Dec 31, 2007

वर्षा'व प्रेमाचा...


कसे म्हणुनी काय पुसता, आम्हास गेले वर्ष यंदाचे।
होते गुणगौरवाचे, परदेशवारीचे, अन्‌ "धंद्या'चे।।

जानेवारीत घडला पहिला "ग्राफिटी' प्रकाशन सोहळा।
उतरविले ज्याने भूवरी लोकप्रिय मराठी "तारकादळां'।।

वेगळी ओळख जाहली स्वतःची स्वतःला, या पुस्तकामुळेच।
स्वप्रतिभेविषयी राहिलो असतो नाहीतर आम्ही "खुळे'च।।

फेब्रुवारीत मग अनपेक्षितपणे घडली मलेशियावारी।
परदेशदर्शनाचा विषय आम्ही त्याआधी नेला होता, हसण्यावारी।।

मार्चही गेला आनंदात अन्‌ एप्रिल, मे महिनाही।
आंबे आणून विकण्याचा झाला सफल प्रयोगही।।

जून आला पाऊस घेऊन अन्‌ तब्येत सुधारली।
"ड्यूक्‍स नोज'मध्ये डुंबून आंदर मावळाची वाट धरली।।

जुलैत पुन्हा आला "ग्राफिटी'चा दुसरा भाग।
दिसण्यासारखा फोटो आला, "सकाळ'मध्ये पहिल्यांदाच।।

ऑगस्टपासून मग "ग्राफिटी'च्या चाहत्यांची लाईनच लागली।
मुलाखती अन्‌ जाहीर कार्यक्रमांची निमंत्रणेही मिळू लागली।।

मिळाले नवे मित्र-मैत्रिणी, तसेच उत्तम टीकाकारही।
सगळ्यांच्याच प्रेमाने वाढलो, विकसित झाली "ग्राफिटी'ही।।

प्रेम मिळवायचे आणखी अन्‌ असलेले टिकवायचे आहे।
संकल्प दुसरा नाही गड्यांनो, नववर्षात हेच घडवायचे आहे।।

-----------

Dec 24, 2007

स्त्री जन्मा, तुझी कहाणी !


एखाद्याच्या आयुष्याची लक्तरं तरी किती व्हावीत!

जीवनाच्या वाटेवरच्या प्रत्येक खाचखळग्यात ह्यांचंच तंगड का मोडावं?

दुर्दैवाचे दशावतार कसले, सहस्रावतारच ते!

अशीच एक अभागी पोरगी. सिनेमांत कामं करून, रिमिक्‍स गाण्यांत नाचून, "स्टेज शो' करून (कमीत कमी कपडे वापरून) पोटाची खळगी भरणारी. महाराष्ट्राची "शान', देशाची "जान'. पण कुणी तिच्या आडनावावरून कोटी करून तिला महाराष्ट्राची "खंत' म्हणालं. कुणी अश्‍लील, बीभत्स, उथळ, फटाकडी, अशी लेबलं लावली. एका मित्रानं भर पार्टीत तिचा गैरफायदा घेतला. तरीही, अवहेलना आणि बोलणी खावी लागली तिलाच बिच्चारीला! दोन-तीन महिने काही प्रसिद्ध व्यक्तींना एकाच घरात कोंडून घालून त्यांचे दैनंदिन उद्योग जगजाहीर करण्याच्या कुठल्याशा कार्यक्रमातही ती गाजली. पण तिथेही पदरी आली निराशा!

मग आणखी एक मोठी संधी मिळाली, स्टेजवर "ता ता थैया' करून लोकांच्या मनाबरोबरच "एसएमएस'ही जिंकण्याची. दिलखेचक नृत्यानं तमाम देशवासीयांची हृदयं जिंकून टीकाकारांच्या छाताडावर नाचण्याची. साथीला तिच्याशी जन्मोजन्मीच्या साथीचा वादा करणारा तिचा "आशिक'ही. जोडी फायनलपर्यंत पोचली. कुठल्याकुठल्या देवळांत ओट्या भरून झाल्या. देव प्रसन्न झाला, पण दैव रुसलंच. फायनलच्या निकालाच्या वेळी तिची "फसवणूक' झाली. नंतर तिला असं कळलं, की महिनाभर आधीच आपल्याला या कुटिल कारस्थानाचा सुगावा लागला होता. "टीआरपी' वाढवण्यासाठीच आपल्याला घेतलं गेलं होतं. आपल्याला खोटंनाटं रडायला, खिदळायला, नाटकी बोलायला लावण्यात आलं होतं. आपण नाचलो नाही, आपल्याला नाचवलं गेलं होतं. कुठल्याही घटनेची "एक्‍स्क्‍ुझिव्ह स्टोरी' करणाऱ्या कुठल्याशा चॅनेलवर मग तिनं टाहो फोडला. कॅमेऱ्यातले रोल संपेपर्यंत डोळ्यांतील अश्रूंना वाट करून दिली. हवा तेवढा वेळ "बाईट्‌स' दिले.

आता ही मर्द मराठी मुलगी स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांकडेही जाणार आहे, असं कळतं. आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध दाद मागणार आहे. या सगळ्या बातम्यांच्या "फुटेज'चा याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागासाठी तिला उपयोग होईल, असं कुणीतरी सांगितलंय म्हणे तिला!


--------

Dec 16, 2007

भय इथले संपत नाही...--------

खबर पक्की आहे.
तमाम न्यूज चॅनेल्सवर दाखवली असली, तरी!
कॅथरिनानं (कतरिना, कॅथरिना, कॅटरिना...आपापल्या सोयीनुसार!) सल्लूमियॉंला सोडल्याची. सलमानचा पंधरा वर्षांतला सलग चौथा विवाहपूर्व घटस्फोट. आधी सोमी अली, मग संगीता बिजलानी, मग साक्षात ऐश्‍वर्या राय. आता त्याचा कॅथरिनाचा "कैफ'ही उतरला. बिच्चारी! अक्षयकुमार नावाच्या सज्जन, सत्शील, सद्‌गुणी माणसाबरोबर चार-दोन पिक्‍चरमध्ये कामं काय केली, सल्लूमियॉंचं डोकं भडकलं. का भडकू नये? त्यानंच तिला पिक्‍चर मिळवून दिले होते. पार्ट्यांमध्ये मिरवलं होतं. लोकांच्या गाठीभेटी करून दिल्या होत्या. हिंदी लिहिता-वाचता-बोलता येत नसताना, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींत बसवलं होतं. तरीही तिनं "हारे' राम हारे राम हारे क्रिश्‍ना हारे राम' करत त्या अक्षयच्या भजनी लागावं? का? फक्त एक लग्न आणि सल्लूसारखेच तीन-चार विवाहपूर्व घटस्फोट यांचा अनुभव म्हणून?

आपला भाव घसरत चाललाय आणि अक्षयचा दर्जा घसरला असला, तरी भाव वाढतोय, हे खरं आहे. पण एवढ्याच कारणास्तव तिनं आपल्याला सोडावं? सल्लू जाम भडकला. त्यानं नेहमीसारखेच तमाशे केले. ऐश्वर्याला सोडल्यानंतर (म्हणजे, तिनं लाथ घातल्यानंतर त्यालाही बरेच दिवस अशी मिळाली नव्हती!) कॅथरिनानं शेवटी कंटाळून त्याला टाटा केला. पुढे गेल्यावर मागचं विसरायची तिलाही सवय झालेय आता!सध्या सल्लू नैराश्‍याच्या गर्तेत आहे म्हणे. एकतर काळविटाच्या शिकारीप्रकरणी शिक्षेची टांगती तलवार आहेच डोक्‍यावर. वाढत्या वयाचं टेन्शन आहे. त्यातनं अशा "मृगनयनी' सोडून गेल्यावर करायचं काय? भांडायचं कुणाबरोबर आणि तमाशे कुणासमोर करायचे?

अशा नैराश्‍यगस्तीत ("ओढगस्ती'च्या तालावर) घरातच गस्त (येरझाऱ्या) घालत असताना सल्लूला एकदम जुना मित्र संजूबाबा आठवला.

त्यानं फोन लावला, तर संजूबाबा कुठल्यातरी विपश्‍यना शिबिरात होता.
"दीर्घ श्वास घ्या...मन एकाग्र करा. लांबवर नजर टाका. आपल्या मनाचं सामर्थ्य ओळखा. मनातले विचार एकदम काढून टाका. आधीची कोरी पाटी पुसून नव्यानं काही रंगवण्याचा प्रयत्न करा...'

संजूबाबा आपल्याला सांगतोय, की समोरच्या शिबिरार्थींना, ते सल्लूला कळलं नाही....

Dec 12, 2007

मी एक अशिष्टाचारी !

आज मी तुम्हाला माझीच (राम)कहाणी सांगणार आहे. तुम्हाला कदाचित बोअर होईल, कदाचित अगदीच रुटीन वाटेल. पण माझ्या आयुष्यातली ही एक गंभीर समस्या झाली आहे, एवढं मात्र नक्की.

मी आजच्या काळात जगायला अगदी नालायक आहे. हो..."नालायक'च ! "अकार्यक्षम', "अयोग्य', "अपात्र' वगैरे नाही. नालायक म्हणजे नालायक ! ज्याची लायकी नाही, तो. आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि जीवनाचं मूल्यच बनलेला, "शिष्टाचार' कशाशी खातात, हे मला माहित नाही. तसं मासे, मटण, खेकडे, चिकन, शेपू-कार्ल्याची भाजी, पिझ्झा, बर्गर, पास्ता, पैसे, आदी अनेक गोष्टी कशाशी खातात, हे मला माहित नाही. (या यादीत सिगारेट आणि दारूही येते. पण बरेच जण "सिगारेट'ला "पिणे' म्हणतात आणि आमच्या गावाकडे तर "काय दारू खाऊन आलायंस काय,' असं विचारलं जातं. त्यामुळं उगाच शाब्दिक, भाषिक, ज्ञानिक अवमान नको, म्हणून या दोन "पदार्थां'ना या यादीतून वगळलंय. चूकभूल देणे घेणे. म्हणजे खरं तर, घेणेच.)आजच्या काळातलं चलनी नाणं असलेल्या शिष्टाचाराला आमच्या जीवनात (आणि जेवणातही) कधीच स्थान न मिळाल्यानं आम्ही जगायला अगदी नालायक झालो आहोत. (आम्ही म्हणजे मीच बरं का! पण काहितरी तात्त्विक उपदेश करायचा असेल, किंवा खूप वरच्या लेव्हलवर बोलतोय असं दाखवायचं असेल, तर हा शब्द वापरायचा, एवढा शिष्टाचार शिकलोय मी !..सॉरी, आम्ही ! हल्ली तर ललित किंवा "इनोदी' काहितरी लिहायचं असेल, तरी "आम्ही' असा शब्द वापरायचा प्रघात आहे म्हणे !)

शिष्टाचार न शिकविण्याच्या या अशिष्टाचाराचं सगळं (अप)श्रेय आमच्या परमपूज्य मात्यापित्यांनाच द्यायला हवं. आमचा बाप (डोक्‍याला ताप!) हा रात्रीबरोबरच दिवसाही "पिता'च असल्यानं, त्याला त्याच नावानं हाक मारत आलोय आम्ही. त्यामुळं त्याच्याकडून शिकण्यासारखं काहीच नव्हतं. आईला घरकामातून आणि बाहेरच्या मोलमजुरीतून कधी वेळच नव्हता आमच्याकडे बघायला. पोरं किती आणि किती वर्षांची असं विचारल्यावरही तिला उत्तर द्यायला अर्धा तास लागायचा. तर पोरांना शिष्टाचार शिकवण्याची काय कथा?त्यामुळं, जगाच्या बाजारात आम्ही धाप्पकन पडलो, तेव्हा अशा संपन्न कौटुंबिक पार्श्‍वभूमीमुळं आमची वैयक्तिक "पार्श्‍वभूमी' शिष्टाचारप्रेमी सुसंस्कृत, सुविद्य नागरिकांकडून वारंवार शेकून निघाली. थोडक्‍यात ुुवर लाथा बसल्या ! मग आम्ही शिष्टाचार शिष्टाचार म्हणतात तो कशाशी खातात, हे शिकून घ्यायचा थोडाफार प्रयत्न केला. तर अनेक चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी समजत गेल्या.शिष्टाचार म्हणजे भलतंच प्रकरण आहे आणि ते आपल्या बापजन्मात कधी जमणार नाही, असं तेव्हा वाटून गेलं.

शिष्टाचाराचा हा प्रवास अगदी झोपेतून उठण्यापासून जो सुरू होतो, तो पुन्हा रात्री झोपेपर्यंत!घराबाहेर पडल्यावर, समाजात वावरताना, सरकारी कचेऱ्यांत, कोर्टात किंवा ऑफिसांतच हा शिष्टाचार पाळायचा असतो, अशी आमची आपली भाबडी, खेडवळ समजूत. पण तिला सुरुंग लागला, आम्ही "थाड थाड शिष्टाचारा'चे क्‍लास जॉइन केले तेव्हा ! शिष्टाचाराची सुरुवात घरापासून होते, असा आम्हाला अंतर्बाह्य हादरवून टाकणारा, आमच्या संवेदनाच गोठवून टाकणारा साक्षात्कार आम्हाला त्या प्रसंगी झाला. ही धरणीमाय दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं, असं वाटू लागलं. पण हाय रे कर्मा ! तीही शिष्टाचार पाळणारीच ठरली. यमराजाकडून लेखी ऑर्डर असल्याशिवाय दुभंगत नाही म्हणाली.सांगण्याचा मुद्दा काय, की शिष्टाचाराची सुरुवात सकाळी झोपेतून उठल्यापासून, म्हणजे अगदी घरापासून होते. आपण उठल्यावर आपल्या अंथरुणाची घडी करून ठेवणं, हा शिष्टाचार. आपला चहा वगैरे तयार असेल, घरातली स्वच्छतेची कामं उरकून निम्मा स्वयंपाकही तयार असेल, हा समज मनाचा हिय्या करून दूर सारून, बायको अंथरुणातून हललेलीच नाहिये, हे सत्य समोर आल्यानंतर तिला लाडक्‍या (अंथरुणातल्या) नावानं हाक मारणं, हा शिष्टाचार. तिच्या कंबरड्यात लाथ घालून, "म्हशी सूर्य डोक्‍यावर आलाय, इथे काय लोळत पडल्येस,' असं न विचारता, "बरं वाटत नाहीये का? डोक्‍याला बाम चोळून देऊ का?' काल घरी खूप काम होतं का,' असं विचारणं, हा शिष्टाचार. मग तिनं डोळेही न उघडल्याकडे दुर्लक्ष करून, स्वतःच चरफडत उठून, तोंड विसळणं आणि स्वतःच चहा करून घेऊन पिणं, वर तिच्यासाठीही चहा करून ठेवणं, हा शिष्टाचार. रात्री दातांत घाण साठते, तोंडाला वास मारतो. त्यामुळं सकाळी उठल्यावर राखुंडी, मिश्री, दातवण, किंवा नव्या काळात ब्रश-पेस्टनं दात स्वच्छ घासणं, हे आम्ही शिकलो होतो. पण सध्या उठल्या उठल्या अंथरुणातच फतकल मारून दुसऱ्यानं आणून दिलेला चहा पिणं, यालाही श्रीमंतांघरी शिष्टाचार म्हणतात, असंही अलीकडेच कळलं.

आम्ही आपले सूर्यकांत-चंद्रकांतचे सिनेमे बघून मोठे झालेले. त्यांमध्ये "स्वारी', "धनी' वगैरे शब्दांनी पतीला हाक मारण्याची पद्धत. त्यातली नायिका पहाटे उठून, (आमच्या "हिची' पहाट नऊ वाजता होते) सडासंमार्जन करून (म्हणजे काय असतं ते?), सगळी कामं उरकून (विसरा !) धन्याच्या सेवेला सदा तत्पर असणारी. तो बाहेरून आल्यावर त्याचे कोट-टोपी सावरणारी, त्याला काय हवं-नको ते पाहणारी. एकदा सहज घरी हे उदाहरण देऊन पाहिलं, तर स्त्रीमुक्ती, विचार-आचारस्वातंत्र्य, यावर तासभर लेक्‍चर ऐकावं लागलं. सगळा शेजारपाजार गोळा झाला होता. शेवटी मीच नमतं घेतलं आणि "स्त्रीमुक्तीचा विजय असो!' अशा घोषणा (मनातल्या मनात) देऊन गप्प बसलो.बायकोच्या नादाला न लागता मग पाण्याचे चार-दोन शिंतोडे अंगावर उडवून झाले, (सभ्य भाषेत याला आंघोळ म्हणतात) की ऑफिसला जायची तयारी करायची. डबा तयार असेल, तर आपलं भाग्यच. नाहीतर तसंच सुटायचं, दुपारी कॅंटीनमध्ये मिळेल ते शिळंपाकं खाण्याच्या आशेवर.ऑफिसातल्या शिष्टाचारांची तर मोठीच जंत्री आहे. पार्किंगमध्ये जागा मिळाली, तर गाडी लावणं, दोन-चार गाड्या फराफर ओढून आपल्याला जागा करून दिल्याबद्दल वॉचमनलाही "थॅंक यू' म्हणणं, हा शिष्टाचार. या "थॅंक यू'ची मोठी गंमत आहे हं! हॉटेलात ज्या कामासाठी वेटर असतो ना, ते केल्याबद्दल म्हणजे पाणी-बिणी आणून दिल्याबद्दल सुद्धा त्याला "थॅंक यू' म्हणणं "मस्ट' आहे. आपल्या तोंडून एखादी चुकीची ऑर्डर गेली, तर "सॉरी' म्हणायचं. त्याला बोलवायचंही "एक्‍सक्‍यूज मी' असं म्हणून. आता, ऑर्डर देण्यासाठी आधी त्याची माफी का मागावी लागते, कुणास ठाऊक? इंग्रजांची परंपरा आहे म्हणून आपणही चालवायची.... एक्‍सक्‍यूज मी हं! ऑफिसी शिष्टाचारांबद्दल बोलताना जरा भरकटलोच. सॉरी....!

