तास गेले होते. दुपारचे साडेतीन वाजल्यानं सहचारिणीनंही स्वयंपाकघरावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यामुळं हाटिलातच हादडावं लागलं. तिथे ते फ्री गिफ्ट व्हावचर पाहताना लक्षात आलं, की तीन दिवस दोन रात्री फुकटात राहण्याची ऑफर मिळवण्यासाठीदेखील सगळ्यात जवळचं ठिकाण कुर्ग (कर्नाटक) हे होतं. "सहा महिन्यांसाठी ही ऑफर व्हॅलिड आहे,' असं सांगणाऱ्यांनी त्याच्या मागे मात्र तीनच कालावधी नमूद केले होते. त्यातला एक 20 मार्चपर्यंतचा होता, जो अशक्‍य होता. दुसरा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातला आणि तिसरा असाच कुठलातरी. म्हणजे सहा महिन्यांत जाऊ शकता, ही ऑफरही फसवीच ठरली.
तुम्हाला कुणाला आलेय का अशी ऑफर? तुम्ही काय केलं त्या वेळी? की खरंच आहे काही त्यात तथ्य?
प्रतिक्रियांची वाट पाहतोय. या वेळी फक्त अनुभव लिहिण्याबरोबरच दुसऱ्यांचे अनुभव कळावेत, ही मनापासूनची इच्छा आहे....तेव्हा लिहा प्लीज!

