संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात मुख्य
रस्त्याच्या कॉर्नरला असलेलं ते रेस्टॉरंटसुद्धा उत्साहाने फुललं होतं. संधिप्रकाश
दारंखिडक्यांतून झिरपत आत येत होता आणि आकर्षक रंगसंगती केलेल्या टेबलांवरची सजावट
आणखी खुलून दिसत होती. बाहेरची वाढती रहदारी, लोकांची घरी जाण्याची घाई, मध्येच
गाडी पुढे घेण्यावरून होणारी भांडणं बघत आलं-वेलची टाकलेल्या चहाचे घोट घेत निवांत
बसणं, हा अनेकांचा संध्याकाळचा विरंगुळा होता. त्या दिवशीही हे रेस्टॉरंट अशाच
दर्दींच्या गर्दीनं फुलून गेलं होतं. अपवाद होता, तो फक्त एका टेबलचा. या
टेबलावरचे सगळेच जण सुतकी चेहऱ्यानं एकमेकांकडे बघत बसले होते. कुणीच काही बोलत
नव्हतं. शेवटी एकानं पुढाकार घेतला आणि मौनव्रताची कोंडी फुटली. ते सगळे एकाच
ऑफिसमध्ये काम करणारे होते, पण वेगळ्या विभागांतले. ऑफिसमध्ये रोज तसा एकमेकांशी
संबंध येत नसे. येई तोसुद्धा कामापुरता. ऑफिस व्यवस्थित चाललं होतं, कामाचंही फार
टेन्शन नव्हतं आणि हाच त्यांच्या चिंतेचा विषय होता.
``आपण व्हॉट्स अप ग्रुप सुरू करूया का?`` एकानं काडी टाकली आणि सगळे खाऊ का गिळू नजरेने
त्याच्याकडे बघायला लागले.
आपण असं काय देशद्रोही विधान केलं, हे न कळून
तो बिचारा कानकोंडा झाला. इतरांच्या बोलण्यातून त्याला कळलं, की ऑफिसमधला कामाचा
शीण घालवण्यासाठी व्हॉटस अप ग्रुप तयार करण्याचा उपाय सुचवणारा तो काही जगातला
पहिला माणूस नव्हता. याआधीसुद्धा हा विचार कित्येकदा पुढे आला होता आणि मागे पडला
होता. ऑफिसमधलं गॉसिप नको, मेसेज वाचण्यातच खूप वेळ जातो, लोक काहीही फॉरवर्ड
करतात, अशा अनेक तक्रारी होत्या. त्याबरोबरच एक मुख्य आक्षेप होता, तो म्हणजे काही
आगाऊ पुरुष सदस्य या कॉमन ग्रुपवर असभ्य जोक्स टाकतात, हा. ती भानगडच नको म्हणून
कधी या ऑफिसचा ग्रुपच स्थापन झाला नव्हता. यावेळी मात्र अशा ग्रुपशिवाय तरणोपाय
नाही, असाच निष्कर्ष या चर्चेत निघाला आणि लगेच शिक्कामोर्तब आणि अंमलबजावणीही
झाली.
अर्थात, ऑफिसच्या साडेचार वर्षांच्या
देदीप्यमान कारकिर्दीतला पहिला व्हॉट्स अप ग्रुप स्थापन करण्याच्या ऐतिहासिक
निर्णयाच्या अंमलबजावणीआधी ग्रुपच्या अटी आणि नियम ठरवणे आवश्यक होते. हिशेब आणि
नियमावलीच्या बाबतीत चोख असलेल्या एका सहकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. बाकीही
कुणाकुणावर अशाच जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाची आणि जोखमीची
जबाबदारी म्हणजे ग्रुपच्या सदस्यांना काबूत ठेवणे आणि त्यांचा तोल सुटू न देण्याची
होती, ती त्या ग्रुपचा प्रस्ताव पुन्हा नव्याने मांडणाऱ्या त्या नव्या सदस्याची
होती. त्या निमित्तानं त्याची सगळ्यांशी पुन्हा ओळख झाली. त्याचं नावही त्याच्या
स्वभावाला साजेसंच होतं – प्रीतम. अल्पावधीत तो सगळ्यांचा `प्रीतम` झाला.
