Jun 12, 2010

सौजन्याची ऐशीतैशी

""तीन पासपोर्ट साइझ फोटो आणावे लागतील!''
महाराष्ट्र बॅंकेच्या शाखेतील त्या बाई शक्‍य तेवढा नम्रपणा टाळून मला सांगत होत्या.
पीपीएफच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी मी बॅंकेत गेलो होतो. पैसे काढण्यासाठी फोटो कशाला, याचाच उलगडा प्रथम होईना. पण "बाबा वाक्‍यम प्रमाणम्‌' मानून मी दुसऱ्या दिवशी तीन फोटो घेऊन त्यांच्याकडे गेलो. पीपीएफ खात्याचे नूतनीकरण करून नवे पासबुक दिले जाणार होते. जुन्या खातेदारांनी त्यासाठी आणि बॅंकेच्या रेकॉर्डसाठी फोटो देणे आवश्‍यक होते. पण त्याचा खुलासा न करता "तीन फोटो आणून द्या!' असा तुच्छ आदेश माझ्या तोंडावर मारण्यात आला होता. त्या काळात बॅंकेत पीपीएफच्या व्यवहारासाठी गेलेल्या कोणत्याही ग्राहकाचे असेच स्वागत करण्यात येत होते. "पीपीएफ खातेदार वर्षातून एखाद-दोन वेळाच उगवतात. मग त्यांना सांगायचे कधी' असा युक्तिवाद बॅंक अधिकारी करू शकले असते. त्यामुळे अधिक चर्चा करण्याचे मी चतुराईने टाळले होते.
यंदा वेगळाच अनुभव आला. गेल्या मंगळवारीच पुन्हा बॅंकेत पीपीएफमधून पैसे काढण्याच्या चौकशीसाठी गेलो होतो. "त्या बाईंना भेटा' असा आदेश मिळाल्यानंतर तिकडे गेलो. त्यांनी किती रक्कम काढता येईल हे सांगितलं आणि पुन्हा स्लिप भरून दिल्यावर माझ्या लक्षात आलं, रेव्हेन्यू स्टॅंपही लागतो पैसे काढायला. तिथल्या कर्मचाऱ्यांकडून त्यावर शिक्कामोर्तब झालं. पुन्हा रेव्हेन्यू स्टॅंप शोधाच्या मोहिमेवर निघायला हवं होतं. रेव्हेन्यू स्टॅंपही हल्ली कोर्ट किंवा सिटी पोस्ट ऑफिसाशिवाय कुठेही मिळत नसल्यानं ती मोहीमही अवघडच होती. पण लगेच एवढी धावपळ करण्याऐवजी दुसऱ्या दिवशीच स्टॅंप घेऊन पुन्हा येण्याचं मी ठरवलं.
दुसऱ्या दिवशी गेलो, पुन्हा स्लिप सादर केली, पुन्हा त्या बाईंना भेटण्याचा आदेश मिळाला. बाई कामात होत्या. "जुनं पासबुक आणलंय का?' त्यांनी अगत्यानं विचारलं.
नवीन पासबुक या बॅंकेकडूनच घेतल्यानंतर मुळात मी जुनं पासबुक संग्रही सुद्धा ठेवण्याचा संबंध नव्हता. पण चिठ्ठ्याचपाट्या जपून ठेवण्याची खाज म्हणून हे पासबुक ठेवलं होतं. आत्ता सोबत मात्र आणलं नव्हतं.
""जुनं पासबुक कशाला?'' मी भोळेपणानं विचारलं.
त्यावरचा खात्याचा जुना नंबर त्यांना हवा होता, असं कळलं. ज्या बॅंकेनं त्यांच्याच खात्याचे नवे नंबर खातेदारांना दिले, नवी पासबुकं दिली, त्यांच्याकडे तेच नंबर रेकॉर्डवर नव्हते. माझं डोकं सटकू लागलं होतं, पण गरज मलाच असल्यानं स्वतःला सावरलं.
"तुमच्याकडच्याच खात्याचा नंबर तुमच्याकडे का नाही,' असं त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर त्याचा ढिम्म परिणाम झाला.
मग मी घरी फोन करून मनस्वी, बाळाला सांभाळणाऱ्या आमच्या मावशी आणि शेजारच्या छोट्या मुलीला कामाला लावून माझ्या ड्रॉवरमधून आधी पासबुक आणि नंतर त्याचा नंबर त्यांना शोधायला लावला. मग तो त्या बाईंना दिला. त्यातून त्यांनी कपाटातून बरंच जुनं बाड काढून माझ्या खात्याची माहिती ताडून पाहिली. त्यांची खात्री पटल्यावर माझा अर्ज दाखल करून घेतला.
आता लगेच मला पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. पण पुढच्याच प्रश्‍नानं पुन्हा धास्तावायला झालं.
"इथे सेव्हिंग अकाऊंट आहे ता तुमचं?' त्यांनी विचारलं.
नाही म्हटल्यावर बहुधा एक दिवस ड्राफ्टसाठी जाणार, अशी खूणगाठ मी बांधली. पण माझा अंदाज चुकला होता.
""दोन दिवस लागतील. सोमवारी या!'' बाईंनी शांतपणे सांगितलं.
""सोमवारी?'' मी ओरडलोच!
मी बॅंकेत मंगळवारी गेलो होतो. दोन दिवस धरले, तरी गुरुवारी ड्राफ्ट मिळायला हवा होता. सरकारी वेळापत्रकानुसार आणखी एक दिवस जादाचा धरला, तरी गेला बाजार शुक्रवारी माझं काम व्हायला काही हरकत नव्हती.
""अहो सोमवारपर्यंत दोन दिवस होत नाहीत!'' मी धाडस करून बाईंना म्हणालो.
""हे बघा, आम्ही दहा तारखेच्या आत कुणालाच पैसे देत नाही. आणि सध्या टॅक्‍सची कामं चालू आहेत.'' बाईंच्या आविर्भावात काही बदल नव्हता.
मी फार वाद घालत बसलो नाही. मलाही पैशांची फार घाई नव्हती. पुन्हा येणं शक्‍य नाही, अशातलाही भाग नव्हता. त्यामुळं मी पुढच्या कामांकडे वळायचं ठरवलं.
लोखंडी दरवाजाला लावलेल्या दोरखंडांच्या साखळीच्या खालून वाकून बॅंकेतून बाहेर पडलो. मनाला लावलेले पारंपरिकतेचे दोरखंड ही मंडळी कधी दूर करणार, हाच विचार त्या वेळी मनात आला...
 

