Aug 29, 2007

टाळण्याची कला...

आजच्या "सुपरफास्ट' जगात सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या कुठली असेल...? नको असलेल्या लोकांना टाळायचं कसं, याची. व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता वर्ग वगैरे घेतले जातात, तसा टाळण्याच्या कलेचा वर्गही घेण्याची नितांत गरज आहे...ही कला अवगत असलेल्या आणि नसलेल्यांविषयी एक "स्वैर' चिंतन...
-----------

एका सहकाऱ्यानं टाळण्याच्या कलेवर लेख लिहायला सुचवलं, तेव्हा प्रथम टाळण्याचाच प्रयत्न केला; पण नंतर टाळण्याची कला अवगत आहे की नाही, असा विचार केला, तेव्हा अंतरात्म्याचं (या अंतरात्म्याचा भाव हल्ली फारच वाढलाय) नकारार्थी उत्तर आलं. (आपली गोची इथंच होते!) त्यामुळं लेख लिहिणं टाळणं टाळता येण्यासारखं नव्हतं.

तर...टाळणं. आयुष्यात काय काय टाळावं लागतं नाही! आणि काय काय टाळावंसं वाटतं, तरीही जमत नाही! आपल्याला आपल्या अपत्याचा जन्मही टाळता येतो; पण स्वतःचा जन्म मात्र नाही. एक वेळ दुसऱ्याला टाळता येतं; पण स्वतःला टाळता येणं अशक्‍यच. लोकांना टाळणं हा काही जणांचा हातखंडा खेळ असतो. काही जणांना मात्र टाळण्याची कलाच अवगत नसते. कुणाकुणाला टाळावंसं वाटतं, याची यादी करायची म्हटली तर भलीमोठी होईल. दूधवाला, पेपरवाला, कचरेवाली, लाइट बिलवाले, टेलिफोन बिलवाले, मोबाईल बिलवाले, मेंटेनन्सवाले, प्रॉपर्टी टॅक्‍सवाले हे महिन्याच्या महिन्याला किंवा ठरलेल्या तारखेला हजर म्हणजे हजर! एक वेळ रोजचा रतीब चुकवतील, खाडा मांडायला चुकतील; पण बिल न्यायला ठरलेल्या तारखेला यायला चुकतील तर शपथ!! बरं, तोंडावर भाव असा, की आठ-आठ दिवस उपाशी आहेत आणि आपल्या शंभर-दोनशे रुपयांच्या बिलानं त्यांच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे.

काही दूधवाले, पेपरवाले मात्र प्रेमळ असतात. महिन्याच्या महिन्याला बिलं पाठवत नाहीत; पण जेव्हा पाठवतात, तेव्हा ती आपले डोळे पांढरे करणारी असतात. एकदम सहा-सहा महिन्यांची बिलं. म्हणजे "भीक नको पण कुत्रं आवर'सारखी अवस्था. त्यावर व्याज लावत नाहीत, हे नशीब. ही झाली आपण घेतलेल्या सेवेसाठी पैसे मागणाऱ्या लोकांची उदाहरणं. आपल्याला नको असलेल्या सेवेबद्दलदेखील पिडणारे कमी नाहीत. त्यांना टाळावं कसं, याचे प्रशिक्षण वर्ग घेतले, तर धो धो चालतील. काही काही सोसायट्यांवर पाट्या दिसतात- "फेरीवाले, विक्रेते यांना सोसायटीत प्रवेश बंद.' पण फोनवरून कुठल्या कुठल्या उत्पादनांबद्दल गळ घालणारे आणि "आमच्याकडून यंदा कर्ज घ्याच...' अशी प्रेमळ विनंती करणाऱ्या फेरीवाल्यांना कसं अडवणार?

