Oct 15, 2018

बेरंग

दाराची कडीसुद्धा वाजणार नाही, याची काळजी घेत ती दबक्या पावलांनी घराबाहेर पडली.

तिला प्रचंड धाकधूक वाटत होती. कुणी आपल्याला बघणार तर नाही ना, कुणी आपल्याला काही बोलणार तर नाही ना, याची काळजी होती. सुदैवानं शेजारीपाजारी आपल्या कामात गुंतले होते. दोन घरं पलीकडे राहणारी नीलिमा खिडकीपाशीच होती, पण आभाळात कुठेतरी नजर लावून बसली होती.

लिफ्टचं बटण दाबून ती लिफ्ट येण्याची वाट बघत बसली. सकाळच्या वेळी लिफ्टमध्ये कुणी ना कुणी असणारच! त्यांनी काही विचारलं तर? तिला काळजी वाटली.

आज तिला कुणाचीच नजर नकोशी झाली होती.

काही क्षणांत लिफ्ट आली. सहाव्या मजल्यावरून खाली जायचं म्हणजे मध्ये कुणी ना कुणी लिफ्ट थांबवणार, आपल्याला बघितल्यावर काहीतरी चौकशी करणार...!

जिन्यानं जावं का?

तिनं दोन क्षण विचार केला. लिफ्टचं दार उघडलं.

``please close the door!`` लिफ्टसुंदरी बोंबलू लागली.

तिनं मनाचा हिय्या केला. काय होईल ते होवो, लिफ्टनंच जायचं! तिनं लिफ्टमध्ये पाऊल ठेवलं आणि ग्राउंड फ्लोअरचं बटण दाबलं. सहा मजले उतरून जातानाचे 15-20 सेकंद तिला युगांसारखे भासत होते.

तिच्या सुदैवानं मधल्या मजल्यांवरच्या कुणीही लिफ्टचं बटण दाबलं नाही. ती ग्राउंड फ्लोअरवर पोहोचली. इथे तरी नक्कीच कुणीतरी समोर भेटणार, अशी सार्थ भीती तिला वाटली. पण सुदैवानं तळमजल्यावरही कुणीही नव्हतं. तिनं तसाच घाईघाईत स्कार्फ गुंडाळला आणि ती बाइकवर बसून भुर्रर्रर्र करून निघाली. आज तिनं खालच्या निर्मलाकाकूंना काही सांगितलं नाही, की सोसायटीबाहेरच्या दुकानदार काकांना बाय केलं नाही, की वाटेतल्या देवळात दर्शन घ्यायला ती थांबली नाही.

तिच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नव्हती. नेमकं वाटेत कुणीतरी ओळखीचं भेटेल की काय, अशी धाकधूक होती. 45 सेकंदांच्या सिग्नलसाठी चौकात थांबतानाही ती अस्वस्थ होती. तिच्या नशीबानं तिचा ऑफिसपर्यंतचा प्रवासही सुखरूप पार पडला.

या ऑफिसमध्ये ती नव्यानेच जॉइन झाली होती. स्टाफ कमी होता आणि सगळ्यांशी नीट ओळखीही झाल्या नव्हत्या. प्रत्येकाचे स्वभाव, सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, सणवार साजरे करण्याची पद्धत, याबद्दल तिला फारशी कल्पना नव्हती.

आज घरातून बाहेर पडण्यापासून ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत तिच्या मनात जी भीती होती, त्यामागेही हेच कारण होतं.

तिच्या नशीबाने तिला आज या प्रवासात कुणी टोकलं नव्हतं. कुणी ओळखीचं भेटलं नव्हतं, कुणी हिणवलं नव्हतं, कुणी काही कमेंट केली नव्हती.

 

ती धावतपळत ऑफिसमध्ये पोहोचली.

एकदा ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिच्या मनातली भीती पूर्णपणे संपणार होती. तिला हायसं वाटणार होतं. एवढी पायरी ओलांडली की झालं, असं तिला वाटलं!

तिची धाकधूक आता अगदी शेवटच्या स्टेजला होती.

तिनं ऑफिसच्या दारात पाय ठेवलं मात्र...

ऑफिसमध्ये नव्यानंच जॉइन झालेल्या रिसेप्शनिस्टनं विचारलेल्या प्रश्नानं तिच्या सकाळपासूनच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, ``काय मॅडम, आजचा रंग निळा आहे, माहिती नाही होय तुम्हाला?``

 

-    अभिजित पेंढारकर.

No comments: