चित्रपट पाहण्याचं आमचं व्यसन जुनंच. अगदी लहानपणापासून कधी आयशी-बापसाचा डोळा चुकवून, कधी लाडीगोडी लावून, कधी "बंडल' मारून थेट्राच्या वाऱ्या आम्ही करत आलोय. (वि. सू. "आम्ही' म्हणजे कोण, असा बावळटासारखा प्रश्न विचारू नका. "आम्ही' म्हणजे आम्ही स्वतः. म्हणजे मी...घरी-दारी किंमत नाही; निदान व्यक्तिगत पातळीवर तरी आदर मिळवू द्या राव!) झापा-बिपाच्या थेट्रात पिक्चर पाहिला नाही कधी; पण सत्यनारायाणाच्या पूजेच्या निमित्तानं शेतात, काट्याकुट्यात, बांधावर, झाडावर, कुठेपण बसून पिक्चर पाह्यलेत.
चित्रपटांचं हे व्यसन कधी लागलं, काही सांगता येणार नाही. (देव आनंद कधी बहकला, महेश भट कधीपासून वाईट चित्रपट काढायला लागला, हे नेमकं सांगता येईल का? ते जाऊ दे! ...गेला बाजार ममता कुलकर्णी, शिल्पा शिरोडकर, सोनम, किमी काटकर, कधीपासून बघवेनाशा झाल्या सांगता येईल का? ...तसंच आहे हे!!) तर सांगण्याचं तात्पर्य हे, ही हे चित्रपटवेड अगदी प्राचीनच म्हणायला हवं. चौथीत असताना पहिल्यांदा आई-बापाव्यतिरिक्त, एका टवाळ पोराबरोबर पिक्चर पाह्यला होता...अमिताभचा "इन्किलाब'. तेव्हापासून ते "गणपती बघायला जातोय' सांगून पाहिलेल्या "राम तेरी गंगा मैली' किंवा "टारझन' (आपला गावठी टारझन...हेमंत बिर्जेचा...बो डेरेकचा हल्ली हल्ली पाहिला बरं का...!) व्हाया हे व्यसन आता पोरीबरोबर "चक दे इंडिया' पाहण्याची कसरत करेपर्यंत कायम राहिलंय...चित्रपट पाहण्याचं वेड (किंवा असभ्य भाषेत "खाज'च म्हणा!) एवढं, की कुठलंही थेटर, कुठलाही वर्ग, कुठलंही ठिकाण आपल्याला वर्ज्य नाही. अगदी "निशात', "अल्पना', "भारत', "श्रीकृष्ण', "श्रीनाथ'पासून ते "ई-स्क्वेअर', "आयनॉक्स'पर्यंत मोठी "रेंज' आहे आपली! बाकी, मल्टिप्लेक्सला फक्त ऑफिसच्या खर्चानंच पिक्चर परवडतो म्हणा!
बरं, कुठलाही हिरो, कुठलीही हिरॉईन वर्ज्य नाही आपल्याला!तुम्ही देव आनंदचा "मैं सोलह बरस की' पाहिलाय?...मी "फर्स्ट डे फर्स्ट शो', "वसंत'ला पाहिलाय! सकाळी साडेनवाच्या ठोक्याला!त्याच्या "गॅंगस्टर', "सेन्सॉर', अशा सिनेमांची नावंही अनेकांना माहित नसली, तरी ते मी पाहिलेत. स्वतःच्या खर्चानं, तिकीट काढून....लॉजवर राहत असताना रात्री साडेनऊचा पिक्चर बघायचा आणि जेवायला वेळ नाही, म्हणून आधी डबा खोलीवर आणून ठेवून, रात्री साडेबाराला रूममेटना त्रास नको, म्हणून अंधारात जेवण्याचा पराक्रमही मी केलाय!मिथुन, सुजॉय मुखर्जी, करण कपूर, अरमान कोहली...यापैकी कुणाच्याही पिक्चरला मी थेट्रातून एक क्षणही हललेलो नाही...अर्ध्यावर निघून जाण्याची तर गोष्टच सोडा!तर असं हे आमचं चित्रपटवेड.पण आता वय नाही राहिलं, तेवढ्या उत्साहाचं. संसाराचा भार पेलताना परवडतही नाहीत, असली "थेरं'.कधीकधी फारच उबळ आली, तर जातो. बहुधा...एकटाच!परवा असाच एक पराक्रम केला...माझ्या अडीच वर्षांच्या मुलीबरोबर...मनस्वीबरोबर एकट्यानं चित्रपट पाहण्याचा...!"चक दे इंडिया' पाहायचा तर होता, पण कुणाबरोबर जाणं जमत नव्हतं. म्हणून मनस्वीला घेऊनच जायचं ठरवलं.
"सिटीप्राईड कोथरूड'ला 90 रुपयांचं तिकीट आणि वर पार्किंगला पाच रुपयांची दक्षिणा देऊन आत प्रवेश मिळवला. ती राहतेय की नाही, ही धाकधूक होतीच...कारण तिला घेऊन आधी एकच पिक्चर पाहिला होता...महेश कोठारेंचा "जबरदस्त'. पण त्या वेळी बायकोही बरोबर होती आणि पिक्चर मराठी असल्यानं तिलाही (म्हणजे, मनस्वीला...फालतू विनोद कसले करताय?) थोडंफार कळत होतं. या वेळी थोडी अवघड परीक्षा होती...हिंदी चित्रपट तिच्या पचनी पाडण्याची. म्हणजे, तिला काय माझ्यासारखं परीक्षण वगैरे लिहायचं नव्हतं, पण ती निदान अडीच तास थेटरात बसणं आवश्यक होतं.
