Jan 8, 2009

माझा बाप, डोक्याला ताप!


आमच्या बापाला अखेर आमची आवड कळली म्हणायची!च्यायला! गेले एक-दीड वर्षं नुसता छळवाद मांडला होता मेल्यानं! याची हौस नि मला निष्कारण सजा!! आताशा कुठे रुळावर आलाय.
कशाबद्दल बोलतेय, कळलं नाही का? अर्थात आमचा बाप नि त्याचं पिक्चरचं वेड! कळायला लागल्यापासून याव्यतिरिक्त कुठलंही काम निष्ठेनं केलं नसेल त्यानं. पिक्चर म्हणजे जीव की प्राण! कुठल्याही मळ्यात असो वा एखाद्या मित्राच्या खुराड्यात...पंचरंगी महालात असो वा शेणा-मुताच्या वासात...पिक्चर बघणं सोडलं नाही. अगदी शिरीष कणेकर चावले होते म्हणा ना! अर्थात, अजूनही सोडत नाही, पण माझ्या जन्मापासून आणि मला सांभाळण्याची जबाबदारी उरावर पडल्यापासून जरासा आटोक्यात आला बिचारा. लगामच बसला म्हणा ना, आमच्या उधळलेल्या घोड्याला! मला कळायला लागल्यापासून मग मलाच सिनेमाला घेऊन जायला लागला.
मी थेटरात जाऊन पाहिलेला पहिला सिनेमा `जबरदस्त.' म्हणजे, तसं नाव होतं सिनेमाचं . सिनेमा जबरदस्त नव्हता. आई-बाबा दोघंही बरोबर होते. बर्‍यापैकी गप्प राहिले होते मी. मी आणि बाबा, दोघांनी एकत्र पाहिलेला पहिला सिनेमा म्हणजे माझ्या आवडत्या शाहरुख खानचा `चक दे इंडिया'. बरा होता. स्टोरी बिरी कळायचं माझं वय नव्हतं. अवघी अडीच वर्षांची असेन मी तेव्हा. पण आमच्या परमपूज्य पिताश्रींची हौस! राहवेना त्यांना. मग मी सुद्धा ३ तास गप्प बसण्यासाठी आइस्क्रीम नि आणखी काय काय च्याऊ माऊ पदरात पाडून घेतलं.
मग बाप सोकावलाच आमचा! मी राहतेय म्हटल्यावर मला घेऊन कुठेही, कधीही सिनेमाला जायला लागला. अर्थात, त्याचाही नाइलाजच होता म्हणा! परीक्षण हे त्याचं कामच ना! मग अलका, लक्ष्मीनारायण, विजय, प्रभात, नीलायम, सिटीप्राईड, कुठे कुठे दौरे केले आम्ही. तसे, फक्त माझ्या आवडीसाठी फारच कमी सिनेमे बघितले आम्ही. अगदी रिटर्न ऑफ हनुमान, वगैरे. एक नाटकही दाखवलं त्यानं मला. पण मला काहीच झेपेना. गलगले निघाले, चल गंमत करू, पटलं तर घ्या, कसले कसले सिनेमे दाखवले आमच्या जन्मदात्यानं मला! एक तर भीषणच होता! सुखी संसाराची सूत्रे का काय तरी! बापही वैतागला होता या छळाला. मग माझी काय अवस्था झाली असेल बघा!
`रिटर्न ऑफ हनुमान' फार हिंसक होता. मला तोही नाही आवडला. शिवाय मला कधी नव्हे ते कोल्ड्रिंक पाजायची दुर्बुद्धी झाली आणि उलटीच झाली मला. सगळा फियास्को! मग आलो घरी. दे धक्का, उलाढाल मध्येही फार रमले नाही. `उलाढाल'च्या वेळी सिद्धार्थ जाधवला भेटले आणि मकरंद अनासपुरेला पाहिलं, तेवढाच आनंद! नाही म्हणायला `सही रे सही'च्या वेळी बापानं भरत जाधवशीही भेट घालून दिली आणि एकदा सुबोध भावेच्या घरी त्याच्याशीही!! आता शाहरूखला भेटवण्याची गळ घातलेय मी त्याला!
परवा तर गम्मतच झाली. शाहरुख खानचा पिक्चर बघायचा, मकरंद अनासपुरेचा की हत्ती नि अक्षयकुमारचा, असं बाबानं विचारलं. त्याला पक्की खात्री होती, मी शाहरुख खानचं नाव घेइन. कारण त्यालाही तोच (रब ने बना दी जोडी) बघायचा होता. पण मी त्याचा पोपट केला. हत्तीच्या पिक्चरची (जंबो) निवड करून त्याला पार उलटाच पाडला! मग नाइलाजानं त्यानं `जंबो'ला नेलं. मजा आली, पण त्यातलं युद्ध आणि जंबोची नि त्याच्या आईची ताटातूट नाही आवडली मला. रडलेच मी! नक्की कसा पिक्चर आवडतो हिला?' अशा प्रश्नांचं जंजाळ पाहिलं मी बाबाच्या चेहर्‍यावर.
माझी आवड नक्की आहे तरी कशी, यावर बाबाची पीएचडी सुरू होती. वाढदिवसापासून मला खोकला झाला. सध्या त्याचा यशस्वी तिसरा आठवडा सुरू आहे. (बाबाचा आवडता पिक्चरही एवढे आठवडे टिकत नाही!) माझ्या परमप्रिय आईनंच मग माझं नाचणं, पळणं बंद करून देण्यासाठी कुठला तरी माकडाचा पिक्चर लावून देण्याचं फर्मान सोडलं. बापाला काय्...गुनान ऐकण्यावाचून पर्याय नव्हता. लावला बिचार्‍यानं! मला तो प्रचंडच आवडला. एकदा, दोनदा, तीनदा, सात-आठ वेळा बघून झाला आत्तापर्यंत. एवढा आवडला, की आता सीडी लपवून ठेवायचा विचार करतायंत आई-बाबा!
तर, त्या महान सिनेमाचं नाव म्हणे `डंस्टन चेक्स इन'! असो. नावात काय आहे? तरीही, पहिल्यांदा बघून झाल्यावर `बाबा, मला नाही आवडला पिक्चर. यात सगळीकडे नाहीये माकड!' अशी लटकी तक्रार केलीच मी. पण मनातून आवडला होता. अजूनही आवडतोय. आता तरी बाप वेगवेगळे प्रयोग करून माझा छळ मांडणार नाही, अशी आशा!
- मनस्वी (आपला) अभिजित.

