Jul 3, 2008

कशी शांतता शून्य शब्दांत येते....

तो किंवा ती आपल्याला मनापासून आवडते. आपल्या काळजातच घुसते. कुठल्याही अपेक्षेनं नव्हे, पण निव्वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आपण प्रेमात पडतो. त्यानं/तिनं आपल्याशी मैत्री करावी, असं वाटतं. पण ती एका मर्यादेपलीकडं आपल्याला फार भीक घालत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी, वेगळ्या वाटेनं जातो. पण व्यर्थ!
ती (व्यक्ती) कुठलीही असू शकते. कुठल्याही पार्श्‍वभूमीची, कुठल्याही प्रवृत्तीची. आपल्याला आवडते, ती तिची प्रवृत्ती. जगण्याची कला. धडाडी, कर्तबगारी, शैली, बोलण्या-वागण्याची पद्धत, एखाद्या विषयातला अभ्यास, विचार, मतं मांडण्याची पद्धत, यांपैकी काहीही. आपल्याकडे तो गुण नसतो कदाचित, म्हणून आपण तिचा आदर करायला लागतो. तिच्याकडून आणखी काही शिकता यावं, असं वाटतं. त्यासाठी तिच्याशी मैत्री करायला हवी असते. तिनं आपल्यासाठी खास काही करावं, काही द्यावं, अशी अपेक्षा नसते. पण थोडा वेळ तिच्या सहवासात राहता यावं, असं वाटत असतं. तिच्या सोबत राहून जेवढं टिपता येईल, तेवढं आपल्याला टिपायचं असतं. तिच्या खासगी गोष्टी तिनं सांगाव्यात, अशी अपेक्षा नसते, पण आपल्या खासगी गोष्टींत तिचा सल्ला मिळेल, निदान तिच्या सहवासाचा काही प्रभाव पडेल, असं वाटत असतं.
ती कुणी "ग्रेट' असतेच, असं नाही. पण सर्वसामान्यांपेक्षा कुठल्या तरी बाबतीत वेगळी असते. काही एक वेगळा गुण असतो, ज्याचं आपल्याला आकर्षण वाटत असतं आणि आपल्यात तो नसल्याबद्दल रुखरुखही. पण तिला आपल्याबद्दल फारसं वाटत नसतं. औपचारिक ओळख ठेवण्यापलीकडे मैत्री सरकत नाही. मैत्रीच्या तारा काही छेडल्या जात नाहीत. आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, पण तिला त्याची फारशी कदर नसते. निदान आपल्या मैत्रीच्या प्रयत्नांचा आदर राखण्याएवढंही सौजन्यही कधी कधी वाट्याला येत नाही. हा तिचा दोष असतो, की आपल्याच अवाजवी अपेक्षांमधला फोलपणा?
तुम्हाला हा अनुभव आलाय कधी? मला हज्जारदा आलाय! अनेकदा तोंडघशी पडलोय, अनेकदा त्रास करून घेतलाय. अगदी मनापासूनचा म्हणवणारा मित्र काही कारण नसताना दुरावल्याचा. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडल्याची साक्ष देणाऱ्याकडून नंतर काहीच संपर्क न साधला गेल्याचा. कॉलेज संपल्यावर नातंही संपल्याचा. आणि आपण कितीही ओढीनं आपली सुख-दुःखं सांगितल्यानंतरही, त्यांची परतफेड न झाल्याचा. आपण अतिशय प्रामाणिक राहिल्यानंतरही, त्याच्या आयुष्यातला अगदी महत्त्वाचा टप्पाही दुसऱ्याच्या तोंडून कळण्याचा.
आपल्या चांगल्या/वेगळ्या कामगिरीकडे, कलेकडे नियमितपणे लक्ष ठेवून त्यात सूचना करणारा, कान धरणारा, सल्ले देणारा कुणीच मित्र असत नाही? गरज असल्याशिवाय, आपल्या आयुष्यात काय चाललंय, याची चौकशी करावीशीही त्याला वाटत नाही?
खरंच खरी मैत्री एवढी दुरापास्त आहे? व्यावहारिकतेच्या, धावपळीच्या आयुष्याच्या, अर्थाजनाच्या बंधनांनी तिला जखडून, संपवून टाकलंय? कधीतरी हॉटेलात जाणं, फोनवर बोलणं, एसएमएस करणं, यापलीकडे मैत्री जाऊ शकत नाही? नोकरी, जबाबदाऱ्या यांची बंधनं मैत्रीच्या नात्यापेक्षाही तीव्र असतात?
चांगल्या मैत्रीची गरज काय फक्त एकटेपणीच असते? अगदी जगण्याचं रहाटगाडगं व्यवस्थित चालू असतानाही मित्रांशी उत्तम नातं नाही राखता येत?
-------------

3 comments:

Devidas Deshpande said...

काय अभिजीत, अचानक गंभीर? जास्त सिरियस होऊ नकोस, तब्येतीला मानवणार नाही.

Sneha said...

hmm barobar aahe manasik garaja paN asatatat.. aani bhetan ashakya kadhich nasat.. pan aajkal bhetanyachi ichcha aani trivrata kami jhaliye


...Sneha

अमित said...

अहो पेंढारकरकाका [post वाचल्यावर अचानक आपण एकता कपूरच्या सिरीअल सारखे एका दिवसात २० वर्षांनी मोठे झाला आहात असं वाटलं, म्हणून काका... :)] काय अचानक serious??? आजारी वगैरे पडलात की काय? मला तरी असले विचार फ़क्त आजारी पडल्यावरच येतात. :)

आणि मला तरी असं कधीच वाटलं नाही. जगात बरेच लोक आहेत की, मग कुणीतरी एक आपल्याला विसरलं तर काय बिघडलं. तो/ती आपल्याबरोबर असताना आपल्याला जेवढं टिपता येईल तेवढं घ्यायचं, जर समोरच्याला आपलं वेगळं असणं खरच भावल असेल तर मला नाही वाटत तो/ती आपल्याला विसरेल, कदाचित आयुष्याच्या धावपळीत भेटायला वेळ नसेल मिळत. पण तुमच्या म्हणण्याप्रमाणे खरंच एखादी व्यक्ती तुम्हाला विसरत असेल तर मग ती जे काही म्हणाली ते तोंडदेखलं होतं आणि तुमचे खरे गुण त्या व्यक्तीला कधी कळलेच नाहीत, मग अशा व्यक्तीने आपल्याला विसरण्याचा त्रास आपणच का करुन घ्यायचा?

आता तुम्ही जसा विचार तुम्हाला विसरत चाललेल्यांबद्दल करत आहात तसाच विचार तुमचे काही मित्र [जे तुमच्यातुन काहीतरी टिपण्याचा प्रयत्न करत असतील, कदाचित तुमच्या नकळत; आणि तुम्हाला मात्र ते तितकेसे जवळचे वाटत नसतील]करत असतीलच की? मग, जे गेले त्यांचा विचार करायचा की जे आपण स्वत:हून घालवतोय [कदाचित, नकळत] त्यांना जवळ करायचं?

कुणीतरी म्हटलंच आहे ना... Love them who loves you. :)

आणि इतकं serious लिहू नका हो, उगीचचं घाबरायला होत... :D