Mar 12, 2010

दत्तकविधान-10

मनस्वी त्याला कशी स्वीकारणार, हा आमच्यापुढे मोठा प्रश्‍न होता. तिची घरातली एकट्याची सद्दी संपेल, तिच्या कौतुकात, लाडांत वाटेकरी आल्यानं ती बिथरेल, टोकाची प्रतिक्रिया देईल अशी आम्हाला शंका होती. तिनं हा प्रश्‍न तिच्या निरागसपणानं आणि मनस्वितेनं चुटकीसरशी सोडवून टाकला आणि आम्हाला तोंडघशी पाडलं. आपल्याला भाऊ मिळाल्याचा केवढा आनंद झाला होता तिला! "त्याला आणायला आपण हॉस्पिटलमध्ये कसं गेलो नाही, आईला तिथे का ठेवावं लागलं नाही,' वगैरे कुठलेही प्रश्‍न तिला पडले नाहीत. किंबहुना, पडले असले, तरी तिला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. तिला खेळायला एक हक्काचं बाळ मिळालं होतं, बस्स! तिच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. (आम्ही त्यासाठी करून ठेवलेली पूर्वतयारी आमच्यापाशीच राहिली.) त्याचं सगळं आता तिला करायचं होतं. त्याचे लंगोट बदलणं, त्याला दूध पाजणं, मांडीवर घेऊन खेळवणं, त्याला उचलून घेऊन घरभर मिरवणं...!यातलं फक्त निम्मंच करायची आम्ही तिला परवानगी दिली होती. ती देखील आमच्या उपस्थितीत. तरीही, तो रडत असला, तरी दामटून त्याला मांडीवर घेऊन थोपटण्याची आणि पायांवर घेऊन दूध किंवा पाणी पाजण्याची हौस ती अधूनमधून भागवून घेतेच! त्यानं कितीही विरोध नोंदविला, तरी! त्याला अधूनमधून गोष्टीही सांगते आणि कधीकधी तर त्यानं अंगावर "शू' केल्यानंतर उदार मनानं त्याला माफ करते! आमच्या आधी ती त्याच्याशी एकरूप झाली! निरागसपणा कधीकधी जाणतेपणावरही मात करतो, तो असा!!मनस्वीला लहानपणापासून आम्ही पाहिलं होतं, हाताळलं होतं. त्यामुळं तिचं दुखणंखुपणं माहित होतं. या बाळाचं सगळंच नवं होतं. त्याला दर तीन तासांनी खायला घालावं लागत होतं. रात्रीसुद्धा! त्यामुळे रात्री खाल्ल्यापासून बरोब्बर तीन तासांनी तो गजर लावल्यासारखा किंचाळून उठायचा आणि दूध गरम करून पुन्हा थंड करून आणेपर्यंत घर आणि सोसायटी डोक्‍यावर घ्यायचा. तिथे संस्थेत त्याला बाटलीच्या दुधाची सवय होती. ती मोडणं हे आमचं पहिलं ध्येय होतं. (बाटलीतून पोटात जाणाऱ्या अतिरिक्त हवेमुळे मुलांना वातासारखे बरेच त्रास होतात.) पहिले दोन दिवस त्यासाठी हर्षदाला जंगजंग पछाडावं लागलं आणि बऱ्याच यातना भोगाव्या लागल्या. त्याच्या तोंडाला साजेसा चमचा मिळणं, तो हिरड्यांना, ओठाला न लागता त्याला व्यवस्थित दूध किंवा खाणं खायला घालता येणं, ही अग्निपरीक्षाच होती. त्यातून "बाटलीची माझी सवय मोडणारे तुम्ही कोण,' या अहमहमिकेनं तो जमेल त्या पद्धतीनं वाटी-चमच्याचा निषेध नोंदवायचा. डॉक्‍टरांनी आम्हाला सुपाचा चमचा वापरायचा सल्ला दिला, तो पथ्यावर पडला. सुपाच्या चमच्यानं तो छान दूध पिऊ लागला आणि त्याला होणारा त्रासही कमी झाला. पण हा प्रयोग फक्त दोन-तीन दिवसच करावा लागला. नंतर त्याला नेहमीच्या वाटीचमच्याची छान सवय झाली.हळूहळू बेट्यानं उजव्या हाताचं दुसरं बोट तोंडात घालायची छान सवय लावून घेतली आणि रात्री दर तीन तासांनी किंचाळून उठणंही कमी झालं. फक्त त्याला गुंडाळून ठेवलेलं असेल आणि बराच आटापिटा करूनही हात बाहेर काढता आला नाही, तर तो आकाशपाताळ एक करायचा, तेवढंच. त्यामुळे कधीकधी तर बिचारा बोटं चोखण्याच्या नादात आपली भूकही मारून टाकायचा. मग कधीतरी अपरात्री त्याच्या बोटं चोखण्याच्या आवाजानंच जाग यायची आणि त्याला खायला घालण्याची तारांबळ उडायची.त्याची किरकोळ आजारपणंही घरी आल्यावर बरी झाली आणि आम्ही सुटकेचा निःश्‍वास टाकला. आता निमिष आमच्या घरात छान रुळलाय. मनस्वी आणि त्याच्यात समतोल साधणं, दोघांना तेवढंच प्रेम देणं आणि दटावणं आणि छान पद्धतीनं वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. यश येईल, अशी अपेक्षा!
ता. क. ...एक सांगायचंच राहिलं. निमिषला सांभाळायला आता घरी एक बाईही येऊ लागल्या आहेत. हर्षदा थोड्याच दिवसांत ऑफिसला जॉइन होईल. त्यामुळं या बाईंचा घरी आधार. त्याची "बाटली'ची सवय आम्ही लहानपणीच सोडवली. आता "बाई'ची सवय लागल्यास आमचा नाइलाज आहे!

(समाप्त)

दत्तकविधान-9

आमच्या तपश्‍चर्यापूर्तीचा दिवस!

सकाळी दहा वाजता निमिषला घरी आणण्यासाठी जायचं होतं. मनस्वी आज तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहणार होती. तिच्या प्रतिक्रियेविषयी प्रचंड उत्सुकता होती. एवढे दिवस तिच्यासाठी ती केवळ दंतकथा होती. शाळेत, शेजारीपाजारी चर्चा करून झाली होती. आता प्रत्यक्ष घरी आल्यानंतर ती त्याला कसं स्वीकारते, हे पाहण्याची आम्हाला उत्कंठा होती.आधी संस्थेच्या कार्यालयात गेलो. निमिषला पाहून मनस्वीची प्रतिक्रिया अतिशय नॉर्मल होती. अगदी कुठल्याही बाळाला पाहावं, अशीच. मी आलो, तोपर्यंत आमच्या स्वागताची आणि सत्काराची तयारी झाली होती.संस्थेत पाट, रांगोळी काढण्यात आली होती. तिथे आम्हाला बसवून आमचं औक्षण करण्यात आलं. निमिषला नवे कपडे घालून आमच्या ताब्यात देण्यात आलं. मनस्वी आणि निमिष, दोघांनाही हार घातले होते. दोघांनाही औक्षण केलं. मनस्वीला हळद-कुंकू लावलं. एवढा मान मिळाला आणि कौतुक झालं, त्यामुळं ती हवेतच होती. त्याला पाहायची, हाताळायची, जाणून घ्यायची तिला भयंकर उत्सुकता लागली होती. त्यामुळं कधी एकदा तो सत्कार उरकून त्याला घरी घेऊन जातेय, असं तिला झालं होतं.वीस वर्षांपूर्वी स्वीडनला दत्तक गेलेली एक मुलगीही तिथे आली होती. तिचं लग्न ठरलं होतं आणि आपल्या आईवडिलांसह ती या संस्थेचे ऋण व्यक्त करायला भावी पतीसह आली होती. तिनंही निमिषला ओवाळलं.या वेळेला मी आठवणीनं गाडीची किल्ली माझ्याजवळच ठेवली होती. गाडीतून घरी येताना निमिषची प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी मनस्वीचा आटापिटा चालू होता. तो गोट्या छान हसत होता. कुणाच्या हातून कुणाच्या हाती जाऊन पडलोय, वगैरे प्रश्‍नांची चिंता त्याला पडलेली दिसत नव्हती. मनस्वीचे हात पकडत होता, तिचे केस ओढायचा प्रयत्न करत होता. त्याच्या या बाललीलांनी मनस्वी चेकाळली होती. एखादं एवढं हक्काचं बाळ तिला पहिल्यांदाच जवळून पाहायला, खेळायला मिळालं होतं. त्याचा आनंद तिच्या नसानसांतून दौडत होता.घरी आल्यावरही नवं घर, नवी माणसं पाहून निमिष रडला नाही की धिंगाणा घातला नाही. अधूनमधून "हूं' करत होता, तेवढंच. पण "चूं' मात्र केलं नाही त्यानं!निमिषच्या स्वागतासाठी आणि संगोपनासाठी हर्षदानं ऑफिसातून तीन महिन्यांची दणदणीत रजा काढली होती आणि मी एक दिवसाची!

(क्रमशः)

दत्तकविधान-8

एकदा आपल्या फॅमिली डॉक्‍टरांकडे जाण्याची औपचारिकताच बाकी आहे, असा आमचा समज होता....पण प्रत्यक्षात तो खोटा आहे, हे कळायला पुढचे चार दिवस जावे लागले.बाळाला डॉक्‍टरांकडे घेऊन जाण्यासाठी मीसंस्थेत गेलो, तेव्हा तर मोठी धमालच झाली! बाळाला न्यायचं, त्यालापहिल्यांदाच छातीशी धरायचं, उन्हातान्हाचा त्रास नको, म्हणून मारे कारघेऊन गेलो होतो. सोबत सासूबाई होत्या. त्याला पाहून त्या त्यांच्याकामासाठी दापोडीला जाणार होत्या. गाडी पार्क करून उतरताना नेमका एकाकुठल्याशा पीआरचा फोन आला. त्याला त्याचं कसलंतरी "दुकान' छापून आणायचंहोतं. फोनवर बोलता बोलता मी गाडीतून उतरलो आणि अगदी आठवणीनं दार लॉक करूनटाकलं. पलीकडून सासूबाई उतरल्या. मी फोनवर असतानाच पलीकडे जाऊनसुरक्षिततेचा उपाय म्हणून पलीकडचं दारही लॉक करून टाकलं! फोन बंदझाल्यावर सहज म्हणून खिसा चाचपला, तर किल्ली कुठे होती? ती सुरक्षितपणेगाडीच्या बंद काचांआडून मला वाकुल्या दाखवत होती.मी त्या पीआरवर जळफळायचा तेवढा जळफळलो. पण थयथयाट करून उपयोग नव्हता.स्वतःच पायावर धोंडा पाडून घेतला होता. उत्साहानं कार घेऊन येण्याचीआयडिया स्वतःच्याच अतिशहाणपणामुळे बारगळली होती. सासूबाईंची महत्त्वाच्याकागदपत्रांची पिशवी आत गाडीत अडकल्यानं त्यांनाही जाणं शक्‍य नव्हतं.त्याही माझ्यावर (मनातल्या मनात) जळफळल्या.तिथून संस्थेत गेलो. माझी अडचण सांगितली. एका नर्सने बाळाला घेतलं आणि आमची वरात अखेर रिक्षाने डॉक्‍टरांच्या क्‍लिनिककडेनिघाली. दरम्यानच्या काळात मी हर्षदाला फोन करून ठेवला होता. ती ऑफिसातहोती. "घरी जाऊन डुप्लिकेट किल्ली घेऊन डॉक्‍टरांच्या क्‍लिनिकपाशी येशीलका,' असा विनंतीवजा आदेश तिला दिला. तीही माझ्यावर जळफळली. एकूण आजचादिवस या सर्व आप्तेष्टांच्या जळफळाटाने भस्मसात होण्याचा होता!क्‍लिनिकमध्ये आम्हाला तुलनेनं लवकर नंबर मिळाला. त्याचं नावडॉक्‍टरांकडे नोंदवणं, फॉर्म भरून देण्याचे सोपस्कार पार पाडावे लागले.हर्षदाही अनायासे आली असल्यानं ती तिथे थांबली होती.डॉक्‍टरांनी हिरवा कंदील दिला आणि नंतर बाळाचा आमच्या घरीयेण्याचा मार्ग मोकळा झाला...प्रत्यक्ष ताब्यात घेण्याआधी आम्हाला हवंअसलेलं त्याचं नाव सुचवायचं होतं. "प्रेषित' हे नाव आधीपासून डोक्‍यातहोतं, पण गृह मंत्रालयानं त्यावर काट मारली. मग ज्याच्या आगमनासाठी आम्हीक्षण न्‌ क्षण मोजला होता, त्याचं तेच नाव द्यायचं ठरवलं..."निमिष!'
(क्रमश:)दत्तकविधान-७

