""मुडदा बशिवला तुझा...डोळेबिळे फुटलेत की काय? मेल्या पायाचं पार भजं केलंस की...
तुझ्या...******!'
एक कचकचीत शिवी त्या कोंदटलेल्या, तुंबलेल्या बसमध्ये घुमली. आणि गजराबाईंच्या पायावर पाय देणाऱ्या सदाचा चेहरा (न) पाहण्यासारखा झाला.
"कुठल्या मुहूर्तावर बसमध्ये चढलो कुणास ठाऊक,' असं त्याला वाटलं.एक तर सकाळी धावतपळत तो बसस्टॉपवर पोचला होता. त्यातून त्याच्या समोरच त्याची नेहमीची बस निघून गेली. त्यामुळं ही दुसऱ्याच मार्गाची बस त्याला धरावी लागली होती. वर फाट्यावर उतरून पुढे बरंच अंतर उन्हातान्हात चालत जावं लागणार होतं. दुसरं वाहन करावं, तर खिशाला चाट बसणार होती. म्हणून पाय ठेवायला जागा नसूनही तो या बसमध्ये चढला होता. पायरीवरच ताटकळत असलेल्या गजराबाईंच्या पायावर त्यानं नकळत पाय टाकला आणि त्यांनी त्याची अगदी साग्रसंगीत, गावठी ढंगात "आरती' केली होती.
आईवडिलांचा झाला, आता बाकीच्या पिढ्यांचा उद्धार नको, म्हणून बिचारा पुढे सरकायच्या प्रयत्नात होता. अंगकाठीची डायरेक्ट चिपाडाशीच स्पर्धा असल्यानं सुळकन कुठेही घुसायची तयारी पक्की होती. पण त्या दिवशी बसमध्ये कंडक्टरनं एवढ्या शिटा कोंबल्या होत्या, की त्याला पुढेही सरकता येईना. गजराबाईंच्या पायावर पाय देऊन, वर माफीही न मागता त्यांच्याच पुढ्यात उभं राहणं म्हणजे त्याला साक्षात सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच वाटत होतं. त्या कधी लचका तोडतील, याचा नेम नव्हता.
सदा आपलं अंग चोरत, कसाबसा पायरीच्या एका कोपऱ्यात लटकत होता. गाडी थोडी पुढे गेल्यावर त्यानं आपल्या अंगकाठीचा उपयोग करत दोघा-चौघांना घुसळून थोडं पुढे सरकण्यात यश मिळवलं आणि एक मोकळा निःश्वास टाकला. आता तो गजराबाईंपासून थोड्या सुरक्षित अंतरावर उभा होता. तरी त्यांची गुरगुर त्याला स्पष्ट ऐकू येत होती...
""धड बघता येत नाही...चालता येत नाही...! कुठ्ठं न्यायची सोय नाही..!! गुमान उभं ऱ्हा म्हटलं तरी ऐकायचं नाही. लई खुमखुमी ना पुढे जायची...मर आता तिथंच म्हणाव...!''
सदानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. गजराबाई तर त्याला साक्षात कालीमाताच भासत होत्या. लांब जीभ काढून कधी आपला घास घेतील, पत्ता लागणार नाही, असंच त्याला वाटत होतं. त्यानं त्यांच्याकडे न पाहायचंच ठरवलं.
दोन-तीन स्टॉप गेले, तशी गाडी थोडीशी मोकळी झाली. म्हणजे आपापल्या अस्तित्त्वाची जाणीव देण्याएवढी. थोडासा मोकळेपणानं श्वास घेता येऊ लागला. सदा पुढे सरकला, तर गजराबाईही त्याच्याच रांगेत आल्या होत्या. सदाच्या पुढेही एक सडपातळ, त्याच्याशी स्पर्धा करेल, असाच बेतास बात माणूस उभा होता. गजराबाई निष्कारण त्याच्यावरही खार खाऊन आहेत की काय, असं सदाला उगाचच वाटलं.
गाडी हलतडुलत पुढे सरकत होती. रिकामी होत होती, तितकीच पुन्हा भरत होती. उभ्याउभ्या वरच्या दांडीला लटकताना सदाला मधूनच पेंग येत होती. एकदा अशीच छानशी डुलकी लागल्यानंतर सदाला मध्येच जाग आली आणि गजराबाई किंचाळत, ओरडत त्याच्याच दिशेनं धावत येतायंत की काय, असा भास त्याला झाला. खडबडून जागा झाल्यावर हे स्वप्न नाही, तर खरंच आहे, याची जाणीव त्याला झाली आणि तो नखशिखांत हादरलाच. बऱ्याच वेळात तो त्यांच्या वाटेलाही गेला नव्हता, मग एकाएकी त्यांना काय झालं या विचारात सदा पडला. पण आता झाल्यागेल्या गोष्टींचा विचार करायला वेळ नव्हता. जीव वाचविण्यासाठी कुठेतरी दडणं आवश्यक होतं. कंडक्टरचाच आधार घेतलेला काय वाईट, म्हणून तो कंडक्टरच्या शर्टात शिरण्याचा प्रयत्न करू लागला. कंडक्टरच्या हातातला तिकिटांचा डबा आणि सुटे पैसेही खाली पडल्यानं त्यानंही सदाला कचकचून शिवी घातली आणि झुरळासारखा त्याला दूर झटकला.