Mar 7, 2011

शर्यत रे जिंकली!"कासव' हा काही उत्साहानं पाहायला जाण्याजोगा प्राणी नाही. मुलांनाही ससा आणि हत्ती-वाघाची जेवढी क्रेझ वाटते, तेवढी कासवाबद्दल वाटण्याची काहीच गरज नाही. एवीतेवी पडला हळू चालणारा, सगळ्यांच्या मागे असलेला आणि कुणाच्या अध्यात-मध्यात न येणारा प्राणी. पण वेळासच्या महोत्सवानं कासव ही सुद्धा पाहण्याची गोष्ट असते, हे सिद्ध केलं. आम्ही वेळासला गेलो, तर किनाऱ्यावर नुसती कासवाची पिल्लं पाहायला दीड-दोनशे पर्यटक मुंबई-पुणे, अन्य कुठल्या कुठल्या शहरांतून आले होते!
एका सहकाऱ्यानं ही टूम काढली होती. मलाही बऱ्याच दिवसांत कुठेतरी उलथायचं होतंच. त्यामुळं सहकुटुंब जायचं ठरवलं. मंडणगडला आधी कधी गेलो नव्हतो. दापोली पाहून झाली, पण मंडणगड तसं अनभिज्ञ होतं. ताम्हिणीमार्गे जायचं तर पाच तासांपासून आठ तास, असा कितीपण रस्ता कुणीही सांगत होतं. वेळास महोत्सवाच्या वेबसाईटवरून थोडीशी माहिती मिळाली होती, पण रस्ता शोधण्याला, चुकण्याला आणि डोकेफोड करण्याला काही पर्याय नव्हता.
तुलनेनं सकाळी पावणेआठला निघाल्यापासून रस्त्याबाबत तरी फारशी काही अडचण आली नाही. एकूण दोनशे किलोमीटरचा प्रवास होता. ताम्हिणीमार्गे माणगावात गेल्यानंतर तिथून वाट शोधत शोधत मंडणगडला पोचलो. तिथूनही वेळास 40 किलोमीटर होतं. दुपारी एकच्या सुमारास आम्ही वेळासमध्ये पोहोचलो. समुद्राच्या काठानं जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यानं वेळासमध्ये आम्ही पोहोचलो. जेमतेम दोन-अडीचशे उंबऱ्याचं गाव. छान नारळीपोफळीच्या बागांमधून जाणारा रस्ता. प्रकाश जोशी यांच्या घरी आम्ही आमच्या राहण्याची व्यवस्था सांगून ठेवली होती. वेळास हे छोटं गाव असल्यानं इथे राहण्याची सोय घरगुतीच आहे. जोशींचं घर अगदी जवळच होतं. तिथे पोहोचलो आणि अगदी कोकणी मातीचा आणि घराचा सुगंध आला. पुढे अंगण, मागे परसदार, पोफळीची बाग...असा मस्त कोकणी थाट होता. जोशींची आणि आमची साता जन्मांची ओळख असावी, अशा थाटात मुलं आणि त्यांच्या मागून आम्हीही त्यांच्या सगळ्या घरात बागडू लागलो. बाहेरचे पाहुणे म्हणून स्वतंत्र खोली वगैरे प्रकार नव्हता. माजघरात एकत्रित जेवण, कुठेही बसून गप्पा, असा सगळा घरगुती मामला होता.
दुपारी जरा वेळ परसातच पडी टाकून आम्ही संध्याकाळी कासवं बघायला समुद्राकडे लोटलो. समुद्र तसा दीडेक किलोमीटरवर होता. मुख्य म्हणजे थेट किनाऱ्यापर्यंत गाड्या जाऊ नयेत, अशीच व्यवस्था कासव महोत्सव आयोजित करणाऱ्या सह्याद्री निसर्ग मंडळानं करून ठेवली होती. बाहेरच्या रस्त्यावर गाड्या लावायच्या आणि आत शेतातून जवळपास तीनेकशे फूट चालत जायचं. जाताना वाटेत दोन काठ्यांची बेडी. (कुंपणं.) जेणेकरून दारूड्यांना धडपणे समुद्रावर तमाशे करण्यासाठी पोहोचताच येऊ नये. आम्ही गेलो, तेव्हा कासवांना बाहेर काढण्याची तयारी सुरू व्हायची होती. ऑलिव्ह रिडले जातीची कासवं या किनाऱ्यावर येऊन डिसेंबरपासून अंडी घालायला सुरुवात करतात. पूर्वी ही अंडी बहुतेकदा स्थानिकांच्या पोटात जायची. सह्याद्री मंडळाचे भाऊ काटदरे यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करून या कासवांना वाचविण्याची मोहीम हाती घेतली. सन 2002 पासून अव्याहतपणे हा उपक्रम सुरू आहे. आता स्थानिक लोकच या कासवांना वाचविण्यात आघाडीवर आहेत. ओरिसानंतर सर्वाधिक प्रमाणात या वेळास किनाऱ्यावरच ही कासवं येतात. अंडी घालून गेली, की पुन्हा या आया मुलांकडे परतत नाहीत. वाळूखाली दीड फुटांवर ही अंडी घातलेली असतात. स्थानिक रक्षक ही अंडी एका सुरक्षित ठिकाणी हलवतात. पुन्हा तेवढाच खड्डा करून, तशाच प्रकारे अंड्यांची रचना करावी लागते...तीदेखील सहा तासांत! पहाटेपासून ही मोहीम सुरू होते. किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी अंडी ठेवल्यानंतर 55 दिवसांनी पिल्लं वाळूतून वर येतात. कावळे-कोल्हे-कुत्र्यांपासून त्यांना वाचविण्यासाठीही हे कुंपण उपयोगी ठरतं. प्रत्येक घरट्याच्या (अंडी ठेवलेली जागा) वर टोपल्या असतात. पिल्लं वाळूतून वर येऊन या टोपलीखाली येऊन बसतात. सकाळी सात आणि संध्याकाळी सहा वाजता समुद्रापर्यंत त्यांची पाठवणी करण्याचा कार्यक्रम होतो
.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला टोपल्या उघडण्यात आल्या. आठ-दहा घरट्यांपैकी एकाच घरट्यातून सात पिल्लं बाहेर आलेली होती. कधीकधी एका वेळी 50 ते 100 पिल्लंही मिळू शकतात. आमचं नशीब एवढं थोर नव्हतं. पण आम्ही गेलो त्या दिवशी सकाळी आणि आदल्या दिवशीही एकही पिल्लू मिळालं नव्हतं. त्या मानानं आम्ही नशीबवान होतो.
एकेक पिल्लू टोपलीत घेऊन समुद्रापासून ठराविक अंतरावर त्याला वाळूत उतरवण्यात आलं. पिल्लं लगेच धडपडत समुद्राकडे धावत सुटली! लोकांच्या पायाखाली ती येऊ नयेत म्हणून कुंपणही घालण्यात आलं होतं. पाचेक मिनिटांतच ती समुद्राच्या लाटांवर स्वार झाली....आपापल्या आयुष्याची वाट शोधत!
एवढा दहा मिनिटांचा खेळ पाहण्यासाठी आम्ही चारशे किलोमीटरचा प्रवास, दोन दिवसांची सुटी, दगदग सगळं सहन केलं होतं. पण कासवांबरोबरच कोकणी गावातल्या आदरातिथ्यानंही सगळे श्रम वसूल झाले.
वेळासहून हरिहरेश्‍वरही अगदी जवळ आहे. जेटीतून कारसह पलीकडे जावं लागलं फक्त. तिथून दहा किलोमीटरवर हरिहरेश्‍वर होतं. तिथेही भेट देऊन संध्याकाळपर्यंत परत आलो. दीड दिवसांच्या या प्रवासानंतर मला संध्याकाळी पुन्हा ड्युटीवर जायचं होतं. कासवांना त्यांची वाट शोधायला समुद्राचा अफाट परीघ होता. आम्हाला मात्र पोटापाण्यासाठी नोकरीशिवाय (तूर्त) पर्याय नव्हता!
...
 

