कांद्याच्या भावांनी सध्या (कांदा न चिरताही) अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. पुढचे काही दिवस सहजासहजी कांदादर्शन घडण्याची चिन्हं नाहीत. कांदा हा जीवनातला आणि जेवणातला अविभाज्य भाग आहे. श्रावणातही कांदा खाण्याची इच्छा मारता येत नाही. त्यामुळे या काही कांदाविरहित पाककृती ः
बिनकांद्याची भजी ः
साहित्य ः कांदा, बेसन पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, पाणी, पातेलं, गॅस, कढई, तेल आणि (मानवी) हात.
कृती ः आधी अख्खा कांदा उभा बारीक चिरून घ्यावा. तुकडे वेगवेगळे करण्याऐवजी कांदा खालच्या किंवा वरच्या बाजूने एकसंध ठेवावा. (फळविक्रेते शोभेसाठी डाळिंब कापून, फुलवून ठेवतात, तसा.) त्यात मीठ, थोडी हळद आणि लाल तिखट घालून तो भिजवून ठेवावा. त्याला पाणी सुटल्यानंतर त्यात बेसन पीठ मिसळावे. हातांनी हे मिश्रण नीट कालवून घ्यावे. थोडा वेळ हे मिश्रण तसेच राहू द्यावे. त्यानंतर अख्खा कांदा तसाच उचलून घ्यावा. त्यावर पाणी ओतून कांद्याच्या फोडींमध्ये अडकलेले सगळे पीठ व्यवस्थित धुवून घ्यावे आणि कांदा नीट बाजूला काढून ठेवावा. आता कांद्यातून बाजूला केलेले पीठ आणि आधीचे पिठाचे मिश्रण एकत्र करून, गरम तेलात त्याची छोटी भजी करून तळावीत. बाजूला काढून ठेवलेला कांदा तसाच फ्रीझमध्ये ठेवून, पुढच्या भज्यांच्या वेळी अशाच प्रकारे वापरावा.
टीप ः पाहुणे आले असल्यास ही भजी शक्यतो गार करून वाढावीत. जेणेकरून ते कमी खातील.
....
कांदा-बटाटा रस्सा
साहित्य ः कांदा आणि बेसनपीठ सोडून वरीलप्रमाणेच. फक्त शेंगदाण्याचे कूट किंवा ओले खोबरे अतिरिक्त.
कृतीः कढईत चवीप्रमाणे मसाल्याचे पदार्थ, मसाला, लसूण, जिरे, असे पदार्थ छान खरपूस परतून घ्यावेत. हे मिश्रण (कढई सोडून!) मिक्सरमधून काढावे. पुन्हा कढईत तेल घेऊन फोडणी करावी आणि त्यात हे मिश्रण घालावे. दरम्यानच्या काळात नवऱ्याला बटाटे धुवून कांद्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायला सांगावेत. पेपर वाचण्याचा, फेसबुक, व्हॉटस् ऍप बघण्याचा, मॉर्निंग वॉकचा वेळ वाया गेल्याची कुरकुर त्याने केल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कांद्याप्रमाणे बारीक चिरलेला हा बटाटा फोडणीत घालावा. नंतर पुन्हा नव्याने वेगळे बटाटे धुवून, त्याचे थोडे मोठे काप करावेत आणि ते फोडणीत घालावेत. चवीप्रमाणे (आणि घरातल्यांवर किती राग काढायचा आहे, त्याप्रमाणे) मीठ व तिखट घालावे. गरमागरम कांदाविरहित कांदा-बटाटा रस्सा तयार!
....
मिसळ, पावभाजी.
साहित्य ः नेहमीचेच.