दत्तकविधान-7

दत्तक मुलासाठी नावनोंदणी केल्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षांनी आम्हालापहिलं बाळ आज पाहायला मिळणार होतं.लग्नाआधीपासून ठरविलेल्या एका निर्णयाच्या पूर्ततेतला महत्त्वाचा टप्पाआज पार पडणार होता! त्या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो होतो, पण मध्यंतरीपरिस्थितीच अशी होती की आशा सोडून द्यायचे विचारही मनात येत होते.सुदैवानं ती लवकर निवळली आणि आज या महत्त्वाच्या वळणावर आम्ही उभे होतो.मी सकाळी रत्नागिरीहून पुण्याला आलो आणि 11 वाजता हर्षदासह संस्थेत दाखल झालो. आम्हाला तिथे दिवसभर द्यायचा होता. फॉर्म भरून देताना आमच्यामुलाखती आणि सविस्तर माहिती घेण्यात आली होती. या टप्प्यावरही आमच्याअधिक सविस्तर मुलाखती घेतल्या गेल्या. अगदी आमचं लग्न कसं ठरलं, कुणीठरवलं, लहानपण कसं होतं, पालकांशी संबंध कसे आहेत, शिक्षण कोणत्या विषयातघेतलं, त्यात काय अडचणी आल्या, आवडीनिवडी काय आहेत, एकमेकांशी नातं कसंआहे, भविष्यकाळात काय योजना आहेत, वगैरे वगैरे. आम्ही दत्तक मुलालावाढविण्यासाठी वैचारिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोतकी नाही, हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न होता. आम्ही अगदी मनमोकळी उत्तरंदिली. बऱ्याच दिवसांनी कुणापाशी आपलं मन मोकळं केल्यासारखाच अनुभव आला.खूप बरं वाटलं. लग्नाविषयी, विचारांविषयी तर भरभरून बोलायला मला नेहमीचआवडतं. आज पुन्हा आणि अगदी निवांत संधी मिळाली होती. नंतर आम्ही बाळ बघायला गेलो.शॉपिंग मॉलमध्ये गेल्यासारखं एका स्टॉलवरबाळं मांडून ठेवल्येत आणि "याचे कान जरा लहान वाटताहेत नाही,' "किंचितजाड वाटतंय,' "नको. डोक्‍यावर केस कमी आहेत,' "याच्यात अमक्‍या शेडचंनाही का,' असे प्रश्‍न विचारून चिकीत्सक वृत्तीनं त्यातलं एक "खरेदी'करण्याचा प्रश्‍नच नव्हता. आमच्या कुटुंबात साजेलसं, आमच्या वर्णाशीसाधर्म्य असणारं आणि उत्तम, निरोगी बाळ आमच्यासाठी संस्थेनं आधीच निवडूनठेवलं होतं. बाळ घेणाऱ्यांची वाढती यादी आणि तुलनेनं बाळे कमी, हे व्यस्तप्रमाण हे त्याचं एक कारण होतंच, शिवाय त्याच्याशी जिवाभावाची, नात्याची,आपुलकीची वीण जोडायची होती. अंगकाठी, रंगसंगती, हे घटक दुय्यम असणंचअपेक्षित होतं."नाही' म्हणण्याचा अधिकार कोणत्याही जोडप्याला असला, तरी त्यानंतर पुन्हानव्या बाळाचा पर्याय त्यांना कधी मिळेल, याची शाश्‍वती देता येत नाही. याबाळाबाबत आम्हाला नाही म्हणण्याजोगं वेगळं काही वाटलं नाही. "तुमच्याडॉक्‍टरला एकदा दाखवून घ्या,' असा सल्ला संस्थेनं दिला.आमचं मन आणि घर आता नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्साहानं उचंबळूनवाहू लागलं होतं.
(क्रमश:)

दत्तकविधान-6

मनस्वीला सांगून झालं, पण आईवडिलांना सांगणं ही मोठी कसोटी होती. आम्ही घेतलेलानिर्णय पालकांना उशीरा कळवला, पण त्याला अगदी कडाडून विरोध झाला नाही."तुमचा निर्णय आहे ना, ठीक आहे. आम्हाला मान्य आहे,' अशीच सर्वसामान्यप्रतिक्रिया होती. तेवढंही दिलासादायक होतं. मूल मिळवण्याचं टेन्शनअसताना हा आणखी एक ताण आम्हाला झेपणारा नव्हता. सुदैवानं तो टळला.
दत्तक मुलासाठी देण्याच्या कागदपत्रांत आम्हाला ओळखणाऱ्या तीन व्यक्तींचीओळखपत्रं आणि आम्हाला भविष्यकाळात काही झाल्यास एका जोडप्यानं त्याबाळाची पूर्ण जबाबदारी घेण्याबाबतचं पत्र (बॉंड) देणंही आवश्‍यक होतं.माझ्या धाकट्या साडवानं ती जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे त्यासर्वांना आधीपासून कल्पना होतीच. शेजारच्या निवडक मंडळींनाही काही दिवसआधी ही कल्पना दिली. विशेष म्हणजे, असा "पराक्रम' करणारे सोसायटीत आम्हीएकटेच नव्हतो, हे त्याच वेळी कळलं. शेजारच्या दोन इमारतींमधील आमच्याओळखीची असणारी दोन मुलं दत्तक होती, हे शेजाऱ्यांकडून कळलं. आमच्याचसोसायटीत राहणाऱ्या अन्य एका जोडप्यानंही मूल होत नसल्यानं ते दत्तकघेण्याचा निर्णय घेतला होता. लोकांच्या सामाजिक जाणिवा रुंदावत असल्याचंआणि विचारशैली प्रगल्भ होत असल्याचं ते लक्षण होतं.
साधारण सप्टेंबर महिन्यात बऱ्याच फॉलोअपनंतर एक बाळ आमच्या नावे लावण्यातआल्याचं संस्थेकडून कळलं. वैद्यकीयदृष्ट्या ते "फिट' ठरल्यानंतर आम्हीत्याला बघायला जाणार होतो. एवढ्या दिवसांच्या प्रतीक्षेला फळ येणार होतं.तणावानं व्यापलेल्या आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा हलकासा शिडकावा झाला.पण हाय रे कर्मा! त्याच्या वैद्यकीय अहवालात काही अडचणी आल्या. आमच्याताब्यात देण्यासाठी ते योग्य नव्हतं. पंधरा दिवस वाट पाहून शेवटी आमच्यापदरी निराशा आली.
आज येईल, उद्या येईल, करत बाळ काही ताब्यात मिळण्याची लक्षणं दिसेनात,तेव्हा आम्ही नोव्हेंबरमध्ये महाबळेश्‍वर-रायगड सहल करून घेतली.(रायगडावरील सूर्योदयाविषयी लिहिलं होतं, आठवतंय?) डिसेंबरमध्ये मी आणिमनस्वी दोघंच माझ्या आईवडिलांसह गोव्याला जाऊन आलो. (त्याविषयीही लिहिलंहोतं...आठवतंय? तुम्ही म्हणाला, हा बाबा दर हगल्या-मुतल्याचा ब्लॉग लिहीतअसतो. त्याला आम्ही काय करणार! तर ते असो.)गोव्यात असतानाच संस्थेतून फोन आला. आमच्या नावे एक नवं बाळ "लावण्यात'आल्याचा. सप्टेंबरमध्ये जन्मलेलं हे बाळ आता या संस्थेतून आपल्याहक्काच्या घरात जाण्यासाठी तयार होतं आणि आपल्याला कोणतं घर मिळणार,याचाच विचार करीत असावं बहुधा. मी पुण्याला आल्याआल्या भेटायला येण्याचं कबूल केलं...

दत्तकविधान-5

मनस्वीला आम्ही दुसऱ्या बाळाविषयी अगदी सहजपणे सांगितलं. "तुला घरात एकटंवाटतं ना, कंटाळा येतो ना, मग घरात एखादं बाळ असेल तर किती छान,' हातिच्या मानसिक तयारीचा मूळ गाभा होता. तिनंही ते सहज मान्य केलं. पण लहानबाळ म्हणून मावसबहिणीलाच तिनं जवळून पाहिलं होतं. त्यामुळं बाळ आणायचं तेमुलगीच, अशी तिची ठाम धारणा होती. मग आपल्या घरात आधीच तुम्ही दोन मुली(आई आणि ती) आहात ना, मग आणखी एक मुलगी आणली तर कशी चालेल? त्यापेक्षामुलगा आणला, तर दोन मुलगे-दोन मुली (आई-बाबा व मनस्वी आणि तिचा भाऊ)होतील, असं तिला पटवून दिलं. तिलाही ते पटलं.शेजारी कळलं तरी हरकत नाही, अशी वेळ आली, तेव्हाच आम्ही मनस्वीलासांगितलं. त्यामुळं तिनं शेजारीपाजारी जाहिरात केलीच. अपेक्षेप्रमाणे"बाळ कधी आणायचं,' असं टुमणंही सुरू केलं. पण अनपेक्षितरीत्या, त्यासाठीहात धुवून मागे लागली नाही. हे सुखद आणि धक्कादायक होतं.शाळेत मात्र काही सांगू नको, आपण बाळ आणल्यावरच सगळ्यांना "सरप्राइज'देऊ, असं आम्ही तिला बजावलं होतं. तिनं कसाबसा तीन-चार दिवस तग धरला.नंतर एके दुपारी शाळेतून घरी आल्यावर मला म्हणाली, ""बाबा, मी बाळ आणायचंहे फक्त आर्याला सांगितलंय.''"कशाला सांगितलंस,' असं मी गुरगुरल्यावर मला म्हणते, ""पण तिला सांगितलंयमी, कुणाला सांगू नकोस म्हणून!''दुसऱ्या दिवशी "कुणाला सांगू नकोस' हे वाक्‍य आणि आमचं गुपीत एकामित्राला सांगून झालं होतं. वर्गात शेजारी जो बसेल, त्याला तिच्यामर्जीनुसार हे रहस्योद्‌घाटन करण्याचं तंत्र तिनं अवलंबलं होतं. तरीही,गती एवढी नव्हती.आणखी एक-दोनच मैत्रिणींना पुढच्या आठ दिवसांत सांगून झालं. सुदैवानंबाईंना मात्र सांगितलं नाही.घरात बाळ आणायचं मग ते कुठून, कधी, कसं आणायचं, याविषयी तिनं फार खोदूनविचारण्याचा प्रयत्न केला नाही, हे आमच्या पथ्यावरच पडलं. आई, तुझ्यापोटात बाळ आहे का, ते कधी बाहेर काढायचं, वगैरे बालसुलभ प्रश्‍नही तिलापडले नाहीत. घरात बाळ येण्याशी तिला मतलब होता. मग ते कुठून का येईना!...आमची विचारसरणी तिनं वेगळ्या प्रकारे कशी काय आत्मसात केली, याचंचआश्‍चर्य वाटत होतं!शिबिरात सहभागी झालेल्या आमच्या त्या मित्राचा फोन आला. त्यालादुसऱ्या दिवशी मुलगी मिळणार होता. त्याचं अभिनंदन केलं. अर्थातच, मुलगीहवी असल्यानं त्याचा नंबर आधी लागला होता. मुलांसाठीची वेटिंग लिस्ट आणखीमोठी होती! मग काही दिवसांनी त्याच्या घरी जाऊन त्याची मुलगी पाहून आलो.तो या नव्या पाहुण्यात छान रमला होता. त्यालाही आधीचा मुलगा होता. त्यामुलानंही आपल्या बहिणीला सहज स्वीकारलं होतं...

Mar 11, 2010

दत्तकविधान-4

दीड वर्षं!