Feb 27, 2011

नायगावकर उवाच!

``काय सुंदर विडंबनं आहेत!
"हा माणूस स्टेजवर परफॉर्म करत असेल, तर नक्की स्टेज गाजवत असेल...''
 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कवितासंग्रहात मी दिलेल्या कविता वाचून साक्षात (महा)कवी अशोक नायगावकर यांनी माझ्या विडंबनांचा केलेला गौरव!

याच त्या कविता...

मी बुडताना गाव माझा
डोळे भरून पाहिला होता
"दिवाळी' साजरी करायला सारा गाव
किनाऱ्यावर उभा राहिला होता
---------
बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो,
कारण त्या वेळी वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो
----
पावसाची सर चुकून
त्या दिवशी घरातच पडली
आणि त्यानिमित्ताने मला
बऱ्याच दिवसांनी आंघोळ घडली
-------
गावाबाहेर आडोशाला
एक पडका वाडा आहे...
तिथेच भरलेला माझ्या
तारुण्यातल्या पापांचा घडा आहे...
----
मैत्रीण दाराशी आली; म्हटलं,
"तुला शंभर वर्षं आयुष्य आहे!'
बायको घरी नाही पाहून ती म्हणाली,
"हा काय मनुष्य आहे!'
------
बोन्साय केलेल्या झाडालाही
नवी पालवी फुटली...
त्यालाही कळेना,
ही वाढायची जिद्द कुठली?
-----
ठाऊक असतं, तुझं येणं अशक्‍य आहे
तरी मन "पॉइंट'वर जाणं सोडत नाही
तुला शोधताना मग नजर
एकही "पाखरू' सोडत नाही...
------
मरताना वाटलं,
आयुष्य नुसतंच वाहून गेलं
करायचंय, करायचंय, म्हणताना
लग्न करायचंच राहून गेलं...
----
घराभोवती कुंपण हवं
म्हणजे ते सुरक्षित ठरवता येतं
आपल्या गुरांना मात्र
दुसऱ्याच्या आवारात चरवता येतं...
------
सिगारेटची थोटकं मिळाली
परवा कपाट लावताना
किती माझी उडाली धांदल
असले "धंदे' लपवताना...
---------
कुणी बरोबर असेल, तर
सिनेमा पाहायला अर्थ आहे
एकट्यानेच पाहायचा असेल,
तर आतला "अंधार'ही व्यर्थ आहे!
--------
दाढीतला एक ढेकूण
एकदा चुकून मिशीत शिरला
इथे सुरक्षित राहू म्हणून
मिशीतल्या मिशीत हसला
---
कुणी म्हणो वाचाळ,
कुणी म्हणो निर्लज्ज आहे,
कोणत्याही "परस्त्री'ला
तोंड द्यायला मी सज्ज आहे...
---
बरसण्याची वेळ आली,
तेव्हा डोळेही फितुर झाले
त्याच वेळी खांदे माझे
तुला "पोचवायला' आतुर झाले...
 

Feb 16, 2011

दे दान, लागे गिरान!


