Aug 11, 2008

ही पोरगी आवरंना!

प्रसंग क्र. १.
स्थळ - टीव्हीएस व्हिक्‍टरची पेट्रोलची टाकी.
वेळ - दुपारी 1. (शाळेतून परततानाची)
पात्र ः मुलगी आणि (शरणागत) बाप।
संदर्भ ः नुकताच कुठल्यातरी दुकानात पाहिलेलं शाहरुख खानचं पोस्टर।

मुलगी ः बाबा, आपण शाहरुख खानकडे कधीच जात नाही!...बाबा फ्लॅट!
जवळपास गाडीवरून कोसळण्याच्याच तयारीत. कसेबसे सावरतात।
"कुणाकडे?'
"शाहरुख खानकडे!'
"अहो, आपण कधीतरी शाहरुख खानकडे जाऊया ना!'
"शाहरुख खान काय तुझ्या बापाचा नोकर आहे, तुला भेटायला मोकळा असायला!'
(हे वाक्‍य अर्थातच मनातल्या मनात म्हटलेलं. कारण उघडपणे बोललं, तर पुन्हा कुठल्या तरी प्रसंगात ते आपल्याच तोंडावर फेकलं जाण्याची शक्‍यता जास्त. त्यामुळं बापाला शेपूट घालण्याशिवाय पर्याय नाही.)(मग साळसूदपणाचा आव आणून...)
"अगं, शाहरुख खान खू.................प लांब राहतो।' ( पण हे देखील उत्तर फारसं पटण्याची शक्‍यता नाही. कारण मुंबई खू...........प लांब नाही, याची तिला कल्पना आहे. त्यापेक्षाही खू........................प लांब, म्हणजे उटीचा दौराही ताजा आहेच! मग पुन्हा काहीतरी दुसरं कारण शोधायला हवं।)"
``अगं, तो असा कुणालाही भेटत नाही. त्याला वेळ नसतो. आपण त्याला फोन करू, आणि मग जाऊ हां'
"मग आपण त्याला भेटल्यावर सांगू, की "तू दिल में मेरे है दर्दे डिस्को' गाणं म्हटलयंस, ते आम्हाला माहितेय!'
(ही पोरगी एके दिवशी सिंहाचे दात सुद्धा मोजेल!)
मग काहीतरी दुसरा विषय काढून बाप आपली सुटका करून घेतो...
-----------
प्रसंग 2 -
स्थळ -ः घराचं स्वयंपाकघर।
वेळ ः दूपारी 1.30 (शाळेचा हॅंग ओव्हर उतरवण्याच्या प्रयत्नांच्या वेळची)
पात्र ः मुलगी आणि (आज्ञाधारक) बाप।

शाळेत नुकत्याच शिकवलेल्या "आज गोकुळात रंग खेळतो हरी'वर धुमाकूळ चालला आहे।
बाप ः "हे गाणं कशासाठी शिकवलंय, तुला माहितेय?'
"कशासाठी?'
"दहीहंडीसाठी! तुला दहीहंडी आठवतेय? आपल्या सोसायटीत खाली मैदानात बांधतात ना॥ती! ती कोण फोडतं सांग?'(तिच्या स्मरणशक्तीला चालना देण्याचा प्रयत्न।)"
तुषारदादा!'
"हां...बरोब्बर! अरे, तुझ्या लक्षात आहे तर!!"...(बापाचं ऊर भरून आलंय. पण नंतर पोरीच्या "कॅरम बॉल'नं हेच ऊर फाटणार आहे, याची त्याला काय कल्पना?)
"मग...तशीच हंडी तुमच्या शाळेत पण बांधणार आहेत...! ती कोण फोडणार सांग?'
(बाप अगदी उत्सुकतेनं विचारतो)
``बाई!''
(बाप स्टुलावरून खाली!! बाई...? म्हणजे ही टिल्ली पिल्ली पोरं खाली गोल करून...आणि त्यांच्या उरावर बसून बाई हंडी फोडणार?? काय तरी कल्पनाशक्ती! तिला काय, तिच्या समोर जी कुणी प्रमुख मोठी व्यक्ती दिसते, तिचं नाव दिलं ठोकून तिनं! इथं बापाची काय हालत होईल, याची तिला काय फिकीर?)
-------
प्रसंग क्र। 3 -
स्थळ - (पुन्हा) टीव्हीएस व्हिक्‍टरची पेट्रोलची टाकी।
वेळ ः दुपारी 2. ("सिंग इज किंग' पाहून परततानाची)

पात्र ः मुलगी आणि (गरीब बिच्चारा) बाप।
संदर्भ ः गेल्या वर्षभरात पाहिलेले डझनभर चित्रपट.
."बाबा, ते कांदे-पोहे गाणं कुठल्या पिक्‍चरमध्ये आहे हो?'
"सनई चौघडे'"हां...ते कुणीतरी असं रडत असतं, तेव्हा लागतं तेच ना ते?'
"हो।'"
आई आणि मी बघितला ना तो पिक्‍चर?'
"हो।'"
"तुम्ही नाही ना बघितलात?'
"नाही. मी तुमच्याबरोबर नव्हतो. पण मी तो आधीच बघितलाय।'"
"आधीच? आधीच कधी? तुम्ही "दूरदेशी' गेला होतात, तेव्हा का?'
("दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई' गाणं तिला पाठ आहे. दूरदेशी म्हणजे कुठेतरी लांब, एवढं कळतंही. पण ती त्याचा असा वापर करेल, याची काय कल्पना?)
------------

`रामदास'बोध!

