Around the corner, I have a friend,
In this great city that has no end,
Yet the days go by and weeks rush on,
And before I know it, a year is gone.
And I never see my old friends face,
For life is a swift and terrible race,
He knows I like him just as well,
As in the days when I rang his bell
And he rang mine but we were younger then,
And now we were busy, tired men.
Tired of playing a foolish game,
Tired of trying to make a name.
`Tomorrow' I say! `I will call on Jim
Just to show that I'm thinking of him."
But tomorrow comes and tomorrow goes,
And distance between us grows and grows.
Around the corner, yet miles away,
``Here's a telegram sir, `Jim died today.'
And that's what we get and deserve in the end.
Around the corner, a vanished friend.
-एक अज्ञात कवी. (इंटरनेटवरून साभार.)
--------------------
बिनचेहर्याच्या अफाट शहरात
होता मला एक जीवलग मित्र
जणू हरवलेल्या माणसांमधलं
माझं रंगभरलं हिरवं चित्र
तो मला आवडायचा अन
मीही, त्याला आवडायचो फार
चर्चा, मस्करी, थट्टेला
पूर यायचा अपार...
पण हळूहळू दिवस सरले...
पाहता पाहता वर्षही सरलं...
माझ्या मित्राचं मी तोंडही नाही पाहिलं
हे तेव्हा कुठे मला आठवलं!
आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची
कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली
नाव, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा होता खेळ
खेळता खेळता नुरला मित्रासाठी वेळ...
पण आता केला निश्चय
अन ठरवलं मनाशी ठाम
उद्य करू फोन त्याला अन सांगू,
`मला तुझी दोस्ता याद येते जाम'
पण `उद्या' आला अन `उद्या' गेला
आमच्यातला दुरावा वाढतच गेला...
एके दिवशी अचानक तार आली..
तार होती, की मित्राला देवाज्ञा झाली!
कसलं आयुष्य, कसली स्पर्धा,
कसली शर्यत अन कसलं काय...
पाहता पाहता मैत्र संपलं,
हाती माझ्या उरलं काय...
बिनचेहर्यांच्या या अफाट शहरात
आता कुठला दोस्त, कुठली दोस्ती...
मित्र गमावलेल्या चेहर्यांची
गर्दी माझ्या सभोवती...
- श्रीपाद ब्रह्मे. (स्वयंस्फूर्त.)
-----------------
तुंबलेल्या कोंदट खोलीत
होता एक `जवळचा' मित्र
त्याच्याविना विचारत नव्हतं
मला काळं कुत्रं
एकाच खोलीतलं जिणं
अन एकाच ग्लासातलं पिणं,
आसपासच्या जगाशी
आम्हाला देणं ना घेणं
घरून आलेला `पॉकेटमनी'
अर्धा महिनाच पुरायचा
उधार-उसनवार्यांनी
उरला महिना काढायचा
समोरच्या टुमदार बंगल्यातली
`गोरटेली' दोघांना आवडायची
तिच्या स्वप्नांतच आमची
एकेक रात्र सरायची..
माझेच कपडे, परफ्यूम वापरून
साल्यानं तिला पटवलं
आपलं `खोटं नाणं' तिच्या
बापाच्या बंकेत वटवलं
उद्या भेटतो सांगून
तो गेला तो गेलाच!
माझ्या जिवावर जगून
माझ्यासाठी `मेलाच!'
`उद्या' आला
आणि`उद्या' गेला
पण माझा `जवळचा' मित्र
कधीच नाही भेटला
कधी जातो आमच्या अड्ड्यासमोरून
त्याच्या आलिशान मोटारीतून
अन बघतो तुच्छतेनं
काळ्या काचांपलीकडून
त्याच जुन्या कोंदट खोलीत
आता मी एकटाच राहतोय
बंगलेवाल्या पोरींकडे
आता `वेगळ्या' नजरेनं पाहतोय...
- अभिजित पेंढारकर. (आगाऊपणे स्वयंस्फूर्त.)
----------------
जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Feb 9, 2008
Feb 5, 2008
लग्नात `पंच' आहे!
आज ६ फेब्रुवारी.
(थोडक्यात पार्श्वभूमी : हर्षदाला डोहाळजेवणासाठी रत्नागिरीला जायचं होतं. पण बस प्रवासाचा त्रास झाला असता. म्हणून आम्ही पुण्याहून पनवेल पर्यंत बसने, आणि तिथून कोकण रेल्वेने रत्नागिरीला गेलो.येताना कोल्हापूरपर्यंत बस, आणि तिथून रेल्वेने आलो.केवढा द्राविडी प्राणायम!
माझं गं गरोदरपण
माझं गं गरोदरपण
माझ्या गरोदरपणाने
माझ्या गरोदरपणातआहे
माझ्या गरोदरपनात
माझ्या गरोदरपणाचा
माझ्य गरोदरपणात
माझ्या गरोदरपणात
माझ्या बाळंतपणानंतर
माझ्या बाळंतपणासाठी
लग्नाचा पाचवा वाढदिवस.
म्हणजे, आयुष्यातल्या वर्षांत `घट' होण्याचा आणि प्रेमात `वाढ' होण्याचा दिवस.
पाच वर्षं हर्षदानं मला सहन केलंय!आणि जगलो वाचलो, तर आणखी ३०-४० वर्षं तरी करेल, अशी आशा आहे.
लग्नानंतर मी खूपच बदललो. आधी ५८ किलो होतो. आत ८४ किलो झालोय.
आधी भोळा, कुणावरही विश्वास टाकणारा होतो. आता रूढ अर्थानं `लबाड' झालोय.
लग्नासाठी तरी किती आटापिटा केला!
किमान चार संस्थांमध्ये नाव-नोंदणी, प्रोफाइल्स पाहण्यात घालवलेले तासंतास, `साथ-साथ'मध्ये सक्रिय सहभाग, २०-२२ मुलींना `पाहण्याचा' भीषण (याहून भीषण शब्द आहे?) अनुभव!काय अन काय!हर्षदाला मी ओळखत होतो, आणि तीही मला.`सकाळ' पतपेढीत कामाला होती ती. तेव्हा पाहिलं होतं. पण तेव्हा तिचा `बायको' म्हणून विचार नव्हता केला. म्हणतात ना, काखेत कळसा नि गावाला वळसा! तेव्हा एके ज्येष्ठ सहकर्यांनी तिचं नावही सुचवलं नव्हतं मला. पण गाडं पुढे गेलं नाही.
आपण काही most eligible bachelor नाही, हे लक्षात यायला (अपेक्षेप्रमाणेच) खूप वेळ लागला. त्यामुळे लग्नाच्या बाजारात आधीचे उंची, आवडी-निवडी, स्वभाव, वगैरे आधीचे सगळे निकष थोडे शिथिल झाले.पुन्हा दुसर्या एका सहकार्यनं हर्षदाचं नाव मला सुचवलं.तेव्हा मीही भेटून तर `बघूया' म्हटलं.तिच्या घरी आम्ही दोघंच भेटलो, आणि चर्चा केली. तिला भेटायला जाताना तिचा चेहराही मला आथवत नव्हता. (पतपेढीत कामानिमित्त दोन-तीनदाच भेटलो आनि एखद-वेळेलाच बोललो होतो. पतपेढीतून कर्ज काधताना त्याचं `प्रकरण' होईल, अशी कल्पना नव्हती.)आपलं जमू शकतं, हे पहिल्याच प्रत्यक्ष आणि निवांत भेटीत जाणवलं मग माझ्या आग्रहाखातर आम्हि एक नाटक पाहिलं, त्याच्यावर चर्चा केली. तिचे विचार आवडले, पटले. मुख्य म्हणजे, ती टिपिकल `पुणेकर' नाही, ही लक्षात आलं. आधुनिक विचारांची अस्ल्याचंही जाणवलं. मला थोडा आणखी वेळ हवा होता, पण तिला निर्णयाची घाई होती. मग पुन्हा आम्ही भेटलो आणि फायनल करून टाकलं.माझ्या मनासारखी जोडीदार अखेर मला मिळाली होती.
संसार यशस्वी झालाय, असं आतापर्यंतच्या अनुभवावरून तरे म्हणता येइल. पुढचं पुढे.
तीन वर्षाचं एक गोड पिल्लूही आहे आता सोबत.मजा येतेय.दुसर्या पर्यायाचा विचार सध्या तरी नाही. (हर्षदा हा ब्लॉग वाचणार नाही, अशी आशा आहे.)
बायकोचं खूप कौतुक केलं. पुरे ना आत?
तुम्हालाही अशीच मनासारखी बायको (किंवा गेला बाजार, `बायको तरी') मिळो, ही शुभेच्छा!
--------
--------
बाय द वे,डोहाळजेवणाच्या वेळी केलेलं हे काव्य वाचा.
(थोडक्यात पार्श्वभूमी : हर्षदाला डोहाळजेवणासाठी रत्नागिरीला जायचं होतं. पण बस प्रवासाचा त्रास झाला असता. म्हणून आम्ही पुण्याहून पनवेल पर्यंत बसने, आणि तिथून कोकण रेल्वेने रत्नागिरीला गेलो.येताना कोल्हापूरपर्यंत बस, आणि तिथून रेल्वेने आलो.केवढा द्राविडी प्राणायम!
`तुम्हाला मूल होणं शक्य नाही! तेव्हा अमक्या टेस्ट करा, तमकी औशधं खा,' असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. सहज म्हणून सोनोग्राफी केली असता, ही गोड बातमी कळली. तेव्हा मनस्वी पोटात तीन महिन्यांची होती!)