पावभाजी आणि मिसळ,या दोन्ही पदार्थांना वरून घातलेल्या कांद्याशिवाय चव नाही. त्यामुळे या दोन्ही पाककृतींमध्ये कांदा पूर्णपणे टाळता येणार नाही. फक्त वाचवता येईल. त्याची कृती पुढीलप्रमाणे ः
लहानात लहान कांदा बारीक चिरून घ्यावा. तो एका ताटलीत पसरून ठेवावा. त्यावर बारीक छिद्रांची जाळी कायमस्वरूपी चिकटवून टाकावी. मिसळ किंवा पावभाजी घरातल्या मंडळींना डिशमध्ये वाढल्यानंतर ही कांद्याची ताटली त्यांच्या नाकासमोरून फिरवावी. बारीक छिद्रांच्या जाळीमुळे कांद्याचा वास त्यांच्या नाकापर्यंत जाईल आणि कांदा खाल्ल्याचा फील येऊ शकेल. जाळी निघणार नाही किंवा कुणाला काढता येणार नाही, याची काळजी घ्यावी. ही ताटली फ्रीझमध्ये ठेवून महिनाभर सहज वापरता येईल.
....
रामबाण उपाय ः
बिनकांद्याचे हे पदार्थ खाऊन थोड्या दिवसांनी कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी कर्ज काढून कांदे विकत आणण्याचा पर्याय स्वीकारण्याऐवजी पुढील उपाय करावा ः
""अरे देवा! ह्यांना चक्कर आली! अहो काकू, दोन कांदे द्या पटकन!'' असं म्हणून शेजाऱ्यांच्या घरी विद्युतवेगाने धावत जावे. प्रचंड घाबरेघुबरे झाल्याचा अभिनय करावा. (प्राइम टाइममधली कोणतीही मालिका पाहिल्यास हा अभिनय फारसा अवघड जाणार नाही.) शेजारच्या काकूंनी शेजारधर्माला जागून (यदाकदाचित) कांद्याची परडी पुढे धरल्यास "असू देत अडीनडीला' असं म्हणून चार-पाच कांदे पटकन उचलून घराच्या दिशेने पोबारा करावा.
2 comments:
कांद्यामुळे जो वांदा झालाय त्याबद्दल पेपरात वाचून आहे ......पण तुझ्या कांदायुक्त ( की मुक्त ) पाककृती वाचल्या आणि आणि मी समोर कापून ठेवलेल्या तिखट कांद्यामुळे डोळ्यात आलेलं पाणी तिथल्या तिथ आटलं. असो , सद्य कान्देबाजारावर अश्या शेलक्या भाषेत लिहिलेल्या लेखामुळे मराठीत " प्रहसन (बहुधा दुसऱ्याला न दुखावता केलेली खेचाखेची अस काहीतरी असाव ) " हा वाङमय प्रकार अजून जिवंत आहे अस वाटलं आणि आनद झाला ....आणि असे ' प्रहसनकार ' आमचे मित्र आहेत हे उमजल्यावर ' उर ' अजूनच भरून आला . BTW सध्या " तश्या " कार्यक्रमात " कांद्या पोह्याला काही पर्याय उपलब्ध झालाय का ?
कांद्यामुळे जो वांदा झालाय त्याबद्दल पेपरात वाचून आहे ......पण तुझ्या कांदायुक्त ( की मुक्त ) पाककृती वाचल्या आणि आणि मी समोर कापून ठेवलेल्या तिखट कांद्यामुळे डोळ्यात आलेलं पाणी तिथल्या तिथ आटलं. असो , सद्य कान्देबाजारावर अश्या शेलक्या भाषेत लिहिलेल्या लेखामुळे मराठीत " प्रहसन (बहुधा दुसऱ्याला न दुखावता केलेली खेचाखेची अस काहीतरी असाव ) " हा वाङमय प्रकार अजून जिवंत आहे अस वाटलं आणि आनद झाला ....आणि असे ' प्रहसनकार ' आमचे मित्र आहेत हे उमजल्यावर ' उर ' अजूनच भरून आला . BTW सध्या " तश्या " कार्यक्रमात " कांद्या पोह्याला काही पर्याय उपलब्ध झालाय का ?
Post a Comment