``आरती, काय गं, कुठे होतीस एवढे दिवस? अचानक गायब झालीस! काही फोन नाही, निरोप नाही!`` वीणा जराशी वैतागलीच होती.
``बाई अहो गावाला गेल्ते. कामं होती जरा शेतीची.``
``तुम्हा बायकांचं असंच आहे. हातातल्या कामांचं तुम्हाला देणंघेणंच नसतं. असं अचानक न कळवता निघून जातात का? किती पंचाईत झाली माझी, माहितेय?``
``ताई, अहो कामासाठीच गेल्ते ना! जाऊ द्या की आता. इसरा! किती बडबड कराल?``
``घ्या! वर मलाच ऐकव तू. माझी बडबड दिसतेय तुला, स्वतःचा निष्काळजीपणा नाही दिसत?``
``बरं ऱ्हायलं. तुम्हाला नसंल पटत, तर जाते मी. दुसरं काम बघेन!``
आरती वळून जायला निघाली.
``थांब आता!`` वीणा पटकन तिच्या मागे धावली. ``काय करणार? आम्हालाच गरज ना! ये उद्यापासून. की आजच येतेयंस?``
``तुम्ही सांगाल तसं.``
``बरं, मग आजच काम सुरू कर. मला जरा श्वास तरी घ्यायला मिळेल. गेले महिनाभर मीच करतेय सगळं. कंबरडं पार मोडलं धावपळ करून!`` वीणा बडबडत होती. ``बाबा चार दिवसांसाठी इथे आले होते, ते बाथरूममध्ये घसरून पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं, गावाला नेऊन पोचवणं, आईकडे त्यांच्या औषधपाण्याची चौकशी, इथे मुलांचे डबे, माझी नोकरी, घरातली कामं... आणि नेमकी त्याच दिवसापासून तू गायब!`` वीणाचा सगळाच त्रागा आज आरतीवर निघाला.
``जाऊ दे, तुझ्याशी काय बोलत बसलेय?`` असं म्हणत वीणा बेडरूमकडे वळली. आत पडलेले कपडेही अजून आवरायचे होते.
``आणि अर्धा पगारही कापणारेय हं मी तुझा!`` वीणानं जाता जाता सुनावलं.
काहीच प्रतिक्रिया न देता आरती कामाला लागली.
वीणा आत गेली, तेव्हाच तिचा फोन वाजत होता. शेवटची रिंग होऊन फोन कट व्हायच्या आधीच तिनं फोन उचलला.
``हां, संजना, बोल गं!``
संजनाने काहीतरी महत्त्वाचं सांगायला फोन केला होता. वीणालाही ते ऐकून धक्का बसला होता. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. आरतीनं घरात झाडलोट सुरू केली होती, पण वीणा अध्येमध्ये येरझारा घालत होती आणि काळजीतही वाटत होती, ते तिच्या लक्षात आलं होतं. अर्ध्या तासाने तिचा फोन संपला, तेव्हा आरतीनं तिच्याकडे काळजीने बघितलं.
``काय झालं बाई?``
``जरा ऑफिसमध्ये गडबड झालेय, तुला नाही समजणार.``
``सांगा की. तुम्ही काळजीत वाटला, म्हणून इचारलं.``
``अगं, तुझ्या लक्षात येण्यासारखा विषय नाहीये तो! तुला कशाला चौकशा?``
``तसं न्हाई, पण....म्हंजी, तुमचा आवाज बी बदलला होता, म्हणून...``
``ह्या बायकांना ना, नको त्या चौकशा!`` वीणा स्वतःशीच पुटपुटली, ``आत्ता मला विचारेल आणि नंतर गावभर जाऊन सांगेल!``
बडबड करत वीणा पुन्हा तिच्या कामाकडे वळणार होती, तेवढ्यात तिला जाणवलं, आरती तिच्याकडे बघत जागीच उभी आहे.
``अगं काय त्रास आहे तुझा? तुला समजायला हवंच आहे का?