माझ्या गरोदरपणात
आहे त्रास वारेमाप
अन डोकियाला ताप
अभिजितच्या
माझं गं गरोदरपण
थोडं लांबलं पण
होती सारखी भुणभूण
इतरांची
माझं गं गरोदरपण
कळलं तीन महिन्याअंनी
होता घरच्यांनी
धीर सोडला
माझं गं गरोदरपण
मला तेव्हाच कळलं
सोनोग्राफीत पाहिलं
जेव्हा बाळाला
माझ्या गरोदरपणाने
पाच डॉक्टर पाहिले
आणि खूप ऐकले
सल्ले विकतचे
माझ्या गरोदरपणातआहे
डोहाळजेवण म्हणून
जगप्रदक्षिना करून
आले रत्नगिरीला
माझ्या गरोदरपनात
बाळ सारखं ढुशा देतं
कधे आइस्क्रीम मागतं
कधी वडापाव
माझ्या गरोदरपणाचा
काळ मला सुखावतो
अभिजित पुरवतो
लाड माझे
माझ्य गरोदरपणात
नवरा किती काळजी घेतो
उष्टी-खरकटी काढतो,
घासतो भांडी
माझ्या गरोदरपणात
रोज पौष्टिक आहार
सुटले पोटही फार
अभिजितचे
माझं गं बाळंतपण
पार पडो सुरळीत
बाळ होवो गुटगुटीत
आम्हा दोघांचे
माझ्या बाळंतपणानंतर
बाळ दंगा करेल भारी
पुढच्या वर्शी तयारी
त्याच्य भावंडाची
माझ्या बाळंतपणासाठी
त्रास सारखा वेचीन
खूप मागे पडो `चीन'
भारताच्या!
----------------
चित्रपट परीक्षणं...मला आवडलेली आणि सिनेमावाल्यांना नावडलेली...
1. शंभू माझा नवसाचा
----------
शंभू माझा "हौसे'चा
-------
देव भक्तांची परीक्षा पाहतो म्हणतात. त्याच्या कसोटीला उतरेपर्यंत त्यांना प्रसन्न होत नाही. "शंभू माझा नवसाचा'मधला शंभू असाच (चित्रपट)भक्तांची परीक्षा पाहतो. त्यांची पूर्ण सत्त्वपरीक्षा पाहिल्याखेरीज "समाप्त' या पाटीचं "विश्वरूपदर्शन' देत नाही.श्रद्धाळू असणं हा गुन्हा नाही. दुसऱ्याला देवाचं महत्त्व पटवून देणं आणि अस्तित्व समजावणं, हाही गुन्हा नाही. पण देवाला मानल्याशिवाय तुमचं भलं होणार नाही, किंबहुना, देवाला मानलं नाहीत, तर तुमचं वाईट होईल, असं सांगणं म्हणजे घोर अपराध आहे. "शंभू...'सारखा भक्तिपट तो आजही करत आहे.
नीता देवकर निर्मित, सुभाष फडके दिग्दर्शित या चित्रपटात एक सरळमार्गी, विज्ञाननिष्ठ प्राध्यापक शंभू (मिलिंद गुणाजी), त्याची देवभक्त पत्नी (अलका आठल्ये) आणि मुलगी भैरवी (भैरवी गोरेगावकर) यांची कथा आहे. कॉलेजातील विद्यार्थिनी सोनिया (तेजा देवकर) शंभू सरांवर भाळते आणि तिच्यामुळे त्यांच्या संसारात वादळ येतं. शंभू हा देव न मानणारा. शिखर शिंगणापूरला तो नवस फेडायला जात नाही, म्हणून त्याच्यावर एकामागून एक संकटं येतात आणि शेवटी देवाच्या पायावर धाव घेतल्यावर ती टळतात, असा चित्रपटाचा आशय. एखाद्यानं हौसेपायी चित्रपट काढावा आणि कोणत्याही गोष्टीकडे गांभीर्यानं पाहू नये, तसंच झालंय. कथा पटण्याजोगी नसली, तरी नाट्यमय आहे. पण पटकथा आणि संवाद लिहिताना प्रसंगांची नाट्यमयता, लांबी, परिणाम, यांचा विचारच झालेला दिसत नाही. त्यामुळं दर दोन मिनिटांनी कुणीतरी "ट्यॉंव' करून व्हायोलिन वाजवतं आणि पडद्यावर त्या वेळी हजर असलेल्या व्यक्तीची टिपं गाळायला नाहीतर भावनांचे कढ काढायला सुरवात.
'वेड्या वयातलं वेडं प्रेम' म्हणून सोनियाच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची सहानुभूतीही मिळवून द्यायची आहे, ती खुनशीही दाखवायची आहे आणि विक्षिप्तही दाखवायची आहे...शंभू, त्याची बायको, भाऊ, वडील यांना आगे-मागे कुणीच नाही. त्यांना सख्खा, सावत्र, मावस, आते, चुलत कुठलाही नातेवाईक/मित्र नाही. आनंदातही तेच आणि संकटातही तेच. "बजेट' कमी करण्यासाठी एवढी ढिलाई?
