Oct 24, 2007

पचका वडा

मित्रहो,

आपण अनेक पदार्थ खातो, पाहतो, अनुभवतो. त्यांची रेसिपीही माहिती करून घेतो. काही घरी बनवायला जमतात, काही जमत नाहीत. मग ते आपण आयते मिळवून खातो.पण इच्छा नसतानाही काही पदार्थांची चव चाखावी लागते. अशाच काही अनोख्या पदार्थांची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न...


सध्या भाग पहिला ः पचका वडा

आपण मोठ्या उत्साहानं काही करायला जावं आणि तोंडघशी पडावं, असे अनुभव जागोजाग येत असतात. त्यातूनच हा रुचकर पदार्थ तयार होतो. हा पदार्थ आपण ज्या परिस्थितीत, किंबहुना, ज्या "स्थिती'त अनुभवू, त्यावर त्याची चव अवलंबून असते. उदा. समजा, एखाद्या तरुणानं तरुणीच्या हृदयापर्यंत आपल्या हृदयींचे गूज पोचवण्याचा घाट घातलाय आणि तिला कुठेतरी "बरिस्ता', "कॉफी डे' मध्ये बोलावलंय समजा. आणि ती बया त्याच्या भावना, प्रेम, एवढी वर्षं दिलेल्या गिफ्ट, गुलाब, तिची भरलेली बिलं, सगळं धाब्यावर बसवून "तुला तसल्या नजरेनं बघितलंच नाही रे राजा' असं सांगते किंवा "मी ऑलरेडी एंगेज आहे,' असा बॉंब त्याच्या तोंडावर फेकते, तेव्हा या घायाळ प्रेमवीराचा होतो, तो "पचका वडा.'

एखाद्याला "एप्रिल फूल' करायला जावं आणि त्यानं आपल्यालाच "मामा' बनवावं, असंही अनेकदा होतं. त्याला "आंबूस वडा'ही म्हणता येईल.पचक्‍याचा दणका जेवढा जास्त, तेवढी त्याची चव अस्सल. विशेषतः बरोबर कुणी असेल, तर त्याला केवळ दुसऱ्याचा वडा होत असताना चाखायला मिळणारी चव लाजवाब! तिला तोडच नाही.

टीप ः शक्‍यतो स्वतः एकदा करून घेतल्यानंतर दुसऱ्यालाही या पदार्थाची चव चाखायला द्यावी.


------------------------

Oct 21, 2007

सो सो सुम...!

बास!
पुरे!
लाडं लाडं, खूप झालं आता.

उसासे आणि उमाळे पुरेत.

मी आपला लिहितोय आणि तुम्हा वाचताय.
आता नाही चालणार हे हळहळं, हुळहुळं लिखाण.

एका गंभीर विषयाकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे....म्हणजे, एका गंभीर आजाराकडे.
खूप पूर्वीच्या काळी पटकी, देवी, जलोदर वगैरे प्राणघातक आजार होते.त्यानंतर कॅन्सर, मलेरिया वगैरे आले.त्यांचीही सद्दी संपल्यावर एड्‌सचा राक्षस आला. आता कुणाला बर्ड फ्लू, डेंगी वगैरेंचीही आठवण होईल. पण माझ्या दृष्टीनं सनातन काळापासून चालत आलेला आणि कोणताही उपाय नसलेला गंभीर आणि असाध्य आजार म्हणजे....सर्दी!



मी या आजाराचा आवडता आणि फेवरेट गिऱ्हाईक आहे. सर्दीचे विषाणू, जीवाणू किंवा अन्य कोणी सूक्ष्म जंतू बिंतू असतील, ते एकदा शरीरात शिरले, की माणसाला त्यांच्यापेक्षाही क्षूद्र जंतू करून टाकतात. बलाढ्य हत्तीला मुंगी सोंडेत शिरून बेजार करते, ती गोष्ट चटकन आठवावी! (हत्तीवरून आठवलं...! आमची अतिशहाणी कार्टी नाकातल्या शेंबडाला "हत्ती' म्हणते. तासंतास बोटं घालून नाकाचं गिरमीट करणं, हा तिचा आवडीचा छंद! असो. काही पोरं जातात बापावर!)

या 81 किलो वजनाच्या अवाढव्य देहालाही ही सर्दी दर पंधरवड्याच्या अंतरानं हैराण करत असते. एकदा आली, की 15 दिवस मुक्कामच ठोकते! सध्याही हेच भोग भोगतोय.सर्दी म्हणजे अक्षरशः गेल्या जन्मींचे भोग आहेत. हृदय बदलणं, एका किडनीवर शरीर चालवणं, कुठलीतरी कातडी भलतीकडे चिकटवणं, कवटीच्या बाहेरून मेंदूचं ऑपरेशन करणं, कसल्या कसल्या भयाण रोगांवरची औषधं आणि उपचार डॉक्‍टरांनी शोधून काढलेत. पण सर्दीपुढे त्यांनी हात टेकलेत.

झडझडून शिंका देऊन सर्वांग गदगदा हलवणारी सर्दी असेल, तर आपली काय हरकत नाही. पण नाक चोंदवणारी आणि डोक्‍याचं गोडाऊन करणारी सर्दी आपलं टाळकंच हलवते!"रात्रभर झोपलो नाही' हे वाक्‍य विविध अर्थांनी वापरलं जातं. सर्दीबाज माणसालाच त्याचा खरा अर्थ कळू शकेल. झोप येत असताना, अंथरुणावर लोळावंसं वाटत असताना सूं-सूं करत तळमळत राहणं केवढं भीषण आहे, हे सर्दीबाज माणूसच जाणे!

सर्दीच्या आठवणी अनंत आहेत. कोकण रेल्वे पहिल्यांदा रत्नागिरी स्टेशनापासून सुटली, तेव्हा पहिल्या दिवसाचा अनुभव घ्यायला गेलो होतो. अतिहौसेपायी अख्ख्या प्रवासात दरवाजातून हललो नाही. जाम वारं भरलं होतं कानांत! त्यातच रात्रभर डोक्‍याला लेप लावून झोपलो. दुसऱ्या दिवशी जी सर्दी झाली, ती आठ दिवस टिकली. रुमालाच्या कंपन्यांचा सर्वाधिक खप रत्नागिरीत त्या काळात झाला होता म्हणे!

हां...पण सर्दीच्या दहशतीमुळं पावसात न भिजणं, थंडी-वाऱ्यातून जपणं वगैरे फजूल गोष्टी आपल्याला मान्य नाहीत हं! एरव्हीही करतोच, पण सर्दी झाली की मुद्दाम गार पाण्यानं आंघोळ करायची आणि पावसाची पर्वा न करता गाडीवरून भिजत जायचं हा आमची खुमखुमी जिरवणारा छंद! पुण्यात आल्यानंतर दोन वर्षं मी बिनरेनकोटच गाडी चालवली. कारण रत्नागिरीतल्या "अवर्षणा'पुढे पुण्यातला पाऊस म्हणजे अगदीच पिचपिचीत वाटायचा त्या काळी!

तर अशी ही सर्दीची कथा. किती दळण दळलं, तरी त्यावर उपाय नाही निघायचा.

असो. सध्या प्रवचन इथंच आटपतं घेतो.

नाक पुसायला रुमाल शोधायचाय...!
समस्त सर्दीग्रस्तांना सर्दीवरील उपाय शोधण्यासाठी शुभेच्छा!!
-----------