""निनाद कुठाय? आत्ताच्या आत्ता त्याला इथे यायला सांग!'' बाहेरून आल्या आल्या श्री. किरकिरेंनी खास "वडीलकी'चा स्वर लावला होता.
""बाबा, तो सोसायटीत खेळायला गेलाय. काय झालंय?'' कु. नं विचारलं.
""तो येऊ दे. मग मला तुमच्याशी एकत्रच बोलायचंय! जा, त्याला हाक मार.''
एवढं बोलून श्री. हातपाय धुवायला गेले. एव्हाना आरडाओरडा ऐकून सौ.सुद्धा फोडणीचा गॅस बंद करून बाहेर आल्या होत्या. कु.ची आणि त्यांची खुणवाखुणवी झाली.
""आई, नक्की काय झालंय? बाबा चिडलेत कशानं एवढे?''
""सांगते नंतर.''
""अगं, सांग ना. आमच्यावर रेशन निघायच्या आधी त्याचं कारण तर कळू देत.''
""बोकडाच्या मानेवर सुरी फिरवायच्या आधी त्याला सांगतात का, की बाबा गेल्यावेळी तू एकदा मला ढुशी दिली होतीस, म्हणून तुला कापतोय...?'' सौं.चा युक्तिवाद पटण्यासारखा होता.
""अगं आई, पण...'' कु. काहीतरी बोलणार, एवढ्यात श्री. फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. त्यामुळे कु.नं तिचे पुढचे शब्द गिळले.
""आला का निनाद?''
""नाही अजून. बोलावते.'' कु. पटकन हाक मारण्यासाठी बाहेर पळाली.
""अहो, जरा शांत राहा. मुलं लहान आहेत, त्यांना जास्त ओरडू नका.''
""काही लहान नाहीयेत. तू त्यांना डोक्यावर बसवून ठेवलंयंस.''
""मी? बरं!'' वाद घालण्यात काही अर्थ नाही, हे सौं.च्या लक्षात आलं. (कधी वाद घालायचा आणि कधी वाद घालण्यासाठी एनर्जी राखून ठेवायची, हे बायकांना बरोबर कळतं.)
काही क्षण असेच तणावाचे गेले आणि चि. आणि कु. दारात हजर झाले. घरात स्फोटक परिस्थिती आहे, हे कु.नं चि.ला आधीच सांगितेललं होतं. महायुद्धाचा भडका उडणार होता, पण त्यामागचं तात्कालिक कारण कुणाला कळत नव्हतं.
""आलात का? या!'' श्री.ंच्या आवाजावरूनच चि.चा धीर आणखी खचला.
""काल कुठे गेला होतास?''
""काल...?''
""हो. कालच! कोर्टात साक्षीला उभा राहिल्यासारखा चेहरा करू नकोस. दोन वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल विचारत नाहीये तुला. कालचंच विचारतोय!'' चि.चं आज काही खरं नव्हतं.
"" कानतोडेंकडे गेलो होतो...भुर्जी तोडायला...आपलं...भुर्जी खायला.''
""हेच...हेच...हीच शिस्त नाहीये तुम्हाला. महिना कुठला चालू आहे आत्ता?'' श्री. जाम भडकले होते.
""ऑगस्ट!'' कु. नं आता कुणीही न विचारता उत्तर दिलं.
""मराठी महिना कुठला चालू आहे, ते विचारतोय.''
""अं...बहुतेक चैत्र असावा.'' कु.च्या निरागस प्रश्नाने श्रीं.चा पारा आणखी चढला.
""श्रावण महिना चालू आहे! तुम्हाला काही आहे का त्याचं?''
""आईशपथ, खरंच हो. लक्षातच नव्हतं माझ्या. श्रावणात एकदा सत्यनारायणाची पूजा घालायची म्हणत होते मी. बरी आठवण केलीत.'' सौं.च्या या विधानाने श्री. आणखी भडकले.
""बाहेर लोक माझी खेटरानं पूजा बांधतायंत आणि तुला सत्यनारायणाची पूजा सुचतेय?'' श्रीं.च्या पट्ट्यातून आज कुणीच सुटणार नव्हतं.
""नक्की काय झालंय, सांगाल का? काल संध्याकाळपासून तुम्ही असे निष्कारण चिडचीड करताय.'' सौ.नी पुन्हा मुलांची बाजू घेतली.
""चातुर्मास चालू आहे आणि भुर्जी पाव खायचं सुचतंय तुम्हाला? तू त्यांच्याकडे जाऊन भुर्जी खाल्लीस, म्हणजे उद्या आपल्याला त्यांच्यासाठी भुर्जी करावी लागेल. मग काय करणार? किरकिरेंच्या सात पिढ्यांमध्ये कुणी श्रावणात कांदा आणि मांसाहार केलेला नाही, माहितेय का? उद्या लोकांनी विचारल्यावर काय उत्तर देऊ मी?''
""बाबा, पण परवाच आईनं घरी भुर्जी केली होती, ती आपण सगळ्यांनीच खाल्ली!'' कु.ला राहवत नव्हतं.
""हो का...? ती चुकून खाल्ली असतील. पण यापुढे कडक श्रावण पाळायचा. कांदाबिंदा सगळं बंद!''
""आणि नॉनव्हेज?''
""तेसुद्धा बंद!''
""चला, मी सकाळीच ताजी मासळी आणलेली पाटीलकाकूंना देऊन टाकते.'' सौ.नी केलेल्या या विधानामुळे श्रीं.ची थोडी चलबिचल झाली, पण तसं न दाखवता ते तडक आत निघून गेले.
आता चि. आणि कु. ने सौ.ना एका कोपऱ्यात घेतलं.
""बाबा एवढे का बिथरलेत?'' दोघांनीही एकदमच विचारलं.
""काय सांगू मुलांनो तुम्हाला? माझीच चूक आहे!'' सौं.नी असं सांगितल्यावर दोघांनीही कान टवकारले.
""काय झालं?''
""अरे, काल चुकून त्यांना बाजारातून भाजी आणायला सांगितलं होतं. यादीत एक किलो कांद्याचाही उल्लेख होता. कांदे घेऊन आले आणि जे बिनसलंय, ते आत्तापर्यंत. प्रत्येक गोष्टीचा हिशोब करत बसलेत! चातुर्मास आणि कांदा-लसूण न खाणं वगैरे सगळ्या संकल्पांचा जन्म त्यातूनच झालाय!!'' सौं.नी खुलासा केला.