मिलिंद गुणाजी, नागेश भोसले, अलका आठल्ये, किशोर महाबोले आणि राजेश शृंगारपुरे यांचं काम सफाईदार. प्रसाद ओक याला काही वाव नाही. तेजा देवकरचे उच्चार, संवादफेक प्रचंड सदोष आहे. त्यातून तिच्यासह सर्वांनाच एकाच जागी उभे राहून लांबलचक, भलेमोठे संवाद म्हणायला दिलेत. त्यामुळं काही काही दृश्यं संपतच नाहीत.
"गडामधी गड रे' याच्यासह बाकीचीही गाणी तेवढी उल्लेखनीय. बाकी व्यावसायिकतेपेक्षा सगळा "हौसे'चाच मामला वाटतो.
-----------
2. मुक्काम पोस्ट लंडन
लंडनमध्ये चित्रीकरण केलेला मराठी चित्रपट
"केदार शिंदेचा नवा सिनेमा' अशी जाहिरात पाहून मनात काय येतं? अडीच तास धमाल, हास्यस्फोटक, खुर्चीत उसळवत ठेवणारा चित्रपट...होय ना? पण "मुक्काम पोस्ट लंडन' चित्रपटाबद्दल अशा अपेक्षा ठेवून गेलात, तर त्या फारशा पूर्ण होत नाहीत. "लंडनमध्ये चित्रीकरण केलेला पहिला मराठी चित्रपट' एवढीच ओळख लक्षात राहते.
"मुक्काम पोस्ट लंडन' हा वेगळ्या हाताळणीचा, चांगला चित्रपट आहे; पण केदार शिंदेच्या शैलीतला विनोदी धुमाकूळ नाही. त्यामुळं एक चांगला, वेगळ्या सादरीकरणाचा चित्रपट पाहिल्याचा आनंद "मुक्काम पोस्ट लंडन' देतो, केदार शिंदेचा चित्रपट पाहिल्याचा नाही. सातारा जिल्ह्यातील काळचौंडीचा वैजनाथ हंपनवार (भरत जाधव) लहानपणापासून पोरका. वडील (मोहन जोशी) जिवंत आहेत आणि आपल्या लहानपणीच ते आईला सोडून लंडनला निघून गेलेत, हे त्याला आईच्या निधनानंतर कळतं. त्यांना जाब विचारायला तो लंडनला जातो आणि तिथे वेगळ्या रूपातील वडिलांबरोबर प्रवास करताना त्यांच्यात अनोखे बंध निर्माण होतात, अशी ही कथा.
स्वतःला "सातारा डिस्ट्रिक्ट फाकडो' (एसडीएफ) म्हणवणारा, गांधी टोपी, लेंगा, झब्बा आणि कोट अशा वेशातला एक मऱ्हाटी माणूस लंडनमध्ये गेल्यावर काय काय धुमाकूळ घालेल, असा विचार मनात येतो; परंतु त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट नाही. प्रेक्षकाचा पहिला अपेक्षाभंग तिथेच होतो. केदार शिंदेंनी चित्रपटाची भावनिक हाताळणी केली आहे आणि त्यात त्यांना यशही आले आहे; पण त्यांच्या चाहत्या वर्गाला ही हाताळणी अपेक्षित नसेल, तर झेपत नाही. सुरवातीची पंधरा मिनिटं सोडली, तर पुढचा चित्रपट वैजनाथ, त्याचे वडील आणि त्यांची सेक्रेटरी (मृण्मयी लागू) यांच्या एका गाडीतील प्रवासातच संपूर्ण चित्रपट घडतो. त्यामुळे अनपेक्षित, धक्कादायक विनोदी प्रसंगांना चित्रपटात स्थान नाही.
पंचवीस वर्षं एकमेकांपासून दुरावलेले पिता-पुत्र वेगळ्या परिस्थितीत एकत्र आल्यानंतर त्यांच्यात जे भावनिक बंध निर्माण होतात, ते केदार शिंदे आणि संवादलेखक मच्छिंद्र मोरे यांनी छान रंगवले आहेत. बराचसा चित्रपट लंडनमध्ये घडत असला, तरी लंडनचं "दर्शन' चित्रपटात फारच थोडा काळ घडतं. भरत जाधव, मोहन जोशी यांसारखे दिग्गज कलाकार जीव ओतून काम करतात. काही प्रसंग त्यांनी उत्तम रंगवलेत. मृण्मयी लागू हिनेही पाश्चात्त्य लहेजा चांगला सांभाळला आहे.
निर्माते कमल शेठ यांनी पहिला मराठी चित्रपट लंडनमध्ये चित्रित करून मोठं पाऊल उचललं आहे. मराठी चित्रपटाच्या कीर्तीबरोबरच प्रत्यक्ष चित्रपटही सातासमुद्रापार नेण्याच्या मोहिमेतलं हे महत्त्वाचं पाऊल ठरावं.