ऑफिसात शिरल्यावर प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणायचं. अगदीच "घाटी' ऑफिस असेल, तर नमस्कार म्हणायचं. आणि त्याहूनही सामान्य संस्कारांचं असेल, तर मात्र शेजारचा माणूस येऊन बसला, तरी ढुंकून बघायचं नाही, हा शिष्टाचार. बरं, सकाळ असेल तर गुड मॉर्निंग, दुपारी गुड आफ्टरनून आणि संध्याकाळी गुड इव्हिनिंग बरं. पण रात्रपाळी असेल, तरी गुड "इव्हिनिंग'च. मी रात्रपाळीत सुरुवातीला "गुड नाइट' म्हणायचो. एवढ्या शिव्या खाल्ल्यायंत म्हणून सांगू! नंतर सरावानं मला असं कळलं, की निघताना सुद्धा काही "खास' सहकारिणींनाच "गुड नाइट' म्हणायचं असतं. तेही हलक्‍या आवाजात, किंवा जमलं तर फोनवरच. बाकीच्यांना, म्हणजे पुरुषांना फक्त "बाय' म्हणायचं. आता, पुरुषांना "बाय' कसं म्हणायचं, असला गावंढळ प्रश्‍न विचारू नका.साधी शिंक आली, तरी सॉरी म्हणायचं. ह्याची तर आपल्याला बापजन्मात कधी सवय नव्हती. शिंक म्हणजे अशी झडझडून पाहिजे, की समोरच्या दोघा-चौघांना आंघोळ होऊन, अख्खा परिसर हादरला पाहिजे. आमचे आजोबा शिंक द्यायचे, त्यानं छपराची कौलं हलायची. माळ्यावरून दोन-चार ढिगारे डोक्‍यावर कोसळायचे. पण या शिष्टाचाऱ्यांच्या राज्यात शिंक द्यायची ती नाका-तोंडावर रुमाल घेऊन. वर "सॉरी'ही म्हणायचं. हा म्हणजे तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार झाला ! बरं, बायकांनी तर शिंक अशी द्यायची, की कळलंही नाही पाहिजे. मला वाटतं, या शिंकांचे पण क्‍लास जॉइन केले असणार त्यांनी.

कुणाच्या घरी जायचं असेल, तर भलतेच शिष्टाचार. आधी फोन करून तो/ती घरी आहे ना, हे विचारायचं. मग त्याची वेळ ठरवायची, आपण येतोय हे सांगायचं. एवढं करून महत्प्रयासानं त्यानं यायला होकार दिलाच, तर त्याच्या घरी जायचं. जाताना घरात केलेलं काही गोडधोड, एखादा पदार्थ वगैरे न नेता, काहितरी "रेडीमेड' गिफ्ट न्यायचं. एखाद्या प्रसिद्ध हलवायाची मिठाई, नाहीतर पॅक्‍ड फूड न्यायचं. त्याच्या घरात असलेल्या समस्त चिल्ल्यापिल्ल्यांची तोंड तासभर बंद राहतील, इतपत काहितरी खाऊ नेणं वेगळंच. त्यानं चहा दिलाच, तरी तो कपात थोडासा कंपल्सरी उरवायचा. तळाशी साखर असली, तर ती चाटूनबिटून अजिबात खायची नाही. कप साफसूफ करून धुण्यासाठी सोपा करून देणं, हे "बॅड मॅनर्स' मानले जातात या शिष्टाचारी जगात. तुमचा कितीही गाढ मित्र असेल आणि त्याच्या घरचं फर्निचर भंगारात विकण्याच्या लायकीचं वाटत असेल, तरी "अरे, नवीन केलं का हे?' असं विचारणं मस्ट. "रंग नवीन दिला का?' असंही विचारायचं. तो "नाही' म्हणाला, तर लगेच पुढचं वाक्‍य फेकायचं..."पण एकदम नवीन वाटतंय हं. छान मेन्टेन केलंय (घर) तुम्ही.' मग त्याच्या सहधर्मचारिणीकडून "बाया कुठे मिळतात हल्ली कामाला, सगळं स्वतःच करावं लागतं. मिळाल्या, तरी अगदी कामचुकार असतात. स्वतः राबल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,' वगैरे टिपिकल प्रवचन ऐकण्याची तयारीही ठेवायची.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, निघताना, "या हं एकदा घरी' असं म्हणायचं. हे वाक्‍य प्रत्येकाला म्हणायचं असतं. विशेषतः तुम्ही पुण्या-बिण्यासारख्या पुढारलेल्या, सुसंस्कृत शहरात राहत असलात, तर ते "मस्ट'च.

आणखी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. "येत्या रविवारी या', "अमूक तारखेला मला सुटी आहे तेव्हा या', असली मूर्खपणाची आणि स्वतःला गोत्यात आणणारी विधानं अजिबात करायची नाहीत. आपण कधीही घरी नसतो, दिवसभर काम असतं, वगैरे वाक्‍यं आधीच गप्पांच्या ओघात पेरून ठेवायची. म्हणजे आपल्याकडे येण्याचा विचारच समोरचा माणूस करत नाही. त्यातून "या हं एकदा घरी' असं म्हटलं, की तो समजून जातो. नव्या सोसायटीत राहायला गेल्यावर समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी सुद्धा हे वाक्‍य फेकता येतं.शिष्टाचाराची ही कथा मग पार चप्पल-बुटांच्या प्रकारापासून स्वच्छतागृहापर्यंत जाऊन पोचते. प्रातर्विधी उरकण्यालाही हल्ली "बाथरूम'मध्ये जाणं म्हणतात. अर्थात, हल्ली संडास-बाथरूम खऱ्या अर्थानं "ऍटॅच्ड' म्हणजे एकत्रच असल्यानं, तेही प्रॅक्‍टिकली खरंय म्हणा!

बॉसच्या वाढदिवसाला ग्रीटिंग, गिफ्ट देणं, कुणाला मिळालेल्या फडतूस प्रमोशनबद्दलही त्याचं तोंड भरून अभिनंदन करणं, हेही शिष्टाचारात मोडतं. आमच्या बापजाद्यांच्या काळात बॉसचा काय, स्वतःचाही वाढदिवस सेलिब्रेट वगैरे करणयाची पद्धत नव्हती. साल माहित असलं, तरी मिळवली, अशी परिस्थिती होती. पण काळानुसार बदलायला हवं, हेही खरंच.मीही काळाबरोबर बदलायचं ठरवलंय. उगाच "धोंडोपंत जोशी' व्हायचं नाही आपल्याला. शिष्टाचार पाळणं एवढाच एक शिष्टाचार सध्या अंगी बाणवायचा प्रयत्न करतोय.

----

Dec 7, 2007

कोकणची टुमटुमी आणि ड्रायव्हिंगची खुमखुमी

बऱ्याच दिवसांनी यंदा शिपोशीचा...माझ्या आजोळचा उत्सव अनुभवला.
धमाल आली.
कार्तिक नवमी ते पौर्णिमा असा हा सहा दिवसांचा उत्सव. कोकणातल्या टिपिकल गावातला. पण नुसती धमाल. गावातून मुंबई-पुण्यात बस्तान बसविलेले सगळे चाकरमानी झाडून या उत्सवाला हजेरी लावतात. वर्षानुवर्षं.

यंदाचा काहितरी एकशेचार-पाचावा उत्सव असावा.एकतर समद्या बामणांचं हे खासगी देऊळ. येणारेही समदे बामण. रात्रीचं जेवण देवळातच. दुपारचं आपापल्या घरी. आम्ही बुधवारी गेलो. म्हणजे उत्सवाचा दुसरा-तिसरा दिवस असावा. रात्रीच्या गाडीनं पुण्यातून रत्नागिरीला पोहोचलो. संध्याकाळी आमची मारुती व्हॅन घेऊन शिपोशी. मी रत्नागिरीला गेलो, की गाडीचा "डायव्हर' मीच.

मनस्वीताईंची प्रवासात छान झोप झाली होती. रात्री देवळात गेलो. देवळाभोवती प्रदक्षिणा, अर्थात भोवत्यांचा कार्यक्रम होता. दर वेळी अभंग म्हणत प्रदक्षिणा, नंतर देवळाभोवती फेर धरून भोवत्यांमध्ये नाच आणि पुन्हा हाच क्रम. असा पाच वेळा. एकादशी होती. त्यामुळं खिचडी बिचडी हाणली होती. नाचताना सगळी जिरली.मनस्वी तर पार उधळली होती. प्रदक्षिणांमध्ये झेपेल तेवढं नाचलीच, पण आम्हाला कुणालाही न जुमानता देवळाच्या परिसरात नुसती धुमाकूळ घालत होती. एवढं मोकळं रान मिळाल्यावर ती आमच्यापाशी कशाला येतेय? ऐश करत होती बेटी!रात्री साडेबाराच्या सुमारास घरी गेलो.

रोज हाच दिनक्रम होता. शिपोशीला मरणाची थंडी होती. त्यातून मामाचं घर कौलारू. सगळीकडे फटी, भगदाडांतून थंडी घरात घुसून ठाणच मांडायची. बरेच पाहुणे तडमडल्यामुळं घरात पांघरुणंही अपुरी पडत होती. त्यामुळं रात्री थंडीत अक्षरशः लाकडं व्हायची. किमान दोन-चारदा तरी जाग यायची. पण त्यातही मजा होती.उत्सवादरम्यान दोन संगीत नाटकं होती. संगीत नाटक म्हणजे फुल टू कंटाळा! मी लहानपणापासून कधीच अशा नाटकांना एका जागी बसलेलो नाही. आम्ही आपले काठाकाठानं फिरत आस्वाद घेण्यात धन्यता मानणारे. कुणी जबरदस्तीनं समोर बसवलंच, तर कधीही शेवटपर्यंत जागा राहिलेलो नाही. त्यातून या वेळी मनस्वी होती. त्यामुळं तिच्या झोपेच्या वेळेआधी घरी पोचणं भाग होतं. ते एक निमित्त मिळालं. रोज नाटक सुरू झालं, की आम्ही घरी!

शिपोशीतली बळीभाऊची मिसळ जाम फेमस आहे. आमचा मुंबईचा मामा तर तिच्यावर फुल फिदा! त्याच्या जोडीनं आम्ही पण मग दोन-तीनदा हाणली. बरं. बारा-चौदा रुपयांत घसघशीत मिसळ, पाहिजे तेवढा रस्सा, दोन पाव! मजाच की मग! "रुपाली'त पाण्याला सुद्धा एवढेच पैसे घेत असतील!उत्सवाचे चार दिवस मजेत गेले. भोवत्या नाचायल नेहमीप्रमाणेच मजा आली. "ग्यानबा तुकाराम'च्या सात स्टेप्स नाचणं म्हणजे खरोखरच दिव्य! यंदा बऱ्यापैकी जमलं मला ते. काही क्‍लिप्स टाकायचा प्रयत्न आहे. बघुया, टेक्‍निकली शक्‍य झालं तर.

उत्सव संपला, सगळी मंडळी पांगली. चार दिवस गजबजून गेलेलं शिपोशीचं मामाचं घरही ओस पडलं. आजीचे डोळे नेहमीप्रमाणे पाणावले.

शिपोशीतून सातारामार्गे पुण्याला गाडी नेण्यासाठी ड्रायव्हर मिळत नव्हता. मग मीच मनाचा हिय्या करून हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. बाबांनीही भरीस घातलं. मग म्हटलं, बघूया, काय होईल ते!शिपोशीहून मीच साताऱ्याला आणि नंतर पुण्याला गाडी आणली. वाटेत आंबा घाट होता, पण त्यात फारशी अडचण जाणवली नाही. हायवेवर वेगात मात्र थोडी तंतरली होती. पण एकूण अनुभव छान होता.

साताऱ्यात एक दिवस राहिलो, पण सज्जनगडाच्या अवघड घाटातून गाडी घालण्याचं धाडस मात्र करवलं नाही. तिथे एक प्रशिक्षित ओळखीचा ड्रायव्हर कम मित्र घेतला. तिथून पुण्याला गाडी एकट्यानंच आणली आणि पुण्यात रस्ते म्हणवल्या जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यांत वाहनांच्या धबडग्यातून चालवलीही.वेगळाचा अनुभव होता.

चांगली बारा-तेरा दिवस रजा उपभोगल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होणं खरंच त्रासदायक होतं. पण नाविलाज को क्‍या विलाज?

------

Dec 4, 2007

"नच ले'लं आणि (न) "पच'लेलं...

घर क्र. 1. स्थळ ः डेनव्हर, अमेरिका.

""अरे, श्रीराम, वाचलंस का हे बाबा, तुझ्या बायकोनं कायकाय वाद निर्माण करून ठेवलेत तिकडे भारतात ते!''
""काय गं आई! मी तिचे सिनेमे कधी बघितले नाहीत, तर त्याबद्दलचे वाद कसे माहीत असणार मला? पण ते मिटल्याचं ऐकलंय मी!''
""ह्या पोरीनं तरी आधीच तपासून घ्यायचं ना सगळं? निष्कारण तिकडे वाद आणि आपल्या जिवाला घोर.''
""आई, उगाच काळजी करतेस तू. ती अख्ख्या भारताची "धडकन' आहे. तिला काय त्रास होणार आहे?''
""कुणी सांगावं बाबा? ती होती म्हणे तेव्हा. पण कशाला उगाच रिस्क घ्यायची?''
""चालतं गं आई. ती आहे ना खंबीर. उगाच काळजी करतेस तू झालं.''
""बरं बाबा. गप्प बसते तू म्हणतोयंस तर. पण तिला लवकर बोलावून घे हो. घराचं रिनोवेशन पण सुरू करायचंय ना आपल्याला? कोण बघणार आहे त्याच्याकडे?''

--------
घर क्र. 2. स्थळ ः मुंबई.
""बेटी, तुला जिची वारस म्हटलं जातं, ती कानामागून येऊन तिखट होऊ पाहतेय. चोप्रांनीच तिला घेऊन नवा पिक्‍चर काढलाय. तू बस मगरींच्या मागे फिरत, नि फ्रिजचे गोडवे गात.''
""हो गं आई, माहितेय मला. मी तर तिच्यापेक्षा जास्त हिट सिनेमा दिला होता गेल्या वर्षी. तोसुद्धा भरपूर पब्लिसिटी करून घेऊन.''
""हो, पण पुढे काय? वर्ष उलटून गेलं त्याला!''
""असू दे. बघू, पुढे काय होतंय ते!''
""तुला काय झालं होतं चोप्रांच्या कनपटीला बसून आणखी एखादा सिनेमा मिळवायला?'' """दिसेन...लवकरच दिसेन. तू नको काळजी करूस.''
""बरं बाई, राहिलं. ती सव्वाशेर होऊ नये, म्हणजे झालं!''
----------
घर क्र. 3. स्थळ ः दिल्ली
""लोलो, आटपलं की नाही तुझं? किती वेळ लावतेस मेक-अपला? आता काय तू फिल्म इंडस्ट्रीत आहेस?'' ""माहितेय मला मम्मी! मला इंडस्ट्रीतून बाहेर काढायला तूही जबाबदार आहेस ना? चांगलं ठरलेलं लग्न मोडलंस माझं! आज मादाम तुसॉंमध्ये माझा पुतळा दिसला असता, तिच्या जागी...! तुझ्यामुळे बिघडलं सगळं.''
""उगाच माझ्या नावानं बोटं मोडू नकोस. तूच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायंस.''
""जाऊ दे. पुन्हा तो विषय नको.''
""मीही तेच म्हणतेय. आता नव्यानं प्रयत्न कर. पुन्हा सिनेमात काम करायला हरकत नाही. चोप्रांनीच तुम्हाला दोघींना एकत्र चमकवलं होतं ना? त्यांच्याकडे पुन्हा प्रयत्न करून बघ. धाकट्या बहिणीची मदत घे, हवं तर!''
""बघते. चल, मला रेसकोर्सवर जायचंय. शॉपिंगही आहे.''
""हेच करत बस आयुष्यभर!'' (चरफडत निघून जाते.)
----------------
घर क्र. 4, 5, 6, 7.... स्थळ ः मुंबई, अमेरिका, अज्ञात...
ऊर्मिला, ममता, शिल्पा, आदी एकत्र येऊन चर्चा करताहेत. संयुक्त मागणीचं एक निवेदन तयार करताहेत. थोडक्‍यात मसुदा असा ः मा. चोप्राजी, आजवर अनेक नव्या नायिकांना आपण चित्रपटांतून संधी दिलीत. आता काही "सीनिअर' नायिकांनाही देताय. आम्हालाही चांगल्या बॅनरची, चांगल्या कथांची गरज असून, त्यासाठी आमचा विचार करावा, ही विनंती.