तब्बल दीड वर्षं हातावर हात धरून भजन करायचं होतं. दुसरं मूल हवं होतं, त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती, पण मुलाचीच प्रतीक्षा होती. हा दीड वर्षांचा कालावधी फार जीवघेणा होता. आमच्या हातात काहीच नव्हतं...वाट बघण्याखेरीज!मनस्वी आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. शाळा, बाल भवनमधील दोस्त मंडळी, सोसायटीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरात धुडगूस सुरू झाल्यानं तिचीही स्वतःची मतं तयार होऊ लागली होती. "आपल्याकडेही बाळ आणायचं,' असं टुमणं सुरू झालं होतं. आम्ही तिला सांगूही शकत नव्हतो आणि लपवूही शकत नव्हतं. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार होता. सांगितलं असतं, तर बीबीसीवरून लगेच ही बातमी गावभर पोचली असती. वर "उद्याच बाळ आणायचं' म्हणून आम्हाला पळता भुई थोडी केली असती, ती गोष्ट वेगळी.वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही फॉलो अप घ्यायला सुरवात केली. तरीही बाळ ताब्यात मिळण्याचं काही चिन्ह नव्हतं. "सध्या एन्ट्री कमी झाल्या आहेत हो' एवढंच उत्तर ऐकायला मिळत होतं.ही अस्वस्थता आणि प्रतीक्षा भयानक होती. वेळ हातातून चाललाय आणि आपल्याला मूल कधी मिळणार, मिळणार की नाही, याविषयी काहीच कल्पना येत नव्हती. एवढा काळ थांबलो, ते चुकलं तर नाही ना, असाही विचार मनात डोकावू लागला होता. ते सर्वांत धोकादायक होतं.अखेर एके दिवशी पालकांच्या दत्तकपूर्व मार्गदर्शन शिबिराचं निमंत्रण आलं. मूल मिळणार असल्याची आधीची पायरी होती ती. बरेच दिवस नुसतेच प्रतीक्षा करत असलेल्या आम्हाला वाळवंटातली पावसाची सुखद झुळूकच वाटली ती.शिबिर दिवसभराचं होतं. माझा ट्रेकिंगमधला एक मित्रही तिथे भेटला. तो मुलानंतर मुलगी दत्तक घेणार होता. अन्यही अनेक जोडपी होती. कुणाला स्वतःचं मूल नव्हतं म्हणून, तर कुणी अन्य कारणांनी मूल दत्तक घेणार होते. दुसरं मूल दत्तक घेणारी जोडपी कमी होती. शिबिरात मुलांना वाढविण्याविषयी मानसोपचारतज्ज्ञांचं मार्गदर्शन, प्रत्यक्ष दत्तक गेलेल्यांचे अनुभव, असे काही कार्यक्रम झाले.मुख्य म्हणजे आपण दत्तक घेणार असलेलं मूल सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या नैसर्गिक मुलापेक्षा दिसायला, वागायला, स्वभावाला वेगळं असणार आहे, हे तिथे स्पष्ट झालं. त्याला आपलंसं करून घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत, हेही लक्षात आलं. दोन मुलांमध्ये योग्य समतोल ठेवणं, मुलाला आपल्या छोट्या भावंडाविषयी योग्य रीतीनं आणि योग्य वेळी समजावून सांगणं, हेही किती महत्त्वाचं आणि जोखमीचं काम आहे, हे लक्षात आलं.स्वीला आम्ही तोपर्यंत कल्पना दिली नव्हती. बाळ ताब्यात मिळण्याची तारीख नजरेच्या टप्प्यात आली की तिला हळुहळू सांगू, असा आमचा विचार होता. या शिबिरानंतर तिला आता कल्पना द्यायला हरकत नाही, असं वाटलं

(क्रमश:)

दत्तकविधान-3

संस्थेत आमची प्राथमिक मुलाखत झाली. आमचं मूल दत्तक घेण्याचं कारण, त्यामागची मानसिकता, आमची मानसिक-आर्थिक तयारी, दत्तक मुलाची प्रक्रिया, त्यासाठीची कागदपत्रे, सगळी माहिती देण्यात आली. जवळपास दोन तासांचं ते मार्गदर्शन होतं. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं - दत्तक मूल मिळण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागतो. दत्तक घेऊ इच्छिणारे पालक "वेटिंग लिस्ट'वर आहेत!
दीड वर्षं हा कालावधी आमच्यासाठी अगदीच अनपेक्षित, प्रदीर्घ होता. आमचं दोन मुलांमधल्या अंतराचं नियोजन बोंबललं होतं. म्हणजे मनस्वी साडेचार वर्षांची होईपर्यंत तरी तिला भाऊ मिळणार नव्हता. तोपर्यंत गावभर बोंब करून कुणाला सांगणंही योग्य नव्हतं. लोकांच्या प्रश्‍नार्थक नजरा झेलणं परवडणारं नव्हतं.कागदपत्रांची जमवाजमव हे देखील एक अवघड लक्ष्य होतं. भलामोठा अर्ज, त्यासह मूल दत्तक घेण्याबद्दलच्या भूमिकेचा पुरवणी अर्ज मनापासून भरून दिला. त्यात माझ्या लेखनाची, शैलीची खुमखुमी पुरेपूर जिरवता आली. आमचे राहण्याच्या ठिकाणचे पुरावे, फोन, लाइटची बिलं, पॅन कार्डांच्या झेरॉक्‍स, गुंतवणुकीची कागदपत्रं, त्यांचे तपशील, इत्यादी इत्यादी सुपूर्द करायचं होतं. तेदेखील सर्व अटेस्टेड कागदपत्रांसह आणि तीन सेटमध्ये. एवढे कागद अटेस्टेड कुठून करून घ्यायचे आणि त्याला किती पैसे जाणार, याचीच विवंचना होती. बरीच भटकंती केल्यानंतर आमच्या घराशेजारीच सर्व काही फुकटात करून देणारे एक गृहस्थ भेटले. त्यांच्याकडून ती कागदपत्रं घाऊकमध्ये अटेस्टेड करून घेतल्यानंतर सुटकेचा निःश्‍वास टाकला.पासपोर्टला लागतो, तसा एक पोलिसांचा "नो ऑब्जेक्‍शन रिपोर्ट'ही हवा होता. त्यासाठी पोलिस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार होत्या. पहिल्यांदाच तेथे गेलो, तेव्हा कुठल्या तरी गुन्हेगाराला "आत' घेऊन पट्ट्यानं बडवत होते. त्याच्या जागी काही काळ मी स्वतःला पाहिलं! सुदैवानं तो रिपोर्ट मिळवायला फार कष्ट पडले नाहीत
सर्व कागदपत्रं सुपूर्द केली. अँड अवर टाइम स्टार्टेट देन...(क्रमशः)