---
3. आबरा का डाबरा
जरा जपून "घाबरा'
जादू हा आबालवृद्धांच्या आवडीचा, कुतूहलाचा विषय. जादू आपल्यालाही करता यावी, अशी अनेकांची इच्छा असते. मग अशी जादूची शाळाच असली तर...? "आबरा का डाबरा'मध्ये ही जादूची शाळाच मध्यवर्ती आहे.
कथा ः "आबरा का डाबरा' या जादू शिकवणाऱ्या शाळेत शानू (अथित नायक) हा मुलगा दाखल झाला आहे. जादूच्याच एका प्रयोगात ढोंगीपणाचा आपल्या वडिलांवर बसलेला शिक्का त्याला पुसायचा आहे. आपले वडील जिवंत असून, ते शाळेची प्रमुख आर. बी. (टियारा) हिच्या ताब्यात असल्याचं त्याला शाळेत आल्यावर कळतं. मग तो वडिलांच्या सुटकेसाठी आणि आर. बी.ला धडा शिकविण्यासाठी प्रयत्न करतो... वेगळं काय? ः अर्थातच "थ्रीडी' हे तंत्रज्ञान आणि त्याच्या गमतीजमती. मुळात लहान मुलांसाठीचे चित्रपट कमी बनतात आणि जादूसारखा विषय पूर्णपणे हाताळणारे तर अगदीच कमी. जादू मुळातच सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय. "थ्रीडी' स्वरूपात ही जादू प्रेक्षकांपुढे येते, म्हणून अधिक गंमत.
चांगलं काय? ः जादूच्या करामती. अथित नाईक, हंसिका मोटवानी, इशा त्रिवेदी, विशाल लालवानी या बालचमूची झकास कामं. अनुपम खेर, सतीश कौशिक, अर्चना पूरणसिंग या मंडळींची कामगिरीही उजवी. संगणकाच्या साह्याने साकारलेल्या करामतीही अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांच्या तोडीच्या आहेत. त्यामुळे बालचमूला खुर्चीत उसळायची बरीच संधी आहे.
मोठ्यांसाठी काय? ः लहानांच्या या चित्रपटात फक्त मोठ्यांना पाहण्यासारखीच दोन गाणीही आहेत. चित्रपटातली मुलंही गाण्यांच्या वेळचं हे दृश्य पाहताना एकमेकांच्या डोळ्यांवर हात ठेवतात. मग चित्रपटात अशी गाणी कशाला?
कंटाळवाणं काय? ः बिस्किटं, रंग, पेन्सिली, रंगीत खडू, यांच्या चित्रपटभर धुमाकूळ घालणाऱ्या जाहिराती. निर्माते-दिग्दर्शक धीरजकुमार यांना दूरचित्रवाणी मालिकांची सवय अंगवळणी पडल्यामुळं चित्रपटाच्या मध्येमध्येही अशा जाहिराती दिसल्या नाहीत, तर प्रेक्षकांना करमणार नाही, असा त्यांचा समज असावा.
टाकाऊ काय? ः प्रभुदेवाचं गाणं. पौराणिक मालिकांची धीरजकुमार यांना एवढी सवय झालेय, की चित्रपटातही त्यांनी तशा मालिकांसारखीच भडक दिसणारी आणि बोलणारी पात्रं घुसडली आहेत. लहान मुलांसाठी प्रभुदेवा "शिववंदना' सादर करतो. त्यातदेखील धीरजकुमार पुजाऱ्याच्या रूपात बरीच स्तोत्रं वगैरे म्हणून डोकं खातात. परमेश्वरावरची निष्ठा प्रेक्षकांच्या माथी मारायची गरज काय?
...आणि त्रासदायक? ः चित्रपटाचं सगळ्यात मोठं आकर्षण. अर्थात, "थ्रीडी' तंत्रज्ञान आणि गॉगल. गॉगलचा दोष की पडद्याचा, की तंत्रज्ञानाचा ते माहीत नाही. पण चित्रपट पाहताना प्रचंड त्रास होतो. "थ्रीडी'मुळे दृश्यं अंगावर येत नाहीतच, उलट डोळे चुरचुरतात.
एकूण काय? ः मुलांसाठी एवढा खर्चिक चित्रपट बनवण्याचं धीरजकुमार यांचं धाडस कौतुकास्पद. लांबी थोडी कमी करून, भरमसाट गाण्यांचा मोह टाळून, "थ्रीडी'तंत्राविनाही चित्रपट बनवला असता तर अधिक मजा आली असती.
--------
4. क्रिश
फुस्स...!
फुस्स...!