- आपल्या नम्र,
(खाली डझनभर "माजी' नायिकांच्या सह्या...)
----------

Nov 18, 2007

गोष्ट कडक आजोबांची आणि प्रेमळ नातवंडांची!

गोष्ट कडक आजोबांची
आणि प्रेमळ नातवंडांची!

तशी टारगट पोरं नव्हेतच ती. थोडीशी उथळ म्हणा, हवं तर! पण सिनेमात प्रचंड मान, कीर्ती असलेली. बरं, हे दोघांचं घरचंच कार्य. म्हणजे तिच्या कल्पनेतून झालेलं आणि त्याच्या पैशातून आणि कामातून. अगदी गोडगोड, छानछान. कुणाला दुखवणं नाही, चिडवणं नाही. अजातशत्रूच जणू! (सगळेच "गोडबोले' अजातशत्रूच असतात म्हणे. असो.)

पण त्यांच्या हातून एक छोटीशी चूक घडली. एका "आजोबां'ची नक्कल केली त्यांनी. बरं, हे आजोबा साधेसुधे नव्हेत. या "नातवंडां'चं बारसं जेवलेले. आपल्या "देशभक्ति'पर चित्रपटांनी भल्याभल्यांना सळो की पळो करून सोडलेले...झालं! त्यावरूनच रामायण सुरू झालं...!

बरं, चॅनेलवाल्यांनाही दिवाळीतल्या दोन नव्या सिनेमांची गाणी, गाण्यांमागच्या कहाण्या, नटनट्यांना शूटिंगदरम्यान किती वेळा शिंका आल्या आणि किती वेळा ठसके लागले, इथपासून अगदी स्पॉटबॉय, जेवणाची व्यवस्था करणाऱ्या मावशी, सगळ्यांच्या मुलाखती दाखवून झाल्या होत्या. आता नवा रतीब काय घालायचा, असा प्रश्‍नच होता. त्यातच हे "आजोबा' हाताशी लागले. मग त्यांना (तोंडावरचा हात काढायला लावून) वेगवेगळ्या "मूड्‌स'मध्ये दाखवून, त्यांचा जळजळीत संताप टीव्हीवर दाखवून झाला.बरं, या "कीर्तिवान' मुलांनाही आपल्या सिनेमाची टिमकी वाजवायला काहीतरी नवं निमित्त हवंच होतं. त्यांनीही लगोलग पत्रकार परिषदेत लोटांगण घालून टाकलं! आता, सिनेमात एके काळी बराच मान मिळवलेल्या (आणि सध्या कुणालाच माहीत नसलेल्या) आजोबांची माफी मागायला त्यांचं काय जात होतं? एका दगडात तीन-चार पक्षी! मोठ्यांचा आदर केल्याचा देखावा, सिनेमाची पुन्हा चर्चा आणि आपल्या निरागसपणावर शिक्कामोर्तबही! बरं, आजोबांच्या कार्याचे गोडवे गाऊन त्यांना पुन्हा खूश केलं, की झालं काम! झालं, पेल्यातलं वादळ एका दिवसात पुन्हा पेल्यात गडप!

---
ता. क. सिनेमासृष्टीत असे अनेक आजोबा आहेत. काही नाइलाजाने निष्क्रिय, काही प्रेक्षकांच्या नाइलाजाने सक्रिय! त्यांची चेष्टा करण्याचा प्रसंग घडल्यास पुन्हा अशा बातम्या पाहायला मिळतील. बाय द वे, आपल्या या "देशभक्तिपरायण आजोबां'नी त्यांच्याच "जय हिंद' चित्रपटातील नायिकेने स्वतःच्या अंगावरचे कपडे जाळण्याचं जे रसाळ दृश्‍य चित्रित केलं होतं, तेही देशभक्तीवरची निष्ठा म्हणूनच बरं का!
-----

Nov 12, 2007

कानपिचक्‍या

थोरल्या कपूर घराण्यातला बबड्या आणि (काही अपरिहार्य कारणास्तव) "बिग बी'चा वारस न ठरू शकलेल्या धाकल्या कपूरांची बबडी.

दोघांचा पहिलाच पिच्चर. त्यातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचा. (म्हणजे, बहुतेक वेळा आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या कथा, कथासूत्र, कथेचा "जर्म', संकल्पना यावरून प्रेरणा घेणारा...थोडक्‍यात "ढापणारा') बरं, बॉलिवूडकरांना आधीच गरीब बापड्या प्रेक्षकांना मोठमोठी स्वप्नं दाखवायची भारी हौस. त्यातून हा तर बाबा तर काय, स्वप्नांचा घाऊक "मॉल'वाला. भसाभस बघ स्वप्नं, विक प्रेक्षकांना...बघ स्वप्न, विक प्रेक्षकांना...असं करणारा. तर अशा या सगळ्या तारकादळाचा पिच्चर येणार ऐन दिवाळीत.

त्याच वेळेला आपलं "भुजाबळ' दाखवायची बॉलिवूडचा "न भूतो न भविष्यती' असा सुपर-डुपर-टिपरस्टारची खुमखुमी! बरं, त्याचा सिनेमाही त्याच्याच जिवलग मैत्रीण कम बहीण कम सल्लागार कम मार्गदर्शक कम "फॅमिली फ्रेंड'नं दिग्दर्शित केलेला. त्याच्याही सिनेमात त्याची लाडकी एक "छबडी.' या दोन "रेड्यां'ची (हे संबोधन चित्रपटासाठी; व्यक्तींसाठी नव्हे.) झुंजही ऐन दिवाळीत. (असते एकेकाला हिंसाचाराची हौस!) मग जाहिरातबाजीही तशीच हवी. लहान मुलं उड्या मारत "माझी आई मोठी की तुझी आई मोठी' खेळतात ना, तसं "माझा बाप मोठा की तुझा बाप', तशीच ही स्पर्धा. मग टीव्हीवरचे नाच्यांचे ("नाचांचे' कसे म्हणावे?) कार्यक्रम, कुठल्या कुठल्या पार्ट्या, फॅशन शो, गेला बाजार सार्वजनिक हळदीकुंकू...जिथे संधी मिळेल तिथं आपल्या पिक्‍चरची वाणं वाटायचा सपाटाच. मधुबाला, वहिदा रहमान, माधुरी दीक्षितसकट तमाम सौंदर्यवतींना बाराच्या भावात काढतील, अशाच या "बबडी' आणि "छबडी' असल्याचा दिंडोरा. सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी पण मजबूत प्रीमिअर वगैरे.

"आमच्या बबड्या-बबडीचं "विविध गुणदर्शन' पाहायला यायचं हं,' ही आईबाबांची प्रेमाची सक्ती. त्यामुळं तमाम तारकादळं साक्षात जमिनीवर. "समजलास काय मला,' अशा आवेशानं स्वप्नांच्या विक्रेत्याला जमिनीवर आणण्यासाठी "किंग'ही सज्ज. अख्ख्या चित्रपटसृष्टीचाच "बाप' मानल्या जाणाऱ्यालाही मग सस्नेह निमंत्रण. "बापा'ची "शहजाद्या'सह हजेरी. अशी ही सगळी सरबराई.

चित्रपटसृष्टीतले "बाप', "पिते', पोरं, घरच्या सुना-बहिणी, ज्यांच्यासाठी ही खटपट करताहेत, ते खरे या सगळ्यांचे "बाप' असलेले प्रेक्षक कोणाच्या पारड्यात पसंतीचं माप टाकतात, हे कळायला वेळ लागेल.
-----------

Nov 6, 2007

तुणतुणी, पिपाण्या आणि पावर्‍या...

काही नाही, एकही प्रतिक्रिया आली नाही `दिवाळी पहाट' या पोस्टवर, म्हणून हेडिंग बदलून पाहतोय, झालं!
आधी वाचलेल्यांनी (आणि पहिल्यांदाच वाचणार्‍यांनीदेखील) पुन्हा वाचण्याची गरज नाही. अगदीच वेळ जात नसेल तर ठीक आहे...!

असो.
------

आपल्या समाजात काही साथीचे रोग आहेत. डेंग्यू, मलेरियापेक्षाही भयंकर वेगाने फैलावणारे. गणपतीतली डिजिटल "भिंताडगिरी', नवरात्रातला दांडिया-मॅनिया आणि आता दिवाळीतला पहाटींची धुडगूस.या रोगांचे व्हायरस कसे येतात, कसे पसरतात आणि धोकादायक असल्याचे माहित असूनही अनेक लोक त्याला कसे फशी पडतात, का...ही कळत नाही. गेले एक-दोन दिवस पेपरातल्या मनोरंजनाच्या जाहिरातींवर तुम्ही नजर टाकली असेल, तर हा दिवाळी पहाट कार्यक्रमांचा उच्छाद सहज लक्षात येईल.कुणीतरी अलाणा फलाणा गायक, गायिका, पावरीवाला किंवा तबलाकुट्या. त्याच्या कलेला हा सुगीचा काळ. एरव्ही त्याला कुणी विचारत नसेल, किंवा रंगमंचावरच्या भरताड भरतीतला तो कुणीतरी एकही असू शकेल. पण दिवाळीत त्याला कोण डिमांड!बरं, हे कार्यक्रम पण भल्या पहाटे साडेपाच, सहाला वगैरे असतात. आता घरी पणत्या, दिवे लावायचे सोडून, कोण उपटसुंभ पहाटे पहाटे पाचशे-हजारांची तिकिटं काढून थेटरांमध्ये दिवे लावायला जातात कोण जाणे! आमच्यासारख्या फुकट पासवाल्यांचं तरी एकवेळ समजू शकतो. पण तिकीट काढून काय जायचं असल्या पावऱ्या नि तबले ऐकायला?पावसाळा आला की पावसाळलेली गाणी, हिवाळ्यात गारठलेली गाणी, दिवाळीत मांगल्यरसाने बदबदलेली गाणी...काय चाललंय काय? गोडाचं किती अजीर्ण सहन करायचं?पुढच्या वर्षाच्या दिवाळीसाठी एक प्रस्ताव आहे. पाहा, पटलं तर. नाहीतरी काय, घरंदारं सोडून बाहेर थेटरातच दिवे लावायचेत ना, मग मल्लिका शेरावतच्या हॉट सीन्सवर (प्रात्यक्षिकासह) रसभरीत चर्चा का नको? सनोबर कबीर, दीपल शॉ यांच्यासारख्यांचा दिलखेचक नृत्यथयथयाट का नको? गेला बाजार, एकमेकांना यथेच्छ बुकलणाऱ्या डब्ल्यूडब्ल्यूएफवाल्यांचा रक्तपाती आविष्कार का नको?बघा, विचार करा. सुचवा आणि आनंद घ्या!

-------

Oct 31, 2007

अति घाई------------

""मुडदा बशिवला तुझा...डोळेबिळे फुटलेत की काय? मेल्या पायाचं पार भजं केलंस की...
तुझ्या...******!'

एक कचकचीत शिवी त्या कोंदटलेल्या, तुंबलेल्या बसमध्ये घुमली. आणि गजराबाईंच्या पायावर पाय देणाऱ्या सदाचा चेहरा (न) पाहण्यासारखा झाला.

"कुठल्या मुहूर्तावर बसमध्ये चढलो कुणास ठाऊक,' असं त्याला वाटलं.एक तर सकाळी धावतपळत तो बसस्टॉपवर पोचला होता. त्यातून त्याच्या समोरच त्याची नेहमीची बस निघून गेली. त्यामुळं ही दुसऱ्याच मार्गाची बस त्याला धरावी लागली होती. वर फाट्यावर उतरून पुढे बरंच अंतर उन्हातान्हात चालत जावं लागणार होतं. दुसरं वाहन करावं, तर खिशाला चाट बसणार होती. म्हणून पाय ठेवायला जागा नसूनही तो या बसमध्ये चढला होता. पायरीवरच ताटकळत असलेल्या गजराबाईंच्या पायावर त्यानं नकळत पाय टाकला आणि त्यांनी त्याची अगदी साग्रसंगीत, गावठी ढंगात "आरती' केली होती.

आईवडिलांचा झाला, आता बाकीच्या पिढ्यांचा उद्धार नको, म्हणून बिचारा पुढे सरकायच्या प्रयत्नात होता. अंगकाठीची डायरेक्‍ट चिपाडाशीच स्पर्धा असल्यानं सुळकन कुठेही घुसायची तयारी पक्की होती. पण त्या दिवशी बसमध्ये कंडक्‍टरनं एवढ्या शिटा कोंबल्या होत्या, की त्याला पुढेही सरकता येईना. गजराबाईंच्या पायावर पाय देऊन, वर माफीही न मागता त्यांच्याच पुढ्यात उभं राहणं म्हणजे त्याला साक्षात सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच वाटत होतं. त्या कधी लचका तोडतील, याचा नेम नव्हता.

सदा आपलं अंग चोरत, कसाबसा पायरीच्या एका कोपऱ्यात लटकत होता. गाडी थोडी पुढे गेल्यावर त्यानं आपल्या अंगकाठीचा उपयोग करत दोघा-चौघांना घुसळून थोडं पुढे सरकण्यात यश मिळवलं आणि एक मोकळा निःश्‍वास टाकला. आता तो गजराबाईंपासून थोड्या सुरक्षित अंतरावर उभा होता. तरी त्यांची गुरगुर त्याला स्पष्ट ऐकू येत होती...

""धड बघता येत नाही...चालता येत नाही...! कुठ्ठं न्यायची सोय नाही..!! गुमान उभं ऱ्हा म्हटलं तरी ऐकायचं नाही. लई खुमखुमी ना पुढे जायची...मर आता तिथंच म्हणाव...!''

सदानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. गजराबाई तर त्याला साक्षात कालीमाताच भासत होत्या. लांब जीभ काढून कधी आपला घास घेतील, पत्ता लागणार नाही, असंच त्याला वाटत होतं. त्यानं त्यांच्याकडे न पाहायचंच ठरवलं.

दोन-तीन स्टॉप गेले, तशी गाडी थोडीशी मोकळी झाली. म्हणजे आपापल्या अस्तित्त्वाची जाणीव देण्याएवढी. थोडासा मोकळेपणानं श्‍वास घेता येऊ लागला. सदा पुढे सरकला, तर गजराबाईही त्याच्याच रांगेत आल्या होत्या. सदाच्या पुढेही एक सडपातळ, त्याच्याशी स्पर्धा करेल, असाच बेतास बात माणूस उभा होता. गजराबाई निष्कारण त्याच्यावरही खार खाऊन आहेत की काय, असं सदाला उगाचच वाटलं.

गाडी हलतडुलत पुढे सरकत होती. रिकामी होत होती, तितकीच पुन्हा भरत होती. उभ्याउभ्या वरच्या दांडीला लटकताना सदाला मधूनच पेंग येत होती. एकदा अशीच छानशी डुलकी लागल्यानंतर सदाला मध्येच जाग आली आणि गजराबाई किंचाळत, ओरडत त्याच्याच दिशेनं धावत येतायंत की काय, असा भास त्याला झाला. खडबडून जागा झाल्यावर हे स्वप्न नाही, तर खरंच आहे, याची जाणीव त्याला झाली आणि तो नखशिखांत हादरलाच. बऱ्याच वेळात तो त्यांच्या वाटेलाही गेला नव्हता, मग एकाएकी त्यांना काय झालं या विचारात सदा पडला. पण आता झाल्यागेल्या गोष्टींचा विचार करायला वेळ नव्हता. जीव वाचविण्यासाठी कुठेतरी दडणं आवश्‍यक होतं. कंडक्‍टरचाच आधार घेतलेला काय वाईट, म्हणून तो कंडक्‍टरच्या शर्टात शिरण्याचा प्रयत्न करू लागला. कंडक्‍टरच्या हातातला तिकिटांचा डबा आणि सुटे पैसेही खाली पडल्यानं त्यानंही सदाला कचकचून शिवी घातली आणि झुरळासारखा त्याला दूर झटकला.

गजराबाई एव्हाना प्रवाशांना धक्के देत, ढकलत, त्या दोघांच्या अगदी जवळ येऊन पोचल्या होत्या. त्यांच्या वाटेत आलेले दोघे-तिघे धारातीर्थी पडले होते.
""माझा नवरा...माझा नवरा...!'' वस्सकन गजराबाई कंडक्‍टरच्या अंगावर ओरडल्या.
ह्यांच्या नवऱ्याची काय भानगड, असा प्रश्‍न कंडक्‍टरला पडला आणि या चुकून आपल्याला तर त्यांचा नवरा समजल्या नाहीत ना, असा विचार मनात येऊन सदाची बोबडी वळली.

