Aug 30, 2008

रामूची "आग' अन् प्रेक्षकांची होरपळ!

चित्रपटगृहात जाऊन 'फूंक' एकट्यानं बघणाऱ्यासाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस रामगोपाल वर्मानं ठेवलं होतं. कुणी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचा दावा केला, तर कुणी अर्ध्यावरच मैदान सोडून पळून गेलं म्हणे. 'फूंक'च्या जाहिरातीसाठीचा हा स्टंट होता, अशीही चर्चा झाली.
रामू हा तसा डोकेबाज आणि ताकदीचा दिग्दर्शक. तसाच तऱ्हेवाईकही. त्याच्या चित्रपटातली पात्रं विक्षिप्त वागतात (आठवा ः 'रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी! ), त्यावरून तो रामूच्याच व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असावा की काय, असं वाटतं. लेखक नाही का, स्वतःच्याच कुटुंबात, आसपास पाहिलेली पात्रं आपल्या कलाकृतीत साकारतात. तसंच दिग्दर्शकांनाही आपल्या स्वभावावर, आयुष्यावर चित्रपट काढण्याची खुमखुमी असते. त्यातून रामू तर जीवनातल्या अनुभवांवर आधारितच चित्रपट बनवतो. त्यामुळं तर त्याच्याविषयीची शंका आणखी बळावते. त्यातून 'रात', 'भूत', 'वास्तुशास्त्र', 'डरना मना है', 'डरना जरूरी है' आणि आता 'फूंक' असे चित्रपट काढून आणि त्यातले काही दिग्दर्शित करून त्यानं आपला विक्षिप्तपणा सिद्धही केला आहे.
'फूंक' एकट्याने पाहा आणि पाच लाख रुपये मिळवा, हा जाहिरातीसाठीचा स्टंट होता, की आणखी काही, हे रामूच जाणे. आमच्या निरागस मनातला प्रश्न एवढाच आहे, की ही स्पर्धा 'फूंक'बाबतच का? आधीच्या भयपटांबाबत ती का नाही घेतली? खरं तर 'कौन' रहस्यपट असला, तरी रामूचा सर्वोत्तम भयपटच होता. आणि त्याहूनही मोठा आक्षेपाचा मुद्दा असा, की रामूनं आधीच्या 'दौड', 'गो', 'रोड', 'मिस्टर या मिस', 'नाच' या चित्रपटांबाबत ही स्पर्धा का नाही ठेवली? कारण हे चित्रपटदेखील आम्ही चित्रपटगृहात सलग पाहू शकलो नव्हतोच! एरवी, वीस-पंचवीस प्रेक्षकांसोबत ते पाहणं हा भयावह अनुभव होता. तर एकटे कसे काय पाहणार?
'रामगोपाल वर्मा की आग' म्हणून रामूनं 'शोले'ची जी काही अब्रू काढली होती, ती आम्हाला विव्हळत, घायाळ होत, धापा टाकत पाहावी लागली. 'आग' बघून केस उपटून न घेतलेला, कपडे-बिपडे टरकावून रस्त्यावरून पिसाटासारखा पळत न गेलेला प्रेक्षक दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी स्पर्धाही घेता आली असती. 'फूंक' वगैरे चित्रपट जसे प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी त्यानं काढले, तसेच हे काही चित्रपट त्यांचा सूड घेण्यासाठी काढले, असं आमचं स्पष्ट मत आहे. असो. रामूनं सत्याला सामोरं जावं, एवढंच आमचं मागणं आहे. 'सत्याला' म्हणजे सत्य परिस्थितीला. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 'सत्या'ला नाही!