सु परहिरोचा चित्रपट म्हणून काय काय कल्पना आपल्या डोक्यात येतात? त्याचं छानसं निसर्गरम्य गाव, सहलीच्या निमित्तानं तिथं येणारी परदेशातली "राजकन्या', दऱ्याखोऱ्यांच्या परिसरात "ऍडव्हेंचर'साठी आलेल्या तिचा त्या परिस्थितीतही कायम असलेला "स्टाईल कोशंट', खलनायकाचा अत्याधुनिक "हायटेक' अड्डा....बरोबर ना? '
अहो असं काय करता, तुम्ही याच गोष्टींसाठी "क्रिश' पाहायला जाणार ना? नाही...? चुकतंय काहीतरी..? राकेश रोशनना मात्र तसंच वाटतं हं! "क्रिश'मध्ये हे सगळं आहे. त्याशिवाय "कोई मिल गया'मधल्या रोहित आणि त्याच्या पत्नीचं पुढं काय झालं, त्यांच्या आयुष्यात आधी काय घडलं होतं, याचेही तपशील आहेत. कमतरता आहे ती पहिल्या भारतीय "सुपरहिरो'च्या "सुपर' करामतींची. "कोई मिल गया'मधल्या रोहितचा मुलगा कृष्णादेखील त्याच्याच सारखा, किंबहुना त्याच्याहून अधिक दिव्यशक्ती घेऊन आलेला असतो. त्याच्याशी ताटातूट होऊ नये म्हणून त्याची आजी (रेखा) त्याला दूर एका गावात नेऊन ठेवते. तिथंच त्याला त्याची नायिका भेटते. तिच्या ओढीनं तो सिंगापूरला जातो आणि तिथे त्याच्यातला "सुपर हिरो' जागा होतो. या दिव्यशक्तींचा गैरवापर करू इच्छिणाऱ्या खलनायकाला तो नेस्तनाबूत करतो वगैरे वगैरे.
भारतीय चित्रपटातला पहिला "सुपरहिरो' म्हणून या "क्रिश'कडून बाळगोपाळांसह मोठ्यांनाही काय काय अपेक्षा असणार! त्यानं जगावेगळ्या करामती दाखवल्या पाहिजेत. 50 कोटींचा चुराडा ज्यासाठी केलाय, तो थरार, साहस, उत्कंठा जागोजाग जाणवली पाहिजे ना? एक तर अर्धाअधिक चित्रपट होईपर्यंत या "कृष्णा'तला "क्रिश' जागाच होत नाही. उरलेल्या वेळात तो करतो काय, तर सर्कशीतल्या आगीतून मुलांना वाचवतो, जमिनीवरून गाड्यांहून जास्त वेगाने पळतो, इमारतींच्या छतावरून इकडेतिकडे उड्या मारतो, खलनायकानं झाडलेल्या गोळ्या हवेतल्या हवेत परतवतो. हे करायला "सुपरहिरो' कशाला पाहिजे? ते तर आपले रजनीकांत, मिथुन वर्षानुवर्षं करतायंत की! साधं हेलिकॉप्टर या "सुपरहिरो'ला अडवता येत नाही. शी! बावळट!
अर्थात, केलेला प्रचंड खर्च चित्रपटात दिसतो. सुंदर चित्रीकरण स्थळं, नायक करतो त्या छोट्यामोठ्या करामती, सिंगापूरमधली दृश्यं, सगळं बघण्यासारखं आहे. पण त्यातून "सुपर हिरो'कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. हा सुपर हिरो आधी आजीच्या कुशीत आणि मग प्रेयसीच्या प्रेमात रमण्यातच आपला बराचसा वेळ घालवतो. "क्रिश'चं कौतुक करायला हवं, ते सुरवातीपासून कुठंही कंटाळा येऊ न देणाऱ्या कथेबद्दल. जुन्या कथेशी योग्य मेळ साधून रचलेल्या पटकथेबद्दल. रंजक सादरीकरणाबद्दल आणि हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा, नसिरुद्दीन शाह, रेखा, यांच्या सहज अभिनयाबद्दल. बाकी राजेश रोशन यांचं संगीत भावाच्या आधीच्या चित्रपटांच्या दर्जाला साजेसं नाही.
राकेश रोशन यांनी तीन तासांची निर्मळ, निखळ करमणूक दिलीय, पण ते भावभावना आणि निसर्गरम्य चित्रीकरणातच जास्त अडकलेत. "सुपरमॅन', "स्पायडरमॅन'सारख्या अपेक्षा ठेवल्या नाहीत, तर हा भारतीय "सुपरहिरो' चांगली करमणूक करू शकेल, एवढं नक्की.
--------
5. धूम-2
छोटू ः बंट्या, आम्ही ना, काल एक मस्त सिनेमा पाह्यला.
बंटी ः हो...sss? कुठला?
छोटू ः धूम! त्यात ना, खूप खूप गमतीजमती होत्या. मज्जा आणि जम्माडी जम्मत होती.
बंटी ः हो, जम्माडी जम्मत म्हणजे काय रे?
