Jun 2, 2010

बालनाट्याची "नाटकं'

मनस्वीला मुंबईला फिरवून आणलं, अलिबागला सहकुटुंब जाऊन आलो आणि नंतर रत्नागिरीचीही वारी झाली. पण यंदा बालनाट्याला गेलो नव्हतो. गेल्या दोन दिवसांत ही कसर भरून निघाली.
म्हणजे, मी स्वतःहून तिला बालनाट्याला नेलं नाही, पण ती बालनाट्यं बघून आली. आणि बघतेय. भरत नाट्य मंदिरात बालनाट्यं होणार होती. जाहिरात मी वाचली, पण त्यासाठी पालकांना प्रवेश नव्हता. हर्षदाला नाटकांचे पास मिळाले, पण मनस्वीला एकट्याला पाठवायचं कसं, हा प्रश्‍न होता. शेवटी तिची एक वर्गमैत्रीण नाटकाला यायला तयार झाली नि दोघी सकाळीसकाळी नाट्यगृहावर दाखल झाल्या. दहाचं नाटक होतं, मीही सोडायला गेलो होतो. पण अगदी दरवाजापासूनच आत पालकांना प्रवेश नसल्यानं या दोघी आत बसणार कशा, मध्यंतरात काय करणार आणि मध्येच उठून तर जाणार नाहीत ना, असे प्रश्‍न मनात होते. नाटक संपल्यानंतर त्यांना शोधतानाही अडचण येणार होती.
मनस्वीला आणायला बारा वाजता हर्षदा गेली होती. नाट्यगृहावरूनच तिचा फोन आला, की या दोघी सापडत नाहीयेत. त्या ज्या जागी बसल्या होत्या, तिथे दिसत नव्हत्या. तिच्या वर्गमैत्रिणीची आई मध्यंतरात त्यांना बघायला गेली होती. तेव्हा त्या दिसल्या नव्हत्या. मी हर्षदाला धीर दिला. त्या दोघी चुकून दुसऱ्या जागी बसल्या असतील, नंतर सापडतील, असा दिलासा दिला.
थोड्या वेळानं दोघी सापडल्याचा तिचा फोन आला. झालं असं होतं, की मनस्वी मला नाटक सुरू व्हायच्या आधीच कोल्ड्रिंकची मागणी करत होती. मी बापाचा कडकपणा जमेल तेवढा एकवटून दिला नकार दिला होता. त्याच्या बदल्यात तिनं दोन चॉकलेट्‌स वसूल केली होतीच. मग खोकला गेल्यावर कोल्ड्रिंक पिऊ, असं आश्‍वासन तिला द्यावं लागलं होतं. पण मध्यंतरात त्या वर्गमैत्रिणीनं मनस्वीला भरीला घातलं असावं बहुधा. दोघी बाहेर पडल्या आणि थेट स्टॉलवर जाऊन कोल्ड्रिंकची मागणी केली. वेफर्सही मिळावेत, अशी अपेक्षा त्यांना होती. प्रॉब्लेम एकच होता. दोघींकडे पैसे नव्हते. पण तसं स्पष्ट आणि रोखठोकपणे त्या स्टॉलवाल्या काकांना सांगण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला होता. स्टॉलवाल्या काकांनीही त्यांचा पुणेरी बाणा न दाखवता "नंतर बाबांकडून पैसे घेऊन या, मग देतो हं,' असं त्यांना जमेल तेवढ्या नम्रतेनं त्यानं सांगितलं. दोघींनी नाटकभर एकमेकींशी भांडणं करून रडारडही केली.
ही खरेदी करण्यासाठी त्या जागेवरून उठून बाहेर गेल्यामुळे जागेवर सापडल्या नव्हत्या. नंतर मात्र सर्व आलबेल झालं.
दुसऱ्या दिवशी तर मी स्वतःच मनस्वीकडे पैसे देऊन ठेवले होते. पण फक्त वेफर्स किंवा तत्सम काहितरी घे आणि मैत्रिणीलाही दे, असं बजावलं होतं. माझी एक तिच्याहून मोठी भाचीही तिच्यासोबत होती. त्यामुळे आज त्या हरवण्याचा प्रश्‍न नव्हता. नाटक संपल्यावर विचारलं, तर तिघींनी पंधरा रुपयांचं एकच कोल्ड्रिंक घेऊन तिघींत वाटून प्यायलं होतं. सगळ्या वस्तू दहा रुपयांच्या होत्या, त्यामुळे ही युक्ती केल्याचं उत्तर मला मिळालं.
आता उद्या तिसरं आणि शेवटचं नाटक आहे. बघूया, पानात आणखी काय वाढून ठेवलंय ते!
---
दि. 3 जून 2010.
हुश्‍श!
बालनाट्याचा शेवटचा दिवस व्यवस्थित गेला. चार्लीचं काहितरी नाटक होतं. मनस्वीला ते आवडलं. एकंदरीत, तीन नाटकांपेक्षा आपल्याला स्वतः पैसे खर्च करायला मिळाले आणि स्वतःच्या मनासारखा खाऊ घेता आला, यातच मनस्वी जास्त खूश होती.