Jun 11, 2010

जिवाची मुंबई

मला कबूल आहे, हा ब्लाॅग लिहिण्यासाठी उशीर झालाय, पण देर आए, दुरुस्त आए ना...

सुटीत मनस्वीला कुठे नेलं नव्हतं. मी पण वीसेक दिवसांची सुटी घेतली होती,
त्यात मुंबईला एक काम होतं. मग तिकडे मनस्वीलाही तिकडे घेऊन जायचं ठरवलं.
एका प्रेस काॅन्फरन्सला जायचं होतं, तेवढ्यापुरताच तिला सांभाळण्याचा
प्रश्न होता. गोरेगावच्या आत्याकडे मुक्कामाला गेलो होतो. तिथे मनस्वी
कशी आणि कितपत रमेल, असा प्रश्न होता. पण तिनं आत्याला गेल्यागेल्याच
गुंडाळून टाकलं आणि घराचा ताबा घेतला.

दुसऱया दिवसापासून आम्ही मुंबईत भटकंतीला सुरुवात केली. सकाळी
बोरिवलीच्या नॅशनल पाकर्ला भेट दिली. मी खूप लहानपणी तिथे गेलो होतो.
फारसं काही आठवतही नव्हतं. पण आजचा दिवस काही आमच्यासाठी शुभ नव्हता.
गेटवरच समजलं, की व्याघ्र आणि सिंहविहार बंद आहेत. सोमवारी बंदच असतात
म्हणे. पहिली माशी तिथेच शिंकली. मनस्वीही आतमध्ये चालत फिरण्यास फार
उत्सुक नव्हती. कशीबशी तिला रमवत आत नेलं. वनराणीची सफर केली. त्याच
मागार्वर असलेल्या हरणांच्या आणि सांबरांच्या विभागाला भेट दिली. त्यांना
गाजरं खायला घालताना मनस्वीची कळी जरा खुलली होती. नॅशनल पाकर्मध्ये
फिरायला दिवसभर लागेल असं वाटत होतं, पण दुपारी बारापयर्ंतच आमचा उत्साह
मावळला. कॅनरी केव्हजॆला जाण्यासाठी बस बंद होत्या आणि रणरणत्या उन्हात
चालत जाणं शक्य नव्हतं. मग दुपारी घरी आलो.

संध्याकाळी जुहूच्या बीचवर जायचं ठरलं. काकाही आमच्यासोबत आले.
गोरेगावपासून जुहूपयर्ंत प्रचंड गदीर्च्या बसमध्ये बसून पार आंबायला
झालं. तरी मनस्वी चिकाटीनं, कुरकूर न करता बसली होती, याचं आश्चयर्
वाटलं.

तिसऱया दिवशी माझ्या प्रेस काॅन्फरन्सच्या वेळी मनस्वीला घरीच ठेवलं.
तीही रमली होती. संध्याकाळी आम्ही तारापोरवाला मत्स्यालय बघायला गेलो.
तिथे ती रमली होती. मग समोरच्या भल्यामोठ्या फुटपाथवरून रमतगमत चालत
गेलो. (त्यालाच मरीन ड्राइव्ह म्हणतात, हे पुण्यात आल्यावर समजलं.)