दत्तकविधान-2

हर्षदा आणि मी एकत्र भेटून (एकमेकांशी) लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दुसऱ्याच बैठकीत आपल्या (भावी) अपत्यांविषयी चर्चा केली होती. सुदैवानं तिची आणि माझी आवड त्या बाबतीतही जुळली...एकट्या मुलांचे प्रश्‍न आसपासच्या कुटुंबांत पाहायला मिळत होते. मुलं एकांडी, हेकेखोर होणं, एकाच प्रकारे विचार करण्याची किंवा दुसऱ्यामध्ये न मिसळण्याची प्रवृत्ती निर्माण होणंही नवीन नव्हतं. आपल्याला दोन मुलं असायला हवीत, त्यातही एक मुलगा-एक मुलगी असावी, हे त्यामुळेच मनात पक्कं केलं होतं.स्वतःच्याच रक्तामांसाच्या मुलाचा अट्टहास धरण्यापेक्षा जगात आधीच जन्माला आलेल्या, पण चांगल्या आधाराअभावी हलाखीचं जीवन वाट्याला येणाऱ्या एखाद्या जीवाला मायेची पाखर का घालू नये, असा विचार मनात यायचा. वैवाहिक आयुष्याविषयी अधिकाधिक सजग होऊ लागलो, तेव्हा आपणही असाच प्रयोग करायचा, हे मनात पक्कं होत गेलं. सामाजिक कामाचा थोडासा वाटाही त्यात होताच.सुदैवानं हर्षदाही त्याच विचारांची होती....त्यातूनच आम्ही तो निर्णय घेतला.मूल दत्तक घेण्याचा!पहिलं मूल स्वतःचं जन्माला घालायचं (झालं तर!) आणि दुसरं दत्तक घ्यायचं, असं ठरवून टाकलं. लग्नाआधीच! (म्हणजे, लग्नाआधी ठरवलं आणि लग्नानंतर जन्माला घातलं. नसत्या शंका घेऊ नका!) पहिला मुलगा झाला तर मुलगी आणि मुलगी झाली तर मुलगा, हे निश्‍चित झालं.मनस्वीने आमच्या आयुष्यात प्रवेश केला आणि तिच्यात छान रमून गेलो. आयुष्याला एक वेगळी दिशा, जगण्याची नवी आशा मिळाली. दोन मुलांमध्ये साधारण तीन वर्षांचं अंतर असावं, असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे ती तीन वर्षांची होईपर्यंत आम्ही निर्धास्त होतो. लग्न ठरवितानाही, बाजारात "आपण उतरलो की सहा महिन्यांत लग्न' असा एक भाबडा माज होता, तो काही महिन्यांतच उतरला होता. दत्तक मुलाच्या बाबतीतही तसंच झालं.मनस्वीचा तिसरा वाढदिवस साजरा झाल्यानंतर आम्ही हालचाल करायला सुरवात केली. आम्ही संस्थेत जाऊन दत्तक मुलासाठी अर्ज दिला, की झालंच आमचं काम, अशी आमची समजूत होती. दत्तक मूल घेतलेल्या काही पालकांकडून वरवर माहिती मिळाली होती, पण त्याची प्रक्रिया आणि कालावधी, याविषयी काहीच कल्पना नव्हती....
(क्रमश:)

(दत्तक विधान-1)

Mar 10, 2010

दत्तकविधान-1

``अमक्‍या तमक्‍याचं तिसरं मूलही असंच सातव्या महिन्यात गर्भात गेलं...''कुणीतरी मला कळवळून सांगत होतं.""अरे, एवढी गंभीर परिस्थिती होती, तर कुणी सांगितलं होतं, नस्ती रिस्क घ्यायला?''माझी त्यावरची सहजस्फूर्त, पहिली प्रतिक्रिया ही होती. सर्वसामान्य शिष्टाचारांना धाब्यावर बसविणारी, मध्यमवर्गीय मानसिकतेला न झेपणारी.पण तीच माझी मनापासूनची, प्रामाणिक आणि ठाम भूमिका होती.लोक स्वतःचं मूल असण्यासाठी एवढा अट्टहास का करतात, हा प्रश्‍न मला तेव्हाही पडला होता आणि आताही भेडसावतोच.
स्वतःचं मूल म्हणजे आनंद, उल्हासाचं प्रतीक. कुटुंबाच्या परिपूर्णतेची निशाणी वगैरे कबूल. पण स्वतःचा जीव धोक्‍यात घालून हा विकतचा आनंद घेण्याचा हट्ट कशासाठी?
मूल असणं-नसणं, किती असावीत, कधी व्हावीत, या सर्वस्वी प्रत्येक जोडप्याचा वैयक्तिक प्रश्‍न. त्यांच्या त्यांच्या विचारांनुसार, आर्थिक व अन्य स्थितीनुसार, जबाबदाऱ्यांनुसार घ्यायचा निर्णय. पण त्याबाबत आधीपासून ठाम भूमिकाही हवी. लग्न झाल्यानंतर मूल कधी, केव्हा, कसं हवं, याचा विचार सुरू करणं म्हणजे भांडणाला, वादाला कारणच. "साथ-साथ'मध्ये जाण्याच्या आधीपासूनच वैवाहिक जीवनातलं अनेकांचं हे अज्ञान आणि अविचारी जगणं खटकायचं. मूल होऊ देणं- न होऊ देण्यावरून लोक घटस्फोटापर्यंत जातात, हे ऐकून तर वैवाहिक अपरिपक्वतेच्या गंभीर स्थितीबद्दल कीव यायची.
मूल होण्याचा आणि लैंगिक जीवनाचा संबंध जोडून फिदीफिदी हसण्यासारखे प्रसंग अनुभवायला लागायचे, तेव्हा सर्वाधिक अस्वस्थ व्हायला व्हायचं. घरातला कुणीतरी वडीलधारा किंवा नवरा पत्नीला "आता घरात छोटा पाहुणा आणायचाय हं' असं म्हणायचा आणि ती हिरॉईन पायानं जमीन उकरायला नाहीतर पडद्यांची सुतं काढायला सुरवात करायची. नाहीतर मुरका मारून आत पळून जायची. मूल होण्याचा संबंध लज्जेशी आणि स्त्री-पुरुष लैंगिक संबंधांशी जोडण्याची काय गरज? स्त्री-पुरुष लैंगिक संबंध हेच मूल होण्याचं मूळ कारण असतं, हे कबूल. पण लैंगिक संबंध हे फक्त मूल होण्यासाठीच असावेत, असं नाही ना? हिरोनं हिरॉइनला "काय मग, आज झोप नाही ना आलेय?' असं काहितरी सूचक म्हणण्यावरून लाजणं समजून घेता येतं. मूल होऊ देणं किंवा न देणं, हा अतिशय गंभीर, पती-पत्नी आणि कुटुंबीयांनी एकत्र बसून सोडवायचा, चर्चा करण्याचा विषय. त्यात मुरके-झटके मारण्याचा काय संबंध?
स्वतःच्याच पोटचा गोळा जन्माला घालण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी, कुठल्याकुठल्या बाबा-बाबीचे गंडे बांधणारी, देशोदेशीच्या देवळा-रावळांचे अंगारेधुपारे घेणारी सुसंस्कृत जोडपी आसपास बघताना मला गलबलून यायचं. अजूनही येतं. हा अट्टाहास घर प्रसन्न करणाऱ्या, अवघं आयुष्य उजळून टाकणाऱ्या लहानग्या मुलाबद्दलचा नाही, तर स्वतःच्या रक्तामांसाच्या मुलाबद्दलचा आहे, ही जाणीवच अस्वस्थ करायची. लग्नानंतर मूल होऊ न देण्याचे जेवढे उपाय आहेत, त्याहून दसपट उपाय मूल होण्यासाठीचे आहेत. कुठल्या कुठल्या उपचार पद्धती अंगावर झेलत, गावोगावच्या हॉस्पिटलच्या वाऱ्या करत, बुवा-देवदेवस्कीच्या नादी लागत हे लोक आयुष्यातला अमूल्य वेळ, पैसा असा वाया का घालवतात, असा प्रश्‍न मला पडायचा.
...आपलं वैवाहिक आयुष्य नक्कीच एवढं धूसर, संदिग्ध नसेल, हे मनाशी तेव्हाच कुठेतरी पक्कं केलं होतं.
(क्रमशः)

