Oct 7, 2008

सौजन्याची ऐशी तैशी

खादीच्या कपड्यावर असलेल्या सवलतीचा फायदा घेऊन भरपूर खरेदी करून आपण महात्मा गांधींचं स्मरण दरवर्षी करत असतो. ही झाली सर्वसामान्यांची पद्धत. मोठ्या लोकांचं सगळंच निराळं असतं. आता हेच बघा ना...ज्येष्ठ समाजसुधारक अंबुमणी रामदास (स्वामी) यांनी यंदाच्या गांधी जयंतीचं निमित्त साधून भारतातील समस्त मानवजातीला सिगारेटच्या व्यसनापासून वाचविण्याचा विडा उचलला. (खरं तर "विडा' हेही व्यसनच. पण ते असो!) तसंच आपल्या राजकीय नेत्यांनी सौजन्य सप्ताह पाळायचं ठरवलं.

वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका, हा गांधीजींचा संदेश. आपल्या धुरंधर राजकारण्यांनी त्यात थोडं "इम्प्रोवायझेशन' करून "वाईट करू नका आणि केलेलं निस्तरून टाका,' ही नवी शिकवण अंगी बाणवली। जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भावी अध्वर्यू अजितदादा पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉंग्रेसच्या एका बड्या मंत्र्यावर आणि अन्य काही नेत्यांवरही टीका केली। दुसऱ्या दिवशी गांधी जयंतीचा संकल्प आठवल्यावर त्याबद्दल खुलासा करून टाकला.

मुलायमसिंह यांनी जुने वैर विसरून सोनिया गांधींची विमानतळावरच धावती (की उडती?) भेट घेतली. अमरसिंहांनी नारायण राणेंची भेट घेतली. ही भेट "बिझनेस'संबंधी होती असं जाहीर झालं असलं, तरी ती राजकीय "धंदा' चालविण्याच्या दृष्टीनेची चाचपणी होती, अशी अफवा आहे।

पुण्यात पत्रकारांच्या अधिवेशनात शरद पवार, गोपीनाथ मुंडे, नारायण राणे एकत्र आले। त्यांचाही कलगीतुरा रंगला, पण सौजन्यपूर्ण वातावरणात। पवारांनी राणेंना पुढील वेळी मुंडेंना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला देऊन टाकला। मुंडेंनीही राणे, पवारांना कोपरखळ्या मारल्या, पण गोडीगोडीनं....आणि या सौजन्य सप्ताहाचा समारोप झाला तो थाटामाटात, वाजतगाजत आणि कुणीही कधीही अपेक्षा केली नव्हती, अशा घटनेनं. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंवरील खटला मागे घेऊन आपली लढाई संपल्याचंही जाहीर करून टाकलं! उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बैठकही झाली. लखोबा, टी. बाळू, अशा सर्व विशेषणं गोदावरीत विसर्जित झाली.

या सर्व घटनांत अर्थातच कोणाचाही स्वार्थ, राजकीय फायदा नव्हता। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांशी या घडामोडींचा संबंध जोडणाऱ्याला नतद्रष्टच म्हणावं लागेल. गांधी जयंतीनिमित्तानं पाळलेल्या सौजन्य सप्ताहाच्या यशस्वितेसाठी प्रत्येक नेत्यानं आपापल्या परीनं टाकलेली ती भर होती. प्रत्येकानं यथाशक्ती त्यासाठी मदत केली.मुख्य प्रश्‍न पुढे आहे. गांधी जयंतीनिमित्त या सर्वांनी अहिंसेचा, प्रेमाचा, वसुधैव कुटुंबकम्‌ चा संदेश बिंदेश दिला हे ठीक आहे! पण पुढच्या आठवड्यात रावणदहन आहे आणि त्यानंतर नरक चतुर्दशी! एरव्ही वर्षभर हा मुहूर्त साधणाऱ्या या नेत्यांवरची जबाबदारी आता वाढली आहे

---