Mar 12, 2010

दत्तकविधान-10

मनस्वी त्याला कशी स्वीकारणार, हा आमच्यापुढे मोठा प्रश्‍न होता. तिची घरातली एकट्याची सद्दी संपेल, तिच्या कौतुकात, लाडांत वाटेकरी आल्यानं ती बिथरेल, टोकाची प्रतिक्रिया देईल अशी आम्हाला शंका होती. तिनं हा प्रश्‍न तिच्या निरागसपणानं आणि मनस्वितेनं चुटकीसरशी सोडवून टाकला आणि आम्हाला तोंडघशी पाडलं. आपल्याला भाऊ मिळाल्याचा केवढा आनंद झाला होता तिला! "त्याला आणायला आपण हॉस्पिटलमध्ये कसं गेलो नाही, आईला तिथे का ठेवावं लागलं नाही,' वगैरे कुठलेही प्रश्‍न तिला पडले नाहीत. किंबहुना, पडले असले, तरी तिला त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. तिला खेळायला एक हक्काचं बाळ मिळालं होतं, बस्स! तिच्यासाठी तेवढं पुरेसं होतं. (आम्ही त्यासाठी करून ठेवलेली पूर्वतयारी आमच्यापाशीच राहिली.) त्याचं सगळं आता तिला करायचं होतं. त्याचे लंगोट बदलणं, त्याला दूध पाजणं, मांडीवर घेऊन खेळवणं, त्याला उचलून घेऊन घरभर मिरवणं...!यातलं फक्त निम्मंच करायची आम्ही तिला परवानगी दिली होती. ती देखील आमच्या उपस्थितीत. तरीही, तो रडत असला, तरी दामटून त्याला मांडीवर घेऊन थोपटण्याची आणि पायांवर घेऊन दूध किंवा पाणी पाजण्याची हौस ती अधूनमधून भागवून घेतेच! त्यानं कितीही विरोध नोंदविला, तरी! त्याला अधूनमधून गोष्टीही सांगते आणि कधीकधी तर त्यानं अंगावर "शू' केल्यानंतर उदार मनानं त्याला माफ करते! आमच्या आधी ती त्याच्याशी एकरूप झाली! निरागसपणा कधीकधी जाणतेपणावरही मात करतो, तो असा!!मनस्वीला लहानपणापासून आम्ही पाहिलं होतं, हाताळलं होतं. त्यामुळं तिचं दुखणंखुपणं माहित होतं. या बाळाचं सगळंच नवं होतं. त्याला दर तीन तासांनी खायला घालावं लागत होतं. रात्रीसुद्धा! त्यामुळे रात्री खाल्ल्यापासून बरोब्बर तीन तासांनी तो गजर लावल्यासारखा किंचाळून उठायचा आणि दूध गरम करून पुन्हा थंड करून आणेपर्यंत घर आणि सोसायटी डोक्‍यावर घ्यायचा. तिथे संस्थेत त्याला बाटलीच्या दुधाची सवय होती. ती मोडणं हे आमचं पहिलं ध्येय होतं. (बाटलीतून पोटात जाणाऱ्या अतिरिक्त हवेमुळे मुलांना वातासारखे बरेच त्रास होतात.) पहिले दोन दिवस त्यासाठी हर्षदाला जंगजंग पछाडावं लागलं आणि बऱ्याच यातना भोगाव्या लागल्या. त्याच्या तोंडाला साजेसा चमचा मिळणं, तो हिरड्यांना, ओठाला न लागता त्याला व्यवस्थित दूध किंवा खाणं खायला घालता येणं, ही अग्निपरीक्षाच होती. त्यातून "बाटलीची माझी सवय मोडणारे तुम्ही कोण,' या अहमहमिकेनं तो जमेल त्या पद्धतीनं वाटी-चमच्याचा निषेध नोंदवायचा. डॉक्‍टरांनी आम्हाला सुपाचा चमचा वापरायचा सल्ला दिला, तो पथ्यावर पडला. सुपाच्या चमच्यानं तो छान दूध पिऊ लागला आणि त्याला होणारा त्रासही कमी झाला. पण हा प्रयोग फक्त दोन-तीन दिवसच करावा लागला. नंतर त्याला नेहमीच्या वाटीचमच्याची छान सवय झाली.हळूहळू बेट्यानं उजव्या हाताचं दुसरं बोट तोंडात घालायची छान सवय लावून घेतली आणि रात्री दर तीन तासांनी किंचाळून उठणंही कमी झालं. फक्त त्याला गुंडाळून ठेवलेलं असेल आणि बराच आटापिटा करूनही हात बाहेर काढता आला नाही, तर तो आकाशपाताळ एक करायचा, तेवढंच. त्यामुळे कधीकधी तर बिचारा बोटं चोखण्याच्या नादात आपली भूकही मारून टाकायचा. मग कधीतरी अपरात्री त्याच्या बोटं चोखण्याच्या आवाजानंच जाग यायची आणि त्याला खायला घालण्याची तारांबळ उडायची.त्याची किरकोळ आजारपणंही घरी आल्यावर बरी झाली आणि आम्ही सुटकेचा निःश्‍वास टाकला. आता निमिष आमच्या घरात छान रुळलाय. मनस्वी आणि त्याच्यात समतोल साधणं, दोघांना तेवढंच प्रेम देणं आणि दटावणं आणि छान पद्धतीनं वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. यश येईल, अशी अपेक्षा!
ता. क. ...एक सांगायचंच राहिलं. निमिषला सांभाळायला आता घरी एक बाईही येऊ लागल्या आहेत. हर्षदा थोड्याच दिवसांत ऑफिसला जॉइन होईल. त्यामुळं या बाईंचा घरी आधार. त्याची "बाटली'ची सवय आम्ही लहानपणीच सोडवली. आता "बाई'ची सवय लागल्यास आमचा नाइलाज आहे!

(समाप्त)

6 comments:

कैलास गांधी said...

खूप छान वाटला तुमचा निर्णय आणि दत्तक विधानचा प्रवास सुद्धा!
पुन्हा एकदा बाप झाल्याबद्दल 'अभी'नंदन!!!
आणि खूप खूप शुभेच्छा !!!

विनय़ा said...

विचारापासून ह्या निर्णयापर्यंत आणि निर्णयापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास सोपा नक्कीच नसणार. सो, त्याबद्दल अभिनंदन.

अभिजित पेंढारकर said...

धन्यवाद, कैलास.
धन्यवाद, विनया.
मनापासून प्रतिक्रियांबद्दल.

sunil chavan said...

Dear Abhijit Great! good decision and nicely writing.

Anonymous said...

^^Abhijit great...! u knw what i liked is u shared this with us...i knw u will shape Nimish's life very well

rajaram. l. k. said...

tu great ahes. खूप खूप शुभेच्छा !!!