छोटू ः ह्यॅ! तुला तर काही माहितीच नसतं बाबा...अरे, हा आधीच्या "धूम'पेक्षा भारी सिनेमा आहे माह्यतेय? पहिल्या सिनेमात कशा भारीभारी गाड्या होत्या, त्यापेक्षा खूप भारी काय काय याच्यात आहे माह्यतेय? याच्यात एक हृतिकदादा आहे. तो ना.. चोर असतो. सारखा ढिशूम ढिशूम आणि पळापळी करत असतो. कुठे कुठे आणि काय काय चोरत असतो. मग ना, त्याला पकडण्यासाठी अभिषेक आणि उदय हे दोघे पोलिसदादा ना, खूप काय काय करतात. एक ऐश्वर्याताई असते ना, तीपण पोलिसांना मदत करत असते. पण मग ना, ती ताई आणि हृतिकदादा ना एकत्रच चोऱ्या करतात आणि पोलिसांचा "पोपट' करतात.
बंटी ः मग काय होतं?
छोटू ः मग बरीच ढिशूम ढिशूम झाल्यावर शेवटी ना....शेवटी ना....
बंटी ः नको नको...सांगू नको. मलापण बघायचाय धूम.
छोटू ः अरे, बघच तू. खूप जम्माडी जम्मत आहे. तो हृतिकदादा आहे ना, तो कुठून कुठून आणि कशा कशा उड्या मारतो माह्यतेय? एकपण गोळी त्याला लागत नाही. गंमत ना...? अरे, अभिषेक आणि उदयदादापण अशाच कोलांट्या बिलांट्या मारतात.
बंटी ः मग चोर असलेला हृतिकदादा शेवटीच सापडतो ना?
छोटू ः ह्यॅ! तो तर किती तरी वेळा अभिषेकदादाला भेटतो. पण अभिषेकदादाला त्याला चोरी करतानाच पकडायचं असतं. तुला गंमत माहित्येय, तो शेवटीपण त्याला पकडतच नाही. आई मला म्हणते, आपण कुणाला ठोसा मारला ना, तरी पोलिस पकडतात. पण हा हृतिकदादा बऱ्याच जणांना गोळ्या घालतो, तरी अभिषेकदादा त्याला पकडतच नाही. का माह्यतेय...? ऐश्वर्याताईमुळे!
बंटी ः अरे पण जम्माडीजम्मत म्हणजे काय काय आहे?
छोटू ः अरे, सर्कस आहे नुसती! झुकझुकगाडी, विमान, बस, बाईक, बोटी...सगळ्या गाड्यांची उडवाउडवी, फोडाफोडी, पेटवापेटवी आहे...धम्माल!! अरे, गाणी तर असली झक्कास आहेत ना! पण बरीचशी इंग्लिश आहेत आणि ढमढम तर एवढी आहे, की काय म्हणतायंत, तेच कळत नाही. कायतरी "किया रे...' एवढं एकच गाणं कळलं मला. आणखी गंमत म्हणजे ऐश्वर्या, बिपाशा, रिमी या सग्गळ्या तायांनी ना, आपली मिनी घालते ना, तस्सेच कपडे घातलेत!
बंटी ः अरे, पण तू सांगतोयस त्याच्यावरून या सिनेमात नक्की जम्माडी जम्मत काय आहे आणि कशी आहे, तेच कळत नाही. तुला नक्की काय आवडलं?
छोटू ः तीच तर जम्माडी जम्मत आहे!
-------
Feb 4, 2008
आकर्षण केंद्र!
आकर्षणाचीच विस्तारित संकल्पना म्हणजे "क्रेझ'. अमक्याची क्रेझ आलेय, तमक्याची क्रेझ आलेय, असं आपण नेहमी म्हणत असतो. आपणही अनेकदा तिचे शिकार ठरलेलो असतो...नाही?
लहानपणी कशाची म्हणून क्रेझ नव्हती? मी रत्नागिरीत लहानाचा मोठा झालो. (कोण तो..."तसं वाटत नाही,' म्हणतोय?) लहानपणी पिक्चर पाहण्याची जाम क्रेझ होती. मिळेल तिथे, मिळेल तशा स्थितीत पिक्चर बघायला मी तडफडायचो. सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त नाक्यानाक्यावर प्रोजेक्टरवर सिनेमे दाखवले जायचे. "pyaar kaa mandir', "आखरी रास्ता', "स्वर्ग से ऊँचा'छाप पिक्चर असायचे. कधी "आराम हराम आहे,' "मुंबईचा फौजदार', असले मराठी एव्हरग्रीन सिनेमेही दाखवले जायचे. मी त्यांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकायचो.
साधारण दहाची वेळ असायची. रस्त्यावरून शेवटची बस गेली, की पिक्चर सुरू! त्यात ती प्रत्येक तीन-चार रिळांनंतर येणारा व्यत्ययही नको वाटायचा.कधी शेतात, मळ्यांच्या बांधांवर, काचा लावलेल्या गडग्यांवर बसून पिक्चर बघायचे. मध्येच कुठे चिखल, कुठे पाणी, कुठे शेण, कुठे काय न् कुठे काय! सगळं सांभाळून सिनेमासाठी जीव टाकायचा. बऱ्याचदा सिनेमा प्रोजेक्टरच्या विरुद्ध दिशेनं पाहायला लागायचा. त्यामुळं अमिताभनं डाव्या हातानं मारलेला ठोसा उजव्या हातानं मारल्याचं वाटायचं. सगळ्या हिंदी हिरॉइनी (साडीत असल्या, तर) गुजराती वाटायच्या.त्यात एक मजा असायची.