आरतीच्या प्रतिक्रियेवरून वीणाला समजलं, की ही काही ऐकल्याशिवाय हटणार नाही. तिला आत्ता जास्त कटकट नको होती. आरतीला कसंतरी गप्प करावं म्हणून ती म्हणाली, ``मी टू` मूव्हमेंटबद्दल काही ऐकलंयंस का तू?``
``न्हाई बा. काय असतं ते?``
``बघ! म्हणूनच तुला सांगत होते ना, तुझ्याशी संबंधित विषय नाहीये ते! नको त्या गोष्टीत लक्ष कशाला घालायचं? तुला नुसती कामं टाळायला काहीतरी कारणं हवीत! जा...काम कर!``
``तरी पण सांगा की!``
आता मात्र वीणा वैतागली.
``अगं, ज्या बायकांना पुरुष त्रास देतात, त्यांचा छळ करतात, त्यांना मानसिक, शारीरिक त्रास होईल असं वागतात, त्यांनी आपल्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी... म्हणजे, आपल्याबाबतीत जे वाईट घडलंय ते सांगण्यासाठी एक चळवळ सुरू केलेय. त्याला `मी टू` असं नाव दिलंय.``
``असंय व्हय? म्हंजी मोर्चा बिर्चा हाय काय?``
``नाही गं, मोर्चा नाही, त्या सोशल मीडियावर लिहितात.``
``कुठं?``
``फेसबुकवर.``
``त्याच्यानं काय होतं?``
``त्यामुळे त्या लोकांचं खरं रूप बाकीच्यांना कळतं, पोलिस चौकशी करतात, इतर बायकांना त्यांच्यावरच्या अन्यायाबद्दल बोलावंसं वाटतं, काही वाईट लोकांचा खोटारडेपणा उघड होतो. कधीकधी पोलिस कारवाईही करतात.``
``असंय व्हय!``
``बघ, म्हटलं होतं ना, तुझा नाही संबंध, तर कशाला विचारतेयंस?``
आरती काहीच न बोलता तिच्या कामाला लागली. सगळं काम पूर्ण करून ती जायला निघाली.
``येते बरं का, ताई.``
``हो. उद्यापासून येणारेस ना नक्की?``
``व्हय.``
``नशीब!``
``ताई, बाबांची तब्येत कशी आहे आता?``
``ठीकेय. थोडा मुकामार होता. नशीब, काही फ्रॅक्चर वगैरे झालं नाही. नाहीतर या वयात पडल्यावर किती त्रास होतो, माहितेय ना..?``
``व्हय व्हय. बरं, येते.`` आरती निघून गेली.
...
``पण वेळच्यावेळी औषधं घ्या बरं का. दुर्लक्ष करू नका. आणि गरज वाटली, तर मला कळवा. मी येईन भेटायला!`` दुसऱ्या दिवशी सकाळी आरती कामावर आली, तेव्हा वीणा तिच्या वडिलांशी बोलत होती.
``एक मिनिट हं, बाबा!`` असं म्हणून वीणानं दार उघडली आणि आरतीला काय काम करायचंय, ते सांगितलं. पुन्हा फोनवर बोलायला लागली.
``अहो, ती आरती आली ना, तिच्याशी बोलत होते. आज महिन्यानंतर उगवलेय ती!`` वीणानं बाबांना सांगितलं.
``नाही, आज जरा लवकरच जाणारेय ऑफिसला. अहो, आमच्या बॉसच्या विरुद्ध एका कलीगनं तक्रार केलेय. त्यांनी तिचा छळ केल्याची. हो, त्यामुळे आज जरा खडाजंगी होणारेय ऑफिसमध्ये. नाही, आम्हाला तसा काही अनुभव नाही आलेला, पण पुरुषांचं काय सांगावं? एकूणच मी टू मोहिमेला सपोर्ट करायला हवा ना!`` वीणाला आणखी बरंच बोलायचं होतं, पण बाबांना अचानक आठवलं, की त्यांना दवाखान्यात जायचंय चेकअपसाठी. वीणानं फोन आटोपता घेतला.
ती बेडरूमकडे जायला वळली, तेव्हा तिला लक्षात आलं, की आरती हातात झाडू घेऊन दारातच उभी आहे.