दान देताना हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची मला प्रचंड खोड आहे. आतापर्यंत अनेकदा त्याबाबत तोंडघशी पडूनही ही खोड काही जाणार नाही. "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेत एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे,' असं विंदा म्हणतात, तसं एखाद दिवशी कुणी माझे हातच घेऊन जाईल की काय, अशी रास्त शंका वाटते.
प्रस्तावनेवरून मी दानशूर कर्णाचा अवतार असल्याचा अनेकांना संशय येऊ शकेल. पण मी तसा अजिबात नाही. सुरुवात जरा आकर्षक करावी म्हणून थोडी अतिशयोक्ती झाली आहे, एवढंच. सांगायचा मुद्दा काय, की दान करण्याबाबतचा अनुभव फारसा उत्साहवर्धक, आनंददायी नाही. मग ते दान पैशांचं असो वा अन्य कुठलं.
लिहिण्यासाठी निमित्त मिळालं ते परवाच आमच्या कॅंटीनच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या कपड्यांचं. बोहारणीला कपडे देऊन तिच्याकडून भांडी, ताटल्या, डबे वगैरे घेण्याची आम्हाला पूर्वीपासूनची सवय. पण इथे मोठ्या शहरातल्या सोसायटीत कुठली बोहारीण वगैरे घरी यायला! त्यामुळे कपडे मी कुठल्या कुठल्या संस्थांनाच देत असतो. या वेळी कॅंटीनमध्ये काम करणाऱ्या मुलांना द्यायचे ठरवलं होतं. नको असलेले कपडे बाजूला काढून ठेवण्यात आणि नंतर ते गोळा करून ऑफिसमध्ये आठवणीनं घेऊन जाण्यातच खूप काळ गेला. दोन दिवसांपूर्वी शेवटी ते नेऊन दोन मुलांच्या ताब्यात दिले. मापाचे नसतील ते परत देण्यासही सांगितलं. मला वाटलं संध्याकाळपर्यंत ते निदान कपडे बसताहेत किंवा बसत नाहीत हे तरी सांगतील. पण कुणीच तसं काही सांगितलं नाही. न बसणारे कपडे परत देण्याचा तर प्रश्‍नच नव्हता. त्यांना त्या कपड्यांचा उपयोग होणार आहे की नाही, हेही कळायला मार्ग नव्हता आणि नाही. मीच पुन्हा त्यांना जाऊन विचारणं म्हणजे त्यांना अवमान वाटायचा. असो.
भाऊ महाराज बोळात राहत होतो, तेव्हाची गोष्ट आठवली. कॉट बेसिसवर होतो आणि रूमवर स्वयंपाक-पाण्याची सोय नव्हती. अध्येमध्ये बाहेरून ब्रेड वगैरे आणून खायचो. असाच एके दिवशी मोठा ब्रेड आणला आणि तो अर्धा शिल्लक राहिला. वाया जाऊ नये म्हणून शनिपाराजवळ बसणाऱ्या भिकाऱ्यांपैकी एका भिकारणीला दिला. मी वळून परत जाईपर्यंत तिने तो कागद उचकटून त्यात काय आहे, ते पाहिलं होतं. ब्रेड फेकून देताना तिला पाहिलं, तेव्हा माझं टाळकं सटकलं. मग तसाच वळून तिच्याशी भांडायला गेलो. तर ती मलाच शिव्या द्यायला लागली. तिथल्या रिक्षावाल्यांनी मग तिचं डोकं फिरल्याचं सांगून मला घरी धाडून दिलं.
पैशांच्या बाबतीत तर माझ्यासारखा दानशूर मीच! अर्थात, मी ते पैसे देताना उधारीच्या बोलीवर देत असेन, तरी घेणारा मात्र ते दान समजूनच घेत असावा. परत न मागण्याच्या अपेक्षेने! कधी कुणी आजारी आहे, कुणी हॉस्पिटलमध्ये आहे, शाळेची फी भरायची आहे, असली कारणं सांगून माझ्याकडून पैसे मागायला आले, की की मी पाघळायचो. ऑफिसातल्याच एकाने असेच तीन हजार रुपये घेऊन ते दिले नाहीत, तेव्हापासून कानाला खडा लावला. आता मी सफाईदारपणे नकार देऊ शकतो. पैसे घेताना हे लोक दीनवाणे, अगतिक वगैरे असतात. द्यायची वेळ आली की मात्र शंभर कारणं तयार! निदान "मी नंतर देईन, थोडं थांब' एवढं म्हणायचं सौजन्यही त्यांना बाळगता येत नाही.
"दान दिल्याने दान वाढते' म्हणतात ते खरं असेल. पण माझ्या बाबतीत दान दिल्याने दान मागणारेच वाढले आहेत! दान प्रत्येकानं केलंच पाहिजे आणि त्याबद्दल फुशारकीही मारता कामा नये. पण दान घेणाऱ्यानं निदान त्याची जाणीव ठेवावी, एवढीच माझी माफक अपेक्षा असते. ती काही चुकीची नाही ना?
आमच्या घरात निमिषला सांभाळायला असलेल्या बाईंसाठीही मी चहा, नाश्‍ता स्वतः करून द्यायचो. त्यांना कदाचित रोज घ्यायला मिळत नसेल, म्हणून. त्यांनी आमच्या घरातला दागिनाच चोरण्याचा प्रयत्न केला. उपकारांची परतफेड म्हणतात, ती ही!