Jan 5, 2009

देव पावला!

एकतर महागड्या वस्तू वापरायची आपली लायकी नाही। दुसरं म्हणजे, लहानपणापासून कधी तशी सवय नाही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे त्या संख्येनं जास्त घेता येतात, असेच बाळकडू. त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा, वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्याच पैशांनी सहाशे रुपयांची कॉटन पॅंट घेतली, तेव्हा केवढं अप्रूप वाटलं होतं मला स्वतःलाच! घड्याळं, पेनं, कुठलीच वरच्या श्रेणीतली गोष्ट घ्यायची सवय नव्हती. नाही म्हणायला, अलीकडे, विशेषतः लग्नानंतर बायकोच्या आग्रहाला, हट्टाला बळी पडून कधीमधी अशा खरेद्या करू लागलो होतो।

नवीन घड्याळ घ्यायचं बरेच दिवस मनात होतं। पण पुढे ढकलत होतो. आधीचं घड्याळ आजीनं घेऊन दिलेलं, साधारणपणे आठ-नऊ वर्षे जुनं असावं. चारशे-साडेचारशे रुपयांचं. आता "लय भारी' घड्याळ घ्यायचं ठरवलं. हे मात्र स्वतःच्याच हौसेपायी. (हो...दरवेळी बायकोच्या नावानं कशाला बिल फाडायचं?) "टायमेक्‍स'च्या शो-रूम मध्ये गेलो, तर ती रेंज काही आपल्याला बापजन्मात परवडण्याजोगी नव्हती. मग शेजारीच "टायटन'च्या दुकानात भीत-भीत शिरलो. हजार-बाराशेपर्यंतच्या खरेदीची मानसिक (आणि आर्थिकही) तयारी केली होती. (असल्या भल्यामोठ्या, आलिशान शोरूम किंवा मॉलमध्ये वगैरे (अर्थातच, नुसतं विंडो-शॉपिंग करायला!) गेलं, की मला उगाचच आपल्यावर कुणी वॉच-बिच ठेवून आहे की काय, अशी शंका येते. आपण जणू कुणी चोर-दरोडेखोर असल्यासारखेच ते सेल्समन-वूमन-गर्ल्स आपल्याकडे बघत असतात. मला तर "पुष्पक'मधल्या कमल हासनच्या त्या प्रसंगाचीच आठवण येते. असो.) "सोनाटा'ची घड्याळं काही आकर्षक नव्हती. मग मनाचा हिय्या करून "टायटन'च्या रेंजकडे नजर वळवली. 1400 रुपयांचं एक घड्याळ आवडलं. घ्यायला बायकोनंही भरीला घातलं. म्हटलं हाय काय नि नाय काय! घेऊन टाकलं!