बॅंका हल्ली "फ्रॅंचायझी' नेमतात आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना ग्राहकांवर "छू' करतात. हे "फ्रॅंचायझी' खरोखर भुकेल्या कुत्र्यासारखे आपल्यावर तुटून पडतात. सगळ्यात वात आणतात ते क्रेडिट कार्डवाले. एक वर्षासाठी फुकट, अमक्‍या रकमेच्या खरेदीवर तमकं फुकट असल्या "ऑफर' घेऊन हे विक्रेते दिवसभर फोनमध्ये तोंड घालून बसलेले असतात. त्या ऑफरची माहिती देऊन झाली, की लगेचच आपण त्याला होकार देऊन टाकणार आणि काही क्षणांत त्यांचा प्रतिनिधी आपल्या घरात येऊन आपल्या कुठे कुठे सह्याही घेऊन जाणार, हे त्यांनी अगदी गृहीतच धरलेलं असतं.

काही काही अनुभव तर भीषण असतात. आता हेच एक उदाहरण पाहा... एका खासगी बॅंकेच्या मधाळ आवाजाच्या युवतीनं एका ग्राहकाला फोन केला आणि कुठल्याशा "पर्सनल लोन' योजनेची माहिती दिली. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, काही क्षणांत 50 हजारांचं कर्ज मिळू शकतं वगैरे. तिचं बोलणं संपल्यावर म्हणाली, "मग हवंय ना तुम्हाला कर्ज?' तो म्हणाला..."नाही'. तर म्हणाली, "का सर?'...तिला भयंकर नैराश्‍य आलं होतं. एवढी चांगली योजना असूनही हा बाबा कर्ज का घेत नाही, याचं. अरे...? पण त्याला कर्ज नकोच असेल, तर कशाला घ्यायचं? उद्या तुम्ही म्हणाल, हजार रुपयांच्या हप्त्यावर विमान देतो. ते काय गच्चीवर उडवू की काय? अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना.

या लोकांची घरी फोन करण्याची वेळही झक्कास असते. सकाळी नऊ, रात्री आठ, भर दुपारी दोन किंवा तीन...वाट्टेल तेव्हा! आपण दुपारी वामकुक्षी घेत पहुडलेले असताना घणघणणारा फोन उचलण्यासाठी चरफडत उठायचं आणि ऐकायचं काय, तर कुठल्यातरी बॅंकेच्या क्रेडिट कार्डाची, कर्ज योजनेची, नाहीतर कुठल्या तरी कंपनीच्या बक्षीस योजनेची माहिती. आपण बाहेर निघालेलो असताना अचानक येऊन टपकणाऱ्या पाहुण्यांना, नको असताना पत्र पाठविणाऱ्यांना / फोन करणाऱ्यांना, आपल्यालाच फोन करायला लावून अघळपघळ बोलत बसणाऱ्यांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या उखाळ्यापाखाळ्या करणाऱ्यांना कसं टाळायचं, हीदेखील एक समस्याच. लोकांच्या उधाऱ्या घेऊन वर त्यांनाच काहीबाही कारणं सांगून आपल्याविषयी सहानुभूतीच वाटायला लावणारे महाभाग काही कमी असतात? पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून आपल्याला टाळणं, ही त्याच्यासाठी समस्या नसतेच. उलट, तो पुन्हा पैसे मागू नये म्हणून त्याला टाळणं ही आपल्यासाठीच समस्या बनते.

टाळण्याची कला ज्यांना येते त्यांच्याकडून ती शिकून घ्यावी, हे बरं. उद्या त्यांनाच टाळायचं झाल्यास "गुरूची विद्या गुरूला' वापरता येईल. असो. टाळाटाळीवर बरीच टकळी चालवली.

आता "टळलेलं' बरं.

2 comments:

स्नेहल said...

hehehehe.... mast lihilay :)

बॅंका हल्ली "फ्रॅंचायझी' नेमतात आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना ग्राहकांवर "छू' करतात. हे "फ्रॅंचायझी' खरोखर भुकेल्या कुत्र्यासारखे आपल्यावर तुटून पडतात.
he jaast awadal :0

अभिजित पेंढारकर said...

thanks, snehal!
you too write very good!