कंडक्‍टरचीही दातखीळ बसलेली बघून गजराबाई पुन्हा खेकसल्या,
""अरे मेल्या, बेल मार की...माझा नवरा उतरला ना आधीच्या स्टॉपला! मुडद्याला सांगितलं होतं, माझ्याबरोबर ऱ्हा म्हनून. खाल्लं ना शेन...! आग लागली मेल्याच्या तोंडाला...!!''

कंडक्‍टरला आत्ता कुठे काय झालंय, त्याचा खुलासा झाला.
"ए...गाडी थांबव रे...' त्यानं ड्रायव्हरला आवाज टाकला.
एव्हाना अर्धमेला झालेला सदाही सावरत, बिचकत उठला. बालंट आपल्यावर आलेलं नाही, या जाणिवेनंच त्याच्या जिवात जीव आला होता.ड्रायव्हरनं गाडी थांबवली, तशा गजराबाई दोघा-चौघांना आडवं करून, त्यांच्या अंगाखांद्यांवर पाय देऊन, गाडीतून खाली उतरल्या.ड्रायव्हर पुन्हा गाडी सुरू करणार, एवढ्यात पुन्हा मागच्या दाराच्या बाजूनं त्यांचा आवाज आला...
""अरे थांबवा की मेल्यांनो...मला सोडून कुठे जाता...?''

आता काय झालं, असा विचार कंडक्‍टर करत असतानाच एक झिडपिडीत माणूस मागच्या दारानं गाडीत चढून आल्याचं त्याला दिसलं. हाच तो गजराबाईंचा नवरा. तो हरवू नये म्हणूनच त्याच्या नावानं त्या गाडीत चढल्यापासून लाखोली वाहत होत्या.चुकीच्या स्टॉपला उतरल्यानंतर मागच्या दारानं पुन्हा गाडीत चढून तो आता गजराबाईंना शोधत होता. त्या खाली उतरल्या आहेत, हे कळल्यावर तो पुन्हा पुढे आला आणि पुढच्या दारानं परत खाली उतरला.

एव्हाना गाडीत चढलेल्या नवऱ्याला शोधायला गजराबाईही त्याच्या मागोमाग गाडीत आल्या होत्या. त्यांचा आधीचा अवतार पाहून भांबावून गेलेल्या इतर प्रवाशांची आता मात्र हसूनहसून मुरकुंडी वळली होती.मग गजराबाई आणि त्यांचा नवरा थोडा वेळ दारातच उभे राहून "कुकडीऽऽऽऽ कूक' खेळत होते. शेवटी कंडक्‍टरनं वैतागून गाडीखाली उतरून दोघांची गाठ घालून दिली आणि तेव्हा कुठं गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.या नवराबायकोच्या भांडणात सदा निष्कारण सापडला होता आणि शिव्यांबरोबरच बरंच काही त्याला सहन करावं लागलं होतं.

जरा वेळानं गाडी थांबली, तेव्हा तो गाडीचा शेवटचा स्टॉप आहे आणि आपण आपल्या उतरायच्या ठिकाणापासून बरंच लांब आलोय, हेही त्याच्या लक्षात आलं. पण आता गजराबाईंना किंवा अन्य कुणाला दोष देऊन उपयोग नव्हता. पुन्हा रिक्षा किंवा बसचा भुर्दंड त्यालाच पडणार होता. स्वतःच्याच कर्माला दोष देत सदा गाडीतून उतरून निमूटपणे उलट दिशेनं चालू लागला...

-----

Oct 29, 2007

चित्तथरारक!


घटना इवलीशी, पण कधीकधी आपल्या अंगाशी येते.
डोकं सैरभैर होतं, काही काळ मस्तकात तिडीक जाते आणि नंतर सगळं अस्तित्त्वच बधीर होऊन जातं.

घाबरू नका.

मानवी स्वभावाच्या पैलूंच्या मनोवैज्ञानिक विश्‍लेषणाचा व्यासंगी आढावा वगैरे घेणार नाहीये मी!
एक किरकोळ विषय केवढा गंभीर आणि तापदायक बनू शकतो, याचा अनुभव सांगणार आहे, फक्त.

"ब्लॅक अँड व्हाईट' नावाचा जुन्या अजरामर (ही द्विरुक्ती झाली. जुनी म्हणजे अजरामरच!) हिंदी गीतांचा एक कार्यक्रम रविवारी रात्री कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार होता. त्याची चार तिकीटं (प्रत्येकी दीडशे रुपये) खपवण्यासाठी मी उरावर घेतली होती. दोन तिकिटं स्वतःसाठी आणि दोन कुणाला तरी विकण्यासाठी, असा बेत होता. ड्युटीमुळे मला जायला जमणारच नव्हतं, पण घरच्या कुणाला तरी देता येतील, हा कयास होता.

आधी विकतची तिकीटं खपवण्याचा प्रयत्न केला. तसं साधं दोन रुपयाचं लकी ड्रॉच तिकीटही कधी खपवता आलं नाही आपल्याला! उगाच तीनशे रुपयांची तिकीटं खपवायला निघालो होतो. जवळपास पंधरा-वीस जणांनी काही ना काही कारणं सांगितली. मग ती परत देऊन टाकायचा निर्णय घेतला. कमी वेळात ती परत नाट्यगृहापर्यंत पोचवण्यासाठीही बरीच यातायात करावी लागली.

आता उरला प्रश्‍न माझ्या स्वतःच्या दोन तिकीटांचा. ती कुणी विकत घेणार तर नव्हतंच, पण फुकट तरी कुणी जातंय का, हे पाहण्याचा प्रयत्न केला. जवळपास पन्नासेक जणांना विचारून पाहिलं. एवढा चांगला जुन्या हिंदी गाण्यांचा दृक्‌श्राव्य कार्यक्रम. लंडन-दुबई वगैरे दौरा करून आलेला. स्वतः पैसे मोजून मला बघायला मिळत नाहीये, याची चुकचूक (खूप वाईट शब्द आहे ना!) होतीच. पण त्यातूनही, फुकट तिकीटं मिळूनसुद्धा जाण्याचं कुणाच्या भाग्यात नाहीये, याची खंत जास्त वाटली.

नगरच्या एका मित्राला पुण्यातले त्याचे सोर्सेस शोधायला लावण्यापासून कुठले कुठले नंबर शोधून त्यांना कळविण्यापर्यंत बरेच उद्योग केले. बऱ्याच जणांनी नेहमीप्रमाणे एसएमेसला उत्तर देण्याचेही कष्ट घेतले नाहीत. आपल्याला कुणी सोबत नाही, म्हणून जायला मिळत नसल्याबद्दल हळहळणारी एकच मैत्रीण भेटली फक्त.

हां...माझी एक अट होती. संगीताच्या बाबतीत औरंगजेब असलेल्या कुणाही फडतूस माणसाला मला ती तिकीटं द्यायची नव्हती. फक्त फुकटात मिळाल्यावर कुठेही जाण्याची तयारी असलेल्या उपटसुंभालाही द्यायची नव्हती. त्यापेक्षा ती फुकट गेलेली मला चालली असती. नेहमी स्वतःच्या पैशानं आणि कष्ट घेऊन, तडजोडी करून असे वेगळे कार्यक्रम बघणाऱ्या एखाद्यालाच ती देण्याची इच्छा होती.

सुमारे पन्नासेक जणांना विचारून झाल्यावर ऑफिसात एका सहकाऱ्याकडे त्याच्या दोन मित्रांना ती तिकीटं दिली. निदान, ती फुकट न गेल्याचं समाधान तरी मिळालं!असो. या सगळ्या धांदलीमुळे की काय कोण जाणे, आज आवाज पार बसलाय!अजिबात बोलता येत नाहीये.जवळचे म्हणतात, बरं आहे. मी तोंड उघडलं, की तिरकस किंवा कुजकटच बोलतो. त्यामुळे संपर्कातल्या लोकांची मजा आहे. पण बघून घेईन त्यांना माझा कंठ फुटल्यावर!

बाय द वे,

काल "सारखं छातीत दुखतंय' पाहिलं.
बेफाट आहे.
अशोक सराफ, निवेदिता, संजय मोने, विनय येडेकर आणि राजन भिसे अशी भन्नाट टीम आहे.
विनय येडेकरनं धुमाकूळ घातलाय आणि अशोक सराफ तर कहर! अगदी साध्या साध्या प्रसंगांत आणि संवादांत हा माणूस "बाप' असल्याचं सिद्ध करतो.आपल्याला काहितरी होतंय आणि आपण लवकरच मरणार, असं त्याला वाटत असतं. त्या भयगंडातून हे सगळं नाटक घडतं.खूपच धमाल आहे.भाई ताईशेट्टे त्याचं नाव. तो बायकोला सांगतो, ""माझ्यानंतर क्रियाकर्म वगैरे करू नका. पेपरात जाहिराती देऊन त्याखाली कविताबिविता करू नका. "ताईशेट्टे' या नावाला जुळणारं यमक सध्या तरी मराठीत नाहीये!''विनय येडेकर आणि अशोक सराफ दोघं भन्नाटच आहेत. राजन भिसेही बेफाट.
मजा आली.
"मनोमिलन' माझं बघायचं राहिलं. आता त्याचे पुण्यात प्रयोग होत नाहीत.
तसंच, मच्छिंद्र कांबळींचं "भैया हातपाय पसरी'देखील राहिलं.
शरद तळवलकरांना अखेरच्या काळात रंगमंचावर पाहायचं असंच राहून गेलं. त्याबद्दल आता आयुष्यभर चुकचुकायला लागणार.

असो. इट्‌स लाईफ!

पण "सारखं छातीत दुखतंय' अवश्‍य बघा.

you will enjoy!!!!

Oct 24, 2007

पचका वडा

मित्रहो,

आपण अनेक पदार्थ खातो, पाहतो, अनुभवतो. त्यांची रेसिपीही माहिती करून घेतो. काही घरी बनवायला जमतात, काही जमत नाहीत. मग ते आपण आयते मिळवून खातो.पण इच्छा नसतानाही काही पदार्थांची चव चाखावी लागते. अशाच काही अनोख्या पदार्थांची माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न...


सध्या भाग पहिला ः पचका वडा

आपण मोठ्या उत्साहानं काही करायला जावं आणि तोंडघशी पडावं, असे अनुभव जागोजाग येत असतात. त्यातूनच हा रुचकर पदार्थ तयार होतो. हा पदार्थ आपण ज्या परिस्थितीत, किंबहुना, ज्या "स्थिती'त अनुभवू, त्यावर त्याची चव अवलंबून असते. उदा. समजा, एखाद्या तरुणानं तरुणीच्या हृदयापर्यंत आपल्या हृदयींचे गूज पोचवण्याचा घाट घातलाय आणि तिला कुठेतरी "बरिस्ता', "कॉफी डे' मध्ये बोलावलंय समजा. आणि ती बया त्याच्या भावना, प्रेम, एवढी वर्षं दिलेल्या गिफ्ट, गुलाब, तिची भरलेली बिलं, सगळं धाब्यावर बसवून "तुला तसल्या नजरेनं बघितलंच नाही रे राजा' असं सांगते किंवा "मी ऑलरेडी एंगेज आहे,' असा बॉंब त्याच्या तोंडावर फेकते, तेव्हा या घायाळ प्रेमवीराचा होतो, तो "पचका वडा.'

एखाद्याला "एप्रिल फूल' करायला जावं आणि त्यानं आपल्यालाच "मामा' बनवावं, असंही अनेकदा होतं. त्याला "आंबूस वडा'ही म्हणता येईल.पचक्‍याचा दणका जेवढा जास्त, तेवढी त्याची चव अस्सल. विशेषतः बरोबर कुणी असेल, तर त्याला केवळ दुसऱ्याचा वडा होत असताना चाखायला मिळणारी चव लाजवाब! तिला तोडच नाही.

टीप ः शक्‍यतो स्वतः एकदा करून घेतल्यानंतर दुसऱ्यालाही या पदार्थाची चव चाखायला द्यावी.


------------------------

Oct 21, 2007

सो सो सुम...!

बास!
पुरे!
लाडं लाडं, खूप झालं आता.

उसासे आणि उमाळे पुरेत.

मी आपला लिहितोय आणि तुम्हा वाचताय.
आता नाही चालणार हे हळहळं, हुळहुळं लिखाण.

एका गंभीर विषयाकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे....म्हणजे, एका गंभीर आजाराकडे.
खूप पूर्वीच्या काळी पटकी, देवी, जलोदर वगैरे प्राणघातक आजार होते.त्यानंतर कॅन्सर, मलेरिया वगैरे आले.त्यांचीही सद्दी संपल्यावर एड्‌सचा राक्षस आला. आता कुणाला बर्ड फ्लू, डेंगी वगैरेंचीही आठवण होईल. पण माझ्या दृष्टीनं सनातन काळापासून चालत आलेला आणि कोणताही उपाय नसलेला गंभीर आणि असाध्य आजार म्हणजे....सर्दी!मी या आजाराचा आवडता आणि फेवरेट गिऱ्हाईक आहे. सर्दीचे विषाणू, जीवाणू किंवा अन्य कोणी सूक्ष्म जंतू बिंतू असतील, ते एकदा शरीरात शिरले, की माणसाला त्यांच्यापेक्षाही क्षूद्र जंतू करून टाकतात. बलाढ्य हत्तीला मुंगी सोंडेत शिरून बेजार करते, ती गोष्ट चटकन आठवावी! (हत्तीवरून आठवलं...! आमची अतिशहाणी कार्टी नाकातल्या शेंबडाला "हत्ती' म्हणते. तासंतास बोटं घालून नाकाचं गिरमीट करणं, हा तिचा आवडीचा छंद! असो. काही पोरं जातात बापावर!)

या 81 किलो वजनाच्या अवाढव्य देहालाही ही सर्दी दर पंधरवड्याच्या अंतरानं हैराण करत असते. एकदा आली, की 15 दिवस मुक्कामच ठोकते! सध्याही हेच भोग भोगतोय.सर्दी म्हणजे अक्षरशः गेल्या जन्मींचे भोग आहेत. हृदय बदलणं, एका किडनीवर शरीर चालवणं, कुठलीतरी कातडी भलतीकडे चिकटवणं, कवटीच्या बाहेरून मेंदूचं ऑपरेशन करणं, कसल्या कसल्या भयाण रोगांवरची औषधं आणि उपचार डॉक्‍टरांनी शोधून काढलेत. पण सर्दीपुढे त्यांनी हात टेकलेत.

झडझडून शिंका देऊन सर्वांग गदगदा हलवणारी सर्दी असेल, तर आपली काय हरकत नाही. पण नाक चोंदवणारी आणि डोक्‍याचं गोडाऊन करणारी सर्दी आपलं टाळकंच हलवते!"रात्रभर झोपलो नाही' हे वाक्‍य विविध अर्थांनी वापरलं जातं. सर्दीबाज माणसालाच त्याचा खरा अर्थ कळू शकेल. झोप येत असताना, अंथरुणावर लोळावंसं वाटत असताना सूं-सूं करत तळमळत राहणं केवढं भीषण आहे, हे सर्दीबाज माणूसच जाणे!

सर्दीच्या आठवणी अनंत आहेत. कोकण रेल्वे पहिल्यांदा रत्नागिरी स्टेशनापासून सुटली, तेव्हा पहिल्या दिवसाचा अनुभव घ्यायला गेलो होतो. अतिहौसेपायी अख्ख्या प्रवासात दरवाजातून हललो नाही. जाम वारं भरलं होतं कानांत! त्यातच रात्रभर डोक्‍याला लेप लावून झोपलो. दुसऱ्या दिवशी जी सर्दी झाली, ती आठ दिवस टिकली. रुमालाच्या कंपन्यांचा सर्वाधिक खप रत्नागिरीत त्या काळात झाला होता म्हणे!

हां...पण सर्दीच्या दहशतीमुळं पावसात न भिजणं, थंडी-वाऱ्यातून जपणं वगैरे फजूल गोष्टी आपल्याला मान्य नाहीत हं! एरव्हीही करतोच, पण सर्दी झाली की मुद्दाम गार पाण्यानं आंघोळ करायची आणि पावसाची पर्वा न करता गाडीवरून भिजत जायचं हा आमची खुमखुमी जिरवणारा छंद! पुण्यात आल्यानंतर दोन वर्षं मी बिनरेनकोटच गाडी चालवली. कारण रत्नागिरीतल्या "अवर्षणा'पुढे पुण्यातला पाऊस म्हणजे अगदीच पिचपिचीत वाटायचा त्या काळी!

तर अशी ही सर्दीची कथा. किती दळण दळलं, तरी त्यावर उपाय नाही निघायचा.

असो. सध्या प्रवचन इथंच आटपतं घेतो.