Feb 11, 2011

अख्खा मसूर आणि दीड (शहाणे) आम्ही!


सातारा रस्त्यावरच्या "अख्खा मसूर'वर बऱ्याच दिवसांपासून डोळा होता. कधीतरी त्याचं नाव कुणाकडून तरी ऐकलं होतं. तिथं जायचं डोक्‍यात होतं, पण योग येत नव्हता. तसा मी फारसा हॉटेलप्रेमी नाही. आहारात चवीपेक्षाही "उदरभरण नोहे' हा मंत्र जपणाऱ्या अंतू बर्व्याचेच आम्ही अनुयायी. त्यामुळं अमक्‍या हॉटेलात तमकी डिश चांगली मिळते वगैरे तपशील माझ्या गावी नसतात. कुणी सांगितलं आणि सहज जमलं, तर मी ठरवून एखाद्या हॉटेलाकडे वाट वाकडी करतो. नाहीतर कुठेही हादडायला आपल्याला चालतं.
तर सांगण्याचा मुद्दा काय, की काल त्या "अख्खा मसूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात गेलो होतो. सिटीप्राईडच्या अगदी समोर असलेलं हे हॉटेल. "अख्खा मसूर' म्हणजे तिथे मसूराचे बहुविध पदार्थ मिळत असावेत, अगदी चटण्या आणि कोशिंबिरीही मसूर घालूनच करत असावेत, असा आपला माझा समज. तशी चौकशीही एकाकडे केली होती. पण प्रत्यक्षात तिथे "अख्खा मसूर' ही एकच डिश मिळते, हे प्रत्यक्ष गेल्यावरच कळलं. तिथेच आम्ही निम्मे खचलो. मुळात त्या हॉटेलचं नाव "अख्खा मसूर' नसून "जगात भारी कोल्हापुरी' असं असल्याचा साक्षात्कारही तिथे गेल्यावरच झाला. आत जाऊन उत्साहानं मेनू कार्ड बघितलं, तर तिथे मसुराशी संबंधित फक्त "अख्खा मसूर' ही एकच डिश असल्याचं लक्षात आलं. ती मागविण्यावाचून पर्याय नव्हता. मग त्यासोबत रोटी मागवली.
रोटी एकाच प्रकारची होती. "व्हीट' वगैरे भानगड नव्हती. तरीपण ती करण्याची प्रक्रिया मनस्वीला दाखवण्याची संधी साधता आली. "अख्खा मसूर'ची चव चाखल्यावर आपण घरात मसुराची उसळ यापेक्षा उत्कृष्ट बनवतो, हे लक्षात आलं. रोटी आल्यावर पदरी पडलं आणि पवित्र झालं या भावनेनं समोर ठेवलेलं हादडायला सुरुवात केली. त्याआधी सभोवार एकदा बघून घेतलं. सगळी टेबल भरली होती आणि लोकही अतिशय प्रेमाने तो अख्खा मसूर रिचवत होते. इतर कसे खातात, हे बघून खाणं बऱ्याचदा श्रेयस्कर असतं. मागे एकदा पुण्यात नवीन असताना मी कॅंपमधल्या "नाझ'मध्ये बन-मस्का उत्तम मिळतो, असं ऐकून तिथे खायला गेलो होतो. ऑर्डर दिल्यानंतर वेटरनं "चहा हवाय काय,' असं प्रेमानं विचारलं. मी "नको' म्हणून गुर्मीत सांगितलं. त्यानं एक भलामोठा पाव समोर आणून ठेवला. हा "बन' असावा असा समज करून घेऊन मी हरी-हरी करत पुढच्या "मस्का'च्या डिशची प्रतीक्षा करत बसलो. तो काहीच आणीना, तेव्हा "बन-मस्का' म्हणजे मस्का लावलेला पाव असावा, असा साक्षात्कार मला झाला आणि मग निमूट चहा मागवून मी स्वतःचा पचका वडा करून घेत तो बन घशाखाली घातला.
या वेळी असं काही होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावी लागली. सगळे जण मसुरावर ताव मारत होते. आम्ही देखील ते मसूर घाशाखाली घातले. चव बरी होती, पण त्यात 70 रुपये देण्यासारखं काही नव्हतं. बायको-मुलीला घेऊन जाऊनही जेवणाचं बिल 230 रुपये येणं एवढाच काय तो माझ्या दृष्टीनं "प्लस पॉइंट' होता.
फक्त मिसळपावाची, फक्त मस्तानीची, फक्त वडा-पावची हॉटेलं ऐकली, पाहिली होती. फक्त चहाच्या "अमृततुल्य'मध्येही हल्ली क्रीम रोल, पॅटीस, सामोसे वगैरे मिळतात. या "अख्ख्या मसूरा'त त्या भाजीशिवाय दुसरी कुठलीही भाजी निषिद्ध होती. "खायचा तर हा अख्खा मसूरच खा. नाहीतर अख्खे तसेच घरी परत जा,' अशी संचालकांची भूमिका असावी.
अख्खे 230 रुपये मोजून मसुराची उसळ आणि रोटी खाल्ल्यानंतर पुन्हा कुठल्या तरी हॉटेलात व्यवस्थित जेवण करायचं, असं आश्‍वासन हर्षदा आणि मनस्वीला दिल्यानंतरच मी अख्खाच्या अख्खा घरी येऊ शकलो!
...

