आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये भाड्यानं राहायला आलेल्या त्या तरुणाची नजर चांगली नाही, असं प्रणीतला पहिल्या दिवसापासून वाटत होतं. त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी काही ठोस कारण प्रणीतकडे नव्हतं, त्यामुळे तो काही बोलूही शकत नव्हता. तरीही त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं प्रणीतनं ठरवलं होतं.
प्रणीतचा अंदाज अगदीच चुकीचा होता, असंही नाही. त्या तरुणाचं वागणं जरा वेगळंच होतं. प्रणीतचं नुकतंच लग्न झालं होतं, त्यामुळे बायकोबद्दल त्याला जास्तच काळजी होती. तिच्याबरोबर घराबाहेर पडल्यावर हा तरुण तिच्याकडे रोखून बघत असतो, असं त्याला दोनतीनदा जाणवलं होतं. एकदा तर त्या तरुणानं काहीतरी निमित्त काढून त्यांच्याशी बोलायला येण्याचा प्रयत्नही केला होता, पण प्रणीतनं त्याला टाळलं होतं. प्रणीत सकाळी लवकर कामावर जायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. संध्याकाळी हा तरुण कुठेतरी गायब असायचा. तो कुणी आर्टिस्ट वगैरे होता म्हणे. प्रणीत आणि त्याची भेट फार व्हायची नाही, पण होण्याची शक्यता असेल, तेव्हाही प्रणीत त्याला टाळण्याचा प्रयत्न करायचा. आपली नवविवाहित बायको दिवसभर घरी एकटीच असते, त्यामुळे शेजारीच राहणाऱ्या या तरुणाबद्दल प्रणीतला भीती आणि खरं सांगायचं तर असुरक्षितपणाही वाटत होता. नाही नाही म्हणताना त्याला आपल्यातल्या उणिवा जाणवून उगाचच न्यूनगंड वाटायला लागला होता.
प्रणीतनं कितीही नाकारलं, तरी तो तरुण त्याच्यापेक्षा दिसण्यात उजवा होता. जास्त स्मार्ट होता. प्रणीतकडे नसलेल्या कला त्याला अवगत होत्या. सहजपणे कुणीही तरुणी भाळावी, असं त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्त्व होतं. प्रणीतचा त्याच्या बायकोवर कितीही विश्वास असला, तरी मनात कुठेतरी अविश्वासाची भावना डोकं वर काढू लागली होती. आपली बायको भोळी आहे आणि हा तरुण तेवढाच लबाड आहे, त्यामुळे तो तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करेल आणि ती भोळी असल्यामुळे कदाचित त्याच्या जाळ्यात अडकेल, ही भीती त्याचं मन पोखरायला लागली होती. त्याची रात्रीची झोप उडाली होती. बायकोला त्याच्यामधला हा बदल जाणवत होता, पण तिनं विचारल्यावर तो नीट उत्तर देत नव्हता. तिला कुठल्या शब्दांत सांगावं, हे त्यालाही कळत नव्हतं.
``तो आपल्या शेजारी राहणारा मुलगा कधी इकडे आला होता काय गं..?`` प्रणीतनं एकदा बोलण्याच्या ओघात बायकोला विचारलं.
``कोण?``
``तोच गं, आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आलाय तो! मला त्याचं नावसुद्धा माहीत नाही!``
``इकडे म्हणजे कुठे?``
``म्हणजे, आपल्या घरी, किंवा आसपास...``
``छे. तो कशाला इकडे येईल?``
``नाही, म्हणजे काही निमित्तानं म्हणा, किंवा सहज...?``
``नाही आलेला. पण तुम्ही का असं विचारताय?``
``नाही, सहजच!``
प्रणीतनं एवढंच बोलून तो विषय संपवला.
असेच काही दिवस गेले. मध्यंतरीच्या काळात प्रणीतला कामानिमित्त काही दिवस बाहेरगावी जावं लागलं, तेव्हा तर त्याचा अर्धा जीव इकडे लागला होता. अर्थात, त्याच वेळी योगायोगानं त्याची आई राहायला आली होती, म्हणून त्याला तेवढी काळजी वाटली नाही. आपण नसताना त्या तरुणानं बायकोशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला नाही, त्यावरून त्याच्याबद्दल आपला समज पूर्णपणे खोटा आहे, याबद्दल प्रणीतला खात्री झाली. त्याच्या मनातली संशय आणि अविश्वासाची जळमटंही दूर झाली. आधीचा न्यूनगंड जाऊन त्याची जागा आत्मविश्वासानं घेतली. याआधी तो तरुण कधी समोर दिसला, तर त्याच्याकडे रागानं बघणारा किंवा दुर्लक्ष करणारा प्रणीत आता त्याच्याकडे बघून ओळखीचं हसू लागला. एकदोनदा त्यानं त्या तरुणाला हायहॅलोसुद्धा केलं. आपल्या बदललेल्या वागण्यामुळे त्या तरुणाच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद प्रणीतला स्पष्ट जाणवला होता. याआधी कधी त्यानं त्या तरुणाला एवढं आनंदी बघितलं नव्हतं.
त्या तरुणानं त्याला एकदा त्याच्या फ्लॅटवर रात्री निवांतपणे येण्याचं निमंत्रणही दिलं. `या रविवारी नक्की येतो,` असं प्रणीतनं त्याला कबूल केलं. त्या तरुणाच्या वागण्याबोलण्याबद्दल आपल्या मनात उगाचच गैरसमज होते, हे प्रणीतनं बायकोला अगदी मोकळेपणानं सांगितलं.
नेमकी रविवारी सकाळीच एका शेजाऱ्यानं प्रणीतला बातमी दिली, की त्या तरुणाला घरमालकानं आदल्या रात्री घराबाहेर काढलं. प्रणीतसाठी हा धक्काच होता.
``का, असं काय घडलं अचानक? अजून तर त्याचा 11 महिन्यांचा करारसुद्धा पूर्ण झाला नसेल!`` प्रणीतला त्या तरुणाबद्दल काळजी आणि सहानुभूती वाटत होती.
``अरे, तो मुलगा साधासरळ नव्हता!`` शेजाऱ्यानं दबक्या आवाजात सांगितलं, ``काल फ्लॅटवर एका मित्राबरोबर त्याला नको त्या अवस्थेत रेडहॅंड पकडला म्हणे घरमालकांनी!``