नाक पुसायला रुमाल शोधायचाय...!
समस्त सर्दीग्रस्तांना सर्दीवरील उपाय शोधण्यासाठी शुभेच्छा!!
-----------

Oct 18, 2007

शेण कसे खावे?बाजारात येता-जाता, गल्ली-बोळातल्या फूटपाथांवर, रेल्वे स्टेशनांवर, बस स्टॅंडांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची वर्तमानपत्रं, नियतकालिकांत सध्या एकाच प्रकारच्या पुस्तकाची चलती आहे...यश कसे मिळवावे, सुखी कसे व्हावे, यशस्वी होण्याचे शंभर उपाय, अपयशातून यशाकडे वगैरे वगैरे....!


ही पुस्तकं एवढ्या संख्येनं सगळीकडे मिळताहेत, खपताहेत, त्यावरून त्यात नक्कीच काहितरी "दम' असला पाहिजे. "नॉन-फिक्‍शन' पुस्तकंच हल्ली खपतात, अशी "रिऍलिस्टिक' माहितीही मिळाली. त्यामुळं आम्हीही काहितरी हृदयद्रावक, मनखोदक, बुद्धिभेदक, नेत्रविस्फारक, कल्पनारम्य, चक्षुचमत्कारिक लिहिण्यापेक्षा खर्रखुर्र आणि वास्तवाधारित लिहावं, असं वाटू लागलं....पण "यश कसं मिळवावं' अशा छापाचं काहितरी लिहायचं, तर स्वतःला किमान यश मिळालेलं असणं अपेक्षित किंवा अध्याहृत आहे, असं आम्हाला वाटलं. (अशी पुस्तकं लिहिणाऱ्या किती जणांना आधी आणि पुस्तकानंतर यश मिळालंय, देव जाणे! पण आमची आपली एक भ्रामक समजूत.) त्यामुळं तो प्रश्‍न मिटला. यशाचा आणि आमचा म्हणजे भुजबळ-शिवसेनेइतकाही संबंध नाही. मग लिहावं कशावर...?


मोठा खासा प्रश्‍न होता. मग आपला हातखंडा असलेल्या अपयशावरच काहितरी लिहावं असा कौल आमच्या सडक्‍या मेंदूनं दिला. भिकारगल्लीतल्या "कवडीमोल' प्रकाशनानं स्वतःहून प्रकाशनाची तयारी दाखवली आणि दहा रुपये सवलतीत एक प्रत आणि खपलेल्या दर तीन पुस्तकांमागे सव्वा रुपया असं भरघोस मानधन मंजूर झाल्यानंतरच आम्ही लेखणीला हात घातला.सध्या एकट्या सानिया मिर्झाचा सन्माननीय अपवाद वगळता सगळ्याच खेळांतले खेळाडू, कलाकार, मान्यवर, मंत्री, संत्री, मोसंबी, सगळ्या क्षेत्रांत यशस्वी होत असताना त्यांच्यासाठी "यश कसे मिळवावे' अशा प्रकारच्या पुस्तकांची काहीच गरज नाही, असे वाटून गेले. (असलीच, तर ती सचिन तेंडूलकरला असेल. पण तोही जाहिराती, हॉटेल व्यवसाय, पेज थ्री वगैरे क्षेत्रांत यशस्वी आहेच की!)


"यशाचाही कंटाळा येतो' अशा स्वरूपाचे कोणत्या तरी प्रसिद्ध व्यक्तीचे संतवचनही आमच्या कानावर पडले होते. त्यामुळं प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं अपयशाची चवही थोडी चाखून बघायला हवी, असं आम्हाला वाटून गेलं. त्यामुळंच, "अपयशी होण्याचे 51 सोपान' अशा छापाचं पुस्तक लिहिलं, तर ते हातोहात खपेल, अशी मनोमन खात्री झाली. पण पुस्तकाला नाव काहितरी आकर्षक असावं, असं कुणीतरी सुचवलं. उदा. "इडली, ऑर्किड आणि मी', "ही श्रींची इच्छा' वगैरे. म्हणून मग आमचा "अंतू बर्वी' बाणा ऐनवेळी हात देऊन गेला. "अपयशी कसे व्हावे' यालाच समानार्थी असलेला आणि आम्ही स्वतः वारंवार अनुभवलेला "शेण कसे खावे,' हा वाक्‍प्रचार मदतीला धावून आला. पुस्तकाला शीर्षक तेच ठरलं.


या पुस्तकाची किंमत फारच वाजवी (कुणीतरी कानाखाली "वाजवी'ल!) असल्यामुळं आणि ते नाक्‍यानाक्‍यावर "गोवा, माणिकचंद'पेक्षाही सहज उपलब्ध असल्यामुळं त्यातल्या तपशीलाबद्दल फार काही देण्याचा मोह इथे टाळलाय. (विचारलंय कुणी?) तरीही, ही थोडक्‍यात झलक...


1. कुठलंही काम हाती घेताना आपल्याला हे बापजन्मात जमणार नाही, याची खात्री मनात बाळगावी.

2. असला-नसलेला उत्साह झटकून टाकून, प्रचंड नैराश्‍यानं आणि एरंडेल प्यायल्यासारखा (किंवा अलोकनाथसारखा म्हणा, हवं तर!) चेहरा करून कामाला नाइलाजानंच सुरुवात करावी.

3. थोडंसं जरी आपल्याला काम जमतंय, यश मिळतंय, असं वाटायला लागलं, की काहितरी कारणं काढून आपली कामाची दिशा बदलावी. नसलेल्या त्रुटींबद्दल तक्रारी करून काम देणाऱ्याला हैराण करून टाकावं.

4. कामात इंटरेस्ट वाटायला लागला असल्यास ताबडतोब काम थांबवावं. चहा किंवा लघुशंकेचं निमित्त करून कामातून मन काढून घ्यावं. उसना उत्साह गाळून टाकावा आणि नव्या नैराश्‍यानं पुन्हा कामाला हात घालावा.

5. एवढं करूनही कसंबसं एखादं काम पूर्णत्वाला गेलंच, तर अंतिम टप्प्यानंतर तरी ते कुणापर्यंत पोचणार नाही, याची काळजी घ्यावी.

6. शक्‍यतो त्याचा आणि आपल्या अयशस्वी कारकिर्दीचा तोंड फाटेस्तोवर अपप्रचार करावा.

7. कामात जाणुनबुजून काहीतरी त्रुटी ठेवाव्यात आणि त्यांवरच समाधान मानावे.

8. आपलं यश काम पूर्ण होण्यात नाही, तर ते अर्धवट राहण्यात, अयशस्वी होण्यात आहे, याची कायम जाणीव ठेवली, तर कधीच अपयश येणार नाही. (म्हणजे काय?)

9. एखाद्या वेळी यशस्वी होण्याची थोडीशीही धुगधुगी निर्माण झाल्यास, ताबडतोब केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ करून टाकावा.

10. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अपयश हे आपलं ध्येय आहे, हे पक्कं मनाशी ठेवावं.

----


सध्या माझं हे पुस्तक प्रचंड खपतंय.

हं...आता काही नतद्रष्ट समीक्षकांच्या पोटात या पुस्तकाचा अत्युच्च दर्जा खुपल्यामुळं आणि त्यांच्या डोळ्यांवर "यश कसं मिळवावं' वगैरे पुस्तकांचं यश असल्यामुळं त्यांनी माझ्या पुस्तकावर प्रचंड टीका केलेय. "लेखकाच्या अपयशाचं कारण सांगणारं पुस्तक' अशी शेलकी आणि सदाशिव पेठी विशेषणं त्यांनी लावल्येत, पण आम्ही फिकीर करत नाही....अपयशावर आमचा प्रचंड विश्‍वास आहे....!


तुम्हीही हे पुस्तक (कुठे मिळालंच, तर) जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा.
काशीत गेलातच म्हणून समजा!


-------------

Oct 16, 2007

धुलाई आणि कोडकौतुक...


सिनेमा पाहण्याचं आमचं वेड पहिल्यापासूनच.
(दर वेळी हीच सुरुवात करायला हवी का? गेल्या वेळी "चक दे'बाबतही पहिलं वाक्‍य हेच होतं. पेंढारकर, सिंह गवत खायला लागलाय आता!)
अगदी मिथूनपासून सोमी अलीपर्यंत (माहितेय?) कुठलाही सिनेमा वर्ज्य नाही.
परीक्षण लिहिण्याची खुमखुमीही पहिल्यापासूनच.
रत्नागिरीत 1994 साली "रत्नागिरी एक्‍स्प्रेस'मध्ये पहिलं परीक्षण लिहिलं. "हम आपके हैं कौन'चं. त्यानंतर परीक्षणं लिहिण्याचा छंदच लागला. कमलाकर नाडकर्णी, शिरीष कणेकर, अभिजीत देसाई, श्रीकांत बोजेवार, यांचा मी पहिल्यापासूनचा फॅन. आणि नंतर मुकेश माचकरचा. किती लिहिलंय या लोकांनी चित्रपटांबद्दल! त्यांनी परीक्षणं वाचणं म्हणजे तर मेजवानीच!

मग त्यांची नक्कल करता करता स्वतःची शैली (डोंबल!) विकसित झाली.

"जेमतेम दोन-तीन हातरुमालांपासून तयार होतील, एवढेच कपडे "सत्यम शिवम्‌ सुंदरम'मध्ये झीनत अमाननं घातलेत.' किंवा "अमक्‍या तमक्‍याला अभिनेता म्हणण्याची माझी तरी छाती होणार नाही. (माझीच काय, ममता कुलकर्णीचीही होणार नाही!) हे शिरीष कणेकरांनीच लिहावं.
"आपटून धोपटून पीळ पीळ पिळलेली माहेरची साडी' हे खास नाडकर्णी स्टाईल शीर्षक. किंवा "चित्रपटात मरतानाही पूजा बेदी अंगप्रदर्शन करून मरते. (केवढी ही निष्ठा!)' हे त्यांच्याच परीक्षणात शोभणारं.
"रंग' ओला आहे' हे श्रीकांत बोजेवारांचं शीर्षक, किंवा "त्यांचंच आग लागो त्या बस्तीला' हे शीर्षक.
"थोरला आणि धाकटा' हा अभिजीत देसाईंचा लेख...आजही चांगलाच लक्षात आहे.
"अचानक कसला, भयानकच!' हे माचकरचं शीर्षक. किंवा "पहेली'वरचा लेख. खास "मुमा'टच!
--
हे सगळं वाचता वाचता स्वतःही परीक्षणं लिहायची सवय लागली आणि चक्क छंद जडला. पुण्यात आल्यावर पत्रकारितेची पदवी करता करता आमच्या विभागाच्या नियतकालिकातच काही परीक्षणं लिहिली. मग "सकाळ'मध्ये नोकरीला लागल्यानंतर दोन-तीन वर्षांनी परीक्षणं लिहिण्याची संधी मिळाली.

परीक्षणात खूप प्रयोग करण्याची संधी मिळाली. मराठी चित्रपटांबद्दल सहानुभूतीनं लिहिण्याचं धोरण स्वीकारतानाच वाईट चित्रपटांना ठोकण्याची परंपराही राबविली. सगळ्यात गाजलेलं परीक्षण म्हणजे गौतम जोगळेकरच्या "आई नं 1'चं. एवढा भीषण सिनेमा मी आजवर पाहिला नसेल. "माता न तू वैरिणी' असं शीर्षक मी त्याला दिलं होतं. जोगळेकर जाम खवळले होते. भलं मोठं पत्रही लिहिलं. तेही "सकाळ'ने छापलं, माझ्या उत्तरासकट!


एका संथ, वाईट मराठी चित्रपटाचं परीक्षण मी "आपण रांगत आहात' असं दिलं होतं. केदार शिंदेच्या "जत्रा-ह्याला गाड रे त्याला गाड'चं परीक्षण "कथेला गाड रे तंत्राला काढ' या शीर्षकानं दिलं होतं.

"धूम-2' या केवळ तांत्रिक चमचमाटी चित्रपटाचं परीक्षण वेगळ्या शैलीत, "गंमत म्हणजे काय रे भाऊ?' असं दिलं होतं. तेही गाजलं.
चित्रपट बघताना कॅमेऱ्याचे अँगल्स, दिग्दर्शकाची मानसिकता, शेड्‌स, रंगांचा वापर, याला माझ्या लेखी अजिबात महत्त्व नाही. मी मानतो, ते चित्रपटाच्या एकूण परिणामाला. सिनेमा आपल्याला एकूण आवडला, तर असल्या बारीक सारीक गोष्टी लक्षातही येत नाहीत, राहत नाहीत. चित्रपटच परिणामकारक नसेल, तर त्यातल्या त्रुटी, खाचाखोचा आपल्याला दिसायला लागतात. तशी संधीच प्रेक्षकाला देत नाही, तो खरा उत्तम चित्रपट.

विनोदी, गंभीर, सामाजिक, कौटुंबिक...कुठलाही चित्रपट आपल्याला वर्ज्य नाही. मी परीक्षणासाठी चित्रपट पाहताना सर्वसामान्य प्रेक्षकाच्या नजरेतून बघतो. म्हणजे अगदी पिटातल्या नाही, तर सुजाण प्रेक्षकाच्या. एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला चित्रटपट आनंद देतो ना, भिडतो की नाही, हे महत्त्वाचं. मग बाकीचे निकष दुय्यम.

मराठी चित्रपट म्हणून निष्कारण उदोउदो नाही आणि दुय्यम अभिनेत्यांचा म्हणून अनाठायी टीका पण नाही. पण हेतूच वाईट असेल, तर त्या सिनेमाला, दिग्दर्शकाला सोलून काढण्याला पर्याय नसतो. म्हणायचं उदात्त हेतू आणि दाखवायच्या उघड्या बायका, या धोरणानं आपलं टाळकंच फिरतं.

तुम्हाला जे मांडायचंय ते स्पष्ट मांडा, स्पष्ट सांगा. अमक्‍यातून तमका अर्थ काढा वगैरे नाही जमणार. तुमचा संदेश व्यवस्थित नाही पोचला, तर तुम्ही नापास!नंतर पत्रकं वाटत फिरणारात का गावभर? मग...? तुम्ही त्या त्या प्रसंगातूनच बोललं पाहिजे. नाहीतर हे दिग्दर्शकाचं माध्यम कशाला म्हणायचं?

असो. खूप बोललो. माझी परीक्षणं तुम्ही वाचत असाल, तर तुम्हाला काय वाटतं?
अनाठायी झोडपल्यासारखं वाटतं का?
अकारण स्तुती वाटते का?

तुमचे चित्रपट आवडी-नावडीचे निकष काय आहेत?

मलाही तुमचं रसग्रहण वाचायला आवडेल...

-----------

Oct 11, 2007

काहीच्या काही चारोळ्या...ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
तरीही मन `पॉइंट`वर जाणं सोडत नाही...
तुला शोधण्याच्या निमित्ताने मग नजर
एकही `पाखरू' सोडत नाही...


-----


बरसण्याची वेळ आली
तेव्हा डोळेही फ़ितूर झाले
त्याच वेळी खांदे माझे
बायकोला `पोचवायला` आतुर झाले...
---------
गावाबाहेर आडोशाला
एक पडका वाडा आहे
तिथेच भरलेला माझ्या
तारुण्यातल्या पापांचा घडा आहे...
--------
कुणी बरोबर असेल, तर
सिनेमा पाहायला अर्थ आहे
एकट्यानेच बघायचं असेल,
तर आतला अंधारही व्यर्थ आहे...
-----------
दाढीतला एक ढेकूण
एकदा चुकून मिशीत शिरला
इथे अधिक सुरक्षित राहू म्हणून
मिशीतल्या मिशीत हसला...
---------
घराभोवती कुंपण हवं
म्हणजे ते सुरक्षित ठरवता येतं
आपल्या गुरांना मात्र
दुसर्‍याच्या आवारात चरवता येतं...
-------
सिगारेटची थोटकं मिळाली
परवा कपाट लावताना
किती माझी उडाली धांदल
असले धंदे लपवताना...
------------
मरताना वाटलं,
आयुष्य नुसतंच वाहून गेलं
करायचंय करायचंय म्हणताना
माझं लग्न करायचंच राहून गेलं...
----------------
मी तुझ्याकडे यायला निघते,
पण तुझ्यापर्यंत पोचत नाही
७-८ मित्रांना भेटल्यावर
तुला काय सांगावं सुचत नाही...
------------
बोन्साय केलेल्या झाडालाही
एकदा मोठी पालवी फुटली
त्यालाही कळेना,
ही `वाढायची' जिद्द कुठली?
-----------
मी बुडताना गाव माझा
डोळे भरून पाहिला होता...
`दिवाळी' साजरी करायला सारा गाव
किनार्‍यावर उभा राहिला होता..
-----
बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो..
कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो...
-------------------

Oct 9, 2007

द ग्रेट अन"लॉयल' सर्कस...

