दोन वर्षांपूर्वी ब्लॉगचं विश्व माझ्यासाठी खुलं झालं, त्या वेळी अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या. ब्लॉग क्षेत्राविषयी मला फारसं माहीत नव्हतं. अगदी ब्लॉग लिहून ते वाचणार कोण, असाच प्रश्न मनात होता. त्यामुळं काही महिने दुर्लक्ष झालं होतं. बऱ्याच अवांतर गोष्टी लिहीत होतो, पण अजूनही बरंच काही लिहू शकतो, मांडू शकतो, हे ध्यानात आलं नव्हतं. ध्यानात आलं, तरी कुठे आणि कसं मांडावं, हे कळत नव्हतं. पेपरमधून ते मांडणं शक्य नव्हतं, कारण वृत्तपत्रीय लेखनाला असलेल्या मर्यादा. अशात आमच्या देविदास देशपांडे या सहकाऱ्यामुळं या ब्लॉग प्रकरणाविषयी अधिक माहिती मिळाली. ब्लॉग कसा लिहायचा, पोस्ट कशा टाकायच्या, लेआऊट कसा करायचा, फॉंट कसे-कोणते निवडायचे, इथपासून ते ब्लॉग इतर वाचकांपर्यंत कसा पोचवायचा, या सगळ्याची माहिती त्याच्या मार्गदर्शनाखेरीज शक्य नव्हती.
ब्लॉग सुरू केला, पण सुरुवातीला लिहायचा कंटाळाच करायचो. मग "सकाळ'मध्येच प्रसिद्ध होणारे लेख नि परीक्षणं टाकण्याची पळवाट शोधली. पण त्यात काही अर्थ नाही, हे लवकरच लक्षात आलं. ब्लॉग चालवायचा म्हणजे त्यासाठी स्वतंत्र लिखाण केलं पाहिजे, हे पटलं. मग वेगवेगळे विषय सुचत गेले. नियमितपणे लिहायला लागल्यावर तर असं लक्षात आलं, की एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेल्यावर तिथेच ब्लॉग लिहिण्यासाठी फोटो वगैरेची तयारी आपण आपसूक सुरू करत आहोत. ब्लॉगच्या जोडीला पिकासा, ऑर्कुट, मनोगत नि मिसळपावची जोड मिळाली आणि ब्लॉगविश्व आणखी खुललं.
ब्लॉग अनेक विषयांवर, अनेक क्षेत्रांतले लोक लिहितात. त्यांचीही निरीक्षणं करू लागलो. पण अभ्यास वगैरे शक्य नव्हतं. इंटरनेटवरून वाचन करायला एक प्रकारची निष्ठा आणि पेशन्स लागतो. माझ्यात तो नाही. पण मित्रांचे ब्लॉग वाचणं आणि त्यातून सादरीकरण, लिहिण्याचे विषय निवडणं, ही प्रक्रिया सोपी झाली. ब्लॉग लिहिताना मी स्वतः मात्र वैयक्तिक अनुभवांवर भर दिला. राजकीय, सामाजिक विषय अभावानेच लिहिले. तसे विषय लिहायचे, तर त्यासाठी वेगळा आणि स्वतंत्र शैलीचा ब्लॉग सुरू करायला हवा. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि नाही.
वैयक्तिक अनुभवांना मात्र भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातलाच हा पहिला अनुभव म्हणजे माझी ब्लॉगवरची पहिलीवहिली पोस्ट. तिला तब्बल 11 प्रतिसाद मिळालेत. आज वीस हजारांच्या टप्प्याच्या निमित्तानं ती पोस्ट खाली पुन्हा प्रसिद्ध करतोय.
आतापर्यंतचा ब्लॉगचा अनुभव प्रसन्न, आनंददायीच आहे. मनातल्या अनेक गोष्टी इंटरनेटच्या पानांवर उतरवता आल्या. अजून अनेक उतरवायच्या आहेत. आयुष्यातल्या अनेक टप्प्यांविषयी, व्यक्तींविषयी लिहिण्याचं मनात आहे. पण मूड लागल्याशिवाय ते प्रत्यक्षात उतरत नाही. आता मात्र नेमानं आठवड्याला दोन तरी पोस्ट टाकण्याचा संकल्प आहे.
पुन्हा एकदा तुमच्या सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल, पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्यावर, ब्लॉगवर असंच प्रेम यापुढेही कायम ठेवा!!
7 comments:
मनःपुर्वक अभिनंदन.. आणि पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.
अभिनंदन मित्रा... असेच नवेनवे लिखाण करत तू लाखोंचा टप्पा गाठशील, असा मला विश्वास आहे...
अभिनंदन मित्रा... असेच नवेनवे लिखाण करत तू लाखोंचा टप्पा गाठशील, असा मला विश्वास आहे...
आशिष चांदोरकर
Hi Abhijit, thanx and heartiest congratulations. i always look forward to your posts.
मस्तरे!!!!!!! भिडू!!!!! भन्नाटच अचिव्हमेंट आहे. फार अवघड आहे इतके सातत्य आणि वैविध्य! कीप-इट-अप
मस्तरे!!!!!!! भिडू!!!!! भन्नाटच अचिव्हमेंट आहे. फार अवघड आहे इतके सातत्य आणि वैविध्य! कीप-इट-अप
Best of luck!!!
Post a Comment