Sep 11, 2008

मेगा`ब्लॉग'

न्यू यॉर्कहून परतीच्या प्रवासात बच्चनसाहेब अस्वस्थ होते. विमानाच्या कॉरिडॉरमध्ये येरझारा चालू होता। सारखा ते कुणालातरी फोन करायचा प्रयत्न करत होते (बहुधा अमरसिंहांना असावा), पण लागत नव्हता. त्यातून त्यांची अस्वस्थता वाढत होती.
``सर, मे आय हेल्प यू? वुड यू लाइक टु हॅव सम कॉफी ऑर ड्रिंक?'' एक हवाईसुंदरी मार्दवी सुरात म्हणाली। मुळात बच्चनसाहेबांशी आपल्याला बोलायला मिळालं, याचंच तिला कौतुक
""नो, थॅंक्‍स।'' बच्चनसाहेबांनी शक्‍य तेवढ्या सौजन्यानं तिला उडवून लावलं।

बच्चनसाहेबांचं सामान वगैरे पुन्हा गायब झालं की काय, असं त्या हवाईसुंदरीला वाटलं। आता आपल्या एअरलाइन्सचं आणि नोकरीचं काही खरं नाही, अशी भावना तिच्यासह अन्य काही कर्मचाऱ्यांच्या मनात दाटून आली. मात्र या वेळी पुरेशी खबरदारी घेतली असल्याचं अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कळवल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.
बच्चनसाहेबांनी "नवरत्न तेल' चोळून पाहिलं, पण त्याचाही उपयोग झाला नाही। चित्रपटसृष्टीतल्या चाळीस वर्षांच्या प्रवासातील चढउतार ज्या तेलाच्या भरवशावर त्यांनी पार केले, त्यानं या वेळीही साथ देऊ नये, याचा त्यांना मनस्वी राग आला. पण तरीही "इमेज'ला ते मारक असल्यानं ते गप्प राहिले. खरं तर "एबीसीएल' गाळात गेली तेव्हा, रेखा प्रकरण सर्वाधिक चर्चेत होतं तेव्हा, बंगल्यावर जप्ती आली तेव्हाही एवढी अस्वस्थता बच्चनसाहेबांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे या वेळचं नेमकं कारण काय असावं, याचं सर्वांना कुतूहल आणि कोडंही होतं. अखेर एकदाचं विमान मुंबई विमानतळावर उतरलं. बच्चनसाहेबांचा मोबाईल सुरू झाला, "न्यूज अलर्ट'ही मिळाले.
अचानक "युरेका युरेका!' थाटात ते ओरडले, ""अरे मिल गया, मिल गया!''
कुणीतरी सहकारी सोबत होता।
"क्‍या मिल गया साब?''
""अरे भैया, ब्लॉग के लिये नया विषय मिल गया!''
""साब, मराठी में बोलो, हम मुंबई में हैं।'' सहकाऱ्यानं जाणीव दिली।
``अरे हां!'' बच्चनसाहेब म्हणाले, ""मिळाला, मिळाला, ब्लॉगसाठी विषय मिळाला।''
तेव्हा कुठं सर्वांच्या लक्षात आलं, की "अनफर्गेटेबल टूर'मधल्या बऱ्याचशा विस्मरणीय अनुभवांवर लिहिल्यानंतर आता ब्लॉगवर काय लिहायचं, हा यक्षप्रश्‍न त्यांना पडला होता. मुंबईत "रेंज' मिळाल्यानंतर जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून उडालेला गदारोळ त्यांना समजला। त्यांनी तातडीनं विषय मिळाल्याचं जया बच्चनना कळवलं आणि त्याचबरोबर वादाबाबत माफी मागण्याचा सल्लाही त्यांना दिला. घराच्या परतीच्या वाटेवर लॅपटॉप उघडून स्वतःच्या ब्लॉगवरही माफीनामा लिहून टाकला.
ता. क. :"डॅड'च्या ब्लॉगसाठी नवा विषय देण्यासाठी आता अभिषेकनं ऐश्‍वर्याकडे आग्रह धरलाय म्हणे!

1 comment:

Ruhi said...
This comment has been removed by the author.