Aug 17, 2008

एक हट्टी `देशप्रेमी'

... तरीही 'भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या 'ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला. "काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी? " वेताळानं विचारलं. विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला. वेताळ आणखी कावला. म्हणाला, "बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता. 'काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमावावं लागतं, ' हे तत्त्व त्यानं स्वीकारलं आणि त्याला यशाचा राजमार्ग सापडला. नंतर तो स्वतःच एक 'ब्रॅंड' झाला. 'बाजीगर'चा 'किंग' झाला. एकदा 'किंग'नं स्वतः एक मोठा प्रकल्प हाती घेतला. त्यात तो स्वतः तर सहभागी होताच, पण देशातल्या सगळ्या राजांना घेतलं. देशप्रेमात बुडालेल्या एके काळच्या एका राजाला मात्र त्यानं अजिबात घेतलं नाही. उलट, आपल्या प्रकल्पात त्याची टवाळीच उडवली. त्या राजाला आपल्या 'राष्ट्रभक्ती'चा हा अपमान वाटला. असं करताना, स्वतःच्या काही प्रकल्पांत चांगल्याचुंगल्या 'राण्यां'ना वाईट वाईट दृश्यं करायला लावून त्यानं स्वतःच देशाची संस्कृती धुळीला मिळवली होती, याचा त्या राजाला स्वतःलाच विसर पडला होता... आता मला सांग विक्रमा, त्या 'किंग'चं काय चुकलं? तू जर बरोबर उत्तर दिलं नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होतील. " विक्रमानं थोडा वेळ विचार केला. मग तो म्हणाला, "किंग'चं एवढंच चुकलं, की त्या राजाचं आधीचं कर्तृत्व लक्षात घेऊन त्याला मान द्यायला हवा होता. पण 'किंग'नं स्वतःच त्याची नक्कल केली. आणि जो स्वतःच दुसऱ्याची नक्कल कायम करत आला आहे, त्याची नक्कल होऊच शकत नाही! " "शाब्बास! विक्रमा, कधी नव्हे ते खरं बोललास! पण तू बोललास, आणि आपलं वचन मोडलंस. आता मी चाललो. पण एक लक्षात ठेव. तू नकलेच्या दृश्यांवर बंदी आणलीस, ती सगळ्या लोकांच्या घराघरात ती नक्कल पोचल्यानंतर! आता फक्त किरकोळ ठिकाणचं प्रदर्शन तू रोखू शकतोस. घराघरात पोचलेल्या सीडींचं काय करशील? " वेताळ पुन्हा सीडीमध्ये गेला आणि चार बोटांनी चेहरा झाकून आणि दुसऱ्या हाताची घडी घालून विक्रमादित्य पुन्हा विचारात पडला...