खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता। उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली.
तेव्हा रत्नागिरीत राहत होतो। दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं। वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं. (क्रिकेटच्या मॅच आणि नातेवाइकांची लग्नं परीक्षेच्या काळातच का घेतात, हा बालमनाला पडलेला प्रश्न अजूनही सुटला नाही!) घरच्यांचा आग्रह होता, मीही यावं असा; पण दहावीच्या अभ्यासाचा `कोंडाणा' सर करण्याच्या जिद्दीपुढे मला आत्तेबहिणीच्या लग्नातल्या आनंदाची फिकीर नव्हती.
तीन-चार दिवस आई-बाबा पुण्याला जाणार होते. घरात आमचं एकट्याचंच राज्य होतं. दूध बरंच शिल्लक होतं, म्हणून त्याचं दही लावलं. तेही शिल्लक राहिलं, तेव्हा काय करायचं, असा प्रश्न पडला नाही. सुपीक डोक्यात श्रीखंडाची कल्पना शिजली. (धोतराच्या फाडलेल्या) मऊसूत फडक्यात रीतसर दही टांगून ठेवून चक्का वगैरे केला. दीड-एक दिवसानं घट्ट चक्का झाला. मग त्यात साखरबिखर घालून, घाटून श्रीखंड केलं. तशी पोळी-भाजी रोज करत होतोच; पण श्रीखंड पोळीबरोबर कसं खायचं? म्हणून पुऱ्या लाटून तळल्या. फर्मास बेत झाला. घरी एकट्यानं मांड ठोकून त्यावर ताव मारला. कुणी वाटेकरी नको, की कुणाची अडचण नको.
दुसऱ्या दिवशी शिऱ्याचा बेत आखला होता। माझा पहिलाच स्वतंत्र प्रयोग होता। तशी रेसिपी माहीत होती; पण प्रत्यक्ष कधी प्रयोग केला नव्हता. साधारण जेवढी कढई भरून शिरा हवा, तेवढाच रवा, या हिशेबानं पाच सहा मुठी रवा घेतला. सुमारे तासभर लागला असेल, शिरा व्हायला. एवढं करून तो गोळाच्या गोळा. दोन दिवस फक्त शिराच खात होतो!चौथ्या दिवशी आई पुण्याहून आली आणि सगळी आवराआवर करताना उरलेला अर्धी कढई शिरा तिला फ्रीजमध्ये दिसला. त्यानंतर काय रामायण झालं असेल, याचा अंदाज कुणालाही येऊ शकेल.
"अभ्यास करायचा म्हणून लग्नाला आला नाहीस आणि तुझे हे धंदे?''
...जणू काही मी घरच विकून खाल्लं होतं! पण ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता।
त्या दिवशी मला भूक नसतानाही एका जागी मांडी ठोकून तो शिरा तिनं (प्रेमानं) खायला घातला..
...पुढचं वर्षभर मी शिऱ्याचं नाव काढलं नाही!
No comments:
Post a Comment