ग्रुपमुळे ऑफिसमुळे नवं चैतन्य आलं, लोकांचा
कामातला हुरूप वाढला, सगळे एकमेकांशी खेळीमेळीत राहू लागले. ऑफिसच्या कामातला रुक्षपणा
संपून तिथे नवा उत्साह आला, कार्यक्षमताही वाढली. एकूण सगळीकडे आनंदीआनंद झाला.
लोक काटेकोरपणे नियमांचं पालन करत होते, ग्रुपवर काही वाह्यात, अवाजवी, थिल्लर चर्चाही
होत नव्हती. थोडक्यात, सगळे आटोक्यात होते आणि नियम पाळत होते. ग्रुपच्या
स्थापनेचा उद्देश प्रचंड यशस्वी झाला होता.
...आणि अशाच उत्साही वातावरणात एके दिवशी भूकंप
झाला! ग्रुपवर हलकल्लोळ माजला, प्रचंड उलथापालथ
झाली. ग्रुपच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. कारणही तसंच घडलं होतं. एवढ्या
साध्या, सरळ, सोज्वळ वाटेने चाललेल्या ग्रुपवर एक अश्लील व्हिडिओ येऊन पडला होता. ग्रुपच्या
सगळ्या नियमांना एका फटक्यात सुरुंग लागला होता. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, तर
साक्षात एडमिनकडूनच हा प्रमाद घडला होता! सगळ्यांचा `प्रीतम` असलेला एडमिन एका फटक्यात सगळ्यांच्या रागाचा
धनी बनला होता. अपेक्षेप्रमाणेच सगळ्यांनी त्याला सोलून काढला. तो सगळ्यात
ज्युनिअर असतानाही एडमिन म्हणून सगळ्यांना गुरकवायचा, त्याचा हूट एका क्षणात
निघाला. प्रीतम हडबडला. खरंतर त्याच्याकडून ही चूक नकळत घडली होती. एवढ्या
प्रेमानं निर्माण केलेला, प्राणपणानं जपलेला, सगळ्या ज्येष्ठश्रेष्ठांच्या भावना
जपून चालवलेला ग्रुप एका क्लिपमुळे उद्ध्वस्त होणार होता. इतर कुणी टाकलेल्या एखाद्या
थोड्याशा वाह्यात विनोदावरही ज्येष्ठांनाही ग्रुपवरच खडे बोल सुनावणारा प्रीतम आज
नैराश्याच्या गर्तेत गेला होता. प्रीतमनं ग्रुपवर `सॉरी` एवढाच मेसेज
टाकला आणि तो मौनात गेला.
दुसऱ्या दिवशीही ग्रुपवर स्मशानशांतता होती.
प्रीतम ग्रुपवरच नव्हे, तर ऑफिसलाही फिरकला नाही.
तिसऱ्या दिवशी सकाळी प्रीतमला जाग आली, तेव्हा
त्याच्या मोबाईलवर व्हॉट्स अपचे कितीतरी पर्सनल मेसेज आलेले होते. बहुधा आणखी बरंच
काही ऐकून घ्यावं लागणार, या काळजीनं त्यानं भीतभीतच मेसेज वाचायला सुरुवात केली.
``प्रीतम, झालं ते झालं. तूसुद्धा मुद्दाम काही
केलं नव्हतंस. आपण काय घडलं ते विसरून जाऊ. मी बाकीच्यांनाही समजावेन. तू परत ये.`` प्रीतमला मेसेज वाचून समाधान वाटलं. त्यानं
हसरा इमोजी पाठवून आपलं समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्याचा मेसेज वाचला
गेल्याचं नोटिफिकेशन आल्यावर लगेच पुढचा मेसेज आला - ``परवाची क्लिप चांगली होती. अशाच आणखी आहेत का?``
प्रीतम उडालाच. काही प्रतिक्रिया द्यायच्या आधी
त्यानं बाकीच्या सहकाऱ्यांकडून आलेले पर्सनल मेसेज बघितले. त्यांचाही आशय बहुतांश
तसाच होता. एवढ्यात प्रीतमला काही महिला सदस्यांचेही मेसेज दिसले. बहुधा परवाच्या
प्रकरणाबद्दलच त्यांनी आपले वाभाडे काढले असतील, असं समजून त्याला ते उघडायचं धाडस
होईना. पण बऱ्याच जणींचे मेसेज बघून त्याला राहवलं नाही. त्यानं ते उघडून बघितले
आणि त्याला पुन्हा जोरदार धक्का बसला.
त्या मेसेजमधलाही आशयही जवळपास तसाच होता!
-
अभिजित पेंढारकर.