जगाच्या उठाठेवी करण्याचं आणि मनाला येईल ते (अर्थात, फक्त स्वतःच!) लिहिण्याचं एक खुलं व्यासपीठ!
Jun 23, 2010
डोळे तुपाशी; डोके उपाशी!
दसऱ्याचा रावण दहनाचा भव्य कार्यक्रम पाहायला जावं आणि बुजगावण्याला जाळताना पाहायला लागावं, तसं काहीसं "रावण' पाहणाऱ्या प्रेक्षकांचं होतं. प्रचंड बजेट, अफाट मेहनत, बक्कळ पैसे घेणारे बडे कलाकार आणि भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळी दिशा देणारे दिग्दर्शक मणिरत्नम अशी भरभक्कम रसद रणांगणावर मान टाकते आणि "रावण'चं "दहन' कसलं, शेकोटीच पाहावी लागते!
महाभारतावरचा "राजनीती' झाला; आता मणिरत्नम यांनी "रावण'मध्ये रामायणाला वेठीस धरलं आहे. इथे दुष्ट प्रवृत्तीचा "रावण' (वीरा ः अभिषेक बच्चन) आहे, त्याला मारणारा "राम' (देव ः विक्रम) आहे आणि रावणानं अपहरण केलेली त्याची पत्नी "सीता' (रागिणी ः ऐश्वर्या राय) आहे. सीतेचं अपहरण, रामाला हनुमानाची (गोविंदा) मदत, सीतेची अग्निपरीक्षा (पॉलिग्राफ टेस्ट!) असं सगळं आहे. मणिरत्नम यांचा रावण मात्र जरा जास्तच सहानुभूती वाटावा असा आणि अन्यायामुळे व्यवस्थेशी संघर्ष करणारा आहे. हा रावण जसा सीतेच्या प्रेमात पडतो, तसेच तिलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते, एवढाच कथानकातला "ट्विस्ट'!
मणिरत्नम यांनी आतापर्यंत नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत आणि प्रत्येक चित्रपटातून ते सामाजिक भाष्य करू पाहतात. "रावण' मात्र सामाजिक सोडाच, कुठलंच भाष्य करत नाही. वीरानं केलेल्या रागिणीच्या अपहरणापासून चित्रपटाला सुरवात होते. रागिणी त्याच्या लंकेतल्या यातना भोगत असताना त्याच्यावर झालेला अन्याय आणि त्याची सर्वांना मदत करण्याची वृत्ती जवळून अनुभवते. तिच्या मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते. रागिणीला सोडविण्यासाठी आणि वीराला पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक देव जंगजंग पछाडतो. रागिणीला मिळवून तो हा संघर्षही संपवतो.
रावणाची व्यक्तिरेखा सादर करताना मणिरत्नम यांनी अभिषेक बच्चनची प्रतिमा लक्षात ठेवून त्याला खूपच सहानुभूती मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. चित्रपटाची मोठी फसगत तिथेच झालीय. सुरवातीच्या निर्घृण हिंसाचाराच्या दृश्यात तो नरसंहारक म्हणून शोभत नाही आणि नंतरच्या सहानुभूतीपूर्ण प्रतिमेमुळे आधीचं क्रौर्य अविश्वसनीयच वाटू लागतं. रागिणीला तिच्याविषयी प्रेम वाटावं म्हणून केलेली ही व्यवस्था कथानक भरकटून टाकते. चित्रपट पकड घेतो तो शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात.
कथा-पटकथा फसली असली, तरी चित्रपट शेवटपर्यंत पाहत राहावासा वाटतो तो संतोष सिवन-मणिकंदन यांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छायाचित्रणामुळे. रौद्रभीषण धबधब्याचं दृश्य असो वा जंगलातील शोधमोहीम... प्रत्येक फ्रेमच्या कानाकोपऱ्यातून कॅमेरा फिरवून त्यांनी झाडं-फुलंच नव्हेत, तर दगड-धोंडेही जिवंत करून टाकले आहेत. शेवटचा अधांतरी पुलावरच्या मारामारीचा प्रसंग म्हणजे तंत्रज्ञानाची, छायाचित्रणाची अत्युच्च पातळी आहे. रहमानचं संगीत वेगळं असलं, तरी चित्रपटातली गाणी अनावश्यक पद्धतीनं येतात.
न शोभणारी व्यक्तिरेखा आणि आचरट हावभाव यामुळे अभिषेक बच्चनची कामगिरी फसली आहे. ऐश्वर्या राय-बच्चनने अभिनयाचा आणखी एक उत्तम नमुना सादर केला आहे. रविकिशन लक्षात राहण्यासारखा. गोविंदाला वाया घालवलं आहे. विक्रमही ठीकठाक.
छायाचित्रण, सादरीकरणासाठी पाहायलाच हवा, असा हा "रावण' मणिरत्नमचा चित्रपट म्हणून अपेक्षापूर्ती करत नाही, एवढं खरं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
तुमच्या मताशी १००% सहमत. अभिषेक ऐवजी विक्रमने साकारलेला देव जास्त लक्षात राहतो, तसेच तमिळ वर्शन अधिक उत्तम जमले आहे, श्रेय अर्थातच विक्रमला...
Post a Comment