Mar 9, 2010

चिंचोली ः मोरांची आणि थोरांची!

मोराच्या चिंचोलीबद्दल बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एखाद्या गावात जाऊन मोर पाहण्याचं प्रचंड आकर्षण वगैरे नव्हतं. पण मुळात भटकायला, नवीनवी गावं नि रस्ते शोधायला आवडत असल्यानं कधीतरी एकदा तिकडे जाण्याचं डोक्‍यात होतं. परवाच्या रविवारी हा योग जुळून आला.

गेल्या महिन्यात एका छोट्या ग्रुपला घेऊन मोराच्या चिंचोलीला एक सहल काढायचा बेत केला होता. तो काही कारणांनी साध्य झाला नाही. म्हटलं, वेळ आहे, तर आपणच जाऊन यावं आधी. कार हाताशी होतीच. आनंदराव थोपटे यांच्या वेबसाइटवर जरा टेहळणी केली होती. त्यांच्याशी संपर्क साधून सर्व आलबेल आहे ना, याची चौकशी केली. सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7 ही मोर दिसण्यासाठी उत्तम वेळ. आम्हाला सकाळी लवकर उठून जाणं शक्‍य नव्हतं, म्हणून दुपारी निघायचं ठरवलं. एक वाजता निघणार होतो, पण सव्वादोनपर्यंत ढकलाढकली सुरू राहिली. मग चिडचीड, वैताग, भांडणांनंतर मनस्वीला काखोटीला मारून कसेबसे पुण्याबाहेर पडलो!

मोराच्या चिंचोलीचा रस्ता शोधायला फारसा अवघड नव्हता. नगर रस्त्यावरून शिक्रापूरपर्यंत जाऊन पुढे पाबळ फाट्याला वळायचं होतं. शिक्रापूरपासून चिंचोली 18 कि.मी. आहे. पुण्यापाहून शिक्रापूर साधारण 48 किमी. पुढचा रस्ता थोडा खराब होता. त्यातून एका अरुंद वळणावर एका टेम्पोमध्ये कोंबून कोंबून भरलेल्या उसाच्या कांड्यांनी आमच्या गाडीच्या अगदी जवळून ठिकठिकाणी पप्प्याही घेतल्या!

दुपारी चारच्या सुमारास मोराच्या चिंचोलीत पोचलो. आनंदराव थोपटेंचा मुलगा आम्हाला न्यायला जरा पुढे आला होता. चिंचोलीत दोन-तीन कृषी पर्यटन केंद्र आहेत. जय मल्हार, माऊली वगैरे नावांची. या थोपटे मंडळींचं कृषी पर्यटन अगदीच घरगुती, पण छान, आकर्षक आणि नीटनेटकं आहे. बाहेर पाटी, बोर्ड वगैरे काही नाही. आम्ही थेट थोपट्यांच्या अंगणातच दाखल झालो. ज्येष्ठ आनंदरावांनी हसतमुखानं स्वागत केलं. नातेवाइकच घरी आल्यासारखी "प्रवासाचा त्रास वगैरे नाही ना झाला,' अशी चौकशी केली. मग चहापान झालं. नंतर आम्ही त्यांच्यासह त्यांचा मळा बघायला निघालो. ज्वारी, वांगी, मका, गवार, गहू, कसली कसली शेती करतात ते! चाळीसेक एकर जमीन नि खाणारी चार माणसं! गावात माणसं मिळत नाहीत म्हणून बरीचशी जमीन तशीच पडीक!

शेतात आम्ही पाऊल टाकलं नि दुसऱ्याच क्षणाला तीन-चार मोर शेतात बागडताना दिसते. आमची चाहूल लागताच पळून गेले. पुढच्याही शेतात कुठेकुठे दडून उभे होते. थोडाफार फेरफटका मारून, चिंचा वगैरे खाऊन आम्ही पुन्हा घराकडे परतलो. तोपर्यंत घराच्या जवळ सत्तरेक फुटांवर झाडांखाली काही मोर दिसत होते. कॅमेरा शक्‍य तितका झूम करून त्यांची छबी टिपली.

