दोनच दिवसांपूर्वी किल्ल्यावरची पोस्ट टाकली ब्लॉगवर. त्यानंतर लगेच त्यासंबंधित विषयावर लिहायला लागेल, अशी कल्पना नव्हती. नियतीनंच हा खेळ मांडला असावा!
घाबरू नका. काही फार गंभीर, चित्तचक्षुचमत्कारिक, नेत्रविस्फारक वगैरे लिहिणार नाहीये. अनुभव अगदी साधासाच, पण धडा शिकविणारा आणि योगायोगाचं महत्त्व ठसविणारा.
परवा शनिवारी ऑफिसला आलो, तेव्हा अंमळ उशीरच झाला होता. ऑफिसला यायचं, म्हणजे सगळं शिस्तशीर असतं. म्हणजे, शर्टाच्या शिखात लायसन्स, डेबिट कार्ड (हो, डेबिटच! "क्रेडिट' नाही!!), पीयूसी. पॅंटच्या डाव्या खिशात घराची किल्ली, मोबाईल. उजव्या खिशात गाडीची (म्हणजे बाईकची. आम्ही "श्रीमंत' मध्यमवर्गीय बाईकलाच "गाडी' म्हणतो.) किल्ली आणि रुमाल. दर पाच मिनिटांनी खिसे रापून हा सर्व जामानिमा सुरक्षित आहे ना, हे बघण्याची सवय. बरं, आपली टाचणी हरवली, तरी अस्वस्थ होण्याची प्रथा. पेनबिन म्हणजे फारच त्रास! तर सांगण्याचा मुद्दा काय, की त्या दिवशीही सगळं असंच व्यवस्थित जागच्या जागी होतं.
जेवणाचा डबा सवयीप्रमाणे बाईकच्या डिकीत ठेवला होता. जेवणाच्या सुटीत खाली पार्किंगमध्ये गेलो. डब्यात पोळ्या नसल्यानं त्या हॉटेलातून घेऊन आलो. डिकी उघडायला गेलो अन् काय? खिशात किल्लीच नाही! हादरलो. गाडीला आहे काय, ते पाहिलं. नव्हती. पार्किंगच्या जागेत बऱ्याच ठिकाणी शोधली. गाडी हलवून पाहिली. किल्ली कुठेच नव्हती.
तसाच वर टेबलपाशी आलो. मीटिंग रूम, आर्टिस्ट रूम, कॉन्फरन्स हॉल, साहेबांची केबिन, स्वच्छतागृह, जिथे जिथे म्हणून जाऊन आलो होतो, तिथे तिथे वेड्यासारखा फिरलो. औरंगजेबाच्या सैन्याला जसे संताजी-धनाजी पाण्यात दिसत, तसे मला सगळीकडे माझी किल्लीच पडलेली असल्याचा भास होऊ लागला होता. पण अर्थातच या शोधमोहिमेचा काही उपयोग झाला नाही. शेवटी ज्या हॉटेलातून पोळ्या आणल्या, तिथेच त्याच पोळ्या आणि वर भाजी बिजी घेऊन चार घास पोटात ढकलावे लागले. वसुबारसेच्या दिवशी ते भयाण अन्न अक्षरशः पोटाची गरज म्हणूनच खावं लागलं.
"गाडीची डुप्लिकेट किल्ली घेऊन ये,' अशी विनंती सहधर्मचारिणीला केली, पण तिने पुणेरी स्वाभिमानी बाणा दाखवत ती धुडकावून लावली. झक् मारत ड्युटीनंतर एक तास थांबून एका मित्राच्या मागे बसून घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी डुप्लिकेट किल्ली घेऊन ऑफिसला हजर. तिथे आल्यावर सहज म्हणून वॉचमनकडे चौकशी केली, तर माझी किल्ली तिथे माझी वाट बघत होती. कॅंटीनमधल्या मुलाला सकाळी झाडताना पार्किंगमध्ये मिळाली होती. अशा रीतीने माझी कसोटी बघत बेटी छान सुरक्षित हाती विसावली होती!
....
किल्लीचाच प्रसंग दोन दिवसांत पुन्हा घडेल, असं अजिबात वाटलं नव्हतं.
या वेळी "बळी' होती, माझ्याबाबत बाणेदारपणा दाखविणारी आमची (म्हणजे माझीच हं!) सहधर्मचारिणीच!
संध्याकाळी दिवाळीच्या उत्साहाच्या आणि पोरीला खेळवण्याच्या नादात बाईसाहेबांनी लॅचचं दार बाहेरून लावून घेतलं. मग शेजारून मला फोन करून आपला पराक्रम कळविला. वर मलाच किल्ली घेऊन घरी येण्याचा विनंतीवजा आदेशही दिला. काय करणार बापडा? नवरा या प्राण्याला बाणेदारपणा नसल्यामुळे झक् मारत जावं लागलं. एक फायदा मात्र झाला. अगदी जेवायच्या वेळीच घरी गेल्यामुळे कधी नव्हे ते गरमगरम गिळायला मिळालं. अर्थात, माझ्या उपकारांच्या ओझ्यामुळं दबून गेल्यामुळं बायकोनंही न कुरकुरता जेवायला घातलं, हे वेगळे सांगणे न लगे!
...
या निमित्तानं एक सुरस आणि चमत्कारिक कथा आठवली. शनिवार पेठेत भाड्याच्या (हा कोण "भाड्या?') खोलीत राहत होतो, तेव्हाचा प्रसंग. एकदा पहाटे पाचला रत्नागिरीहून आलो, तो खोलीची किल्ली रत्नागिरीत विसरूनच! मग पत्र्यावर चढून, तिथून गॅलरीत उतरून, खिडकीतून खोलीत शिरून दुसऱ्या किल्लीनं दार उघडण्याचं दिव्य पार पाडावं लागलं होतं. तेव्हा कुण्या शेजाऱ्यानं चोरटा समजून दगडबिगड मारले नाहीत, हे नशीबच!
...
असो. इजा-बिजा-तिजा कधी होतोय, पाहायचं!
------------
1 comment:
शनिवार पेठेत भाड्याच्या (हा कोण "भाड्या?') खोलीत राहत होतो
jabardast .. lihita tumi ..
awadla lekhan !
Post a Comment