नमनाला एवढं घडाभर तेल ओतण्याचा उद्देश हा, की गेले काही दिवस या घड्याळाचा पट्टा सैल झाला होता। आणि एकदा शंका आली होती, तोच अनर्थ रविवारी रात्री घडला. सोमवारी सकाळी घराबाहेर पडताना शोधू लागलो, तर घड्याळ जागेवर नव्हतं. जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जिथे असू शकतं, तिथेही नव्हतं. मग मी रात्री साडेदहाला औषधं आणायला बाहेर पडलो होतो, ते आठवलं. रात्री कुठे वाटेत पडलं असेल, तरी सकाळनंतर ते मिळण्याची सुतराम शक्‍यता नव्हती. बरं, मी संध्याकाळी एकदा आणि रात्री एकदा असं दोनदा बाहेर पडलो होतो. नेमकं कोणत्या वेळी घड्याळ हातात होतं आणि कोणत्या वेळी नव्हतं, काहीच आठवेना.

एकतर मी माझं दोन रुपयांचं पेनसुद्धा हरवलं, तरी अस्वस्थ होतो। अर्थात, त्यापायी मला अन्नपाणी गोड न लागणं बापजन्मात शक्‍य नाही! परीक्षेत एका ओळीचाही अभ्यास झालेला नसताना, बारावी-एसवायला नापास झालो तेव्हा, घरातून "पळून' गेल्यावर, शेअर मार्केटमध्ये शेण खाल्ल्यावर...सगळ्या प्रसंगांत मला अन्न-पाणी व्यवस्थित गोडबिड लागत होतं. पण माझी झोप मात्र उडते काही हरवल्यानंतर. हल्ली जरा कोडगेपणा वाढला आहे, तरी अस्वस्थता आलीच. वाटेनं उलटं जाऊन शोधण्यातही काही अर्थ नव्हता. शक्‍यता दोनच होत्या- सोसायटीत पडलं असल्यास वॉचमनला मिळालं असलं तर आणि दुसरी, पण अगदीच धूसर शक्‍यता म्हणजे त्या मेडिकल दुकानातच ते पडलं असलं आणि दुकानदारालाच मिळालं असलं, तर! वॉचमनला अपेक्षेप्रमाणे पत्ताच नव्हता. मग मेडिकलकडे मोर्चा वळविला. शेवटची आशा म्हणून! अपेक्षा नव्हतीच, त्यामुळे जाताना वाटेत स्वतःवर विनोदही केले. लहानपणी (माझ्या!) आजी गजानन महाराजांची पोथी वाचायची आणि मलाही वाचायला लावायची. त्यासोबत, गजानन महाराज कुण्या भक्ताची बॅगबिग वेगळ्या रूपात जाऊन परत करतात वगैरे (भाकड)कथाही सांगायची. पण मी नास्तिक असल्यामुळं, गजानन महाराजांचा कुणी अवतार माझं घड्याळ घेऊन "याचा मालक कोण आहे,'वगैरे शोधत बसला असेल, अशी सुतराम शक्‍यता नव्हती!

दुकानात पोचलो आणि चौकशी केल्यावर काय आश्‍चर्य! त्या सद्‌गुणाच्या पुतळ्यानं दोन मिनिटांत टेबलावरच ठेवलेलं माझं घड्याळ मला परत केलं। त्यात माझ्या भावना बिवना नव्हे, तर माझे पैसे गुंतलेले होते. त्यामुळे जिव्हाळा जास्त होता. मला तर त्या दुकानमालकाच्या जागी भगवान विष्णूच विश्‍वरूपदर्शन देताहेत आणि मी नतमस्तक झालो आहे, असं चित्र दिसू लागलं होतं! "चौदाशे रुपयांच्या घड्याळासाठी एक हजार रुपये काढा!' या त्याच्या प्रेमळ टिप्पणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून, केवळ औपचारिक धन्यवादाचा पुणेरी+कोकणी बाणा दाखवून मी काढता पाय घेतला. पण या मेल्याकडे आता पुढची दोन-तीन आजारपणं ("बाळंतपणं'च्याच चालीवर!) काढण्याचं प्रायश्‍चित्त घ्यावं लागणार.

असो. "आठवं आश्‍चर्य' एवढाच एसएमएस ऑफिसमध्ये पोचल्यावर बायकोला केला. आणि तिला तो चक्क कळला!