Dec 24, 2007

स्त्री जन्मा, तुझी कहाणी !


एखाद्याच्या आयुष्याची लक्तरं तरी किती व्हावीत!

जीवनाच्या वाटेवरच्या प्रत्येक खाचखळग्यात ह्यांचंच तंगड का मोडावं?

दुर्दैवाचे दशावतार कसले, सहस्रावतारच ते!

अशीच एक अभागी पोरगी. सिनेमांत कामं करून, रिमिक्‍स गाण्यांत नाचून, "स्टेज शो' करून (कमीत कमी कपडे वापरून) पोटाची खळगी भरणारी. महाराष्ट्राची "शान', देशाची "जान'. पण कुणी तिच्या आडनावावरून कोटी करून तिला महाराष्ट्राची "खंत' म्हणालं. कुणी अश्‍लील, बीभत्स, उथळ, फटाकडी, अशी लेबलं लावली. एका मित्रानं भर पार्टीत तिचा गैरफायदा घेतला. तरीही, अवहेलना आणि बोलणी खावी लागली तिलाच बिच्चारीला! दोन-तीन महिने काही प्रसिद्ध व्यक्तींना एकाच घरात कोंडून घालून त्यांचे दैनंदिन उद्योग जगजाहीर करण्याच्या कुठल्याशा कार्यक्रमातही ती गाजली. पण तिथेही पदरी आली निराशा!

मग आणखी एक मोठी संधी मिळाली, स्टेजवर "ता ता थैया' करून लोकांच्या मनाबरोबरच "एसएमएस'ही जिंकण्याची. दिलखेचक नृत्यानं तमाम देशवासीयांची हृदयं जिंकून टीकाकारांच्या छाताडावर नाचण्याची. साथीला तिच्याशी जन्मोजन्मीच्या साथीचा वादा करणारा तिचा "आशिक'ही. जोडी फायनलपर्यंत पोचली. कुठल्याकुठल्या देवळांत ओट्या भरून झाल्या. देव प्रसन्न झाला, पण दैव रुसलंच. फायनलच्या निकालाच्या वेळी तिची "फसवणूक' झाली. नंतर तिला असं कळलं, की महिनाभर आधीच आपल्याला या कुटिल कारस्थानाचा सुगावा लागला होता. "टीआरपी' वाढवण्यासाठीच आपल्याला घेतलं गेलं होतं. आपल्याला खोटंनाटं रडायला, खिदळायला, नाटकी बोलायला लावण्यात आलं होतं. आपण नाचलो नाही, आपल्याला नाचवलं गेलं होतं. कुठल्याही घटनेची "एक्‍स्क्‍ुझिव्ह स्टोरी' करणाऱ्या कुठल्याशा चॅनेलवर मग तिनं टाहो फोडला. कॅमेऱ्यातले रोल संपेपर्यंत डोळ्यांतील अश्रूंना वाट करून दिली. हवा तेवढा वेळ "बाईट्‌स' दिले.

आता ही मर्द मराठी मुलगी स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांकडेही जाणार आहे, असं कळतं. आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध दाद मागणार आहे. या सगळ्या बातम्यांच्या "फुटेज'चा याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागासाठी तिला उपयोग होईल, असं कुणीतरी सांगितलंय म्हणे तिला!


--------