""बाबा, सर्कसला जाऊया?''
"नको रे...कंटाळा आलाय. शिवाय गावाबाहेर आहे ती. खूप लवकर निघावं लागेल.''"
"शी बाबा! तुम्हाला नेहमीच कंटाळा. अहो, बरेच प्राणी असतात त्यात. मला बघायचेत.''"
"नको म्हटलं ना! आणि हल्ली मेनकाताईंच्या कृपेनं त्यात कुठलेच प्राणी नसतात. फक्त कुत्री-मांजरी, पोपट-मैना असतात.''"
"वाघ, सिंह, हत्ती नसतात?''"
"अजिबात नाही!''"
"मग...सर्कसमध्ये बघायचं काय?''
"अरे...सांगितलं ना, बघण्यासारखं काहीच नसतं हल्ली''"
"पण ते झुल्यावरच्या कसरती, मृत्युगोल, गाड्यांच्या कसरती तरी असतातच की!''"
"तू अगदी हट्टी आहेस बघ. अगदी आईवर गेलायंस. आपलं बोलणं खरं केल्याशिवाय राहणार नाहीस. अरे, गाड्यांच्या कसरती बघण्यासाठी सर्कशीच्या तंबूपर्यंत कशाला जायला हवं? मी तुला दाखवतो. आपल्या पुण्यातल्या रस्त्यांवर रोज अखंड कसरती चालू असतात.''"
"बाबा बाबा, आपण जायचं, रस्त्यावरची सर्कस बघायला?''"
"चल...''
-----
दृश्‍य दुसरे ः स्थळ ः टिळक चौक. (अलका टॉकीजच्या जवळचा. "टिळक' कोणाला माहित नाहीत, ना!)"

"हं. आता बघ गंमत. तुला वाहतुकीचे नियम शिकवलेत का शाळेत? हा हिरवा दिवा म्हणजे जा, पिवळा म्हणजे गाडी हळू करून थांबा आणि लाल म्हणजे पूर्ण थांबा. पण बघ हं आता...लक्ष्मी रस्त्यावरून येणाऱ्या या गाड्या आहेत ना, त्या पिवळा दिवा लागल्यावर थांबणारच नाहीत. उलट, आणखी वेगानं जातील. लाल दिवा लागल्यानंतरही पुढेच पळत राहतील.''"
"बाबा बाबा, तो बघा, सायकलवाला. तो काय उडवणार आहे का आता?''
""उडवू सुद्धा शकतो, बाबा! या सायकलवाल्यांचं काही खरं नाही. आता लकडी पुलावरून दुचाक्‍यांना बंदी आहे की नाही? पण सायकलवाल्यांना कुठलेच नियम नाहीत. ते कुठेही, केव्हाही, कसेही घुसू शकतात. बघ आता, कसा वाकडा-वाकडा शिरतोय, सिग्नल नसतानाही! अरे अरे अरे....तो बघ दुसऱ्याला पाडून निघून गेला!''"
"बाबा, लाल सिग्नल आत्ताच लागलाय ना, मग हे बाईकवाले गाड्या कशाला फुरफुरवतायंत?''
""अरे, मागच्या जन्मी मावळे होते ते. सारखी घोड्यावर टांग मारायची सवय. त्यामुळं गाडीचा चाबूक ओढल्याशिवाय करमत नाही. सिग्नल असताना गाडी बंद करणं त्यांना मान्य नाही.''"
"बाबा, ते कुठूनही वळवून, कसेही चालवणारे रिक्षावाले काका बघितलेत?''
""अरे बाबा हळू बोल! त्यांनी ऐकलं, तर त्यांच्या सगळ्या जातभाईंना गोळा करून आपल्या सळो की पळो करून सोडतील. दिसायला ही एवढीशी रिक्षा असली, तरी या काकांची "दादा'गिरी मोठी आहे. ते कुणालाही जुमानत नाहीत. तो रिक्षावाला तर बिनधास्त कडेला रिक्षा लावून दुसऱ्याशी बोलत बसलाय, बघ! रिक्षा एवढीशी असली, तरी तिचे दर विमानापेक्षाही जास्त असतात, माहितेय?''
-----------

दृश्‍य तिसरे ः अप्पा बळवंत चौक.

""बाबा, आपण इथे का आलोय?''"
"अरे, संतांच्या, ज्ञानवंतांच्या, विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या आणि आता काही उपद्रवी जंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा एक हिस्सा आहे हा! ऐतिहासिक शनिवारवाडा इथून अगदी हाकेच्या अंतरावर. जगप्रसिद्ध बावनखणी....जाऊ दे जाऊ दे....! आणि तू असा उद्धटासारखा प्रश्‍न विचारतोयंस...? अरे आयशी-बापसानं हेच शिकवलं का?''"
"बाबा, तुम्ही तर मला आज पहिल्यांदाच इथे आणताय. आणि बावनखणी म्हणजे काय?''
""अं...अरे ते बघ..ते बघ...तू आईस्क्रीम खाणार?''"
"नको. विषय बदलू नका.''"
"आता इथे उभं राहून निमूट गंमत बघ. इथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याचीच खरी सर्कस आहे. बघ, कुठल्याही बाजूनं वाहनं सुटली, तरी बाजीराव रस्ता ओलांडणंच शक्‍य नाही. ते पांढरे पट्टे दिसताहेत ना, ते क्रॉसिंगसाठी नव्हे, गाड्यांच्या रेससाठीच असावेत, असं वाटतं ना?''"
"बाबा, इथे पोलिस नसतात का?''
""असतात ना...अरे, पुण्यातले वाहतूक पोलिस कर्तव्यदक्ष आहेत. ते नेहमी ड्युटीवर हजर असतात. पिवळ्या दिव्यावर गाड्यांना थांबायला लावतात. नाही थांबल्या, तर दंड घेतात. चिरीमिरी अजिबात घेत नाहीत. पण ते नसले, की असा गोंधळ होतो बघ...!''
""बाबा, ते कोपऱ्यात तंबाखू मळत, गप्पा मारत उभे असलेले पांढरा शर्ट, खाकी पॅंटमधले काका कोण आहेत? मघाशी इथे रस्त्यातच उभे राहून वाहनांना सूचना करताना बघितलं होतं मी त्यांना...!!''"
"अं....ते ना... ते...आपले ते हे...जाऊ दे. घरी चल!''

-------

Oct 2, 2007

शुद्ध काही जीवघेणे...

"शुद्ध' काही जीवघेणे...

---------
व्याकरण, भाषा, यांचा आग्रह अस्मादिकांना पूर्वीपासूनचा.
मी काही तर्कतीर्थ नाही, की भाषासुधारक वि. दा. सावरकर.
पण माणसानं निदान शुद्ध, व्यवस्थित, दुसऱ्याला समजेल, अशा सोप्या पण स्वच्छ भाषेत बोलावं, एवढा बरीक आग्रह.
किंबहुना, हट्टच.
(त्यामुळं गृहस्वामिनीशीबरोबरही अनेकदा समरप्रसंग ओढवतात. असो.)

पुण्याची भाषा अधिक शुद्ध, व्याकरणाग्रही, आदीम आहे, असा आमचा आपला पूर्वीपासूनचा ग्रह. पण पुण्यात दहा वर्षांच्या मुक्कामातला अनुभव जवळपास नैराश्‍यजनकच. आता, काही तज्ज्ञ मंडळी म्हणतील, बाहेरून आलेल्या (आमच्यासारख्या) लोकांनीच पुण्याची भाषा बिघडवली. पण मी हे बोलतोय हे पुण्यात राहणाऱ्या, म्हणून पुणेकर असलेल्या बाहेरच्या बुणग्यांविषयी नाही; तर ज्याच्या पिढ्यान्‌ पिढ्या पुण्यातच जन्मल्या (आणि खपल्या) आहेत, अशा अस्सल पुणेकर म्हणवणाऱ्यांबद्दल.

"तुम्ही येणार आहे काय,' हे मराठी व्याकरण मला पुण्यात आल्यावरच लक्षात आलं.
"तू येणार आहेस काय,' "तो येणार आहे काय' आणि "तुम्ही येणार आहात काय,' ही वाक्‍यरचना योग्य, असं आमचं आपलं मराठीचं दुबळं ज्ञान आम्हाला सांगतं.
पण "तुम्ही येणार आहे काय' ही आमच्या ज्ञानात भरच.

"सिंह' ( lion ) हा शब्द लिहिताना "सिंह' लिहायचा आणि "सिंव्ह' असा उच्चारायचा, अशी आपली आम्हाला पुस्तकातून, अभ्यासातून, शाळेतून मिळालेली शिकवण. पण पुण्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला ज्याचा अभिमान असला पाहिजे, अशा सिंहगडाचा उच्चार अस्सल पुणेकरही "सिंव्ह'गड' नव्हे, तर "सिंह'गड असाच करताना पाहून, तानाजी नावाच्या नरसिंहाचे बलिदान व्यर्थ जाते की काय, अशीच शंका आमच्या मनाला (सिंहासारखी) चाटून गेली.

पाण्याची "टाकी' असते. पाण्याचं "टाकं' हा शब्द मला पहिल्यांदाच कळला.
पुठ्ठ्याचा खोका असतो. "खोकं'ही नवीन होतं.
माळावर वारा सुटतो. "वारं' मला न झेपणारं होतं.

बाकी तो लसूण की ती लसूण,
ती लसणीची चटणी, की ते लसणीचे तिखट.,
तो ढेकर की ती ढेकर,

तो लाईट की ते लाईट,

हे वाद तर आदीम आहेत. आणि त्यांना अंतही नाही. त्यांत मला पडायचं नाही. पण वानगीदाखल (वांगीदाखल) काही उदाहरणं दिली.

फुटाणे म्हणजे, साखर-फुटाणे.
इथे चण्यालाच फुटाणे म्हणतात.

आता यापुढची काही उदाहरणं अस्सल पुणेकराची नसतील, पण एकूण अनुभवावरची आहेत.
त्याबद्दल मी अस्सल पुणेकराला दोष देणार नाही.

वात आणणारे काही शब्द ः
(माझ्या मते) योग्य शब्द सुरुवातीला आणि त्याचं अपरूप शेवटी.
पोळी - चपाती
(अनेकवचनी) केस - केसं
किल्ली - चावी.
पेन्सिली/पेन्सिल्स - पेन्सिल्या
गटारे - गटारी
(एकवचनी) कारंजे - कारंजा
आमटी - डाळ
भात - राईस

--------------

आता, डोक्‍याची मंडई करणाऱ्या (हाही वाक्‍प्रचार पुण्यातलाच!) काही प्रश्‍नांची जंत्री

ः1. स्थळ ः अमृततुल्य हॉटेल कम टपरी. (इथे फक्त चहा आणि चहाच मिळतो. अगदी डोक्‍यावरून पाणी म्हणजे साधं बिस्कीट आणि क्रीम रोल.)
तिथे आपण एकटेच चहा प्यायला गेल्यावर, कळकटातला कळकट वेटर खुणेनंच विचारतो ः"एक' का?(म्हणजे बोटानं फक्त "एक'ची खूण. संभाषण नाहीच.)

अरे बैला, मी काय तुझ्याकडे "सुपरपॉवर रिन' विकायला आलोय? एकटा चहा प्यायला आलेलो दिसतोय ना? मग (शक्‍य असेल, तर बोटं बुडवून) चहाचा कप बोडक्‍यावर आपट, नाहीतर तोंडानं विचार ना! खाणाखुणा कसल्या करतोयंस?
---
2. स्थळ ः अस्मादिकांच्या सोसायटीचे पार्किंग, किंवा घराचा दिवाणखाना, किंवा कोणतीही जागा.
वेळ ः दुपारी अकरा, बारा, दोन किंवा तीन, चारपर्यंत कोणतीही.
समोरून कुणातरी परिचिताचे आगमन, किंवा फोनवरून संभाषण.
अगदी निरागस, प्रामाणिक विचारणा ः आज "सुटी' का?

पण त्याची ही निरागसता तळपायाची आग मस्तकाला नेऊन भिडवणारी.
अरे अकलेच्या खंदका! नतद्रष्टा! मी पत्रकार आहे! सकाळी उठल्यावर चहा ढोसताना तुला ज्या ताज्या बातम्या चवीचवीनं वाचायला आवडतात (आणि चॅनेलवरची एखादी बातमी त्यात रंगवून सांगितलेली नसली, तर तू शिव्या घालतोस,) त्यासाठी जोडे, लेखणी आणि की बोर्डची बडवाबडवी मला आणि माझ्या जमातीतल्या समस्त पोटार्थ्यांना रोजच करावी लागते. तुझ्यासारखं दहा ते सहा ऑफिस, मग निवांत घरी चहा-पोहे, पर्वती, रात्री साडेआठला वरणभात नाहीतर गुरगुट्या भात आणि पावणेदहापर्यंत गुडूप, असं सरळ, साधं, सोपं आयुष्य नाही आमचं! तुमच्या गरजेपोटी आम्हाला रात्री एकपर्यंत लोकांच्या कुलंगड्यांच्या उठाठेवी करत, सोमालियापासून हिरडोशी बुद्रुकपर्यंतची उष्टी-खरकटी आवरत बसावं लागतं. रात्री अकरा-बारा-एक कितीही वाजेपर्यंत उपाशी पोटी भरल्या घरच्या धन्यांच्या भाषणांच्या बातम्या देत बसावं लागतं.संध्याकाळी आणि रात्री ऑफिसमध्ये म्हटल्यावर सकाळी (आणि सकाळीच) मी घरी असणं अपेक्षित आहे ना? मग कशाला तेच तेच प्रश्‍न विचारून डोकं पिकवतोस?
---

3. तुम्ही "एडिटिंग' म्हणजे नेमकं काय करता? अग्रलेख पण तुम्हीच लिहिता का?

या प्रश्‍नावर त्या माणसासमोर लोटांगण घालणं किंवा स्वतःच्या डोक्‍याचे केस उपटून घेणं, याखेरीज दुसरा काहीच पर्याय नसतो.
असे हे काही प्रश्‍न.
काही शुद्ध, पण जीवघेणे!

यांतून सुटका बहुधा अस्मादिकांचे अवतारकार्य संपुष्टात येईपर्यंत तरी नाही!
-------------

Sep 30, 2007

ग्राफिटी नगरच्या भेटीला...

मित्रहो,

"ग्राफिटी'निमित्त मुलाखतींचे कार्यक्रम सध्या करतोय.
म्हणजे, मुलाखती देत फिरतोय.
आपल्याला काहीही वर्ज्य नाही...यशवंतराव, साधना कला मंच, हाउसिंग सोसायट्या, हळदीकुंकू, मंगळागौर, केळवण, डोहाळजेवणं...!!!
शनिवारी नगरला कार्यक्रम झाला. आमचे तिथले सहकारी अभय जोशी यांनीच आयोजित केला होता. तिथल्या उदय बुक एजन्सी या पुस्तकांच्या दुकानानं आयोजित केला.आदल्या दिवशी जायचं, सकाळी लवकर जाऊन नगर फिरायचं वगैरे मनसुबे अपेक्षेप्रमाणंच उधळले गेले. अखेर सहाच्या कार्यक्रमासाठी संध्याकाळी पाच वाजताच आम्ही नगरमध्ये पोचलो. चहा-पान (म्हणजे फक्त चहाच!) झाल्यानंतर सहाला कार्यक्रमस्थळी गेलो. सुरुवातीला चार-दोन टाळकीच होती, पण कार्यक्रम सुरू होईपर्यंत सगळा हॉल भरून गेला. दाराच्या बाहेरही काही लोक उभे होते.

मी बॅटिंग व्यवस्थित केली, लोकांचे हशे आणि टाळ्याही मिळवल्या. नगरकरांची गंमत करण्याची आणि खवचट प्रश्‍न विचारणाऱ्यांना तोंडावर पाडण्याची संधी सोडली नाही.प्रभाकर भोसलेनं त्याच्या ब्रशचे फटकारे ड्रॉइंग शीटवर ओढले आणि त्याची कला दाखवली. हा अगदी वेगळा प्रयोग छान रंगला. मजा आली.

आमच्या सह्या घ्यायलाही झुंबड उडाली होती. चाहत्यांचा प्रतिसाद पुण्यापेक्षा उदंड होता. मी वाचलेल्या सगळ्या ग्राफिटी त्यांना तोंडपाठ होत्या. आम्ही खरंच भारावलो. श्रीफळ (नारळ नव्हे!), पुष्पगुच्छ आणि छानसं पाकीटही मिळालं.जेवण खास नव्हतं, पण सीताफळाचं आईस्क्रीम भारी होतं. उशीर झाल्यानं काही खरेदीही करता आली नाही. रात्री 11 च्या गाडीनं दोनपर्यंत पुण्यात परतलो.

पुण्याबाहेरचा हा पहिला कार्यक्रम झकास झाला. आता सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर वगैरे ठिकाणच्या निमंत्रणांची वाट पाहतोय!
-आपल्याही शुभेच्छा हव्या आहेत!

Sep 23, 2007

हरिहरेश्‍वर महाराज की जय!

परवाच्या गणपतीच्या पोस्टला दणकून प्रतिसाद मिळाला. बऱ्याच जणांना कोकणातले अनुभव आवडले. आणखी लिहिण्याचा आग्रह झाला, म्हणून पुन्हा कीबोर्ड बडवाबडवी.
(टीप ः वरील विधानाशी या ब्लॉगचे वाचक आणि "कॉमेंट'दार सहमत असतीलच, असे नाही. असो. म्हणजे...."नसो.')

