Sep 9, 2008

गणपती बाप्पा मोरया!

गणपती म्हंजे कोकणी मान्साचो वीक प्वाइंट। गणपतीला घरी न जायील, तो कोकनी म्हनायचाच

सांगूक काय होता, की दरवर्सारमानं कोकनात गेल्तो।

औंदा सगळ्या दिवसांसाठी नाय, तर फकस्त चारच दिवसांसाठी. पण मजा आली.एकतर पहिल्या दिवशी येणार नाही, म्हणून आई भडकली होती. पण चार दिवस गेलो, हेही नव्हते थोडके।


रत्नागिरीत पोचलो तेव्हा गणपती घरी येऊन दोन दिवस झाले होते. पण "घरचा गणपती' आला नसल्याने पंचपक्वान्नांचा नैवेद्य बाकी होता. पहिल्याच दिवशी आईनं मोदकांचा घाट घातला. मीही थोडे हात साफ केले, पण काही जमलं नाही. मनस्वीही लुडबुड करायला बसली होती. संध्याकाळी गावातले दोनचार गणपती बघून आलो. फादरांच्या गाडीला सध्या ड्रायव्हर नसल्यानं मी गेलो की मीच ड्रायव्हर. मग काय, इकडे जाऊ नि तिकडे जाऊ. लालबागच्या राजासारखा यंदा तिकडे "रत्नागिरीचा राजा' हा मोठा गणपती बसवला आहे. तो पाहिला. संध्याकाळी आरती बिरती आणि मग गुडूप!

दुसऱ्या दिवशी गणपतीपुळ्याला जायचा घाट घातला होता. घरी कुणीतही हवं म्हणून आई घरी थांबली आणि आम्ही फादरांसह तिकडे गेलो. प्रवास धमाल होता. गणपतीपुळे आमच्या घरापासून आता अगदी 26 किलोमीटरवर आलंय. त्यातून रस्ताही मस्त आणि निसर्गरम्य! जातानाचा आरे-वारे पूल तर सुंदरच! ("फुल 3 धमाल' या चित्रपटात तुम्ही कदाचित पाहिला असेल.) पाऊण तासात गणपतीपुळ्याला पोचलो. दर्शन घेऊन किनाऱ्यावर उधळलो. मनस्वीला भरपूर खेळायचं होतं, पण आम्हाला जेवायला घरी यायचं होतं. मग तिथलं कोकण दर्शन प्रदर्शन न पाहताच माघारी फिरलो. येताना थोडासा रस्ता चुकलो, पण त्यामुळं दोन किलोमीटर वाचले. एकूण सहल झकास झाली.नंतरचे दोन दिवसही घरगुती व सार्वजनिक गणपती पाहणे, फिरणे, यात गेले।

विसर्जनाला यंदा मी पहिल्यांदाच गणपती घेतला होता. शेजारच्या तळ्यात मी स्वतःच विसर्जन केलं. वडिलांची गादी आता मुलाकडे आली म्हणायची! अप्पांनी तर पुढच्या वर्षी माझ्यावर जबाबदारी टाकण्याची घोषणा करून हात झटकून टाकले!संध्याकाळी काळ्या समुद्रावर (रत्नागिरीत काळी वाळू आणि पांढरी वाळू असलेले दोन समुद्रकिनारे आहेत. त्यांना काळा समुद्र आणि पांढरा समुद्र म्हणतात.) विसर्जन पाहायला गेलो. तिथेही मजा आली. आम्हाला रात्रीच्या गाडीसाठी लवकर परतायचं होतं. त्यामुळं फार वेळ आनंद नाही घेता आला.प्रवास ठीक झाला, पण रात्रभर पाऊस होता. सकाळी रिक्षा मिळवतानाही बोंब झाली. कसेबसे पहाटे साडेपाचला घरी पोचलो।

एकत्र आरत्या वगैरे म्हणण्याची परंपरा हल्ली लुप्तच झाली आहे. लहानपणी आम्ही घरोघरी जाऊन आरत्या म्हणायचो. पूर्वी मिऱ्या भागात अनेकांकडे घरगुती गणपती आणि देखावे पाहण्यासारखे असायचे. हल्ली तेही नाही. थोडेफार उरलेत, त्यांचाही उत्साह मावळला आहे. ब्राह्मणेतर लोकांमध्ये गणपतीचा उत्साह आणि एकोपा अजून दिसतो. बामण मात्र त्याबाबत चिकू मारवाडी आणि हातचं राखून वागणारे!असो. आता यंदाही पुण्यातले देखावे बघायला फारसा वेळ मिळेलसा वाटत नाही.

ता. क. गेल्या वर्षीच्या गणपतीच्या पोस्टसाठी इथे पाहा....
http://abhipendharkar.blogspot.com/search/label/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87

आणि फोटो इथे...
http://picasaweb।google।com/abhi.pendharkar/ycmnb

2 comments:

Anonymous said...

नमस्ते,
तुमच्या कोकण च्या सफरी विषयी वाचून फार आनंद जहाला.लय भारी !
शिक्षनाच्या निमित्ताने का होईना पण माला तिन वर्ष कोकणात राहता आल.इंजीनियरिंग ला धक्क्याला लावून,खिशात फुटकी कवदिही नसताना सायकल वरुण कोकण हिंडलो .हल्ली जायला होत नाही...चला आज आठवणी ताज्या जहाल्या.
कल्याण

Santosh Kulkarni said...

I belongs to `deshavaracha`... dont know Konkan. Your nice sharings of typical konkani manoos gives feel of being Konkani!