रांगेत राहून तिकीट काढलं आणि पहिलीच रांग मिळाली. चित्रपटाआधीच्या संगीताचा दणदणाट सुरू झाल्यावरच मनस्वी घाबरली. एकतर पहिल्या रांगेत असल्यानं पडदा अंगावर येतोय, असंच वाटत होतं. त्यातून डॉल्बी डिजिटल का फिजिटल काय ती साऊंड सिस्टीम. कसं सहन करावी त्या एवढ्याशा जिवानं? बरंच काही समजावल्यावर मग राहिली. दहा मिनिटांतच तिचा खुराक सुरू झाला. डब्यातून आणलेली बिस्किटं, बाकरवड्या, वेफर्स, नानकटाई, सगळं चरून झालं. वीसेक मिनिटांनी मागच्या रिकाम्या खुर्च्या बघून शाहरूख खानची बूज राखण्यासाठी मागे जाऊन बसलो. मग मात्र मनस्वी जरा थंडावली. एकतर तिला (फुकटात) स्वतंत्र सीट मिळाली होती, वर खुराकही चालू होता.
तिच्या अधूनमधूनच्या बडबडीचा माझ्याशिवाय कोणाला त्रास होत नव्हता.इंटरव्हलच्या काही मिनिटं आधीपासूनच तिची चुळबुळ सुरू झाली. नंतर आईस्क्रीम घेऊन देण्याची लालूच मी तिला दाखवली होती. त्यासाठी ती उतावीळ होती. दारं बंद आहेत, लाईट चालू नाहीत वगैरे कारणं तिच्या गळी उतरली नाहीत. तेवढ्यात इंटरव्हल झाला आणि माझ्याच जिवात जीव आला. इंटरव्हलमध्ये आईस्क्रीम आणि पॉपकॉर्नसाठी 55 रुपयांची फोडणी बसली. आईस्क्रीम खाण्याचा कार्यक्रम यथासांग (पॅंट, टी शर्ट, तोंड, हात आणि सर्वांग रंगवून) झाला. हात पुसून टाकायला तिचा विरोध होता. (स्वच्छतासम्राज्ञीच ना ही!) त्यामुळं चरफडत तिला घेऊन बेसिनपर्यंत जाणं आलं. तिथून थेटरात परल्यावरही तिला तोंड धुवायचं राहिल्याचं लक्षात आलं. म्हणजे, तोंड धुतलं होतं तिचं, पण चूळ नव्हती भरली. (रोज घरी सकाळी तोंड धुताना आणि दात घासताना घाम काढते कार्टी!) समजावण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यावर पुन्हा बाथरूमची वारी करावी लागली. बरं, लेडीज टॉयलेटमध्ये जावं, तरी पंचाईत! शेवटी अपंगांसाठीच्या राखीव टॉयलेटमध्ये तिचं तोंड विसळावं लागलं. तरीही तिचं समाधान झालं नाहीच. पुन्हा खुर्चीवर येऊन बसल्यावर तिनं हात धुण्याचं टुमणं लावलं. मग पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतच तिला हात धुवायला सांगितलं, तर बयेनं तोंडात पाणी घेऊन पाचकन चूळही भरली खुर्चीखाली!अरे कर्मा! कुणी बघितलं नाही म्हणून नशीब!नाहीतर पुण्यातले तथाकथित उच्चभ्रू वास्सकन अंगावर भुंकले असते...!!
11 comments:
haa.haa.. farach surekh! tumachi mulagi tumachyahi peksha mahaan chitrapaT-rasik nighaNar he nakki. :-)
Kharach, wachun khup maja aali.Ha "Anubhav" aamhalahi upyogi yeil.
Hey... r u Abhijit Pendharkar, one who writes in Sakal??
Nice 2 c u on blogger :) keep writting
आम्ही चित्ररसिक मनस्वीपणे चित्रपट पाहतो. तुम्ही तो मनस्वीसह पाहता! आता शिशुवर्गाची एखादी सहल घेऊन आर्काईव्हमध्ये एखादी आर्ट फिल्म दाखवायला नेऊ शकतोस तू!
...आणि एक सांगायचं राहिलं... साधी फुगडी, लोळणफुगडी, झिम्मा, हादग्याची गाणी, शीर्षासन, वक्रासन, उत्तानपादासन (बाप रे! काय नाव आहे!) वगैरे करायला शीक तोपर्यंत... आणि हो, शिकवणी तर घरीच आहे....
kharach surekh.....
aapali chitrapat samiksha ekdum sahi asate...we just like to read it....
keep it up yaar
good luck
niks
lage raho abhijit bahi
amazing experience :)
छान लिहीलय. माझा ब्लाग आहे झुळुक.
sherachi sawwasher distey.
eka chaglya chitrapatichi tar udvyala tumchyasarkhyache kai jatay, pat kharach tumchyasarkhyani picture baghun upyog nahi, hech tumhala kalat nahi, jo pictrue hit aahe, a khupch chan aahe, tyathi tumhala vatratpana suchto, aso,
kutryache sheput vakde
Post a Comment