सं त अंबुमणी रामदास महाराजांचा वर्ग सुरू होता. स्वतः रामदासबुवा व्यसनमुक्तीवर प्रवचन देत होते। समोर साक्षात "भीष्माचार्य' अमिताभ, "युधिष्ठिर' आमिर, "दुर्योधन' सलमान, संजूबाबा, यांसारखे ज्ञानी, अभ्यासू, विचारवंत श्रोते बसले होते। बिपाशा, करीना, दीपिका, प्रियांका यांसारख्या भक्तिणींचा मेळाही जमला होता। सध्या फारशा चर्चेत नसलेल्या मनीषा, राणी, प्रीतीसारख्या भक्तिणी एका बाजूला स्वेटर विणण्याचं सामान आणि तूप व वाती घेऊन बसल्या होत्या।

महाराजांची रसवंती झरझर पाझरत होती। अनेक श्लोक, ओव्या, जुन्या काळचे संदर्भ, ताज्या काळातली व्यसनाधीनतेची भीषण स्थिती, यांवरची उदाहरणांमागून उदाहरणं दिली जात होती. कोपऱ्यात बसलेल्या एका श्रोत्याचं मात्र या सगळ्याकडे लक्ष दिसत नव्हतं. तो धुराची वलयं सोडण्यात मग्न होता. "हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया'छाप भाव त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. अखेर रामदासबुवांनी त्याला झापलंच. "तुमच्या कीर्तनात व्यत्यय तर येत नाहीये ना? छातीचा खोका झाला, तर माझ्या होईल. तुम्हाला काय करायचंय? ' स्वभावाप्रमाणं आगाऊपणानंच त्यानं बुवांना विचारलं।
बुवा चरकले, तसंच श्रोतेही।
कुणी तरी विचारलं, "कोण आहे रे तो उर्मट माणूस? '
त्याच क्षणी शेजारच्यानं त्याच्या खाडकन मुक्सटात मारली।
""बॉलिवूडच्या "किंग'ला ओळखत नाहीस? '' पाठोपाठ प्रश्न आला।
बुवांनी शाहरुखला आणखी खडे बोल ऐकवले. शाहरुखही गप्प बसला नाही. शब्दाला शब्द वाढला आणि वातावरण एकदम तापलं. मग शाहरुखचे मित्रही त्याच्या मदतीला धावले. बच्चनही मदतीला धावले. नंतर बुवांनीच नमतं घेतलं आणि कीर्तन उरकून टाकलं।
मध्यंतरी काही काळ गेला. एरवी शांत, विचारवंत, बुद्धिवंत म्हणून प्रसिद्ध असलेला एक श्रोता - आमिर हा छुपा रुस्तम ठरला. एरवी कुठल्याही वादात आणि "सोहळ्या'त न पडणाऱ्या (आणि फक्त चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीच प्रेसशी जवळीक साधणाऱ्या) आमिरनं स्वतःच सिगारेटच्या व्यसनात अडकल्याचं कबूल करून टाकलं, तेव्हा रामदासबुवांसकट अख्ख्या चित्रपटसृष्टीला धक्का बसला. मात्र, भाच्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आपण या "विकतच्या दुखण्या'तून मुक्त होऊ, असंही जाहीर करून आमिरनं रामदासबुवांना थोडा धीर दिला. नेहमीच्या स्पर्धेप्रमाणं आधी व्यसन कोण सोडणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती।

स्वतः व्यसनाची कबुली देणारा आमिरच ग्रेट आणि व्यसन न सोडण्याचं जाहीर करणारा शाहरुख उद्धट, याविषयी कुणाचं दुमत नव्हतं. पण शेवटी "किंग'नंच बाजी मारली. रामदासबुवांच्या उपदेशाच्या डोसानं नव्हे, तर मुलांच्या प्रेमानं ही किमया केली होती. आपण विमानात 17 तास सिगारेटविना राहू शकतो, तर जमिनीवर का राहू शकणार नाही, असा साक्षात्कार "किंग'ला झाला. कदाचित, त्याला "स्टार' बनविणाऱ्या "बाजीगर'मधल्या एका वचनानं त्याला प्रेरणा दिली असावी- "हार कर भी जितनेवाले को "बाजीगर' कहते है।'

ता. क. - सिगारेट सोडण्याची "अफवा' शाहरुखनं पुन्हा नाकारली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा रामदासबुवांच्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा विचार त्याचे कुटुंबीय करत आहेत, म्हणे!