Jan 29, 2011

गोप्या पडदो उघड!

गोप्यानं पडदो उघडल्यान.

क्‍क्‍याण्णवावं अखिल भारतीय नाट्य संमेलन रत्नागिरीत धूमधडाक्‍यात सुरू झालंय. तसं 25 तारखेपासूनच बालनाट्य, एकांकिका महोत्सवाची नांदी सुरू झाली, पण संमेलनात जान आली ती गुरुवारी संध्याकाळी डॉ. विजया मेहता यांच्या झालेल्या सत्कारानं. स्वतःची नाट्यसृष्टी घडवणाऱ्या विजयाताई म्हणजे अभिनय, दिग्दर्शन, सादरीकरण यांचं विद्यापीठ. त्यांनी मराठी रंगभूमीला दिलेल्या विक्रम गोखले, रीमा, नीना कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, सुरेश भागवत, दिलीप कोल्हटकर अशा एकाहून एक ताऱ्यांनी, अर्थात त्यांच्या शिष्यांनीच त्यांचा सत्कार केला. रीमाताईंनी विजयाबाईंना कलाकारांच्या नव्या पिढीसाठी नाट्य शिबिरं घेण्याची गळ घातली. नीनाताईंनी विजयाबाईंची शिस्त, रंगभूमीबद्दलची निष्ठा, यांची आठवण सांगितली.

विक्रम गोखलेंनी या विजया मेहता नावाच्या या "आभाळा'ला आता तरी "पद्मभूषण' किताबाने सन्मानित करा, अशी गळ घातली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी भरपूर बॅटिंग केली. बहुधा नाट्य संमेलनात विजयाबाईंचा सत्कार होण्यासाठी उदय सामंत "आमदार' होण्याचीच सगळे जण वाट बघत होते, असा षटकारही ठोकला. केंद्र सरकार दरबारी प्रयत्न करून विजयाबाईंचा "पद्म'सन्मान करण्याचं त्यांनी दिलेलं आश्‍वासन आता किती खरं उतरतंय, ते लवकरच पाहायला मिळेल.

विजयाबाईंनीच 70च्या दशकात दिग्दर्शित केलेल्या "बॅरिस्टर' नाटकाचं आता त्यांचेच शिष्य विक्रम गोखलेंनी दिग्दर्शन करून ते पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे. त्याच्याच सेटवर विजयाबाईंचा सत्कार होणं हे एक वेगळं औचित्य होतं. सेटची तयारी सुरू असल्यानंच सात वाजताचा सत्कार प्रत्यक्षात रात्री साडेआठला सुरू झाला आणि बसण्याच्या व्यवस्थेचं नियोजनही थोडं फिस्कटलंच. सावरकर नाट्यगृहात एवढी तुडुंब गर्दी झाली, की खुर्च्यांच्या दोन्ही बाजूला लोक दाटीवाटीनं उभे होते. शेवटी दरवाजे बंद करून घ्यावे लागले. थोडंसं मानापमान, भांडणंही झाली. रात्री "बॅरिस्टर'चा प्रयोग उत्तम झाला. काहीसं गंभीर नाटक असलं, तरी रात्री पावणेदोनपर्यंत लोक खाली बसून, दाटीवाटीनं नाटक बघत होते.