आरत्यांवरून आठवण झाली. आमच्या आजोळी, शिपोशीला (ऐकायला विचित्र वाटलं, तरी असं गाव आहे. शी-पो-शी. ता. लांजा, जि. रत्नागिरी.) कार्तिक नवमी ते पौर्णिमेपर्यंत हरिहरेश्‍वराचा उत्सव असतो. नुसती धमाल! उत्सव म्हणजे "जत्रा' बित्रा नाही. मोठमोठाले पाळणे, खेळ, स्वतःच्याच भयानक प्रतिमा दाखवणारे आरसे वगैरे नाही. अगदी हरिहरेश्‍वराच्या छोट्याशा देवळातला छोटासा, लहानगा, "ब्राह्मणी' उत्सव. पण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण.

किती वर्षांची परंपरा असेल, ठाऊक नाही, पण मी मात्र माझ्या लहानपणापासून अनुभवतोय. लहानपणी तर आम्ही पडीक असायचो शिपोशीत. मे महिन्यात आंबे-फणस-कैऱ्या-चिंचा-करवंदं-बोरं-जांभळं-आवळे खायला. आजीनं केलेलं आंब्याचं रायतं, तक्कू, कोयाडं, आमटी, साटं, सुकंबा, मुरांबा, खारवलेला आंबा, ताज्या फोडांची आणि सुकंबाची लोणची, फणसाची साटं, सांदणं, भाकऱ्या, गऱ्यांची कढी, आठिळांची भाजी आणि फणसाची साकटा भाजी, गऱ्यांची भाजी, मोरावळे, चटण्या, कोशिंबिरी...काय नि काय!शिवाय पोट फुटेस्तोवर आमरस आणि पडीचे-अडीचे-आंबे!असो. आंब्या-फणसांच्या दिवसांविषयी नंतर कधीतरी. सध्या फक्त हरिहरेश्‍वराच्या उत्सवाबद्दल.

हरिहरेश्‍वराचं म्हणजे शंकराचं अगदी फार देखणं नाही, पण नीटनेटकं मंदिर आहे शिपोशीत. आमच्या मामाच्या घरापासून एक नदी ओलांडून गेलं, की लगेचच मंदिर. आरत्या सुरू झाल्या, की रात्रीच्या शांततेत घरापर्यंत आवाजाची साद घेता येते. आरत्या हे तर सगळ्यात मोठं आकर्षण. दशावताराची आरती झक्‌मारेल, अशा एकेक भन्नाट आणि लंब्याचौड्या, उत्तमोत्तम आरत्या घुमायला लागल्या आणि त्यांच्या चालीवर घंटा घणघणायला लागली, की मन कसं डोलायला लागतं. बरं, एकजात सगळ्यांच्या आरत्या तोंडपाठ. आरत्या झाल्या, की भोवत्या.

भोवत्या (प्रदक्षिणा) म्हणजे नुसती धमाल. नवमी ते पौर्णिमा चढत्या क्रमानं भोवत्या. भोवत्या म्हणजे देवळाच्या बाहेरून पटांगणातून भजन गात मोठी प्रदक्षिणा म्हणायची. सगळ्यांच्या मागे पालखी. प्रदक्षिणा संपताना सगळ्यांनी देवळासमोरल्या मोठ्या पटांगणात रिंगण करायचं. मग वेगळाच अभंग घेऊन त्यावर लयबद्ध नृत्य. म्हणजे एक पाय पुढे, एक पाय मागे किंवा बसून, उकिडव्यानी, असलं अतिशय लयबद्ध आणि तालबद्ध नृत्य. मध्ये तालासाठी ढोलकीचा गजर. अभंग संपल्यावर तर नुसतंच ढोलकीवर नाचायचं. सोबतीला झांजांचा झंकार.
"राधे राधे' हा प्रकार म्हणजे ताक घुसळल्यासारखे हात करत दोन पावले पुढे, दोन मागे. आणि "ग्यानबा तुकाराम' तर घाम फोडणारा, भयंकर दमछाक करणारा आणि लयीचा आणि तालबद्धतेचा कस पाहणारा प्रकार. त्यातल्या सात स्टेप्स सगळ्यांच्या साथीनं बरोबर जमवणं, हे महाकठीण काम. मला आतापर्यंत एकदाच जमलंय.

शिपोशीची बहुतांश मंडळी मुंबई-पुण्यात स्थिरावली असली, तरी उत्सवाला हमखास हजेरी लावणार. आपला अभिनिवेश बाजूला ठेवून देवळातली सगळी कामं करणार. उत्सवातली नाटकं ही देखील एक मोठी मेजवानी. संगीत नाटकांचा शौक फार. मधुवंती दांडेकर, मोहन मुंगी, विजय गोखले, अशा मंडळींना आम्ही लहानपणापासून पाहत आलोय. या कलाकारांचा तिथला मुक्काम आणि सहवास याचं भलतंच आकर्षण असायचं.

उत्सवाच्या शेवटच्या रात्री उशिरापर्यंत भोवत्या आणि त्यानंतर पहाटेपर्यंत कीर्तन. मध्यंतरातला चुलीवरचा चहा म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद. कीर्तनाला आम्ही लहानपणी देवळातल्या कोपऱ्यात निद्रावस्थेत आणि थोडी शिंगं फुटल्यावर बरेचदा बाहेर उनाडक्‍या करतानाच सापडणार. पण त्यातही एक मजा असायची. मोठ्यांनी दामटून कीर्तनाला बसवायचं आणि आम्ही कारणं काढून तिथून सटकायचं, हा नेमच. शेवटच्या दिवशीच्या महाप्रसादाचीही मोठी रंगत. लांबच्या लांब पंगती आणि आग्रहानं वाढलेलं श्रीखंडाचं किंवा जिलबीचं जेवण! उदबत्त्यांचा सुगंध आणि रांगोळ्यांच्या पायघड्या.

चार वर्षांपूर्वी हरिहरेश्‍वराचा शंभरावा उत्सव झाला. लग्नानंतर मला तिकडे जायला जमलं नाहीये. यंदा मात्र दिवाळीनंतर जायचा बेत पक्का आहे. सध्या तरी.

--------

Sep 19, 2007

लेट्‌स एन्जॉय गणपती!


आज भल्या पहाटे पावणेपाच वाजता पुण्यात पोचलो. "शेमी'लक्‍झरीतल्या शेकंडलास्ट शीटमुळे (शेशेशी) पार आपटून-धोपटून निघालो. त्यातनं कोकरूडच्या जंगलातला तो भयानक रस्ता. रात्री जाग आली, तर बाहेर किर्रर्र अंधार. पण एक बरं होतं, दणकून झोप लागली गाडीभर. स्वारगेट आल्यावरच कळलं. आजपासून पुन्हा कामाचा रामरगाडा सुरू.चार दिवस मजेत गेले.


कोकणात गेलो, की मन नेहमीच प्रसन्न होतं. कोकणातल्या गावांत, भटकंतीत जी मजा आहे, ती महाराष्ट्राच्या अन्य कुठल्याही भागात नाही. कोकणातल्या गावासारखं शांत, निवांत, निसर्गानं नटलेलं, प्रेमळ गाव एकतरी शोधून दाखवा अन्यत्र. बकाल स्टॅंड, उकिरडे, डुकरं, घाण, कचऱ्यांनी भरलेल्या गल्ल्या, बजबजपुरी तुम्हाला कुठेच दिसणार नाही. कोकणातही ही "परंपरा' आणू पाहणारे काही सन्माननीय अपवाद आहेत म्हणा, पण अगदीच तुरळक.घरीच गणपती असल्यानं वातावरण प्रसन्न होतंच. त्यातून लाडक्‍या लेकाला रोज काहितरी नवं, गोडधोड खाऊ घालण्यात माऊली चार दिवस व्यग्र होती. त्यामुळं लेकही धन्य आणि माऊलीही. जमलं, तर नैवेद्याचा वास मिळालेला गणपतीबाप्पाही.लहानपणी आरत्यांची धमाल असायची. शेजारीपाजारी रात्री अकरापर्यंत सामूहिक आरत्या चालायच्या. इतर वेगळी गावावरून ओवाळून टाकलेल्या सर्वांना गणपतीच्या काळात मग फारच मानाचं स्थान मिळायचं. आरत्यांसाठी त्यांना निमंत्रणं जायची. उत्तमोत्तम प्रसादांची आमिषं दाखवली जायची. मग त्या बोलीवर तास-तासभर आरत्या चालायच्या. स्पष्ट उच्चार, चोख पाठांतर आणि खणखणीत आवाज (बामणाला दुसरं जमतंय काय?) यामुळं अस्मादिकांनाही गणपतीच्या काळात मागणी फार. पण हळूहळू चित्र बदललं. गणपतीची, आरत्यांची, प्रसादाची "क्रेझ' कमी झाली. आरत्यांची गर्दी हळुहळू विरळ व्हायला लागली, घरं रिकामी व्हायला लागली. माणसं एकटी पडायला लागली. सात दिवसांचे गणपती दीड दिवसांवर आले. एकमेकांकडे गणपती पाहायला जाणं, हा उत्साहाचा, भेटीगाठीच्या निमित्ताचा भाग न बनता औपचारिकता व्हायला लागली. टीव्हीच्या आक्रमणामुळं आरत्याही आटोपत्या घेतल्या जाऊ लागल्या, मोठ्या शहरांतल्या सार्वजनिक भव्यदिव्य देखाव्यांपुढं घरच्याच माणसांनी राबून केलेल्या पण सुबक, आकर्षक देखाव्यांची किंमत वाटेनाशी झाली.


हल्ली दरवर्षी गणपतीतल्या मुक्कामात हेच जाणवतं. मित्रांच्या भेटीगाठी होतात, लांब गेलेले गणपतीच्या निमित्तानं एकत्र येतात, एवढंच काय ते सुख.असो. आता पुण्यातल्या धुमाकुळाचा सामना करायचाय.


पुण्यातले देखावे मला आवडतात, पण दरवर्षी तोच गणपती रंगवून वापरणं, (हो, "वापरणं'च!) दिवसा देखावे बंद ठेवणं, गणेशभक्तीचा बडेजाव करणं, त्या जोरावर रस्ते अडवणं, उकरणं आणि देखावे पाहायला आलेल्या "पर्यटकां'ना "गणेशभक्त' वगैरे म्हणणं, याचा आपल्याला प्रचंड तिटकारा आहे.


...आणि हो! सोन्या-चांदीत-हिरेमाणकांत लपेटलेला (खरं तर घुसमटलेला) तुमचा तो दगडूशेठ हलवाई गणपती तर मला अजिबात "देव'बिव वाटत नाही. "देव' कसा हवा, सगुण, निराकार, शांत, प्रसन्न, निर्मळ, नैसर्गिक...एवढा "कृत्रिम' आणि "श्रीमंत' देव कसा असतो बुवा?


तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण कोकणातल्या साध्याच दोन-चार ढोलताशांच्या गजरात जी मजा आहे, ती मानाच्या मंडळांपुढच्या अफाट ढोलपथकाच्या शिस्तबद्ध वादनात नाही.


पण रात्र-रात्र चालणारी गणेश विसर्जन मिरवणूक आपल्याला प्रचंड "एन्टरटेन्मेंट' असते.


सो, लेट्‌स एन्जॉय गणपती!


-----

Sep 9, 2007

आग लागो, `तसल्या' नजरेला!


तसल्या नजरेनं तुला कधी पाहिलंच नाही रे (राजा!)
ज्या वाक्‍यांची अस्मादिकांना सर्वाधिक तिडीक आहे, (आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं,) अशापैकी एक वाक्‍य.

परवा "असंभव'मधला एक लाडिक, मधाळ सीन पाहताना हे वाक्‍य डोळ्यासमोर नाचत होतं. नको-नको म्हणत असताना मन पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेलं.

डोंबलाची "तसली नजर'!

एकतर प्रेम आहे किंवा नाही!
तू मला आवडतोस, किंवा नाही!"
कधीपासून वाट पाहत होते तुझ्या या प्रश्‍नाची' किंवा "तोंड पाहिलंयस का आरशात?'

एखाद्या मुलीला "प्रपोज' केल्यानंतर उत्तरादाखल तिचा वरीलपैकीच काहितरी पर्याय असायला हवा, अशी आपली आमची साधी, सरळ अपेक्षा.

ही "तसल्या नजरे'ची काय भानगड?आम्ही तर आयुष्यभर (हो, हो, बायकोची नजर चुकवून अजूनही!) पाहण्यात, संपर्कात, माहितीत आलेल्या प्रत्येक मुलीला "तसल्या' नजरेनं पाहत आलो आहोत.

"तसल्या' म्हणजे वाईट नजरेनं नव्हे. तर हिच्याशी आपलं नातं काय? म्हणजे ही आपली संभाव्य बायको, जवळची मैत्रीण, खास मैत्रीण, नुसतीच मैत्रीण, नुसतीच परिचित, बहीण, किंवा यापैकी कुणीच नाही या वर्गवारीत पहिल्या एक-दोन भेटींतच (जमल्यास पहिल्याच भेटीत) तिची रवानगी करत आलो आहोत.

"आमची नुसतीच मैत्री आहे. एकमेकांचा तशा दृष्टीनं विचारच केला नाही अजून,' असला खोटारडेपणा आपल्याला आयुष्यात कधी जमला नाही, जमणार नाही.अरे हा काय तमाशा आहे?म्हणजे, एवढी वर्षं सांडासारखे उधळलात...गावभर बोंबलत फिरलात...मिळेल त्या मुलीशी/मुलाशी ओळख काढायला, लाईन मारायला रक्तच नव्हे, (बापाचे) पैसेही आटवलेत. तेव्हा कुठे गेली होती तुमची "तसली नजर'? अरे? एकदा-दोनदा-तीनदा-दहादा भेटलेल्या मुलाकडे/मुलीकडे तुम्ही मैत्रीच्या पलीकडे कुठल्याच दृष्टीने पाहिलेलं नाही? तिच्यात तुम्हाला संभाव्य बायको, सहचारिणी दिसलीच नाही? कसली तुमची नजर?

हिंदी पिक्‍चर पाहताना तर दरवेळी या संवादांनी आपलं डोकं उठत आलं आहे. ते दोघं एकमेकांशी उसासत, धपापत, (जमल्यास) अंग घुसळत बोलतात. एकमेकांना सूचक हावभाव, संवादांची देवाणघेवाण करतात. पण प्रत्यक्ष निर्णयाची वेळ आली, की मात्र एकमेकांबद्दल "प्रेम' असल्याच्या भावनेनं त्यांना धक्काच बसतो. त्यांची "तसली नजर' तडमडते मध्ये.

सब बकवास है. "तसली नजर' बिजर काही नाही. अंगाशी आलं की माणसं हात आखडता घेतात. पळवाटा आहेत सगळ्या. खरं बोलायची हिंमत नसते लोकांमध्ये.

-------

Sep 6, 2007

नसबंदी...!


"बेवारस कुत्र्यांची नसबंदी करणार' ही बातमी वाचून माझं अवसानच गळालं.
घशाला कोरड पडली.
हातपाय लटलटू लागले

जीभ फूटभर लोंबू लागली

मघाशीच एक विजेचा खांब "पावन' करून आलेलो असताना आता पुन्हा तिकडे जाण्याची उबळ आली.

फारच भयंकर बातमी होती. कुठल्या तरी सामाजिक संस्थेच्या किंवा पेठेतल्या कुठल्यातरी उपटसुंभाच्या मनात आल्यामुळे कोर्टात एक जनहित का काय ती याचिका दाखल झाली होती आणि कामधंदे नसलेल्या कोर्टानं आमच्याविरुद्ध हे फर्मान सोडलं होतं. मनातल्या मनात मेनका गांधींचा धावा सुरू केला. (मेनका की "मनेका'? सुधारून घ्या. व्याकरणाच्या नावानं आमची बोंब आहे!) या "मेनके'नं आमच्या भाईबंदांवर आणि समस्त प्राणिमात्रांवर अन्याय करणाऱ्या तमाम "विश्वामित्रां'ची तपश्‍चर्या भंग केली होती. सध्या मात्र आमची ही तारणहारिनी तिच्या पक्षाप्रमाणेच अज्ञातवासात गेल्यानं कितपत पावेल, याची शंकाच होती. तरीपण खडा टाकून बघायला काही हरकत नव्हती.काही झालं, की ह्या हरामखोरांना आमचीच जात आठवते। सालं, नळीत घाला नाहीतर फळीत घाला, माणसाचं शेपूट वाकडं ते वाकडंच ! जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाही। काय तर म्हणे, भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। गेल्याच आठवड्यात भटक्‍या विमुक्तांनी मोर्चा काढल्याचं आठवत होतं। म्हणजे एकूणच "भटक्‍यां'वर संक्रांत आली होती तर! पण हे तर चक्क आमची "नसबंदी' करायला निघाले होते

काय काय स्वप्न रंगवली होती, वयात येताना॥! जोशांच्या कार्ट्यानं चोरून आणलेल्या ऍडल्ट फिल्म्स चोरून बघून तर चित्तवृत्ती खवळल्या होत्या। गुळगुळीत मासिकातली दोन-चार पान उचकटून त्यातली चित्रंही बघितली होती. परवा ती "मिनी' नजरेस पडल्यावर तर कलिजाच खलास झाला आपला! आता हिला पटवावं, कुत्र्या-मांजरांच्या साक्षीनं लग्न करावं, सुरेख कुठल्यातरी "हिल'वर हनीमूनला जावं...कसलं काय न्‌ कसलं काय?आता ही "नसबंदी'ची टूम निघाली की कुणाला धरतील नि कुणाला नाही, कुणी सांगावं? नसबंदीचं इंजेक्‍शन बंदुकी-बिंदुकीतून मारलं तर? त्यांचा काय नेम नाही ब्वॉ


कुत्र्यांची संख्या काही भारताच्या भूमीला न पेलवण्याएवढी जास्त झालेली नाहीये। उलट, कुणाची झालेय, ती बघा! त्यांची नसबंदी करा आधी। बाकी, तुमच्या नसबंद्या पण अयशस्वी होतात, म्हणा।असो। आता फक्त "थांबा आणि वाट पाहा' एवढंच हाती आहे. आमची दुखरी "नस' त्यांच्या हाती आहे


------
Sep 4, 2007

परिवर्तनाचे वारे...