``काय गं, तू अजून काम सुरूच केलं नाहीयेस?`` वीणा पुन्हा वैतागली.
``ताई, ते मी टू बद्दल कायतरी सांगत व्हतात नव्हं का तुम्ही काल... ?``
``झाली का तुझी सुरुवात? कशाला गं तुला नसत्या चौकशा?``
``सांगा की ताई. आत्ता बी बोलत व्हतात तुम्ही.``
``तुला काय हवंय नेमकं? आणि मुळात तुझा काय संबंध? तू का विचारतेयंस एवढं? अगं, मोठमोठ्या ऑफिसमध्ये, कंपन्यांमध्ये, कामाच्या ठिकाणी असले त्रास असतात. बॉस लोक त्यांच्या ऑफिसमधल्या बायकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात, त्यांचा गैरफायदा घ्यायला बघतात, कधीकधी सिनेमात किंवा नाटकात काम करणाऱ्या नट्यांच्या बाबतीतसुद्धा असं होतं. तू जा बाई आता..मलाही लवकर निघायचंय...वेळ नको घालवू.``
``ताई, पण कधीतरी असलं कायतरी झालेलं असंल, लई दिस उलटून गेले असतील, तरी बी तक्रार करता येते? म्हंजी, पोलिस ऐकून घेत्यात?``
``घ्यावंच लागतंय त्यांना! अनेक बायका तक्रार करतायंत, पोलिसांवर तेवढं दडपण आहे. त्यांनी दखल घेतली नाही, तर तेच अडचणीत येतील. सरकार तर कायदासुद्धा करणारेय या बाबतीत! `` वीणानं तिच्या सगळ्या शंका मिटवून टाकल्या. ``पण तू का एवढ्या चौकशी करतेयंस? तुझ्या माहितीत कुणाच्या बाबतीत काही....`` वीणाला आता आरतीच्या चेहऱ्यावरून जरा काळजी वाटायला लागली होती.
``म्हायतीत कशाला ताई? मी माझ्याबद्दल इचारत होते!``
``काय?`` वीणा उडालीच!
``अगं, मग सांगितलं का नाहीस? कुणी त्रास दिला तुला? तुझ्या शेजारचं कुणी? दीर? नात्यातलं जवळचं कुणी? की... ?``
``ताई, मला सांगा, आपण तक्रार दिल्यावर पोलिस त्या मानसाला पकडून तुरुंगात टाकतात व्हय?``
``म्हणजे काय! कधीकधी चांगलं धुतात कोठडीत. लहान-मोठं, वय बिय काही बघत नाहीत!``
``पण त्या मान्सानं आपल्या अंगावर कधीतरी हात टाकला असंल, आन् पोलिसांनी त्याला फटकावल्यावर त्याला बी त्रास झाला तर?``
``होऊ दे की! त्याच्या कृत्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी! आपण कशाला त्याच्या वयाचा विचार करायचा? त्यानं हे असले धंदे करताना केलेला असतो का विचार? मला सांग, तू असं आडून आडून का बोलतेयंस? तू काहीतरी सांगत होतीस, ते सांग की! घाबरू नको! मी आहे तुझ्या पाठीशी!`` वीणाला आता आरतीबद्दल पूर्ण सहानुभूती वाटत होती. आरतीसाठी काहीही करायचं तिनं ठरवलं होतं.
``न्हाई...मी आपलं सहजच इचारत होते. तसलं काय न्हाई झालेलं माझ्यासंगट.!``
``नक्की ना?``
``व्हय.``
वीणानं मोकळा श्वास घेतला. आरतीसुद्धा दोन क्षण तिथेच रेंगाळली.
``ताई, बाबांची तब्येत कशी आहे आता?`` तिनं विचारलं.
``ठीकेय. होतायंत हळूहळू बरे. बाथरूममध्ये पडले तेव्हा जरा मार लागला होता, पण नशीबानं फार मोठं काही नाहीये. नशीबच म्हणायचं!``
- अभिजित पेंढारकर.
No comments:
Post a Comment