गणपतीपुळे रस्त्यावरचं मौजे पिरंदवणे वाडाजून हे रत्नागिरीचे थोर कलावंत कै. शंकर घाणेकर यांचं जन्मगाव. रंगभूमीवर काम करता करता आयुष्याची अखेर होणं हे कोणत्याही कलाकारासाठी भाग्यच. कै. घाणेकरांना हे भाग्य लाभलं. 1974 साली गावातच "वरून कीर्तन आतून तमाशा' या नाटकाचा प्रयोग साकारताना हृदयविकाराच्या झटक्‍यानं त्यांचा मृत्यू झाला. त्याच रंगमंचावर गुरुवारी सकाळी त्यांना आदरांजलीचा कार्यक्रम झाला. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर, शंकर घाणेकरांबरोबर काम केलेल्या अभिनेत्री आशालता वाबगावकर या वेळी उपस्थित होते. घाणेकरांच्या घरी जाऊन त्यांच्या भावजयीची भेटही या मंडळींनी घेतली.

आता आज (शुक्रवारी) संध्याकाळी नाट्यदिंडी आहे. बऱ्याच कलाकारांची नावं जाहीर करण्यात आल्येत. येतील तेवढे खरे म्हणायचे!

Jan 22, 2011

सिनेमा...सिनेमा

`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले.
अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं. "आम्ही लहान होतो ना, तेव्हा...' अशी आपली टेप सुरू झाली, की ती सध्याची पिढी कशी नालायक आहे आणि आपण कसे ग्रेट होतो, या तात्पर्यापर्यंत आल्याशिवाय थांबतच नाही! माझं गाव, माझं बालपण, माझ्या छोट्या-छोट्या गरजा...सगळ्याचं दळण दळायला आपल्याला फार आवडतं, पण पुन्हा त्या परिस्थितीत कुणी नेऊन ठेवतो म्हटलं, की लगेच आपण दोन पावलं मागे येतो. तर ते असो!
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे "भानुविलास'वरून मला झालेली आमच्या रत्नागिरीतल्या "लता टॉकीज'ची आठवण. हेदेखील तिथलं "भानुविलास'च. अगदी, राजा गोसावींनी तिथे काम केलेलं नसूदे. पण आमच्या लेखी त्याचं माहात्म्य "भानुविलास'एवढंच! रत्नागिरीत तीन थिएटर होती. त्याआधी दोन होती. एक नाटकाचं थिएटर होतं. त्याचं नंतर "श्रीराम' चित्रमंदिर झालं. माझ्या लहानपणापासून मी लता, श्रीराम आणि राधाकृष्ण ही तीन थिएटर्स पाहत आलो आहे. "राधाकृष्ण'चा दर्जा जरा उजवा. तिथे नवे हिंदी सिनेमे लागायचे. नवे म्हणजे मुंबई-पुण्यातल्या रिलीजच्या नंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी आलेले. त्याचं तिकीटही इतरांपेक्षा जरा जास्त होतं. "जरा' म्हणजे "जरा'च! मी कॉलेजात असताना, म्हणजे 90च्या दशकाच्या सुरुवातीलाही तिथलं सर्वांत जास्त तिकीट होतं सहा रुपये! तेदेखील आम्हाला जास्त वाटायचं. असो.
त्यानंतर "श्रीराम'चा नंबर लागायचा. इथे साधारणतः बरे मराठी किंवा दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे लागायचे. कधीकधी तर "राधाकृष्ण'ला खूपच नवा आणि गाजलेला सिनेमा लागलेला असेल, तर "श्रीराम'लाही तोच लावला जायचा. गंमत म्हणजे, दोन्हीकडे रीळ एकच असायचं आणि सिनेमाच्या खेळाच्या वेळा बदलून मग मधल्या वेळेत एक रीळ संपल्यावर ते शेजारच्या "श्रीराम'मध्ये नेलं जायचं. गंमत होती सगळी.
नंतर नंतर हॉलिवूडचे सिनेमे भारतात डब होऊन यायला लागल्यानंतर त्यांनाही "श्रीराम'चाच बऱ्याचदा आश्रय मिळत असे. नाहीतर हमसें ना टकराना, मुकद्दर का बादशहा, जीते हैं शान से, वर्दी, कानून क्‍या करेगा, अशाच चित्रपटांशी "श्रीराम'च्या पडद्याची गट्टी जमायची. "श्रीराम'ने एखाद्या चित्रपटाचा दुसरा आठवडा पाहिलाय, असं क्वचितच झालं असेल!