तिथून टॅक्सीनं मग हॅंगिंग गाडर्नला गेलो. ती फार काही पाहण्यासारखी
नव्हती. शिवाय तिथे मनस्वी दंगा करताना पडली आणि पायाला छोटी जखम झाली.
त्यामुळे तिचा पुढे फिरण्याचा उत्साह मावळला. समोरच्या म्हातारीच्या
बुटाचं ओझरतं दशर्न घेतलं. लहानपणी नवा व्यापार खेळताना लक्षात ठेवलेली
नि विकत घेतलेली ही ठिकाणं आज पहिल्यांदाच पाहत होतो...

संध्याकाळी एल्फिस्टन रोडवरून ट्रेन पकडली, तरी फार गदीर् नव्हती.

बुधवारी मला पुण्याला यायला निघायचं होतं. अजून राणीची बाग बघणं आणि डबल
डेकरमध्ये बसणं बाकी होतं. सकाळी 11 वाजता घराबाहेर पडलो. मनस्वीला
सांभाळत, मोठ्या बॅगेचं ओझं खांद्यावर नाचवत लोकलनं दादर गाठलं. तिथून
चालत एशियाडच्या बसस्टाॅप पयर्ंत गेलो. दुपारच्या गाडीचं आरक्षण करण्याची
काही गरज नाही हे समजल्यावर तिथून पुन्हा राणीच्याबागेला जाण्यासाठी
दादरला आलो. लोकलने भायखळ्याला गेलो. स्टेशनवरून राणीची बाग किती लांब
आहे माहिती नव्हतं. घामाघूम अवस्थेत चालतही जाणं शक्य नव्हतं. टॅक्सी
केली नि ती वेग घेण्याच्या आधीच थांबली. राणीची बाग अगदी दोन मिनिटांच्या
अंतरावर आहे हे तेव्हाच समजलं. एवढा द्राविडी प्राणायाम करून राणीच्या
बागेच्या दारात पोचलो, तेव्हा कळलं की आज बुधवार असल्यानं बाग बंद आहे.

मुंबईला जाण्याचं मोठं आकषर्ण होतं ती राणीची बाग. मीही कधीच तिथे सफर
केली नव्हती आणि कुणाकडून तिची वेळ आणि सुटीचा दिवस, हेही समजलं नव्हतं.
बोरिवलीच्या पाकर्मध्ये सोमवारी गेलो, तर तो नेमका त्यांचा सुटीचा वार
होता. पण निदान आम्हाला वनराणीत तरी बसता आलं होतं. इथे राणीच्या बागेला
बुधवारी सुटी होती आणि आम्हाला नेमका तोच मुहूतर् मिळाला होता. जाम वैताग
आला. एकंदरीत आजचा दिवस फुकट गेला होता. एवढा व्याप करून भायखळ्यापयर्ंत
आलो, त्याचाही काही उपयोग झाला नव्हता.

आता दुसरं एक आकषर्ण राहिलं होतं, डबलडेकरचं. पण तिथे पंधरा-वीस मिनिटं
थांबल्यानंतर कुणीतरी सांगितलं, की तिथे डबलडेकर येतच नाही. ती बंद होऊन
बरीच वषर्ं झाली म्हणे. मी लहान असताना मलाही डबलडेकरचं फार आकषर्ण होतं.
पण पूवीर् बोरिवलीमध्येही डबलडेकर यायची. आता ती बंद झाल्यानंतर निदान दक्षिण मुंबईत कुठेतरी मिळेल, अशी आशा होती. तिच्यावरही पाणी पडलं.


डबलडेकर हवी असेल तर सीएसटीला जावं लागेल, असं कुणीतरी सांगितलं. हाताशी
फार वेळ नव्हता. शिवाय पुन्हा मनस्वीला सांभाळत आणि बॅग नाचवत तिकडे
जाण्याचा उत्साह नव्हता. तरीही तिच्यासाठी गेलो असतो, पण तिनं फार काही
उत्सुकता दाखवली नाही. मुंबईत फिरता आलं, याचंच समाधान तिला होतं. शिवाय
पुण्याला परतीचे वेधही लागले होते. मग आम्ही पुन्हा मजल दरमजल करत
दादरच्या एशियाड स्टॅंडपयर्ंत आलो. आमच्यासाठी गाडी तयारच होती. एसी
बसमुळे येतानाचा प्रवास सुखाचा झाला.

लहानपणापासून मी मुंबईला अनेकदा गेलो, पण उपनगरांच्या बाहेर फारसा पडलो
नव्हतो. मला मुंबई दाखवण्यासाठी कुणाकडे वेळ नव्हता. मग मी मोठा झाल्यावर
एकटाच कुठेकुठे फिरून ठिकाणं पाहिली. गेटवे, घारापुरी लेणी वगैरे. आता
मनस्वीला दाखवण्याच्या नादानं माझीही राहिलेली काही ठिकाणं पाहून झाली.
तरी अजून हजी अली, टिटवाळा, नेहरू सेंटर वगैरे बाकी आहेच. शिवाय राणीची
बाग आणि नॅशनल पाकर्चा व्याघ्रविहारही पुन्हा पाहावा लागेल. बघूया, कधी
आणि कसं जमतंय ते...