"थरार'च्या निमित्तानं आणखी एक घटना लिहायचीच राहिली.
त्या वेळी मी रत्नागिरीत "रत्नागिरी एक्स्प्रेस'मध्ये काम करत होतो. 1995 चं वर्ष असेल. आमचं ऑफिस कुवारबावला, म्हणजे एमआयडीसीत मुख्य शहरापासून सात किलोमीटरवर होतं. माझ्याकडे बजाज सुपर एफई स्कूटर होती. घरी जायला रात्रीचे अकरा वाजायचे. एकदा असाच काम संपवून घरी चाललो होतो. पावणेअकरा वाजले असतील. रस्त्याला अधूनमधून दिवे असले, तरी बाकी मिट्ट काळोख. माझ्या स्कूटरचा लाईट बाकबूक करत होता. कदाचित, कुठलीतरी वायर सैल झाली होती. पण मी फारसं लक्ष दिलं नव्हतं.
काय हौस आली कुणास ठाऊक, पण नेहमीचा गावातून जाणारा रस्ता सोडून शॉर्टकट म्हणून माळावरून जाणारा रस्ता धरला. हा रस्ता दिवसा अगदी परिचयाचा, पण रात्री तेवढाच सुनसान आणि भयाण. आसपास अजिबात वस्ती नाही आणि मोकळा माळ. त्यावरून येणारा वाराही छातीत धडकी भरवणारा. पण आमची "खाज' जरा जास्तच ना! विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला छेद देऊन जाणारा चौक ओलांडला आणि थोडासा पुढे गेलो होतो. तेवढ्यात स्कूटरचा हेडलाइट बंद पडला. काहीही करून चालू होईना. हात मारून, धक्के देऊन, स्कूटर बंद-चालू करून पाहिलं, काहीही फायदा नव्हता. आता काय करायचं? पुढेही जाता येईना, मागेही फिरता येईना. अक्षरशः जवळून कुणी डोळ्यात बोट घातलं, तरी कळणार नाही, एवढा मिट्ट काळोख. मला काहीच सुचेना. पण भीती बीती फारशी वाटली नव्हती.
थोडा वेळ वाट बघितल्यानंतर एक ट्रक मागून येताना दिसला. मग ठरवलं, पुढंच जायचं. स्कूटर सुरू करून ठेवली. ट्रक जवळ आला तशी मी त्याच्या मागची लाइन धरली. ट्रक सुदैवानं आमच्या घराच्या दिशेनंच जाणारा होता. त्याच्या मागेमागे चाचपडत जात राहिलो. रस्ता परिचयाचा होता, त्यामुळं थोड्याशा उजेडातही मला अंदाज यायला काही त्रास नव्हता.
घरी पोचलो, तेव्हा मनात हायसं वाटलं. घरी अर्थातच काही सांगितलं नाही. नाहीतर, "कुणी सांगितले होते नसते उद्योग!' असलं काहीतरी ऐकायला लागलं असतं.
असो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरं!
---------
2 comments:
तुमच्या या लेखाने माझ्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. मी फिनोलेक्स कॉलेजला होतो त्यावेळी विमानतळाजवळ रहायचो. तिकडचे रस्ते अगदी निर्मनुष्य. दूरदूर पर्यंत वस्ती नाही. आता गद्रे आणि फिनोलेक्समुळे थोडी जाग आहे पण रात्रीच्यावेळी कोणी नाही. रात्री उशीरा अभ्यास करायचो. कंटाळा आला की विमानतळावर फिरायला जायचो. आण्खी बरेच लिहायचे आहे .. पुन्हा कधीतरी .... धन्यवाद..
tya rastyala ratnagirit highway mhantat na? ekdam sagla prasang dolya samor ubha rahila.
Post a Comment