"कुत्र्यासारखा मारीन बघ...!'
आमचा मालक अण्णा जोशानं हे वाक्‍य उच्चारलं आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली.
असे "प्राणि'वाचक उल्लेख मला अजिबात खपत नाहीत.
वाटलं, एक कडकडून चावा घ्यावा आणि या जोशाला अज्ञातवासाच्या कोशात घालवावं. पण हल्लीच मला "अँटीरॅबीज' इंजेक्‍शन देऊन आणलंय मुडद्यानं ! वर स्वतःही घेतलंय. (फुकट होतं.) त्यामुळं चावणं म्हणजे नुसतंच "दात दाखवून अवलक्षण' झालं असतं. गप्प राहिलो.

आमच्या जातीचा असा उद्धार केलेला मला अजिबात खपत नाही. काही लोक तर अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक देतात. आमच्या शेजारचा रॉकी परवा म्हणे..."ट्रेकिंगला कुत्र्यासारखं चालावं लागतं.'
म्हणजे काय?
तुम्हाला आमच्यासारखं चार पायांवर चालावं लागतंय?
विजेचा खांब दिसला की तंगडं वर करता?
चांगले बूटबिट घालून जाता की तडमडायला तिकडे डोंगरांत!
आम्हाला इथे उन्हातान्हात पोटापाण्यासाठी दाही दिशा भटकावं लागतं. कुणी उकिरड्यावर टाकलेला शिळा भाकरतुकडा उचलावा लागतो. त्यातून पळवलेल्या भाकरीवर तूप वाढण्यासाठी आमच्या मागे पळणारे एकनाथ महाराजांसारखे संतही आता राहिले नाहीत. उलट, इथे आमच्याच तोंडातली भाकरी पळवण्यासाठी टपलेले भिकारी आहेत. नळावरच्या भांडणांसारखी तिथे उकिरड्यावर आमची भांडणं होतात. एकतर आमच्या जातभाईंमध्येच एकी नाही. शिळ्या भाकरीसाठी पण आमच्यात मारामाऱ्या.

..तशी, आमची (म्हणजे माझी!) स्थिती बरी आहे म्हणा. आम्ही "पाळीव प्राणी' या गटात मोडतो. सध्या तरी जोशांच्या घरी आपला डेरा आहे. पण हल्ली या जोशाचं काही खरं दिसत नाही. (खरं तर, अन्नदात्याचा असा उद्धार करणं माझ्या स्वभावात नाही. मी काय मालकाचा कृतघ्न कार्टा थोडाच आहे?)

जोशाची हल्ली सटारलेय. सारखा मला घालूनपाडून बोलत असतो. पदोपदी माझा अपमान. कुत्रा असलो म्हणून काय झालं, स्वाभिमान आहेच ना मला! तरी बरं, या जोशाला एकदा चोरांच्या, दोनदा पोलिसांच्या आणि तीनदा बायकोच्या तावडीतून मी सोडवलंय. "माडी'वर गेला असताना पोलिसांनी "रेड' घातली, तेव्हा काळाठिक्कर पाडला होता जोशाचा चेहरा. मी तेव्हा मधे आलो, म्हणून पळून तरी जाऊ शकला. नाहीतर पोलिसांनीच काळानिळा करून सोडला असता. मग "व्हाईट कॉलर' चांगलीच मातीत गेली असती. तरीही या उपकारांची जाणीव नाही त्याला. म्हणून आपला तर हल्ली जीवच उडालाय. परवा फुकटात मिळालेला त्याचा सामोसा मी हाणला म्हणून बदड बदड बदडलं मला त्यानं. मीच आपला गरीब, म्हणून राहिलोय इथे.

पण आता मालक बदलायचा विचार चाललाय. कुत्र्याचं इमान वगैरे राहू द्या. इथे शिळंपाकं खावं लागतंय, वर बोनस म्हणून मारही. बघू. संधी मिळाली, तर ही "कुतरओढ' थांबवायचा विचार आहे. तोपर्यंत आपलं मन मोकळं करण्यासाठी या डायरीचाच आधार...!

------------

"डॉग शो'तला "कॅट वॉक'

सकाळी मस्तपैकी मुरगुशी मारून झोपलो होतो, तर नतद्रष्ट बंट्यानं भुंकून भुंकून उठवलं. खरं तर उठणारच नव्हतो, पण अंगावरच तंगडं वर करीन, म्हणाला. चरफडत उठलो. चार-दोन शिव्या घातल्या. पण लेकाचा ढिम्म होता. काहीही परिणाम नाही. बंट्या पूर्वी कॉंग्रेसवाला असावा. असो.
मला म्हणाला, चल "डॉग शो' बघायला!"
"च्यायला, एवढ्या पहाटे? आत्ताशी नऊ वाजलेत गधड्या!'' मी भडकलो.
तेवढ्यात तिकडून जाणाऱ्या एका गाढवानं पेकाटात एक लाथ घातली. मी बंट्याला गधड्या म्हटलेलं आवडलं नव्हतं त्याला.
गाढवंही माजल्येत लेकाची!"
"अरे, "मॉर्निंग शो' आहे. लवकर आटप आणि चल.''
मला काही ब्रशनं दातबित घासून गुळगुळीत दाढी करायची नव्हती. आटपायचं म्हणजे काय होतं? तंगड्या पसरून मस्तपैकी आळस दिला आणि निघालो बंटीबरोबर. तोंडाला जरा रात्रीच्या मटणाचा वास मारत होता, पण माझ्या तोंडाचा वास घ्यायला कोण जवळ येणार होतं?
मला वाटलं, कुठलातरी पिक्‍चरच दाखवायला नेतोय बंटी. पण तो एका उच्चभ्रू क्‍लबात मला घेऊन आला. सगळीकडे मखमली पडदे, आकर्षक सजावट, झगमगते दिवे, पायाखाली मऊमऊ चादरी...धमाल होती नुसती.
मी म्हटलं, ""बंट्या, पिक्‍चर कुठाय इथे?''"
"तू गप रे! नुसती गंमत बघ तू!''...बंटी माझ्यावरच डाफरला.
मी निमूटपणे (नेहमीप्रमाणे) शेपूट घातलं.
एवढ्यात त्या क्‍लबचे एकेक मेंबर यायला लागले.

क्‍लबच्याही सजावटीला लाजवतील, असे कपडे होते एकेकाचे. भर पावसाळ्यातही पांढरे शुभ्र आणि भरजरी कपडे घालून आले होते. मला वाटलं, कुणाचं लग्नबिग्न दिसतंय. मागे चंपीच्या (आमच्या शेजारच्या गल्लीतली माझी मैत्रीण) आतेभावाच्या मावसबहिणीचं लग्न असंच झोकात झालेलं मी पाहिलं होतं. (आता त्यात चंपीनं लाडानं सगळ्यांचे मुके घेऊन त्यांच्या उंची कपड्यांवर तिचे केस पाडून ठेवले होते आणि चिखलाच्या पायांचे ठसेही उठवून ठेवले होते, ही गोष्ट निराळी!)

क्‍लबचे मेंबर एकटे नव्हते. प्रत्येकाच्या बरोबर वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या जातींची आणि मी कधीच न पाहिलेली कुत्री होती. (कुत्री म्हणजे "कुत्रा' या शब्दाचं अनेकवचन. त्यात मेल/फिमेल दोन्ही आले. उगाच "सदाशिव पेठी' शंका काढू नका.) काय तर म्हणजे ऑल्सेशियन, डॉबरमॅन, ...काय नि काय...!

एक धिटुकली मला फारच आवडली. कुणा तरी नटीबरोबर होती म्हणे. मी काही फारसे पिक्‍चर बघत नसल्यानं मला ओळखलं नाही, पण बंट्यानं सांगितलं. पण तिचा सगळा चेहरा केसांनीच झाकला होता. फक्त लुकलुकते डोळे दिसत होते. साधे "आयब्रोज'सुद्धा करत नाही, हे बघून वाईट वाटलं. पण आपला जीव जडला तिच्यावर. एकदम "लव्ह ऍट फर्स्ट साईट!'. "मिनी' तिचं नाव. गळ्यातला पट्टा पण स्टायलिश होता. मध्येमध्ये माझ्याकडे चोरून नेत्रकटाक्ष टाकत होती.

हा सगळा जामानिमा म्हणजे लग्नबिग्न नव्हे, तर त्या कुत्र्यांचंच संमेलन होतं, हे मला खूप उशिरा कळलं. "डॉग शो' म्हणे. म्हणजे "फॅशन शो'सारखं काहितरी बघायला मिळणार होतं, तर! पण माझ्या मनात दोन शंका होत्या. एकतर "डॉग शो'मध्ये कुत्रे "कॅट वॉक' कसा करणार ही.

दुसरी शंका थोडी गंभीर होती. मागे मी शनिवार पेठेत जोश्‍यांच्या घरात राहायला होतो, तेव्हा मुंबईतल्या कुठल्या तरी "फॅशन शो'मध्ये एका मुलीचे कपडे घसरून पडल्याबद्दल त्यांनी (चवीचवीनं) चाळीत केलेलं निषेधाचं भाषण मला आठवत होतं. त्यामुळं इथेही "मिनी'च्या बाबतीत काही "वॉर्डरोब मालफंक्‍शन' झालं तर काय, याची काळजी मला होती. पण (दुर्दैवानं) तसं काही झालं नाही.मिनी "मिनी स्कर्ट' घालून फारच मिरवत होती. बाकीच्या कुत्तरड्यांनीही (खरं तर आपल्याच जातीच्या बांधवांना आणि भगिनींना...सॉरी, मैत्रिणींना अशा शिव्या घालणं बरोबर नाही, पण हेवा वाटतो ना!) असलेच कायकाय भपकेबाज कपडे घातले होते. काही जण तर ढेंग वर करायला चक्क टॉयलेटमध्ये जात होते. किती हे पाश्‍चिमात्त्यांचं अंधानुकरण! डावे (पाय) काय म्हणतील?शेवटी एकदाचा तो "डॉग शो' आटपला.

गळ्यात पट्टे बांधलेल्या आपल्याच बांधवांना आणि मैत्रिणींना अशा प्रकारे माणसांच्या आदेशांच्या आहारी जाताना बघवलं नाही. कुणा एका जोडीला बक्षीस पण मिळालं म्हणे. मला नंतर फार वेळ थांबवलं नाही.

परतताना मिनी मात्र सारखी डोळ्यासमोर दिसत होती. पांढऱ्या शुभ्र पोशाखात भलतीच गोड दिसत होती. तिनं हेअरस्टाईल मात्र बदलली पाहिजे, असं मनोमन वाटलं. असो.

लग्न झाल्यावर बघू.
----

Sep 3, 2007

हसा थोडं...

""बाई, लईंच शिकल्याली दिसत्येय तुमची सुनबाई...!''
मालती मानकामे भाजीवालीनं दिलेल्या "कॉप्लिमेंट्‌स'नं ज्योत्स्नाबाई देशपांडे फारच सुखावल्या.
आज त्या सुनेला घेऊन पहिल्यांदाच भाजी मंडईत आल्या होत्या. नेहमीच्या भाजीवालीनं केलेल्या कौतुकानं त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. बाह्या (नसल्या तरी) फुरफुरल्या.
पांढऱ्याशुभ्र साडीच्या पदरावर चिकटलेला धुळीचा कण हातानं उडवत टेचात म्हणाल्या, ""मग, पुण्याची आहे ती पण! नाव पण "प्रज्ञा' आहे तिचं. चांगली "एमबीए' आहे म्हटलं ! उगाच नाही, देशपांड्यांच्या घरची सून झाली!...का गं, पण तू का विचारत्येस?''"

"न्हाई...शेवंताकडंनं घेतलेल्या पिकलेल्या टॉमॅटोंच्या पिशवीत कोबीचा मोठा गड्डा बाद्‌कन टाकला तिनं, तवाच वळखलं म्या!'' मालती मानकामेनं खुलासा केला.

-------

2. काही संवाद

गिऱ्हाईक ः अहो, कुत्र्याची बिस्किटं आहेत का?
दुकानदार ः आहेत. बांधून देऊ, का इथेच खाणार?
---
फोनवरून (पलीकडून) आवाज ः हॅलो, देशपांडे आहेत काय?
अलीकडून ः नाहीत.
पलीकडून ः कुठे गेलेत?
अलीकडून ः (अर्थातच, वैतागून) ते पावनखिंडीत लढतायंत!
पलीकडून ः मग त्यांना सांगा, "राजे' गडावर पोचले. आता "गेलात' तरी चालेल, म्हणावं!

----------

3. कर्तारसिंगची नुकतीच पुण्याला बदली झाली होती. पुण्यातल्या "बाजारपेठविश्‍वा'ची त्याला काहीच कल्पना नव्हती. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचं दुकान शोधालयाच त्याला तास-दोन तास पायपीट करायला लागली.

"केशव नारायण कुलकर्णी अँड सन्स' नावाची भली मोठी पाटी छोट्या अक्षरांत मिरवणाऱ्या एका दुकानात शेवटी तो टेकला.
अपेक्षेप्रमाणे दुकानाचे मालक वास्सकन्‌ अंगावर आलेच...""काय पाहिजे?'
धाप जिरवत, श्‍वासावर नियंत्रण ठेवत कर्तारसिंगनं समोरच्या शोकेसकडे बोट दाखवलं...""हा टीव्ही किती किमतीला आहे?''"
"आम्ही सरदारजींना टीव्ही विकत नाही...''
पुणेरी दुकानदारांच्या "स्पष्टवक्ते'पणाविषयी कर्तारसिंगच्या थोडंसं कानावर आलं होतं, पण हे प्रकरण एकदमच अवघड होतं. पण पिच्छा सोडेल, तर तो कर्तारसिंग कसला! त्याला एकदम आपला पंजाबी बाणा आठवला.
दुसऱ्या दिवशी वेशबिश बदलून तो पुन्हा त्याच दुकानात गेला.पुन्हा तोच संवाद.पुन्हा तेच उत्तर.कर्तारसिंगला पुणेरी दुकानदारांच्या चाणाक्षपणाविषयीदेखील आता खात्री पटली. पण लहानपणी वाचलेल्या विक्रम-वेताळाच्या गोष्टींना जागून त्यानंही आपला हट्ट सोडला नाही.

तिसऱ्या दिवशी धार्मिक रीतीरिवाजांना, परंपरेला हरताळ फासून, कर्तारनं तुळतुळीत दाढीबिढी केली, डोक्‍यावरचं पागोटंही उतरवलं आणि संपूर्ण "मेकओव्हर' करून तो "कुलकर्णी अँड सन्स'च्या मालकांसमोर डेरेदाखल झाला.
"सॉरी...आम्ही सरदारजींना टीव्ही विकत नाही!'
एवढा बदल केल्यानंतरच्या या उत्तरानं मात्र तो पुरता वैतागला आणि मग त्याचा संयम सुटला."
"च्यायला, कपडे बदलून आलो, चेहरा बदलून आलो, तरी तुम्ही मला कसं काय ओळखता? आणि मला टीव्ही विकायचा नाही, मग दुकान तरी कशाला टाकलंय इथं?''"
"श....हळू बोला. पाठीमागे माझी बायको झोपलेय. निष्कारण आरडाओरडा करायला, हे तुमचं घर नाही,'' कुलकर्णींनी शांत स्वरात कर्तारला समजावलं, ""आणि हे बघा, तुमची मागणी पूर्ण करणं मला तरी शक्‍य नाही. आमचं "मायक्रोवेव्ह' विकण्याचं दुकान आहे. टीव्ही ठेवत नाही आम्ही!''
-------