नंतर आनंदराव आम्हाला त्यांच्या हिल-स्टेशनवर म्हणजे चिंचिणीखाली घेऊन जायला निघाले. घराच्या आवारातून बाहेर पडलो आणि शेजारच्याच माळावर चार-पाच मोर मस्त बागडताना अगदी जवळून दिसले. एक मोर आणि लांडोरीचा खेळही (!) चालला होता. त्याचा व्हिडिओ टिपता आला. काही फोटो मिळाले. तिथून मग त्या "हिल स्टेशन'वर पोचलो. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या चिंचेच्या झाडांखाली त्यांनी खाटाबिटा टाकून बसायची झकास व्यवस्था केली होती. मोठा ग्रुप असेल तेव्हा ही थोपटे मंडळी तिथे सडारांगोळी वगैरे घालून स्वागताचा कार्यक्रम करतात.
संध्याकाळी कृषी पर्यटनच्या बससेवेच्या माध्यमातून एक महिला मंडळ येणार होतं. आनंदरावांची त्यासाठी लगबग चालली होती. आम्ही घरी परत आलो आणि ते तयारीला लागले. दोन किलो पोहे करून ठेवले होते. पण ती पुणेकर सुसंस्कृत मंडळी आल्यावर काय बिनसलं कुणास ठाऊक! अचानक काही मिनिटांत निघून गेली. अन्न-पाण्यावर बहिष्कार घालून! त्यांना म्हणे घरात, दारात, अंगाखांद्यांवर खेळणारे, बागडणारे मोर अपेक्षित होते. "तुमच्या गावातल्या प्रत्येक घरी पाच-पाच मोर पाळलेत, असं ऐकलंय आम्ही. काढा ते बाहेर!' असं सुद्धा दरडावून विचारायला त्यांनी कमी केलं नाही!!

मंडळी पोहे न खाता निघून गेली, तरी आनंदराव मात्र शांत होते. "दोन किलो पोह्यांचं आता करायचं काय? माझं नुकसान कोण भरून देणार?' असा एखाद्या व्यावसायिकाला साजेसा थयथयाट त्यांनी अजिबात केला नाही. "राहू दे. खातील गावातील पोरं. जाऊ देत त्यांना. माणसाचं समाधान महत्त्वाचं,' असं ते पत्नीला आणि मुलाला समजावत होते. मुलाला राहवलं नाही. शेजारच्या दुसऱ्या व्यावसायिक पर्यटन केंद्रात ही मंडळी गेली. पण तिथली 100 रुपये प्रवेश फी ऐकूनच परत फिरली. पुन्हा थोपट्यांकडेच आली आणि पोह्यांवर तुटून पडली.

त्यांच्या निमित्तानं आम्हीही पोहे खाऊन घेतले. रात्री आम्हाला लवकर निघायचं होतं. मोर पोटभर पाहून झाले होते आणि अंधारतल्या अपरिचित रस्त्यावरून फार उशीरा जायला नको, असंही वाटत होतं. थोपटे मंडळींनी ज्वारीची भाकरी, पिठलं, चटण्या, लोणचं, पापड, आमटीभात, असा फर्मास बेत केला होता. आनंदराव स्वतः भाकरीवर बदाबदा तूपही ओतत होते. (मला पुण्यातल्या खाणावळी नि भोजनालयांतल्या "तुपाच्या वाटीचे पैसे वेगळे पडतील,' अशा पाट्यांची आठवण झाली!) "रात्री कमी जेवावे' वगैरे आरोग्यदायी बोधामृताला बासनात गुंडाळून आम्ही त्या जेवणावर यथेच्छ ताव मारला.

जेवल्यानंतर तर "लक्ष्मीनारायणा'चा जोडा म्हणून आनंदरावांनी आणि त्यांच्या अर्धांगिनीनं आमचं औक्षण वगैरे केलं. रीतसर ओटी भरणं, श्रीफळ देणं वगैरे कार्यक्रम झाले. या भल्या मंडळींनी आमच्याकडून थेट पैसेही घेतले नाहीत. "तुम्हाला काय द्यायचे ते देवापुढे ठेवा' म्हणाले. पावणेआठला गावातून निघालो. मुख्य फाट्यापर्यंत सोडायला स्वतः आनंदराव त्यांच्या मोटरसायकलवरून आले होते. तिथून दीड तासांत घरी पोचलो.
"आनंद कृषी पर्यटन केंद्र' नावाने वेबसाइटही चालविणाऱ्या या थोपट्यांच्या पाहुणचाराचा अनुभव अगदी अनपेक्षित होता. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून त्यांचा साधेपणा दिसत होता, पण प्रत्यक्ष गेल्यावर तो अनुभवायलाही मिळाला.

काही टिप्स ः
अंतर ः
मोराची चिंचोली पुण्यापासून 66 कि.मी. अंतरावर आहे. जाण्यासाठी पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरहून पाबळ फाट्याला वळावं लागतं. शिक्रापूर अंतर 50 कि.मी आणि पुढे चिंचोली 18 कि.मी.
वेळ ः मोर दिसण्याची वेळ सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7. सकाळी जास्त मोर दिसतात आणि भाग्यात असेल, तर नाचतानाही पाहायला मिळतात. जास्त जवळून. संध्याकाळी मोर तुलनेनं कमी दिसतात.
जायचं कधी? ः कुठल्याही मोसमात. एक-दोन पाऊस पडून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत असतात. त्या वेळी त्यांचा नाच आणि पिसारा पाहण्याची सुवर्णसंधी असते. शिरूर तालुक्‍यात पाऊसही फार नसतो. त्यामुळे त्याचा त्रास होण्याची शक्‍यता कमी.
पथ्यं कोणती पाळाल? ः कुठलाही वन्य प्राणी त्याच्या मर्जीप्रमाणेच वागत असतो. "माणसं आल्येत, चला त्यांच्यासमोर फोटो काढून घेऊ,' म्हणून आपल्या अंगचटीला येण्याची शक्‍यता नसते. मोराचंही तसंच. चिंचोलीत मोर भरपूर असले, तरी ते ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी आणि जवळून दिसतीलच, असं सांगता येत नाही. शेवटी त्यांची मर्जी आहे! जास्त जवळ गेलं, तर ते पळून जाण्याची शक्‍यताच जास्त. झूमची सुविधा असलेला कॅमेराही फोटोसाठी अधिक चांगला. नाहीतर आपल्या डोळ्यांचा कॅमेरा आहेच! ग्रुपनं जायला हे जास्त चांगलं ठिकाण आहे. रात्रीचा मुक्कामही करता येणं शक्‍य आहे.
आनंद कृषी पर्यटन केंद्र : http://www.chincholi-morachi.com/
छायाचित्रे इथे पाहा ः http://picasaweb.google.com/abhi.pendharkar/uSYPDJ#