"पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
दारास भास आता हळुवार पावलांचा...'
दर वर्षी वातावरण पावसाळलं, की मला या गाण्याची अनिवार ओढ वाटतेच. पावसाळ्यात दर दोन दिवस आड ही कॅसेट (हो, कॅसेटच! "सीडी' नाही!) घरी वाजतेच. पण यंदा अजून एकदाही लावावीशी वाटली नाही. खरंच, यंदा वरुणराजा रुसलाय!
मी जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात उटी-कोडाईकॅनॉल सहल ठरवली, तेव्हा अनेकांनी वेड्यात काढलं होतं. पावसाने सहल बुडते की काय, असं नंतर मलाही वाटायला लागलं होतं. पण त्यानं कृपा केली. फारसा त्रास न देता सहल व्यवस्थित पार पडली, तेव्हा कोण आनंद झाला होता! पण तोच आनंद पुण्यात परतल्यावर मावळला.
पहिल्या धारेचा पाऊस यंदा झेलता आला नाही. पहिल्या आठवड्यात इथे, कोकणात तो दणकून कोसळला. तेव्हा मी तमिळनाडूत बागडत होतो. आल्यावर जो तोंड घेऊन पळाला, तो आतापर्यंत! जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे चिपळूण-राजापूर-संगमेश्वर, महाड, सांगली, मुंबई किमान दोनदा तरी पाण्यात बुडाल्याच्या बातम्या, कुठेतरी दरड कोसळल्याची दुर्घटना, धबधब्यांनी ओसंडून वाहणाऱ्या घाटांचे फोटो, अनुभवायला मिळणारच! पण यंदा ही दृश्यं फारच दुर्मिळ!
पावसाळा म्हणजे ट्रेकिंगला उधाण! दरवर्षी ड्यूक्स नोज आणि जमल्यास तोरणा हे ट्रेक तर मी चुकवतच नाही! पण यंदा तोरण्याला अजिबात जावंसं वाटलं नाही. आमच्या "गिरीदर्शन'चे जूनअखेरीस तोरणा आणि जुलैअखेर ड्यूक्स नोज ट्रेक ठरलेले. पण तोरणा तरी यंदा हुकला. किंबहुना, हुकवला. पाऊसच नाही, तर जायचा उत्साह कसा वाटणार? ड्यूक्स नोज पर्यंत तरी तो कोसळेल, अशी अपेक्षा.
पावसाळ्याच्या अनेक आठवणी आहेत. एकतर माझा भयंकर आवडता सीझन. दोन-चारदा पावसात तुडुंब भिजल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. विशेषतः ट्रेकला जाताना अजिबात रेनकोट बिनकोट न्यायचा नाही, मनसोक्त भिजायचं आणि गच्च ओले कपडे तसेच अंगावर वाळवायचे, बदलायचेही नाहीत, हा आपला नेम. ट्रेक नसला, तरी रेनकोट बाळगण्याचे कष्ट न घेता, ऑफिसातून नखशिखांत भिजून घरी जायचे प्रसंग दोन-तीनदा तरी आलेच पाहिजेत! पुण्यात 97 साली आलो, तेव्हा दोन वर्षे माझ्याकडे रेनकोटही नव्हता. कारण रत्नागिरीच्या पावसातून आलेल्या मला पुण्याचा पावसाळा म्हणजे झाडांना पाणी शिंपडल्यासारखा होता!
रत्नागिरीत तर पावसात धुमशान असायचं. कॉलेजात असताना थिबा पॅलेसला क्लासला जायचो, तेव्हा परतताना पाऊस लागला, तर वह्या सोबतच्या मुला-मुलींकडे द्यायच्या आणि सायकलवरून मनसोक्त भिजत घरी जायचं, हा आवडता छंद! काय धमाल यायची त्या पावसात! अगदी दोन फुटांवरचंही दिसायचं नाही.
एफ. वाय. ला असताना पावसजवळ भटकंतीला गेलो होतो. तेव्हा जो टपोऱ्या थेंबांचा तुफानी पाऊस झेललाय, तसा नंतर कधी पाहिला नाही. आणि त्यानंतर बस मिळाली नाही, म्हणून वाळू नेणाऱ्या टेम्पोच्या हौद्यात बसून रत्नागिरीपर्यंत हेंदकाळत, ठेचकाळत केलेला प्रवास. त्यातून त्यात टेम्पोच्या हौद्याच्या खालच्या फळ्या निसटलेल्या आणि त्यातून थेट रस्त्यावर पडण्याचा, किंवा गेला बाजार पार मुरगळण्याचा धोका! प्रत्येकाने एकमेकांच्या हाताला घट्ट धरून दिलेला आधार! ओहो!
"रत्नागिरी एक्स्प्रेस'मध्ये काम करताना एकदा रात्री साडेदहाला घरी निघालो, तेव्हा तुफानी पाऊस पडत होता. रेनकोट होता, तरी घरी पोचेन, अशी माझी मलाच खात्री नव्हती. एकतर मिट्ट अंधार, रस्त्यालाही दिवे नाहीत आणि छातीत धडकी भरविणारा विजांचा कडकडाट! माझी तर पाचावर धारण बसली होती!
यंदा मात्र अजून तरी त्यानं कृपा केलेली नाही. मस्त भिजून घरी यावं आणि कांदा भज्यांवर ताव मारावा, अशी इच्छा फार वेळा झालेली नाही. दूरवर भटकायला जावं आणि सोसाट्याचा वारा खावा, असं वाटलेलं नाही. राजा, कधी बरसणार आहेस रे...?
------------
4 comments:
hi tumchi post vachli, mala hi pavsala khup aavdato, pavsat chimb bhijlyashivay pavsala yeun gela ase vatatach nahi, pan khareya halli global warming mule pavsane tond firvale ahe ani tyamule aaplya sarkhya pavsalapremichi kondi jhali ahe
ठाण्याला असताना माझ्या घरातून डोंगरावरून वर्दी देत येणारा पाउस दिसत असे.सगळी कामेधामे टाकून अगदी गाडीही चुकली तरी चालेल. मी तो तिथून नाचत बागडत माझ्यावर सहस्त्र तुषारांनी कोसळेतो डोळे भरून पाहात उभी राहत असे. पाऊस अतिशय आवडीचा. काही लोक इतके hate करतात पावसाला ते पाहून इतकी हळहळ वाटते. किती कमनशिबी आहेत इतक्या सुंदर सुखाला गमावतात. असो.
पोस्ट छान झालीये.
I will not concur on it. I assume nice post. Expressly the designation attracted me to review the sound story.
Good dispatch and this fill someone in on helped me alot in my college assignement. Say thank you you on your information.
Post a Comment