गजराबाई एव्हाना प्रवाशांना धक्के देत, ढकलत, त्या दोघांच्या अगदी जवळ येऊन पोचल्या होत्या. त्यांच्या वाटेत आलेले दोघे-तिघे धारातीर्थी पडले होते.
""माझा नवरा...माझा नवरा...!'' वस्सकन गजराबाई कंडक्टरच्या अंगावर ओरडल्या.
ह्यांच्या नवऱ्याची काय भानगड, असा प्रश्न कंडक्टरला पडला आणि या चुकून आपल्याला तर त्यांचा नवरा समजल्या नाहीत ना, असा विचार मनात येऊन सदाची बोबडी वळली.
कंडक्टरचीही दातखीळ बसलेली बघून गजराबाई पुन्हा खेकसल्या,
""अरे मेल्या, बेल मार की...माझा नवरा उतरला ना आधीच्या स्टॉपला! मुडद्याला सांगितलं होतं, माझ्याबरोबर ऱ्हा म्हनून. खाल्लं ना शेन...! आग लागली मेल्याच्या तोंडाला...!!''
कंडक्टरला आत्ता कुठे काय झालंय, त्याचा खुलासा झाला.
"ए...गाडी थांबव रे...' त्यानं ड्रायव्हरला आवाज टाकला.
एव्हाना अर्धमेला झालेला सदाही सावरत, बिचकत उठला. बालंट आपल्यावर आलेलं नाही, या जाणिवेनंच त्याच्या जिवात जीव आला होता.ड्रायव्हरनं गाडी थांबवली, तशा गजराबाई दोघा-चौघांना आडवं करून, त्यांच्या अंगाखांद्यांवर पाय देऊन, गाडीतून खाली उतरल्या.ड्रायव्हर पुन्हा गाडी सुरू करणार, एवढ्यात पुन्हा मागच्या दाराच्या बाजूनं त्यांचा आवाज आला...
""अरे थांबवा की मेल्यांनो...मला सोडून कुठे जाता...?''
आता काय झालं, असा विचार कंडक्टर करत असतानाच एक झिडपिडीत माणूस मागच्या दारानं गाडीत चढून आल्याचं त्याला दिसलं. हाच तो गजराबाईंचा नवरा. तो हरवू नये म्हणूनच त्याच्या नावानं त्या गाडीत चढल्यापासून लाखोली वाहत होत्या.चुकीच्या स्टॉपला उतरल्यानंतर मागच्या दारानं पुन्हा गाडीत चढून तो आता गजराबाईंना शोधत होता. त्या खाली उतरल्या आहेत, हे कळल्यावर तो पुन्हा पुढे आला आणि पुढच्या दारानं परत खाली उतरला.
एव्हाना गाडीत चढलेल्या नवऱ्याला शोधायला गजराबाईही त्याच्या मागोमाग गाडीत आल्या होत्या. त्यांचा आधीचा अवतार पाहून भांबावून गेलेल्या इतर प्रवाशांची आता मात्र हसूनहसून मुरकुंडी वळली होती.मग गजराबाई आणि त्यांचा नवरा थोडा वेळ दारातच उभे राहून "कुकडीऽऽऽऽ कूक' खेळत होते. शेवटी कंडक्टरनं वैतागून गाडीखाली उतरून दोघांची गाठ घालून दिली आणि तेव्हा कुठं गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.या नवराबायकोच्या भांडणात सदा निष्कारण सापडला होता आणि शिव्यांबरोबरच बरंच काही त्याला सहन करावं लागलं होतं.
जरा वेळानं गाडी थांबली, तेव्हा तो गाडीचा शेवटचा स्टॉप आहे आणि आपण आपल्या उतरायच्या ठिकाणापासून बरंच लांब आलोय, हेही त्याच्या लक्षात आलं. पण आता गजराबाईंना किंवा अन्य कुणाला दोष देऊन उपयोग नव्हता. पुन्हा रिक्षा किंवा बसचा भुर्दंड त्यालाच पडणार होता. स्वतःच्याच कर्माला दोष देत सदा गाडीतून उतरून निमूटपणे उलट दिशेनं चालू लागला...
-----
2 comments:
असं होतं कधी कधी. पण वर्णन छान केलंय.
Hahahaha. Long live Gajarabai!
Post a Comment