"लता'चा नंबर तिसरा होता. एक तर हे थिएटर खूप छोटं होतं. साधारणतः सहाशे ते सातशे क्षमतेचं असावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे तिकीट अगदी कमी होतं. माझ्या लहानपणी एकदा त्याचं "रिनोवेशन' झालं, त्यानंतरचं तिकीट होतं एक, दोन, तीन आणि चार रुपये! आमच्याकडे कमल नावाची मोलकरीण होती. तिलाही इथेच सिनेमा बघायला परवडायचं! एक रुपयात! त्या वेळी एक रुपया ही तिची एका घरची दिवसाची कमाई होती!! मी कॉलेजात असतानाही अनेकदा इथे साडेचार ते पाच रुपयांत सिनेमे पाहिले आहेत! "लता' म्हणजे मराठी सिनेमांचं माहेरघर होतं. नवे हिंदी सिनेमे इथे लागलेले मी क्वचितच पाहिलेत. अनेकदा इंग्रजी ढिशूम ढिशूम छाप सिनेमेही लागायचे.
लता टॉकीजमध्ये मी "फुकट चंबू बाबूराव', "जखमी वाघीण', "ठकास महाठक' असे अनेक सिनेमे पाहिलेत. "आज का अर्जुन'ही इथेच पाहिलेला. "लता'मध्ये एक छोटी बाल्कनीदेखील होती. "राधाकृष्ण' आणि "श्रीराम' ही मोठी थिएटर असूनही, तिथे बाल्कनीची सोय नव्हती. त्याउलट "लता'मध्ये ही लक्‍झरी मिळायची. ही बाल्कनी जेमतेम पाच ते सहा रांगांची होती. आपल्या "लक्ष्मीनारायण'च्या "मॅजेस्टी'पेक्षा थोडीशी मोठी. शिवाय तिथे पुढे (माझ्यासारखा) उंच माणूस बसला, की मागच्याला दिसायचं नाही. मग त्याला वाकून, दोन खुर्च्यांच्या आणि डोक्‍यांच्या मधून कसाबसा सिनेमा पाहायला लागायचा. मग मागच्याला दिसावं म्हणून मला खुर्चीत जवळपास झोपूनच सिनेमा पाहण्याची शिक्षा होत असे. (परवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये फुकटात आर-डेक्कनमध्ये बसून (झोपून) सिनेमा पाहिला, तेव्हा ही शिक्षा नाही, हे कळलं! असो.)
घरच्यांच्या धाकात त्या वेळी सिनेमा बघणं म्हणजे दुर्मिळ मेजवानीच असायची. साधारणपणे अकरावीनंतर आम्ही घरच्यांना न जुमानता, न सांगता आणि न सांगण्यासारखे (!) सिनेमे बघायला सुरुवात केली, तेव्हा "लता' आणि "श्रीराम'चाच मोठा आधार मिळाला. "लता'ला तेव्हा इंग्रजी ऍडल्ट सिनेमे लागायला सुरुवात झाली होती. ग्रुपनं जाऊन सिनेमावर भरपूर कॉमेंट करत तो पाहणं हा मोठा सोहळा असे!
चौथीत असल्यापासूनच सिनेमाची गोडी...गोडी कसली, व्यसनच म्हणा...लागलं होतं. शाळेपासून थिएटर जवळच असल्यानं मी आणि एक मित्र मधल्या सुटीत पळून थिएटरवर सिनेमाची पोस्टर बघायला जायचो. "राधाकृष्ण'मध्येच तिथे आणि "श्रीराम'मध्ये लागलेल्या सिनेमातली पोस्टर खिडकीतून दिसायची. "पोस्टर' म्हणजे मोठी नव्हेत. साधारण ए-3 आकाराची, एका काचेच्या चौकटीत लावलेली सिनेमातल्या दृश्‍यांची चित्रं. आता आपण टीव्हीवर "प्रोमो' पाहतो ना, त्याचं छायाचित्ररूप. ती बघून आम्ही तो सिनेमा "भारी' आहे की नाही, हे ठरवायचो. "लता'मध्ये मात्र ही सुविधा नव्हती. तिथे पोस्टर असायची, पण ती बाहेरून तिकीट न काढता दिसायची नाहीत. सिनेमासाठी तिकीट काढून आत गेल्यावरच ती पाहता येत असत. मग सिनेमा सुरू व्हायच्या आधी आणि मध्यंतरातही ती पोस्टर पाहून, कुठला सीन दाखवायचा राहिलाय, याची शहानिशा मी करायचो.
"लता'चे मध्यंतरी काही वाद झाले. त्यानंतर थिएटर बंद पडलं. मग तिथे वेगवेगळी प्रदर्शनं भरायला लागली. आता तर तिथे कायमस्वरूपी कार्यालयच झालं आहे!
 
आपल्या बालपणातली आठवणींची एकेक स्मारकं उजाड, भकास होताना पाहिली, की काळजात कुठेतरी चरचरतं...