मुळात आमच्या परमपूज्य पिताश्रींनाही सिनेमाची प्रचंड आवड. आम्हाला बाळकडू त्यांच्याकडूनच मिळालेलं. पण कधी ते इच्छुक नसले, तर मला सोबत शोधायला लागायची. शिवाय, कोणतीही सिनेमा पूर्ण बघण्याचा माझा हट्ट. स्वतःच्या पैशांनी मिथूनचे सिनेमेही मी थिएटरमध्ये जाऊन पूर्ण बघितलेले आहेत. कधी सोबत मिळाली नाही, तर मग चिडचीड व्हायची. रात्री घरी येताना सोबत मोठा जथ्था असायचा, पण त्यावर विसंबून राहता यायचं नाही. थिएटरला जाऊन सिनेमा बघण्यावर मात्र घरून कडक बंधनं होती. त्यामुळे दोन-तीन महिन्यांतून एकदाच सिनेमा बघता यायचा. दहावीच्या वर्षात तर मी अख्ख्या वर्षभर एकही सिनेमा पाह्यला नव्हता. केवढी ही तपश्चर्या! एकमेव "भुताचा भाऊ' व्हीडिओवर एका मित्राच्या घरी, गणपतीत पाहिला होता. "थरथराट' न पाहता आल्याबद्दल मी जाम हळहळलो होतो. मोठा झाल्यावर रत्नागिरीतल्य तीनही थिएटरमधले सगळे सिनेमे पाहायचेच, ही माझी महत्त्वाकांक्षा झाली होती.
त्यानंतर "व्हीडिओ कॅसेट'चं फॅड आलं. छोट्या टीव्हीवर व्हीसीआरच्या साह्यानं असे पिक्चर दाखवले जायचे, त्यालाही गर्दी व्हायची. मला आठवतंय, "राम तेरी गंगा मैली'साठी आम्ही एका ठिकाणी असाच जीव घालवला होता. पण लांबून काहीच दिसत नसल्यानं, परत आलो होतो. तो सिनेमा मोठा झाल्यावर ज्या कारणांसाठी पाहिला, ती कारणं त्या वेळी अज्ञात होती.केबल आली, आणि ती सगळीच मजा केली. रोज घरबसल्या कुठलाही सिनेमा पाहता येण्याची सोय झाल्यानं, थंडीवाऱ्यात कुठेतरी बोंबलत जाण्यात कुणालाच स्वारस्य राहिलं नाही. आता सीडी, डीव्हीडीच्या धुमाकुळानं सिनेमा क्षेत्राचा अगदीच "कचरा' करून टाकलाय!त्या काळी नाटक, प्रदर्शनांच्या जाहिराती करणाऱ्या गाड्या फिरायच्या. पोरं दिसली, की या गाड्यांतून दोन-चार पत्रकं फेकली जायची. त्या गाडीच्या किंवा रिक्षाच्या मागे धावत जाऊन ती पत्रकं मिळवण्याची क्रेझ होती. त्यासाठी मग रस्त्यावरच्या इतर गाड्यांचीही कधीकधी पर्वा केली जायची नाही. आता माझी तीन वर्षांची मुलगीही "लेझ' नको, "मॅगी'च हवं, म्हणूनही हट्ट करू शकते.
कैऱ्या, चिंचा यांची मला कधी क्रेझ नव्हती. पण आंब्यांची मात्र होती. शिपोशीला, आमच्या आजोळी गेलो की आंब्यात सचैल स्नान असायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र...फुटेस्तोवर आंबे! एकदा आंब्याच्या झाडावर दगड मारून आंबे पाडताना माझ्या डोक्यातच दगड पडून मोठी खोक पडली होती. ती महिनाभर निस्तारत होतो.पुण्या-मुंबईत फिरण्याचीही क्रेझ फार होती. त्यातल्या त्यात मुंबईत जास्त. पण माझ्या लहानपणी मुंबईत मला फिरवायला कुणालाच वेळ नसायचा. गेट वे ऑफ इंडिया देखील मी अगदी अलीकडे, चार-पाच वर्षांपूर्वीच पाहिलं. असो.
गेल्याच आठवड्यात घरी इंटरनेट घेतलं. ते सुरू व्हायला आठ दिवस गेले. घरचं नेट चालतं कसं, हे पाहण्याचीसुद्धा क्रेझ होती. आता ते व्यवस्थित सुरू झाल्यावर जीव जरा शांत झालाय.
--------
Subscribe to:
Posts (Atom)